पंकज भोसले
१९९० नंतरच्या काळात हिंदी चित्रपटसंगीत हळूहळू बदलू लागलेच, पण संगीताचे तंत्रही बदलत गेले. या बदलत्या काळातली पिढी लता मंगेशकरांच्या अनुभवापासून काहीशी वंचित राहिली आणि कानांची इतरांकडून होणारी फरपटच ‘एन्जॉय’ करू लागली खरी.. पण त्यातूनही काही लतागीते संस्मरणीय ठरतात, अगदी अनंतकाळच्या संग्रहात साठवण्याइतकी!
उदारीकरणाच्या फेऱ्यात सर्वच क्षेत्रांत जगतिक घटकांचे अतिक्रमण झाल्याचा ज्ञात इतिहास सर्वाच्या लक्षात राहणारा. मात्र या काळात भारतीय लोकप्रिय संगीतात चाललेल्या घुसळणीत लता मंगेशकर या स्वरनिर्मातीच्या गानवर्षांवात न्हाऊन निघणारी पिढी आक्रसत जाण्याला सुरुवात झाली होती. या पिढीला लता मंगेशकर माहीत नसणार की काय, अशी भीती बुजुर्गानी व्यक्त करण्याइतपत ही घुसळण सुरू होती. नव्वदी आरंभाच्या अल्याड-पल्याड सिनेगीतांतील डिस्को-युग ओसरले होते. ‘कयामत से कयामत तक’, ‘आशिकी’, ‘जो जीता वोही सिकंदर’ यासारख्या सिनेमांतून आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतीन-ललित या नवउद्यमी संगीतकार जोडगळय़ा गावोगावांतील बारसे ते विवाहादी सणसमारंभ प्रेमगीतांसह गाजवत होत्या. यांत शब्द आणि चालवैचित्र्याची ‘ओयेओय’, ‘धकधक’छापी गीते अल्पकालीन आनंद पेरण्यापुरती उरली होती. या सगळ्या नव-गीतांच्या आणि ‘नवसंगीत’कारांच्या ताफ्यात साधना सरगम, अलका यागनिक, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा प्रौडवाल या नवगायिकांची भरती होती. त्यांची एकामागोमाग एक गाणी जनओठांवर, छायागीत-चित्रहार- रंगोली आणि सुपरहिट मुकाबल्यासारख्या कार्यक्रमांत रुळण्याच्या कालावधीत राम-लक्ष्मण हे गतपिढीतील संगीतकार ‘कबूतर जा जा..’ सारखे गाणे घेऊन नव्या पिढीला स्वरलता गुणगुणायचा आग्रह धरत होते.. अशा एखाद्या गाण्यातून लता मंगेशकरांचा स्वर, ऐकू आला तर, या पिढीलाही भावत होता.
या काळात जागतिकरणाहून मोठे आक्रमण हिंदी चित्रसंगीतावर झाले ते दक्षिणी सुरावटींचे. ए.आर. रेहमानच्या ‘रोजा’तील (१९९२) ‘दिल है छोटासा’ या मिनमिनी नामक गायिकेने गायलेल्या मूळ ‘चिन्न चिन्न आसै’ या गाण्यानंतर संपूर्ण देशात दक्षिणी गाणी ऐकणारा अबालवृद्धांचा नवा पंथ तयार झाला होता. तमिळ भाषेचा किंचितही गंध नसतानाही ‘उर्वशी’, ‘हम्मा’, चिकबुक-चिकबुक रैले’, ‘गोपाला-गोपाला’ आपल्या घरातील डेकवर, नव्याने उभारलेल्या म्युझिक सिस्टिमवर तमिळ ऐकणे हे मराठी-गुजराती-बंगाली-आसामी तरुणांसाठी अभिमानाची गोष्ट बनली होती. तेव्हा भूपेन हजारिकांनी संगीतबद्ध केलेले ‘दिल हुम हुम करें..’ हे लतागाणे चवबदल म्हणून आठवडी गाण्यांच्या यादीत झळकत होते. आर.डी. बर्मन यांच्या दीर्घविश्रांतीनंतरच्या पुनरागमनानंतर ‘नाईण्टीन फोर्टीएट- ए लव्हस्टोरी’तून आलेले ‘कुछ ना कहो’सारखे लता मंगेशकरांच्या आवाजातले एखादेच गाणेही लोकप्रियतेच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचत होते..
पुन्हा लतायुग..
पण रेहमान, एम.एम करिम, इलय आणि कार्तिक राजाच्या दक्षिणी गाण्यांचे साम्राज्य पसरत असताना पुनर्लतायुग आले ते ‘हम आपके कौन’च्या ‘दिदी तेरा देवर दिवाना’ या गीताने. राम लक्ष्मण यांनी आधी केलेल्या काही विस्मरणीय चित्रपटांतूनही लता मंगेशकरांनी उत्तम गाणी गायली होती. ‘सातवा आसमाँ’(१९९२) या चित्रपटातील ‘धीरे चल..’, ‘तुम क्या मिले जानेजा’ किंवा ‘दिल की बाजी’(१९९३) चित्रपटातील ‘रुक भी जाओ जाना’ ही गाणी ऐकलीत तर त्यांचा ठेका आणि दर्जा ‘हम आपके कौन’ इतकाच कानांना भिडू शकेल. या काळात बासू चक्रवर्ती या संगीतकाराने लताबाईंकडून गाऊन घेतलेले ‘नर्गिस’ या अजिबातच लक्षांत न राहिलेल्या चित्रपटातील ‘अरे तू पवन बसंती, काहे इठलाके चलती..’ हे गाणे त्यांच्या आवाजातील जुन्या गोडव्यासह सुखद
कान-धक्का देणारे आहे. ‘तेरी पायल मेरे गीत’ (१९९३) हा एक सुपरफ्लॉप चित्रपट. गोविंदा आणि मीनाक्षी शेषाद्री यांचा अभिनय आणि नौशाद या बुजुर्ग संगीतकाराचा शेवटचा चित्रपट या बाबीदेखील या चित्रपटाला तारू शकल्या नाहीत. पण त्यातील ‘मुहोब्बत का एक देवतासा मिला’ हे गाणे रेडिओ आणि टीव्हीगीतांमध्ये निराळे ठरतेच!
‘हम आपके है कौन’नंतर एक मोठा बदल झाला. जुन्यापिढीच्या संगीतकारांबरोबर गाणाऱ्या लताबाई नव्या पिढीच्या संगीतकारांसह ऐकू यायला मिळाल्या. ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल तो पागल है’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्यांनी एकाच वेळी संगीतातील दक्षिणाक्रमाणाचा वेग थोपवून टाकला. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरी करण्यासाठी ए. आर. रेहमान यांच्या ‘वंदे मातरम’ अल्बमच्या गाण्यात लताबाईंचे गाणे अग्रभागी राहिले. पुढे (१९९८) ‘दिल से’मधल्या ‘जिया जले’ साठी लताबाईंना जणू पर्यायच नव्हता.
१९९६ साली लकी अलीचा ‘सुनो’ हा गैरफिल्मी अल्बम आला. आलिशा चुनॉयचा ‘मेड इन इंडिया’, सिल्क रूटचा ‘युफोरिया’ आणि सुनिता रावचा ‘परी’ हा याच काळातला. पंजाबी गाणी मुख्य प्रवाहात आणणाऱ्या दलेर मेहंदीचा उगमही या काळातला. न्यूझीलंडच्या वेटा स्टुडिओमध्ये जगातील सर्वाधिक महागडय़ा तंत्रज्ञानातून रेकॉर्ड झालेल्या लकी अलीच्या गाण्यानंतर सुरू झालेल्या पॉप युगामध्ये ‘पॉप अल्बम’ काढण्याचा नादच सर्वाना लागला. या पॉप नादात तरुण कलाकार होतेच, पण गझल गायक जगजितसिंग (तेरा चेहरा), दिग्गज गायिका आशा भोसले( राहुल अॅण्ड आय), महानायक अमिताभ बच्चन (अॅबी बेबी) ते उपनायक दिलीप ताहील (राज की बाते) ही नावेही आघाडीवर होती. या काळात लताबाईंनीही अल्बम काढला, तो मात्र ‘साईराम साईराम’- भजनांचा. अन् त्या नव्यानव्या पॉपयुगातील अल्बमना टक्कर देत ‘साईराम..’ घराघरांत ज्ञात झाला. नव्या गायिकांचा सुकाळ सुरू झाल्याचा आणि अंताक्षरी, मेरी आवाज सुनो वा इंडियन आयडॉल वगैरेसारखे कार्यक्रम भारतीय मध्यमवर्ग अधिक लक्षपूर्वक पाहू-ऐकू लागण्याचा हा काळ. तो प्रादेशिक भाषांमध्येही नंतर फोफावला. मात्र देशाचा उभरता गायक किंवा उभरती गायिका कितीही ग्लोबल कानांची असली, तरी लतास्वरांना डावलून व्यासपीठावर कलाकारीचे ज्ञान पाजळू शकत नव्हती. या काळात एमटीव्ही-व्ही चॅनलची संगीतपिंपे खोऱ्याने देशो-देशींची गाणी ओतू लागली. पाकिस्तानची सीमारेषा पुसून तिथल्या नव्या आणि जुन्या गाण्यांची गीतकारी जवळ करणाऱ्या कानहौशींचा उदय झाला. दोनहजारोत्तर काळामध्ये लताबाईंची दोनच लोकप्रिय गाणी लोकांच्या कानांमध्ये रुळली. लगानमधील ‘ओ पालनहारे’ आणि ‘रंग दे बसंती चित्रपटातील ‘लुक्का छुप्पी’ या गाण्यांनंतर तितक्या ताकदीने लताबाईंचे कोणतेही नवे गीत गौरविले गेले नाही. त्यांच्या आवाजाचा जाड झालेला पोत नव्या पिढीकडे आधीच्या पिढीची खिल्ली उडविण्याचा हुकमी पत्ता बनू लागला. रेकॉर्ड प्लेअर, कॅसेट, सीडी आणि पेन ड्राईव्ह या सगळ्या माध्यमांतून लतागाणी जपणाऱ्या ‘खऱ्या लताभक्तां’पर्यंत या नव्वदोत्तरीतील लताबाई खऱ्या अर्थाने पोहोचल्याच नाहीत आणि स्वरपर्यायांच्या अनंत ढिगामुळे सर्वच अर्थानी लताबाईंना समजून घेणे नव्वदोत्तरीतल्या पिढीला जमले नाही. ‘अनमोल रतन’च्या संपूर्ण फाईल्ससह लतागीतांचा साठा आपल्या हार्डडीस्कच्या १० जीबी जागेत असल्याचा अभिमान असणाऱ्यांना ती ऐकायला एक एमबीचाही वेळ उरलेला नाही, इतके लोकांचे कानजीवन बदलले आहे. गेल्या दशकापासून एक नवाच जनप्रवाह तयार झाला आहे. दरसाली १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचा दिवस देशातील शहरा-शहरांच्या चौका-चौकांत ‘ऐ मेरे वतन के लोगो’ने साजरा होत आहे. त्यात बदल होणार नाही, तोवर लताबाईंच्या स्वर अजरामरतेला धक्का पोहोचण्याची भीती कुणाला व्यक्तही करता येणार नाही.