शिवराय कुळकर्णी
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईविषयी जाहीरपणे अधिक माहिती मागणे हे केवळ भाजपला विरोध करण्यासाठीच सुरू असल्याचा आरोप करणारे टिपण..
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हाताळलेल्या परिस्थितीत संपूर्ण देश एकवटला असताना एक कंपू मात्र, शोकमग्न आहे. देशापेक्षा सत्तास्वार्थाला महत्त्व देणारी ही टोळी. शरद पवार, ममता बॅनर्जी, नवज्योत सिद्धू, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सुरजेवाला, राहुल गांधी, राज ठाकरे, दिग्विजय सिंह आणि कथित धर्मनिरपेक्ष, डावे, बुद्धिजीवी यांना भारत जिंकण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हरले पाहिजेत, यातच अधिक रस आहे. त्यासाठी पाकिस्तान जिंकला तरी चालेल, आमच्या सन्याची कत्तल झाली तरी चालेल, अशी यांची विकृत मानसिकता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देश शोकमग्न असताना हे राजकीय कुरघोडी करण्यात दंग होते. भारत क्षणागणिक कूटनीतीत यशस्वी होत होता. सन्य प्रत्येक चढाई यशस्वी करत होते. पाकिस्तान हादरला होता. जग थक्क होते आणि यांना चिंता लागली होती मोदींच्या अपयशाची. या कावळ्यांचा शाप लागू न पडल्यावर आता हे सारे ढोंगी एकसुरात आपल्याच देशाला पुरावे मागत सुटले आहेत. मोदी विरोधासाठी एकच विषय पुरावा, पुरावा आणि पुरावा !
पाश्चिमात्य प्रसार माध्यमांचा हवाला देत आपल्या एअर स्ट्राइक चे पुरावे मागण्यात यांना धन्यता वाटते आहे. चोवीस तासात विंग कमांडर अभिनंदनला सोडवून आणा, ही मागणी करणाऱ्या एकवीस पक्षांच्या कंपूला अभिनंदनला सुखरूप आणण्यात रस नव्हता. पाकिस्तान अभिनंदन यांना सोडेल, यावर कोणाचाच विश्वास नव्हता. अभिनंदनला पाक सोडणार नाही आणि मोदी सरकारला धारेवर धरण्यासाठी हा मुद्दा प्रभावी राहील म्हणून सारे विरोधक धाऊन आले. दोनच दिवस आधी आपल्या वायुसेनेने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या छाताडावर सपासप वार केले होते. त्या गिधाडांचा खरा चेहरा जगासमोर आणला होता. म्हणून पाकिस्तान नाक मुठीत धरून अभिनंदनला सोडण्यास तयार झाले. मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान विरोधात वातावरण तयार करत होते आणि ही मंडळी मोदींना घेरण्याच्या तयारीत होती. मोदी, सन्य आणि पर्यायाने भारत यशस्वी झाला. इम्रान खानची आणि पर्यायाने पाकिस्तानची अभूतपूर्व गोची झाली. सोबतच मोदी विरोधकांची देखील पंचाईत झाली.
आता देशाचा सूर एकीकडे आणि मोदी विरोधकांचा सूर वेगळाच आहे. निर्लज्जपणे ते पुरावे मागून शूर सनिकांच्या पराक्रमाचा अपमान करण्यात आघाडीवर आहेत. भारताच्या विजयावर अभिनंदन करण्याचे औदार्य यांनी दाखवावे, ही अपेक्षाही करणे मूर्खपणाचे ठरेल असे वातावरण आहे.
या ढोंगी व भंपक कंपूसोबत प्रसार माध्यमांमध्ये देखील एक मोठा वर्ग आहे. भारताने एअर स्ट्राइक केलेलाच नाही, हे सिद्ध करण्याची चढाओढ लागली आहे. अभिनंदनला साठ तासात परत करणारा पाकिस्तान दयाळू आहे, मानवतेचे जिवंत उदाहरण आहे. साक्षात शांततेचे प्रतीक आहे, असा शोध देखील यांनी लावला आहे. पाश्चिमात्य प्रसार माध्यमांची उदाहरणे देऊन भारतीय जनतेला संभ्रमित करण्याच्या कारस्थानाला ऊत आला आहे. पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राइक वर संदिग्धता वर्तविली आहे. ऊरी नंतर झालेल्या सर्जकिल स्ट्राइकलाही याच माध्यमांनी नाकारले होते. आता एअर स्ट्राइक झालाच नाही, अशा बातम्या त्यांनी रंगवल्या. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, टेलिग्राफ, दि गार्डियन, गल्फ न्यूज अशा अनेक वृत्तपत्रांनी कदाचित जाणीवपूर्वक आपला एअर स्ट्राइक नाकारला. न्यूयॉर्क टाइम्स ने तर एकही माणूस मेला नसल्याचे मांडले. वरचढ ठरत असलेला भारत त्यांना खुपतो.
थोडे मागे वळून पाहिले तर हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्यांची मनोवृत्ती आपण समजून घेतली पाहिजे. १९९८ मध्ये भारताने सर्व महाशक्ती राष्ट्रांना गाफील ठेवून, त्यांची नजर चुकवत अणुचाचणी केली होती. पोखरण मध्ये आपण स्फोट केले. तेव्हाही याच प्रसार माध्यमांनी ते नाकारले होते. जर आपण पोखरण मध्ये केलेली अणुचाचणी त्यांनी नाकारली तर आज ते आपल्याला अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र कसे काय मानतात? आज आपण अणवस्त्रसंपन्न आहोत याची त्यांना खात्री आहे. आपल्या वाढलेल्या सामर्थ्यांची त्यांना पूर्ण जाणीव आहे. तरीही ते अमान्यच करणार. कारण त्यांना ते सोयीचे आहे. तुम्ही अणुचाचणी केली तेव्हा आपण गाफील होतो, हे अपयश लपवायचे असते. कोणी वरचढ ठरतो आहे, कोणी समर्थ बनतो आहे, हा त्यांचा पोटशूळ आहेच. आजचेही त्यांचे वागणे याच केविलवाण्या मनोवृत्तीचा भाग आहे. पण एका बाबतीत ते यशस्वी आहेत. त्यासाठी त्यांना विशेष परिश्रम करण्याची गरज देखील नाही. त्यांच्या या कुटील कारस्थानाला सहकार्य करणारा एक कंपू भारतात आहे. देशासमोरच्या संकटाच्या वेळी मसूद अझहरची, दहशतवादाची आणि पाकिस्तानची बाजू घेण्यात धन्यता मानणारा वर्ग भारतात आहे. तीच टोळी आगामी काळात कोल्हेकुई करणार आहे. त्याला प्रारंभ देखील झाला आहे.
भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या ऐतिहासिक चढाईचा विरोध करणाऱ्या बातम्यांचे स्रोत काय, हा प्रश्न सामान्यजन विचारत नाहीत. हे स्रोत आपण तपासले तर आपल्या लक्षात येईल या घटनेचे वार्ताकन करणाऱ्या कोण्याच पत्रकाराला अजूनही उध्वस्त केलेल्या भागावर जाता आलेले नाही. एअर स्ट्राइक नंतर तासभरात उध्वस्त झालेले परिसर पाकिस्तानने ताब्यात घेतले. पाकिस्तानी पोलिसांनाही प्रवेश नव्हता. रुग्णवाहिका चालकांचे सेलफोनही जप्त होते. या बातम्या छापलेल्या वार्ताहरांनी घटनास्थळापासून दूर असलेल्या पोलिसांचा बातम्यांसाठी स्रोत म्हणून उपयोग केला. पाकिस्तानी लोक भेदरले होते. ते बोलायला तयार नव्हते. पाकिस्तान सन्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या बातम्या आल्या. महत्वाचे म्हणजे कोणीही घटनास्थळाचे फोटो छापलेले नाहीत. म्हणजेच या बातम्या निपक्ष नाही. भारताच्या एअर स्ट्राईक विरोधात पाकिस्तानात संतापाची लाट आहे. सामान्य लोक हातात बंदुका, शस्त्र घेऊन आपण सीमेवर लढायला जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल करीत आहेत. पाकिस्तानी चित्रवाणी वाहिन्यांचे अँकर बावचळले आहेत. जैशचे आघाडीचे म्होरके मारले गेले. मसूदचा भाऊ मौलाना अम्मार बदल्याची भाषा बोलतो आहे. अजहर मसूद मारला गेला की नैसर्गिक मृत्यू झाला असे सांगून परिस्थितीला वळण देण्याच्या मानसिकतेत पाकिस्तान आलेला आहे. तरी आम्ही पुरावे मागतो ! आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता या लोकांचा मोदी विरोध आपण समजू शकतो. पण पाकिस्तान धार्जणिी भूमिका घेऊन आपल्यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या भारतीय सन्याच्या मनोबलावर त्याचा काय परिणाम होत असेल, याचे तारतम्य या मंडळीने गमावले आहे.
पुलवामा हल्ल्यात चाळीसहून अधिक सैनिक ठार झाल्यावर मेहबुबा मुफ्ती यांना अजूनही पाकिस्तानशी वार्तालाप करावा वाटतो. पंतप्रधानपद भूषविलेले मनमोहनसिंग यांची व संरक्षण मंत्री पद भूषविलेले शरद पवार विवेकशून्य वागतात. एका सामान्य माणसाची यावर प्रतिक्रिया बोलकी होती. तो म्हणाला, या लोकांनी इमरान खानलाच महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करणे तेवढे बाकी राहिले आहे !
संपूर्ण देश गंभीर वळणावर असताना विपक्ष मात्र, मोदींना घेरण्यासाठी रोज नवा डाव खेळत होते. देशहितापेक्षा मोदीद्वेष त्यांना महत्वाचा वाटत होता. विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्याला सुखरूप परत आणण्याच्या व्यूहरचनेत सहकार्य करण्याऐवजी मोदी कसे घेरले जातील, ही व्यूहरचना हा कंपू आखत होता. आपली वर्तणूक पाकिस्तानच्या समर्थनात आणि भारतीय सन्याच्या विरोधात जात असल्याचे वैषम्य यांना वाटले नाही. ताब्यात असलेल्या अभिनंदन सोबत पाकिस्तान कुठला व्यवहार करू शकतो याची पूर्ण जाणीव सामान्य भारतीयांना देखील आली होती. पण ते भान विरोधी पक्षांनी ठेवले नाही. भारत सरकार, सन्य संपूर्ण शक्तीनिशी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याच्या कामी असताना काँग्रेस आणि आघाडीचे प्रवक्ते पाकिस्तानी प्रवक्त्यांची भाषा बोलत होते.
या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी अविचल होते. त्यांनी सर्व कार्यक्रम सुरू ठेवले. सन्याला ऐतिहासिक मोकळीक दिली. कूटनीतीत यश मिळवले. पाकिस्तानला गुटघे टेकवण्यास त्यांनी बाध्य केले. अभिनंदनचा परतीचा प्रवास हा चच्रेचा परिणाम नाही. त्यासाठी पाकिस्तान दयाळू किंवा शांतताप्रिय आहे, असेही नाही. ‘ईट का जवाब पत्थर से’ धोरणाचा तो परिणाम होता. आपण हल्ला केला की नाही, हे जाणून घेण्याचा विरोधकांना अधिकार आहे. लोकशाहीनेच तो दिलेला आहे. योग्य त्या पटलावर त्यांनी हवे ते जाणून घ्यावे. सत्ताधारी दडवत असतील तर त्यांनी सत्ताधाऱ्यांना बाध्य करावे. त्यासाठी आवश्यक त्या सांसदीय आयुधांचा वापर करण्यास ते मोकळे आहेत. मोदींना विरोध जरूर करावा पण पाकिस्तानचे मनोबल वाढेल अशी वर्तणूक करू नये. केवळ व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी किंवा मोदीद्वेषाची काविळ झाली म्हणून एअर स्ट्राइक नाकारणे हे अक्षम्य आहे. आपल्या एअर स्ट्राइकने पाकिस्तान ने काय गमावले, हे न समजण्याइतपत विरोधी पक्ष खुळे नाहीत. पण त्यांनी जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेतले आहे.