|| अभिजीत ताम्हणे
‘‘बुद्धिवादी लोक पॉप्युलिझम किंवा जनप्रियतावाद हा विचार न करणाऱ्यांचा प्रांत मानतात; म्हणून मग लोकांचे अनुभव आणि कलाकृती यांचा ताळमेळ राहात नाही. त्याऐवजी यंदाच्या ‘कोची बिएनाले’साठी कलाकृती निवडताना, लोकांकडे विचारशक्ती असतेच, अशा विश्वासानं मी काम केलं’’- अशा शब्दांत चित्रकर्ती आणि कोचीन शहराच्या ‘फोर्ट कोची’ बेटावर दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महा-प्रदर्शनाच्या यंदाच्या नियोजक अनिता दुबे यांनी प्रेक्षकांच्या विचारशक्तीला कलाकृतींतून चालना देण्याची उमेद व्यक्त केली. या प्रचंड प्रदर्शनातल्या सुमारे ५०० कलाकृती कशा असतील, याची उत्सुकता वाढवणारंच हे प्रतिपादन होतं आणि आहे! पण, खरोखरच अनिता दुबे यांच्या या भूमिकेप्रमाणे यंदाची ‘कोची बिएनाले’ आहे का?
या मुद्दय़ावर कदाचित दुमत असेल. त्याला कारणं आहेत. ती नंतर पाहू. पण मुळात एवढय़ा प्रचंड प्रदर्शनांबद्दल दुमतच काय, कितीही विविध मतं असू शकतात, हे लक्षात ठेवू आणि आधी या प्रदर्शनाची थोडीफार माहिती घेऊ. कोची बिएनालेची यंदा चौथी खेप. जगभरात सुमारे २५० बिएनाले (किंवा बायएनिअल, बिनाले अशा विविध उच्चारांनी ओळखली जाणारी) समकालीन दृश्यकलेची महाप्रदर्शनं भरतात. त्या नकाशावर भारताला दमदारपणे आणून ठेवणारी पहिलीवहिली ‘कोची बिएनाले’ १२/१२/१२ या तारखेला (१२ डिसेंबर २०१२ रोजी) सुरू झाली होती. त्यानंतर दर दोन वर्षांनी, १२ डिसेंबर याच तारखेला हे प्रदर्शन फोर्ट कोची इथल्या ‘अस्पिनवॉल हाउस’मध्ये ध्वजारोहण करून सुरू होतं आणि साधारण मार्चपर्यंत चालतं. यंदाची कोची बिएनाले २९ मार्चपर्यंत सुरू राहील. या महाप्रदर्शनाचं महत्त्वाचं वैशिष्टय़ असं की, कार्यरत असणारे चित्रकार – दृश्यकलावंतच अख्ख्या महाप्रदर्शनाचे ‘क्युरेटर ’ किंवा नियोजक (गुंफणकार) असतात. दृश्यकला हा बिएनालेचा गाभा असला तरी फिल्म, संगीत, नाटय़ात्म सादरीकरणं, व्याख्यानं, प्रकट मुलाखती आणि चर्चा यांचीही रेलचेल असते. मुख्य प्रदर्शनाची आठ ठिकाणं आणि तेवढीच अन्य, सहयोगी प्रदर्शनस्थळं, १५० हून अधिक देशी- विदेशी चित्रकार किंवा दृश्यकलावंत असा या महाप्रदर्शनाचा पसारा असतो, तसा तो यंदाही आहेच. याखेरीज, देशभरच्या कलामहाविद्यालयांतील सुमारे १०० निवडक विद्यार्थी कोचीच्याच ‘स्टूडंट बिएनाले’मध्ये सहभागी झाले आहेत. यंदाच्या कोची बिएनालेतील काही कलाकृती प्रेक्षकालाही सहभागी करून घेणाऱ्या आहेत. इथल्या सर्व कलाकृतींची माहिती इंग्रजी आणि मल्याळम् भाषेत लिहिण्यास आली आहे. कोची बेटावरल्या फोर्ट कोची आणि मट्टनचेरी परिसरातच ही सर्व प्रदर्शनस्थळं असली, तरी चित्तप्रसाद, मृणालिनी मुखर्जी आणि कृष्णकुमार या तिघा दिवंगत कलावंतांचं खास उपप्रदर्शन एर्नाकुलम भागातील दरबार हॉलमध्ये आहे.
या दरबार हॉलमधल्या प्रदर्शनापैकी कृष्णकुमार हे १९८० च्या दशकातील ‘रॅडिकल ग्रूप’चे संस्थापक आणि यंदा कोची बिएनालेच्या नियोजक असलेल्या अनिता दुबे यादेखील याच गटाच्या सदस्य होत्या. रॅडिकल ग्रूपने कला ही अभिजनवादी किंवा थोडय़ांसाठीच असू नये, असं मत जपलं होतं. ‘विचारशक्ती सर्वाकडेच असते आणि मी या सर्वासाठी प्रदर्शनाची गुंफण करते आहे’ अशी जी भूमिका अनिता दुबे यांनी मांडली, त्याचा इतिहास हा असा आहे. ‘पण प्रत्यक्षात ती भूमिका इथं दिसते का?’ या प्रश्नावर, कोचीमध्ये या बिएनालेच्या उद्घाटनावेळी उपस्थित राहिलेल्या अनेक चित्रकार – शिल्पकारांनी नन्नाचा पाढा लावला. ‘अनितानं आणखी प्रयोग करायला हवे होते.. आत्ता ती म्हणत्येय लोकांसाठी केलं, पण कोचीतल्या आधीच्या साऱ्या बिएनालेंनादेखील सामान्यजनांचा भरघोस प्रतिसाद होताच की नाही? मग यंदा काय वेगळं झालंय.. नेहमीसारखंच तर आहे सगळं!’ असा साधारण, या अनेक कलावंतांच्या प्रतिक्रियांचा सरासरी सूर होता.
पण बिएनालेत चार दिवस फिरल्यानंतर, हा सूर खरा मानण्यात काही अर्थ नाही, असं वाटू लागलं. ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय अनुभवांचा परामर्श घेणाऱ्या कलाकृतींचा समावेश यंदाही बिएनालेमध्ये असला, तरी बालपण, स्त्रीत्व, समलैंगिकता, लैंगिक अत्याचार अशा सर्वसामान्य जीवनानुभवांना भिडणाऱ्या कलाकृती यंदा अधिक आहेत, असं हे महाप्रदर्शन पाहताना जाणवू लागलं.
इथल्या काही कलाकृती प्रेक्षकाला अचंबित करणाऱ्या, प्रचंड आकाराच्या आहेत. स्यू विल्यमसन यांनी गुलामीचा इतिहास हा विषय मांडण्यासाठी साखळदंड, वाहतं पाणी, समुद्राचे प्रतीक म्हणून साचलेलं पाणी यांचा वापर मांडणशिल्पात केला आहे. इसवीसनाच्या १७ व्या शतकापासून, नायजेरियातून गुलाम म्हणून शेकडोजणांना युरोप वा अमेरिकेत पाठवलं गेलं. अमेरिकेला जाणाऱ्या जहाजांत हे गुलाम कोंबले गेले, त्यांपैकी प्रत्येक जहाजातले किमान पन्नासेक गुलाम प्रवासादरम्यान प्राणास मुकले. याचा थेट हिशेब, त्या काळातल्या नोंदींचा शोध घेऊन विल्यमसन यांनी मांडला आहे. विल्यम केंट्रिज यांनी तब्बल आठ मोठय़ा पडद्यांवर साकारलेला चलच्चित्रपट वसाहतवादाचा इतिहास मोजक्याच प्रतिमांतून जिवंत करणारा आहे. इतिहास मांडणाऱ्या या कलाकृतींच्या जवळपासच इथं, अगदी ताज्या विषयांवरल्या कलाकृतीदेखील पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, फ्रान्सच्या तबिता रोझेर यांनी ‘स्मार्टफोन’च्या स्क्रीनसारख्या दिसणाऱ्या मोठय़ा आकारातल्या आठ ‘लाइटबॉक्स’ (प्रकाशित खोक्यासारख्या) कलाकृतींवर ‘चॅट’सदृश सोप्प्या इंग्रजीतलं संभाषण आणि मोजक्याच प्रतिमा यांचा वापर करून, ‘इंटरनेटचे आपण सारे गुलाम – पण मग आपल्याला गुलाम बनवणारे कोण?’ हा विषय हाताळला आहे. किंवा मेक्सिकोवासी दृश्यकलावंत मोनिका मेयेर यांनी, जगभरातल्या महिलांना पुरुषांकडून छुप्या वा उघड लैंगिक छळाचा अनुभव कसा येतो, हे कलाकृतीतून उघड केलं आहे. व्हिडीओ, छायाचित्रं यांबरोबरच मोनिका यांच्या कलाकृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे, पोस्टकार्डाहून जरा कमी आकाराच्या कार्डावर त्यांनी महिलांना विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना अनेक महिलांनीच अनामिक राहून किंवा नाव उघड करून, दिलेली उत्तरं! यापैकी एक प्रश्न आहे, ‘तुम्हाला शाळेत वा वरिष्ठांकडून विनाकारण आणि अ-वांच्छित लगट झाल्याचा अनुभव कधी आला का?’ यावर एका भारतीय महिलेचं उत्तर होतं- मला तर देवालयातसुद्धा असा अनुभव सोसावा लागला आहे.
बालसुलभ कुतूहलानं पाहाव्यात, त्यामागचं साधंसुधं तंत्र जाणून घ्यावं, अशा अनेक कलाकृती कौस्तुभ मुखोपाध्याय या मुंबईच्या गुणी कलावंतानं इथं मांडल्या आहेत. वाया गेलेल्या, टाकाऊ सामानातून त्यानं घडवलेल्या या कलाकृती खेळण्यांसारख्याच वाटतात, बटण दाबून किंवा हातानं चालना देऊन प्रेक्षकही या कलाकृतींशी ‘खेळू’ शकतात. कौस्तुभला यंत्रांचं ‘मरणोत्तर जीवन’ साकारायचं आहे की काय, अशी अभ्यासू शंका काहीजणांना येईलही; पण कौस्तुभनं यापूर्वीही अशाच प्रकारच्या अनेक कलाकृतींमधून, आजच्या यंत्रावलंबी माणसांना याच यंत्रांकडे जरा भावनेनं, जरा जाणिवेनं पाहायला शिकवलं आहे एवढं खरं! असाच एक भन्नाट बालसुलभ अनुभव नागालँडचा दृश्यकलावंत तेम्सूयाँगर लँकुमर यानं दिला आहे.. ‘कॅच अ रेनबो’ हे त्याच्या कलाकृतीचं नाव, आणि सुमारे १५ फूट उंचीवरल्या २५ फूट लांब पायपाच्या छिद्रांमधून हिरवळीवर भुरूभुरू पाऊस पडावा अशी त्यानं केलेली व्यवस्था, एवढंच या कलाकृतीचं पहिल्यांदा दिसणारं रूप. हा पाऊस पडू लागला की प्रेक्षकांनी हिरवळीवर जायचं आणि इंद्रधनुष्य शोधायचं, एवढीच ही कलाकृती. मात्र, इंद्रधनुष्य हे आजच्या काळात समलैंगिकतेचं किंवा लैंगिक बहुविधतेचं आंतरराष्ट्रीय प्रतीक मानलं जातं, हे ध्यानात ठेवूनच या कलाकृतीची योजना लँकूमर यांनी केलेली आहे.
साध्याशा दिसणाऱ्या कलाकृतींमधून आशय ‘नेमका पकडण्या’चं काम कठीणच असतं नेहमी. पण त्यासाठी मदत करणारे माहिती-फलक इथं प्रत्येक कलाकृतीशेजारी लावलेले आहेत. शिवाय, बिएनालेतल्या निवडक कलाकृतींची ‘गायडेड टूर’सुद्धा या महाप्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवडय़ापासून आता सुरू झालेली आहे. अर्थात, या टूरसोबत मोजक्याच कलाकृतींचा आस्वाद घेता येणार. त्यापेक्षा इंग्रजी वाचण्यासाठी नेट लावला, तर भरपूर कलाकृती ‘कळू’ शकतात. अर्थात, अशा पद्धतीनं कोची बिएनाले पाहायला किमान चार दिवस तरी सहज लागतील. पाच-सहा दिवस हातात असतील तर उत्तमच.
थोडक्यात, किती पाहू आणि किती नको, असं इथं होतं. हा अनुभव प्रत्येक बिएनालेत येतो खरा, पण एरवी न बोलले जाणारे विषय आणि काही कलाकृतींचा कठीण आशय सोप्या आणि आकर्षक दृश्यांतून पोहोचवण्याचा अनिता दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. कोचीमधल्या तीन भिंतींवर मूळचा नागपूरचा आणि आता बडोदेवासी चित्रकार पराग सोनारघरे याच्या थक्क करणाऱ्या कलाकृती आहेत.. त्यांच्या आशयातून परागला वयासोबत येणाऱ्या दीर्घदृष्टीचंही सूचन करायचं असलं, तरी प्रेक्षकाला या कलाकृती वेगळ्या कारणासाठीदेखील लक्षात राहतील.. कोची बिएनाले पाहायला ‘दोन डोळे अधिक असते तर.. जास्त पाहता आलं असतं’ या आपल्या अनुभवाशी या मोठय़ा भिंतचित्रांचं नातं आपसूक जोडलं जाईल.
तो अनुभव प्रत्येकाला येणारच आहे. पण कॅमेऱ्यात कलाकृती साठवून, त्यांचा आस्वाद पुन्हापुन्हा घेऊन आपण आपली नजर समृद्ध करू शकतो. त्यासाठी कोचीला जायला हवं, कारण दृष्टीच्या समृद्धीची प्रचंड मोठी संधी देणारं हे महाप्रदर्शन आहे!