इसाक मुजावर
चित्रपट संगीतात संगीतकार कितीही मोठा व महत्त्वाचा असला तरी लताचा आवाजच संगीतकाराहून अधिक मोठा बनला. त्यांच्या आवाजाशिवाय कोणाही संगीतकाराच्या संगीताचा स्वत:बद्दल विचारसुद्धा करता येऊ नये अशी परिस्थिती लताच्या आगमनानंतर निर्माण झाली.. लता मंगेशकर युग कसे तयार झाले याची सविस्तर चर्चा करणारा लेख.
नूरजहाँ पाकिस्तानला निघून गेल्यानंतर भारतीय चित्रपट संगीतात जरूर एक पोकळी निर्माण झाली असेल, पण ती पोकळी लताबाईंनी येथे अशी काही भरून काढली की, नूरजहाँचा आवाज हेच ज्यांचे भांडवल होते, अशा संगीतकारांनाही तिच्या आवाजाची उणीव येथे कधी जाणवली नाही.
के. दत्ता, श्यामसुंदर, गुलाम हैदर, सज्जाद हुसेन हे संगीतकार तसे नूरजहाँचे संगीतकार, नूरजहाँचा आवाज हेच त्यांच्या संगीताचे बलस्थान होते. तिच्या आवाजानेच त्यांच्या अनेक गाण्यांना चिरंतन केले. पण नूरजहाँऐवजी लताचा आवाज त्यांच्या संगीतात आला म्हणून त्यांच्या संगीतातील त्या गोडव्यात तसा काही फरक पडला नाही. आवाज नूरजहाँच्याऐवजी लताबाईंचा. तरीही गोडवा मात्र अगदी तोच. नूरजहाँची कोठेही उणीव न जाणवू देणारा.
के. दत्ता, श्यामसुंदर, गुलाम हैदर, सज्जाद या नूरजहाँच्या संगीतकारांच्या संगीतातील लताबाईंची अगदी सुरुवातीच्या काळातील गाणी ऐकताना ही गोष्ट स्पष्टपणे जाणवते. ‘दिया जलकर आप बुझाय’, ‘आ इंतजार है तेरा’ (बडम्ी माँ), या नूरजहाँच्या आवाजातील गाण्यांनी के. दत्ता यांच्या संगीतात जरूर एक गोडवा निर्माण केला असेल. पण हाच गोडवा, ‘गाये लता जा, गाये लता जा’ (दामन), यासारख्या अनेक गाण्यांतून लताबाईंनीही के. दत्ताच्या संगीतात निर्माण केला. नूरजहाँच्या आवाजातील ‘बैठी हूं तेरी याद का लेकर के सहारा’ (गांव की गोरी), हे गाणे श्यामसुंदर यांच्या संगीताची एक हाईट असेल. पण ‘बहारे फिर भी आयेगी, अगर हम तुम जुदा होंगे’ (लाहोर), ‘साजन की गलिया छोडम् चले’ (बाजार) या लताबाईंच्या आवाजातील गाण्यांनीही श्यामसुंदरला अगदी त्याच हाईटला पोचवले. नूरजहाँचा संगीतकार म्हणून ओळखला जाणारा सज्जाद तर नंतरच्या काळात लताबाईंनी त्यांच्या संगीत नियोजनाखाली गायिलेल्या ‘ऐ दिलरुबा, नजरे मिला’ (रूस्तुम सोहराब) सारख्या काही गाण्यांसाठीच आज लक्षात आहे. नूरजहाँच्या आवाजातील गोडवा ओ गोरा गोरा चला गया, अंग्रेजी छोरा चला गया (मजदूर) यासारख्या लताबाईंच्या काही गाण्यांनी नंतरच्या काळात गुलाम हैदर यांच्या संगीतातही येथे निर्माण केला आहे.
के. दत्ता, श्यामसुंदर, गुलाम हैदर, सज्जाद यांच्या संगीतात नूरजहाँचे जे स्थान त्या काळात होते तेच स्थान त्या काळात खुर्शीदने खेदचंद प्रकाश यांच्या संगीतात मिळवले होते. त्यांच्या संगीत नियोजनाखाली खुर्शीदने गायिलेल्या ‘मैं तो हरी के गुन गाऊ प्रभुके गुन गाऊ’ (शादी), ‘पहले जो मोहब्बतसे इन्कार किया होता, ना दिल जो दिया होता, ना प्यार किया होता’ (परदेशी), ‘घटा घन घोर घोर, बरसोरे’ (तानसेन), या सारख्या अनेक गाण्यांनी त्यांच्या संगीताला येथे अजरामर केले होते. खुर्शीद देखील नूरजहाँप्रमाणेच फाळणीनंतर पाकला निघून गेली. पण म्हणून काही त्यांच्या संगीतात तसा काही फरक पडला नाही. खुर्शीदच्या ऐवजी लताबाईंचा आवाज त्याच्या संगीतात आला आणि त्याच्या आवाजातील ‘चंदा रे जा रे जा’ (जिद्दी), ‘आयेगा आनेवाला’, ‘मुष्कील है बहोत मुष्कील, चाहत को भुला देना’ (महल), यासारख्या काही गाण्यांनी त्यांच्या संगीतात खुर्शीदच्या आवाजाची कोठेही उणीव जाणून न देता एका वेगळय़ाच उंचीला त्यांच्या संगीताला पोचवले, याचे कारण एकच होते नूरजहाँ व खुर्शीद या कितीही श्रेष्ठ गायिका असल्या तरी लताबाई या मूळातच त्यांच्यापुढे जाणाऱ्या एक गायिका होत्या, यामुळे त्यांचा आवाज येथे अनेक गायिकांच्या आवाजापैकी एक बनला नाही. तर ती एक सवय बनली.
आवाजाचे महत्त्व
कोणत्याही गोष्टीची सवय एकदा का माणसाला लागली की त्या गोष्टीशिवाय तो काहीच करू शकत नाही. लताबाईंच्या आवाजाच्या बाबतीत अनेकांचे येथे हेच झाले. श्यामसुंदर हे याचे चालते बोलते उदाहरण. नूरजहाँचा आवाज हा या श्यामसुंदरच्या संगीताचा खरं तर प्लस पॉईन्ट. पण नूरजहाँ पाकला निघून गेली म्हणून तो येथे कधी उणे ठरला नाही. लताच्या आवाजाचा आधार घेऊन तो येथे खंबीरपणे उभा राहिला. मध्यंतरीच्या काळात या श्यामसुंदरचे काही कारणावरून लताबाईंशी मतभेद झाले होते आणि त्यांचा आवाज आपल्या संगीतात कधीच वापरायचे नाही, असे त्यांनी ठरवले होते. पण नूरजहाँ पाकला जाताच तिची उणीवदेखील कोणाला जाणवणार नाही, अशी गाणी लताबाईंच्या आवाजात निर्माण करणारा हा श्यामसुंदर लताबाईंच्या आवाजाशिवाय तशी गाणी येथे निर्माण कर शकला नाही. ‘ढोलक’, ‘निर्दोष’ या चित्रपटात लताबाईंच्या आवाजाशिवाय तो काहीसा निष्प्रभ ठरल्यासारखा झाला आणि यामुळे आपल्या संगीतात लताबाईंचा आवाज कधीच घ्यायचा नाही हा आपला निर्धार बदलून अलिफ लैलाह्ण या आपल्या शेवटच्या चित्रपटात त्याला लताबाईंचा आवाज घ्यावा लागला आणि या चित्रपटात लताबाईंनी त्याच्या संगीत नियोजनाखाली गायिलेल्या ‘बहार आयी खिली कलियांऽऽ, दिल को दर्द बनाने वाले’ या गाण्यानीच त्याला पुन्हा ‘लाहोर’, ‘बाजार’ या चित्रपटातील त्यांच्या संगीताच्या उंचीला पोचवले.
श्यामसुंदरसारख्या एका समर्थ संगीतकाराचा हा तसा पराभवच होता. आणि हा पराभव केला होता लताबाईंच्या आवाजाने. लतायुगाच्या येथील उदयानंतर त्यांच्या आवाजाचे महत्त्व येथे तसे वाढले होते. नूरजहाँ व खुर्शीद या कितीही श्रेष्ठ गायिका असल्या तरी त्यांच्या काळात आवाजाचे महात्म्य येथे हे असे वाढले नव्हते. त्या दोघी कितीही समर्थ गायिका असल्या तरी तेव्हा चित्रपट संगीतात गायक-गायिकांहून संगीतकार महत्त्वाचा होता. पण लतायुगाच्या येथील उदयानंतर हे चित्र येथे एकदम पालटले आणि संगीतकाराहून लताबाईंचा आवाजच येथे अधिक महत्त्वाचा बनला आणि त्या आवाजाशिवाय अनेक संगीतकार येथे निष्प्रभ ठरू लागले.
या दृष्टीने श्यामसुंदर यांचे उदाहरण मी येथे दिलेच आहे. आणखी एक ठळक उदाहरण म्हणजे सी. रामचंद्र. त्यांच्याशी अनेकदा माझ्या मैफली जमायच्या आणि या मैफलीत ‘लताबाईंचा आवाज तुमच्या संगीतातून उणे केला तर तुमच्या संगीतात काहीच उरणार नाही’ असे कोणी त्याना म्हणाले तर एकदम त्यांना राग यायचा.
उसळून ते एकदम म्हणायचे, ‘लताबाईंचा आवाज माझ्या संगीतातून उणे केला तर माझ्या संगीतात काय उरेल असे म्हणायला मी काही लताचा हात धरून येथे संगीतकार बनलेलो नाही. लता येथे कोणी नव्हती तेव्हापासून संगीतकार म्हणून येथे मी वावरत आहे. आणि लता युगाचा येथे उदय होण्यापूर्वी अमीरबाई, शमशाद, जोहारबाई, ललिताबाई देऊळकर, बीनापाणी मुखर्जी यासारख्या अनेक गायिकांच्या आवाजात हीट संगीत देऊन माझे श्रेष्ठत्व मी येथे सिद्ध केले आहे.’
लतायुगाचा उदय
त्या काळातील मी. रामचंद्र यांचे श्रेष्ठत्व केव्हाही वादातीत आहे आणि लता युगाचा येथे उदय होण्यापूर्वी अमीरबाई, शमशाद, ललिताबाई देऊळकर यासारख्या गायिकांच्या आवाजात अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी दिलेली आहेत, हा देखील कधीही न विसरला जाणारा एक इतिहास आहे. पण त्या काळात ही लोकप्रिय गाणी देताना ते कधीही कोणा एका गायिकेच्या आयाजाच्या आहारी कधी गेले नव्हते. गायिका कोणीही असो. तिच्या आवाजात ते लोकप्रिय गाणी निर्माण करू शकत होते. पण लतायुगाच्या उदयानंतर त्यांच्यात ही क्षमता उरली होती असे म्हणता येणार नाही. ते स्वत: कितीही श्रेष्ठ संगीतकार असले तरी नंतरच्या काळात स्वत:च्या संगीताहून लताबाईचा आवाजच त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा बनला होता आणि आपण लताबाईंना घडवलंय असा कितीही दावा असला तरी नेमकी येथेच लताबाईंनी त्यांच्यावर मात केली होती.
ही शोकांतिका एकटय़ा सी. रामचंद्र यांच्या संगीताची नव्हती, तर आपण लताबाईंना घडवलंय असा दावा करणाऱ्या हुस्नलाल भगतराम या संगीतकार जोडीचीही होती. लताबाई येथे आल्या तेव्हा त्यांच्या संगीतावर नूरजहाँचा प्रभाव होता. त्यांच्या आवाजावरील नूरजहाँचा हा प्रभाव पुसून काढण्याचे श्रेय निश्चितपणे हुस्नलाल भगतराम व सी. रामचंद्र यांना आहे. कोणीही ही गोष्ट नाकारू शकणार नाही. पण लताबाईंच्या आवाजावरील नूरजहाँचा ठसा पुसून काढता काढता हुस्नलाल भगतराम, सी. रामचंद्र येथे पुरते लतामय बनून गेले ही गोष्ट देखील कोणाला नाकारता येणार नाही. यामुळे लतायुगाचा येथे उदय होण्यापूर्वी हुस्नलाल भगतराम व सी. रामचंद्र यांच्या संगीताला स्वत:चे जे व्यक्तिमत्त्व होते ते लतायुगाच्या उदयानंतर येथे हरवले आणि लताबाईंचा आवाज हेच त्यांच्या संगीता वे व्यक्तिमत्त्व बनले. यामुळे लताला आपण घडवलंय असा दावा करणारे हुस्नलाल भगतराम व सी. रामचंद्र देखील नंतरच्या काळात लताबाईंच्या आवाजाशिवाय येथे काही करू शकले नाहीत.
आवाजात वरचष्मा
पण हे आपणाला केवळ सी. रामचंद्र व हुस्नलाल भगतराम यांच्या बाबतीतच म्हणून चालणार नाही. लतायुगाच्या येथील उदयानंतरच्या संगीताचा विचार जर आपणाला करावयाचा झाला तर प्रत्येक संगीतकाराच्या बाबतीत आपणाला हेच म्हणावे लागेल. नौशाद यांचे उदाहरण वानगीदाखल घ्या ना! लता युगाचा उदय होण्यापूर्वी येथे नावारूपाला आलेले ते एक संगीतकार, ‘रतन’ या चित्रपटापासून संगीतासाठी चित्रपट पाहण्याची प्रवृत्ती प्रेक्षकांच्यात त्यांनी निर्माण केली आणि लतायुगाचा येथे उदय होण्यापूर्वी ‘अनमोल घडम्ी’, ‘दर्द’, ‘मेला’, ‘दिल्लगी’ यासारख्या अनेक चित्रपटातील संगीत त्यांनी येथे अजरामर करून ठेवले. या चित्रपटातील त्यांच्या संगीताचा व लतायुगाचा येथे उदय झाल्यानंतरच्या त्यांच्या संगीताचा आपण विचार केला तर त्यांच्या संगीतात देखील फार मोठा फरक आपणाला जाणवेल. लतायुगाचा येथे उदय होण्यापूर्वीच्या काळात त्यांच्या संगीताने येथे कितीही लोकप्रियता मिळवली तरी त्या संगीतात गायक-गायिकांच्या आवाजाचा आपणाला इतका वरचष्मा जाणवणार नाही, गायक-गायिकांच्या आवाजाहून त्यांच्या संगीताचा प्रभावच त्यावेळच्या त्यांच्या संगीतात आपणाला जाणवेल. पण हेच आपणाला लतायुगाचा येथे उदय झाल्यानंतरच्या त्यांच्या संगीताबाबतीत मात्र म्हणता येणार नाही. या काळातही त्यांच्या संगीतावर त्यांच्या संगीताचा प्रभाव तसा असला तरी लताबाईंचा आवाज हाच या काळात त्यांच्या संगीताचा स्थायीभाव बनला आहे. ‘उठाये जा उनके सितम’ (अंदाज), ‘मोहे भूल गये सांवरिया’ (वैजू बावरा), ‘तकदीर जगाकर आयी हूँ’ (दुलारी), ‘तीर खाते जायेंगे’ (दीवाना), ‘ढुंडो ढुंडो रे साजना’ (गंगा जमना) यासारखी लताबाईंच्या आवाजातील त्यांची गाणी आपण ऐकली तरी याची आपणाला जाणीव होईल. लताबाईंच्या आवाजाशिवाय या गाण्याची आपणाला कल्पनाही करता येणार नाही इतका नौशाद यांच्या संगीतातील या गाण्यात लताबाईंच्या आवाजाचा वरचष्मा आहे. यामुळे लतायुगाचा येथे उदय होण्यापूर्वीच्या नौशाद यांच्या संगीताचा गायक-गायकांच्या आवाजाशिवाय ज्याप्रमाणे आपण विचार करू शकतो, त्याप्रमाणे लतायुगाच्या येथील उदयानंतर त्यांच्या संगीताचा लताबाईंच्या आवाजाशिवाय आपणाला विचारच करता येणार नाही.
आवाजाचं श्रेष्ठत्व
कोणालाही तो करता येऊ नये असाच नंतरच्या काळात भारतीय चित्रपट संगीतावर लताबाईंच्या आवाजाचा पगडा उमटला. संगीतात गाण्याचे शब्द, संगीतकाराचे संगीत याहून लताबाईंचा आवाजच अधिक मोठा बनला.
त्यांच्या आवाजाला प्राप्त झालेल्या या मोठेपणामुळे लतायुगाचा येथे उदय झाल्यानंतर ओ. पी. नय्यरचा एक सन्माननीय अपवाद वगळता एकही संगीतकार येथे लताबाईच्या आवाजाशिवाय यशस्वी ठरू शकलेला नाही. ओ. पी. लताबाईंच्या आवाजाचा आधार न घेता येथे यशस्वी झाला हे त्याचे फार मोठे यश आहे. पण हे यश मिळवतानाही लताबाईच्या आवाजाच्या बाबतीत सी. रामचंद्र, हुस्नलाल भगतराम या संगीतकारांची येथे जी अवस्था झाली नेमकी तीच अवस्था आशाबाईंच्या आवाजाबाबतीत ओ.पी.ची झाली आहे. लताबाईंना आपण घडविले हा सी. रामचंद्र व हुस्नलाल भगतराम यांचा दावा होता. आशाबाईंच्या बाबतीत ओ.पी.चा देखील हाच नेमका दावा आहे आणि तो तसा चुकीचा नाही. कारण आशाबाईंना येथे घडविण्यात त्यांचाच सिंहाचा वाटा आहे. पण आशाबाईना आपण घडविले असा दावा करणारा ओ.पी. ही नंतरच्या काळात आशाबाईंच्या आवाजाशिवाय येथे निष्प्रभ ठरला आहे हे एक कटु सत्य आहे. याचे कारण आशाबाईंना घडवता, घडवता त्यांच्या संगीताला लागलेली त्यांच्या आवाजाची सवय.
खऱ्या अर्थाने संगीत
लता व आशा यांचा येथे उदय होण्यापूर्वी अनेक गायिका येथे झाल्या असतील. पण त्यापैकी कोणाही गायिकेने आपल्या आवाजाची ही अशी सदय कोणीही संगीतकाराच्या संगीताला लावली नव्हती. यामुळे त्या काळातील संगीत हे खऱ्या अर्थाने संगीतकाराचे संगीत होते. गाणे कोण गाणार आहे याचा विचार न करता आपल्या संगीताचा विचार करून संगीतकार आपली संगीतरचना तेव्हा स्वतंत्रपणे करू शकत होते. पण लता युगाचा येथे उदय झाला आणि पाहता पाहता हे चित्र येथे असे काही चंदलले की आपल्या संगीताहून लताबाईंच्या आवाजाचाच प्रामुख्याने विचार करून ते आपली संगीत रचना करू लागले. आणि इतर गायिकांच्यासाठी गाणी तयार करतानाही काही केल्या लताबाईंचा आवाज त्यांना विसरता येईना.
‘आँचल’ या चित्रपटातील ‘सांवरिया रे तेरी मीरा क्यू रोये रे’ या गाण्याच्या वेळचा प्रसंग अजूनही मला आठवतो. लताबाई तेव्हा सी. रामचंद्र यांच्याकडे गात नव्हत्या आणि त्यांच्या आवाजाशिवाय आपले संगीत यशस्वी करून दाखविण्याची जिद्द तेव्हा त्यांनी बांधली होती. पण ही जिद्द बांधतानाही काही केल्या लताबाईंच्या आवाजाला ते विसरायला तयार नव्हते. ‘सांवरिया रे’ हे गाणे सुमन कल्याणपूर गाणार असल्या तरी त्या गाण्याची चाल त्यांनी लताबाईंचा आवाजच डोक्यात ठेवून बांधली होती. त्या गाण्यात लताबाईंच्या आवाजाची अपेक्षाच त्यांच्याकडून ते करीत होते.
आता सुमन कल्याणपूर कितीही चांगल्या गात असल्या तरी त्यांच्या आवाजातून लताबाईंचे गाणे कसे येणार? त्यादिवशी नूरजहाँ सांगत होती, ‘लता, लता असली तरी शेवटी मी, मी आहे. लताची गाणी तिच्याप्रमाणे मला गाता येणार नाहीत. पण माझी गाणी देखील लता माझ्याप्रमाणे गाऊ शकणार नाही.’
आणि ते तसं खोटं नाही. कारण शेवटी नूरजहाँ, नूरजहाँ असली तरी लताबाई या लताबाई आहेत.
आवाज संगीतातील अखेरचा शब्द
प्रत्येकाच्या गायकीत तसा फरक राहणारच. लतायुगाचा येथे उदय होण्यापूर्वी संगीतकाराना गायकी, गायकीतील हा फरक कळत होता. यामुळे कोणत्याही एका आवाजाच्या आहारी न जाता गायकी, गायकीतील फरक लक्षात घेऊन त्या त्या गायकीला सूट होईल, अशा संगीतरचना करण्याची क्षमता तेव्हा संगीतकारात होती. पण लतायुगाचा येथे उदय झाल्यानंतर त्यांच्यातील ही क्षमता संपली आणि लताबाईंचा आवाज हाच त्यांच्या दृष्टीने संगीतातील अखेरचा शब्द बनला. तसं नसतं तर लतायुगाचा येथे उदय होण्यापूर्वी अमीरबाई, शमशाद, ललिता देऊळकर यांच्या आवाजाची जात लक्षात घेऊन त्यांच्यासाठी त्या आवाजाबरहुकूम चाली बांधणारे सी. रामचंद्र नंतरच्या काळात लताबाईंच्या आवाजाच्या इतके आहारी गेलेच नसते. इतर गायिकांच्यासाठी गाणी तयार करता लताबाईंच्या आवाजाला विसरून त्या गाण्यांना ते चाली लावू शकले असते. पण लताबाईंना आपण घडवले असा दावा करणाऱ्या सी. रामचंद्रना देखील नंतरच्या काळात हे जमले नाही. ते पूर्णपणे लताबाईंच्या आवाजाच्या आहारी गेले आणि इतर गायिकांकडूनही आपल्या संगीतात त्याच गाण्याची अपेक्षा करू लागले. ही अपेक्षा करताना इतर गायिकांकडून ते गाणे त्यांना कधीच मिळाले नाही. उलट आगतिक होण्याची पाळी अनेकदा त्यांच्यावर आली.
‘आँचल’मधील ‘सांवरीया रे, तेरी मीरा क्यूँ रोये रे’ या गाण्याच्या वेळची त्यांची अगतिकता आजही मला आठवते. लताबाईच्या आवाजाशिवाय चित्रपट संगीतक्षेत्रात यशस्वी होण्याची जिद्द, या गाण्याची संगीतरचना करताना त्यांनी बांधली होती. पण लताबाईंचा आवाज डोक्यात ठेवूनच या गाण्याची संगीतरचना त्यांनी केलेली असल्यामुळे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात हे गाणे ऐकताना काही केल्या लताबाईंच्या आवाजाला ते विसरू शकत नव्हते. यामुळे ते गाणे ऐकताना ते म्हणायचे, ‘नाही ते, सुमन गाण्याचा मुखडा अगदी लताप्रमाणे गाते. पण दुसऱ्या कडव्यालाच तिची दमछाक होते. यामुळे लताच्या आवाजाचा परिणाम या गाण्यात ती काही निर्माण करू शकत नाही.’
चित्रपट संगीतात संगीतकार कितीही महत्त्वाचा असला तरी लताबाईंचा आवाज येथेच संगीतकाराहून अधिक मोठा बनला. त्यांच्या आवाजाशिवाय कोणही संगीतकाराच्या संगीताचा स्वतंत्रपणे विचारसुद्धा करता येऊ नये अशी परिस्थिती त्यांच्या आगमनानंतर येथे निर्माण झाली आणि संगीतकाराना व त्याच्या संगीताला मागे टाकून लताबाई येथेच त्यांच्या पुढे गेल्या. तसे नसते तर त्यांच्या आवाजाशिवाय अनेक संगीतकार येथे निष्प्रभ ठरले नसते.
नूरजहाँ पाकला निघून गेल्यानंतर देखील कोणा संगीतकाराच्या संगीतात ही निष्प्रभता येथे आली नव्हती. पण लतायुगाच्या येथील उदयानंतर त्यांच्या आवाजाशिवाय आपले संगीत यशस्वी करून दाखविण्याची जिद्द बांधणाऱ्या संगीतकारांच्या संगीतात मात्र ही निष्प्रभता आली. लताबाईंच्या आवाजाशिवाय आपल्या संगीताला काही केल्या ते त्यांच्यापुढे नेऊ शकले नाहीत. लताबाईं पुढे गेल्या आणि त्यांच्या आवाजाशिवाय ते मात्र येथे मागे पडले.
(लोकराज्यच्या १९९२ सालातील लता मंगेशकर विशेषांकातून साभार)
लतादीदींशी नेहमीच संवाद राहिला, त्यांच्याकडून अपार स्नेह मिळाला हा माझा बहुमान आहे. लतादीदींच्या जाण्याने देशात एक पोकळी निर्माण झाली आहे ती लवकर भरून निघणे अवघड आहे. त्यांच्या आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
*****
जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल, जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे. आता लतादीदी देहाने आपल्यात नाहीत़ पण, अमृतस्वरांनी त्या अजरामर आहेत़ त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादी आनंदघन म्हणून त्या स्वरअंबरातून आपल्यावर स्वरअमृत िशपीत राहतील.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
*****
जगभरातील कोटय़वधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजत राहील.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
*****
आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.
– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
*****
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने आठ दशकांहून जास्त भारतीयांच्या मनावर स्वरवर्षां करत तृप्त व शांत करणारा स्वर आता आनंदघन बरसणार नाही. लतादीदींचे जीवन हे शुचिता आणि साधनेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. संगीत क्षेत्रातील त्यांची साधना आणि आठ दशकांवर अधिक काळ गायनाने त्यांना विश्वमान्यता मिळाली होती. त्यांचे जीवनच सर्वागीण दृष्टीने पवित्र आणि तपस्याच होते.
– मोहन भागवत, सरसंघचालक
*****
जगाचा व भारताचा इतिहास पाहिला तर लता मंगेशकर या जगात एकमेव आहेत, ज्यांनी आयुष्यात कधी पडता काळ पाहिला नाही. स्वत:च्या करिअरची सुरुवात झाल्यापासून त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही़ त्यांच्या करिअरचा आलेख नेहमीच नवनवी उंची गाठत राहिला़ असे हे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व होते.
– राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
*****
भारतभूचा सूर हरपला. सुमधुर शब्दही हरपला. लताबाईंचा मधुर सूर हा देश-दुनियेत घुमला तो त्यांच्या भावनिक प्रकटीकरणाने. ए मेरे वतन के लोगोसारख्या गीतातून उमटलेले व अनेकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे, आजवर देशातील कष्टकरी, शेतकऱ्यांसह लढणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहणारे गीतही अविस्मरणीय आहे. लताबाईंना सलाम, सूरसम्राज्ञीला श्रद्धांजली.– मेधा पाटकर, सामाजिक कार्यकर्त्यां