‘‘आय वॉज रिअली बिईंग टफ अ‍ॅण्ड सो वॉज ही. अ‍ॅण्ड देन वी फेल इन लव्ह. ही रोट मी ब्यूटिफुल लेटर्स अ‍ॅण्ड दे आर ग्रेट लेटर्स.’’ अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्याबाबत ३० सप्टेंबर २०१८च्या एका सभेत केलेली ही विधाने. अर्थात सिंगापूरमध्ये १२ जून रोजी या उभय नेत्यांमध्ये झालेल्या शिखर परिषदेचा संदर्भ त्यास होता. ती परिषद अपयशी ठरली. गेल्या आठवडय़ात व्हिएतनामच्या हनोईमध्ये झालेल्या दुसऱ्या परिषदेची फलनिष्पत्तीही शून्य ठरली आणि या दोन नेत्यांचा बेभरवशीपणा अधोरेखित झाला. ट्रम्प यांनी किम यांच्यासोबत पुढील चर्चेचा आशावाद कायम ठेवला असला तरी त्याच्या फलनिष्पत्तीवरील प्रश्नचिन्ह गडद होऊ लागले आहे.

‘‘आता किम यांना चर्चेत स्वारस्य राहिले नसावे. ट्रम्प आणि अमेरिकेने एक हजार वर्षांतून एकदा येणारी संधी गमावली आहे,’’ असे वक्तव्य उत्तर कोरियाच्या उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई यांनी केले. हे विधान त्यांचे स्वत:चे नसून किम यांनी त्यांना तसे बोलायला सांगितले असावे, असा अंदाज ‘सीएनएन’च्या संकेतस्थळावरील ‘हाऊ ट्रम्प अ‍ॅण्ड किम्स समीट फेल अपार्ट’ या शीर्षकाच्या लेखात वर्तवण्यात आला आहे. ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांच्या स्फोटक जाबजबाबामुळे ट्रम्प यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा निवडून येण्यालाच ट्रम्प यांचे प्राधान्य असल्याने ते किम यांच्यासाठी फार वेळ देणार नाहीत, असा अंदाज ‘सीएनएन’च्या दुसऱ्या एका लेखात व्यक्त करण्यात आला आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला तर अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या किम यांच्या भूमिकेला सुरुंग लागेल. कोरियन द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित करण्याच्या ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे ईन यांच्या प्रयत्नाबाबत डेमोक्रॅटिक नेते साशंक आहेत, याकडेही लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र किम यांनाही खरेच अमेरिकेशी आणि दक्षिण कोरियाशी शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा आहे का किंवा त्यांचा हेतू स्पष्ट आहे का, असा प्रश्नही अनेक माध्यमांनी उपस्थित केला.

हनोई परिषदेचे अपयश हा किम यांचा विजय आहे. अमेरिका मान्यच करू शकणार नाही, हे माहीत असलेल्या मागण्या मांडण्यासाठी किम यांनी ट्रम्प यांना या परिषदेत उपस्थित राहण्यास भाग पाडले, असे निरीक्षण ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील ‘ट्रम्प गॉट प्लेड बाय किम जोंग उन अगेन’ या शीर्षकाच्या लेखात नोंदवण्यात आले आहे. वाईट करारापेक्षा करारच न करणे कधीही उत्तम. पण किम यांनी ट्रम्प यांना खेळवत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करताना या लेखात अमेरिकी नागरिक ओट्टो वार्मियर याच्या मृत्यूचे उदाहरण देण्यात आले आहे. उत्तर कोरियाच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ओट्टो यांचा मृत्यू झाला. तिथे त्यांचा छळ झाल्याचा आरोप आहे. मात्र ओट्टो यांना देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल आपल्याला कल्पनाच नव्हती, या किम यांच्या दाव्यावर ट्रम्प यांनी विश्वास ठेवला, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

‘चिथावणीखोरीचे कृत्य केल्यानंतरच जगाचे आपल्याकडे लक्ष वळते याची जाणीव उत्तर कोरियाला आहे. त्यामुळे उत्तर कोरिया पुन्हा अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणी करील,’ अशी भीती ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका लेखात व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प यांना अतिउत्साह नडला. निर्दयी हुकूमशहाशी चर्चा ठीक, पण त्याची तोंडभरून स्तुती करणे ही आपल्या मूल्यांशी प्रतारणा ठरते, असे या लेखात म्हटले आहे.

ट्रम्प आणि किम हे पहिल्या भेटीत एकमेकांना आजमावण्यात कमी पडल्याने चर्चा फिस्कटली, असे निरीक्षण ‘डेली मेल’मधील एका लेखात नोंदवण्यात आले आहे. उत्तर कोरियातील माध्यमांनी मात्र ही लक्षणीय प्रगती असल्याचा सूर आळवला. दोन्ही देशांनी परस्पर विश्वास आणि आदर वृद्धिंगत केला, असे ‘केसीएनए’ने म्हटले आहे. हनोई परिषदेच्या अपयशात चीनचा हात असल्याचा निष्कर्ष ट्रम्प यांनी काढला, तर उभय देशांदरम्यानची व्यापारविषयक चर्चा धोक्यात येईल, याकडेही माध्यमांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ट्रम्प आणि किम यांना शांतता चर्चा यशस्वी करायची असेल तर आधी विश्वासार्हता कमवावी लागेल.

संकलन : सुनील कांबळी

Story img Loader