एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : भारतीय चित्रपटसृष्टीचे शहेनशहा दिलीपकुमार यांच्या निधनाने त्यांच्या सोलापूरशी असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा मिळाला. प्रसिद्ध चित्रकार ‘यल्ला-दासी’ यांच्या माध्यमातून हे ऋणानुबंध जपले गेले.

सोलापुरातील विश्वनाथ यल्ला आणि सिद्राम दासी ही एक प्रसिद्ध कलाकार जोडी. या दोघांनी  ‘यल्ला-दासी’ या नावाने साकारलेली चित्रपट पोस्टर ही त्याकाळी सर्वाच्याच आकर्षणाचा विषय असायची. त्यांच्या कलाकृतीच्या कुतूहलातूनच त्यांचे आणि दिलीपकुमार यांचे मैत्र जडले आणि त्यातून पुढे हे ऋणानुबंध सोलापुराशी जोडले गेले.

तसे पाहता सोलापूर हे त्याकाळी खेडेवजा गिरणगाव म्हणून ओळखले जात असे. मात्र त्याच सुमारास आबालाल रहिमान, मकबूल फिदा हुसेन यांच्यापासून ते उमेश्वर पोरे, कांबळे, मुन्शी, कादर आदींचा चित्रकला सृष्टीत दबदबा होता. याच मालिकेत ‘यल्ला-दासी’ ही जोडगोळी अल्पावधीत नावारूपास आली. भारतीय चित्रपटसृष्टीचा हा वैभवाचा सुवर्ण काळ होता. चित्रपटगृहात झळकणारे अनेक चित्रपट रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव साजरे करीत. त्या वेळी साहजिकच रसिकप्रिय चित्रपटांचे भव्य-दिव्य पोस्टर खास प्रतिभावंत चित्रकारांकडून तयार करून चित्रपटगृहाच्या शिरोभागी झळकावण्यात येत असत. या कलेमध्ये ‘यल्ला-दासी’ या दोन चित्रकारांनी मोठे नाव कमावले होते.

१९५२ साली ‘बैजू बावरा’ या गाजलेल्या चित्रपटाचे भव्य पोस्टर त्यांनीच साकारले होते. त्यानंतर त्यांचा पोस्टर कलेचा सिलसिला सुरूच राहिला आणि त्याची महती पुणे-मुंबईसह सर्वदूर पसरत गेली. १९६० साली ऐतिहासिक ‘मुगले-आझम’ झळकला. तेव्हा या चित्रपटाचे निर्माते के. आसीफ यांनी चित्रपटाच्या भव्यतेला साजेसे पोस्टर ‘यल्ला-दासी’ यांच्याकडूनच तयार करून घेतले होते. हे पोस्टर देशभरातील प्रमुख चित्रपटगृहांसाठी उभारण्यात आले होते. यल्ला-दासी यांची चित्रकलेची कीर्ती देशभर वाढत असताना सोलापुरात दिलीपकु मार हे ‘गंगा जमुना’ चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’च्या निमित्ताने आले होते. त्या वेळी ‘गंगा जमुना’चे उभारले गेलेले पोस्टर्स पाहून ते अक्षरश: प्रभावित झाले. चित्रकार ‘यल्ला-दासी’ यांना दिलीपकुमारांनी खास भेटण्यासाठी बोलावणे पाठवले.

यापूर्वी ‘मुगले-आझम’साठी चितारलेल्या पोस्टरची जादू त्यांनी अनुभवली होती. दिलीपकुमार हे ‘यल्ला-दासीं’च्या चित्रकलेवर इतके फिदा झाले की, पुढच्या त्यांच्या अनेक चित्रपटांचे पोस्टर रंगविण्यासाठी ‘यल्ला-दासी’ यांनाच पसंती दिली. त्याप्रमाणे ‘यल्ला-दासी’ यांनी दिलीपकुमार यांचेच नव्हे, तर धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, फिरोज खान, सुनील दत्त आदी चित्रपट कलाकारांच्या चित्रपटांचेही पोस्टर रंगविले. यात दिलीपकुमार यांनी ‘यल्ला-दासी’ यांची पहिल्या भेटीत दाखविलेली आत्मीयता पुढील काळात ऋणानुबंध कायम राखणारी ठरली.