किशोरीताईंशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी आज मनात रूंजी घालत आहेत. वास्तविक त्यांच्याविषयी काय लिहायचं, हा मोठा प्रश्नच पडला आहे. अनेक कार्यक्रम आम्ही एकाच संध्याकाळी एकाच व्यासपीठावर केले आहेत. आमची पहिली भेट १९५७मध्ये झाली. त्या वेळी मी पहिल्यांदा जम्मू-काश्मीरवरून जोधपूरला गेलो होतो. तेथे रेडिओवर एक मैफिल होती. त्या वेळी किशोरी आमोणकर तेथे आल्या होत्या. त्यांचे गाणे तेथे होते. त्या वेळी पहिल्यांदा त्यांचे गाणे ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या कलेमुळेच परिचय वाढला.
१९६०मध्ये मी मुंबईत आलो. त्यानंतर तर किशोरीताई यांच्याशी भेटीगाठी होऊ लागल्या. त्यांच्या गाण्यात सगळ्याच चांगल्या गोष्टीच होत्या. त्यांच्या अनेक मैफिलींचा मी साक्षीदार आहे. काही प्रत्यक्ष, तर काही ध्वनिमुद्रीत केलेल्या मैफली मी अनुभवल्या आहेत. त्यांचे गाणे ऐकताना त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांचे गाणे होते, हे लक्षात येत असे. अगदी नीटस आणि दुसऱ्याला शांत करणारे असे त्यांचे गाणे होते. मला आवडणाऱ्या, माझ्या तबियतीला पसंत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या गाण्यात होत्या. त्यांचे गाणे अत्यंत श्रीमंत होते. पण ही श्रीमंती डोळ्यात खुपणारी नव्हती, तर डोळ्यांना सुखावणारी होती.
किशोरीताईंच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लोकांना रिझवण्यासाठी कधीच गाणे केले नाही. मनोरंजन करायला त्या कधीच गात नसत. त्यांचे गाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या स्वभावाशी जोडले गेले होते. किंबहुना त्यांच्यापासून गाणे वेगळे करणेच शक्य नव्हते. त्यांच्या गाण्याला अध्यात्माचा आधार होता. ते गाणे ‘रूहानी’ होते, आत्म्याला आनंद देणारे होते. अनेक कलाकार प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी गातात. त्यांच्या गाण्यात चित्रापेक्षा चौकटीला जास्त महत्त्व असते. किशोरीताईंनी तसे कधीच गायले नाही. लोकांना अंतर्मुख करण्यासाठी त्या गायल्या. त्यांचे गाणे ऐकल्यानंतर श्रोत्यांना दुसरे काहीच सुचत नसे. चार-चार दिवस लोक त्यांनी गायलेल्या रागांच्या धुंदीत असत. त्या ८४ वर्षांच्या होत्या, पण या वयातही सरस्वतीची कृपा त्यांच्यावर होती.
गेल्याच आठवडय़ात दिल्लीतील एका मैफिलीत त्या गायल्या. नुसत्या गायल्या नाहीत, तर श्रोत्यांना व साथीदारांना भान हरपायला लावणारे त्यांचे गाणे होते. आजही त्या गायला बसल्या की, वय वगैरे सगळ्या गोष्टी गौण वाटायला लागत. त्यांना सुरांचे देणे होते आणि त्यांनी ते अगदी शेवटपर्यंत सांभाळले. त्यांचे गाणे हे ईश्वराशी तादात्म्य पावणारे होते आणि त्या अवस्थेपर्यंत त्या श्रोत्यांनाही घेऊन जात. त्यांनी शेवटपर्यंत आपल्या संगीतमूल्यांशी तडजोड केली नाही.
त्यांना मृत्यू आला तोदेखील एखाद्या तपस्विनीला यावा त्याच शांतपणे! कोणालाही पत्ता लागू न देता त्यांच्या आत्म्याने देहाची कुडी सोडली. कसलाही त्रास नाही, कुठेही काही अमंगळ नाही! हे मरण ऋषींचे असते. ते किशोरीताईंना आले. आता उर्वरित आयुष्य त्यांच्या अनेक मैफिलींची आठवण काढत आणि ध्वनिमुद्रीत झालेले त्यांचे स्वर कानांमध्ये साठवत काढणे राहिले आहे.