अस्सल गुणवत्ता होती म्हणूनच मन्ना डे अनाकलनीय प्रतिकूलतेला पुरून उरले. चांगले तीस-चाळीस वर्षे गात राहिले. त्यांचं अस्तित्व कोणत्याही स्टारवर अथवा संगीतकारावर अवलंबून नव्हतं. ‘पंत गेले राव चढले’ या जातीचं यश त्यांना प्रतिस्पर्ध्याच्या जाण्यानं मिळालं नाही ते बरंच झालं. त्यांनी जे यश मिळवलं ते स्वत:च्या गुणांचं आणि मेहनतीचं अन् म्हणूनच निर्भेळ होतं, हे आपोआप सिद्ध झालं.
हिंदी चित्रपटसृष्टीचे कायदेकानू इंडियन पीनल कोडपेक्षा कठोर, गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय आहेत. इथे प्रत्येक गोष्टीत स्टार लागतो, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या! ‘इंपीको’नुसार एखाद्या माणसानं गुन्हा केला तरी गुन्हा सिद्ध होईपर्यंत तो गुन्हेगार नसतो. बॉलीवूड पीनल कोडनुसार पाश्र्वगायक जोवर एखाद्या विशिष्ट यशस्वी स्टारसाठी सातत्यानं गात नाही, तोवर त्याला झगझगीत यश मिळत नाही. मग त्याच्यापाशी कितीही मोठी गुणवत्ता का असेना. लता-आशा या कायद्याला सन्माननीय अपवाद! कारण त्या पाश्र्वगायिका होत्या; पाश्र्वगायक नव्हत्या. पाश्र्वगायक बॉलीवूडनं निर्माण केलेल्या पुरुषप्रधान सापळ्यात अडकले, त्यांचा काहीही दोष नसताना!
मन्ना डे हे याचं मूर्तिमंत उदाहरण. हरेक प्रकारचं गाणं ते उत्तम गायले, पण चित्रपटात जेव्हा रागदारीचं किंवा सहनायक आणि त्याहीपेक्षा पुढे- नव्हे, खाली- जाऊन दुय्यम, तिय्यम किंवा बिनमहत्त्वाच्या पात्राचं गाणं असायचं, तेव्हा संगीतकारांना मन्ना डेंचं नाव आठवायचं. त्यांचा गुन्हा एवढाच होता की, महंमद रफी, किशोरकुमार आणि मुकेश यांच्या कंठांना दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर या चलनी नाण्यांचा ग्लॅमरस चेहरा मिळाला होता, तसा त्यांना सापडवता आला नव्हता. नाही तर असं कोणत्या प्रकारचं गाणं होतं, की जे रफीनं गायलं होतं आणि मन्ना डेनं गायलं नव्हतं? रफीकडे ‘तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा’ होतं, तर मन्ना डेकडे त्याच संगीतकाराचं (मदनमोहन) ‘कौन आया मेरे मन के ये द्वारे’ होतं. रफीकडे ‘सर जो तेरा चकराए’ होतं, तर मन्ना डेकडं त्याच संगीतकाराचं (एस.डी. बर्मन) ‘बनाओ बतिया अरे काहे को झूठी’ होतं.
‘मधुबन में राधिका नाचे रे’मध्ये रफीनं गाण्यातले शब्द संपल्यावर रागदारीतल्या तराण्यातल्या अलंकादाराची अफलातून आतषबाजी केली आहे. तिच्या तोडीस तोड कौशल्य मन्ना डेनं ‘लागा चुनरी में दाग’मध्ये दाखवलं आहे. रफीच्या ‘कोई सागर दिल को बहलाता नही’ मध्ये कधीही न संपणाऱ्या वेदनेची आर्तता आहे, तीच मन्ना डेच्या ‘पूछो ना कैसे मैंने रैन बितायी’मध्ये आहे. ‘अभी न जाओ छोडकर’मध्ये जो गोडवा आणि ओतप्रोत प्रणय अन् नशा आहे, ते सारं ‘ये रात भीगी भीगी’मध्ये आहेच की!
‘तू है मेरा प्रेमदेवता’ (कल्पना) या अप्रतिम गाण्यासाठी हे दोन महान स्वर एकत्र आले, तेव्हा कुणीही उन्नीस नाही की बीस नाही; दोघेही शंभरांपैकी शंभर आहेत हे आपोआपच सिद्ध झालं. ‘बरसात की रात’मधल्या ‘ये इश्क इश्क है इश्क’ या अद्वितीय कव्वालीत दोघांनी धमाल केली आहे. ‘लपक झपक तू कारे बदरवा’ (बूट पॉलिश) ही वात्रट रागदारीदेखील दोघांनी छान रंगवली आहे.
आणि तरीही रफीच्या नावावर २० हजारांहून अधिक गाणी, तर मन्ना डेच्या खात्यात ४ हजारच असावीत? याला म्हणतात देवाघरचा अन्याय! रफीचं स्वरप्रभुत्व अलौकिक आहे, निर्विवाद आहे. त्याला सगळं मिळालं याचं दु:ख नाही; ते मन्ना डेला मिळालं नाही याची हळहळ आहे.
‘परवरिश’मध्ये ‘मस्ती भरा है समा’ आणि ‘बेलिया बेलिया’ या द्रुत गतीच्या गाण्यांकरिता मन्ना डे; पण ‘आंसू भरी है’ मात्र मुकेशकडे, अशी वाटणी व्हायची. ‘जोकर’मध्ये तोच प्रकार! ‘ए भाय, जरा देख के चलो’साठी मन्ना डे, पण अतीव सुंदर ‘जाने कहां गए वो दिन’ मुकेशसाठी राखीव! या दोन्ही गाण्यांसाठी मुकेश आणि फक्त मुकेशच हवा. इथे मुद्दा गुणवत्तेचा नाही; नशिबाचा आहे. आपल्या सगळ्याच समकालीन गायकांसाठी ‘डेप्युटी’ होण्याची वेळ मन्ना डेवर आली. ‘चोरी चोरी’ आणि ‘बसंत बहार’ या दोनच चित्रपटांमध्ये मन्ना डेला एकाच नायकासाठी सगळी गाणी गाण्याची संधी मिळाली. ‘चोरी चोरी’मध्ये नायकाला ‘सोलो’ गाणं नव्हतं आणि दर्दभरं गाणंही नव्हतं म्हणून हे भाग्य मन्ना डेंच्या वाटय़ाला आलं असावं. ‘बसंत बहार’ ही मात्र मन्ना डेंची सूरबहार होती. त्यांच्या सुरांची कोजागिरी आणि दिवाळी होती. ‘नैन मिले चैन कहां’ या अवखळ प्रेमगीतापासून ‘सूर ना सजे क्या गाऊं मैं’ च्या आर्ततेपर्यंत भावनांच्या सगळ्या छटा दाखवणारी गाणी त्यांना या चित्रपटात मिळालीच. शिवाय पं. भीमसेन जोशींबरोबर गाण्याचा (‘केतकी गुलाब जुही चंपक बन’) दुर्मीळ मान याच चित्रपटात लाभला. भारतभूषण हा पहिल्या पाचांतला हीरो असता आणि ‘बसंत बहार’ चालला असता, तर मन्ना डेंचा भाग्योदय झाला असता का? कोण जाणे. बोलूनचालून नशीबच ते! त्यातच आकाशस्थ ग्रहतारे आणि ‘जमीं के तारे’ हे भलतंच ‘डेंजरस’ कॉम्बिनेशन आहे. म्हणून तर प्रतिस्पध्र्याचे अडथळे दूर झाले तरी ‘टॉप पोझिशन’ त्यांना मिळाली नाही. मुकेश गेला तेव्हा राज कपूरची अभिनयाची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा होती. त्यानं दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे त्याआधी राजकरिता अनेक हिट गाणी गाऊनही मन्ना डे वंचित राहिले. रफीचे दिवस दिलीपकुमार आणि देव आनंद यांच्या ‘सेमी रिटायरमेंट’मुळे फिरले; पण संधी मन्ना डेंना मिळाली नाहीच. ‘आराधना’ हिट झाला आणि अज्ञातवासात दिवस कंठणाऱ्या किशोरकुमारचं नशीब फळफळलं. तो सुपरस्टार राजेश खन्नाचा आवाज बनला. राजेश खन्ना मागे पडला; पण अमिताभच्या आवाजाशी जुळणारी ‘बूम बूम’ आवाजात असल्यामुळे किशोरकुमारची सत्तेची खुर्ची कायम राहिली.
अमिताभच्या उदयाबरोबर हिंदी रजतपटावर स्मगलर, गँगस्टर वगैरे गुन्हेगारांचं राज्य सुरू झालं. रागदारी, भजन आणि तत्त्वज्ञानपर गाणी या मन्ना डे स्पेशालिटीला नवव्या दशकापासूनच्या चित्रपटात जागाच उरली नाही. टोटल नो एन्ट्री! मन्ना डेंचा आवाज ज्यांच्यासाठी हमखास वापरला जायचा, तो बलराज साहनींसारखे नट इहलोकाच्या पार गेले होते. ‘तू प्यार का सागर है’, ‘ऐ मेरे प्यारे वतन’ आणि ‘ऐ मेरी जोहरा जबीं’ ही साहनींकरिता मन्ना डेंनी गायलेली तिन्ही गाणी जबरदस्त हिट ठरली, पण साहनींसारख्या चरित्र नायकांना त्या काळात कधीमधीच ‘काबुलीवाला’सारख्या प्रमुख भूमिका मिळायच्या आणि मिळाल्या तरी त्यांच्या व्यक्तिरेखेला प्रत्येक वेळी गाणं नसायचं. ‘जिस देश में..’पासून प्राणच्या स्वराशी मन्ना डेंचा सूर जुळला. ‘कस्में वादें प्यार वफा सब बाते हैं बातों का क्या’ (उपकार) आणि ‘यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी’ (जंजीर) या जबरदस्त ‘हिट’ गाण्यांमधून हे नातं दृढ झालं. पण जी गोष्ट साहनींची, तीच प्राणची. त्यांची कारकीर्दही ‘जंजीर’नंतर फार काळ चालली नाही आणि त्यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांना गाणं असणं अशक्य होतं.
शंकर-जयकिशन, बर्मन पिता-पुत्र, मदनमोहन हे मन्ना डेंना आवर्जून बोलावणारे संगीतकार, पण तेही अधूनमधून आणि एखाददुसऱ्या गाण्यासाठी. हिंदी चित्रपटांच्या अर्थकारणावर डिस्ट्रिब्युटर मंडळींचा वरचष्मा आहे. त्यामुळे म्हणा किंवा बॉक्स ऑफिसच्या गणितामुळे म्हणा, चित्रपट निर्माते व नायक, नायिका, संगीतकार आणि गायक यांची ठरावीक ‘कॉम्बिनेशन्स’ त्यांना लागतात. त्यात मन्ना डेंसारखे कलाकार बसत नसावेत. तरीदेखील हे वर्चस्व झुगारून शंकर-जयकिशन आणि एस. डी. बर्मन यांनी मन्ना डेंना आवर्जून गाणी दिलेली दिसतात. त्यामुळे एकाच चित्रपटात देव आनंदसाठी रफी, हेमंतकुमार आणि मन्ना डे किंवा राज कपूरसाठी मुकेश आणि मन्ना डे यांचे आवाज, अशी गमतीदार स्थिती खूपदा दिसली, पण या अतार्किकतेला संगीतकारांनी आणि चित्रपट संगीताच्या चाहत्यांनी महत्त्व दिलं नाही. या प्रकारात स्टारपेक्षा संगीताला महत्त्व द्यायचं आणि ज्या गाण्यासाठी जो गायक योग्य, त्यालाच ते द्यायचं, असं बंडखोर धाडस या मंडळींनी दाखवलं. या मंडळींचा आत्मविश्वास आणि गायकावरचा विश्वास जबर म्हटला पाहिजे. मन्ना डेंनी तो विश्वास सार्थ ठरवला. ‘ओरिजिनल’ भारतीय संगीत येत असूनही हा आत्मविश्वास! अशा स्वयंभू संगीतकारांना विसंगतीचा दोष पत्करूनही मन्ना डेंना बोलवावंसं वाटावं यात मन्ना डेंचं महत्त्व कळतं. यामुळेच तर इतरांपेक्षा कमी गाऊनही त्यांचं नाव भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात दाखल झालं. कोणत्याही प्रकाराचं, कितीही चढ-उताराचं गाणं पेलण्याची क्षमता मन्ना डेंच्या आवाजात होती. तिला काही संगीतकारांनी न्याय दिला. ‘आवारा’मधल्या ‘घर आया मेरा परदेसी’च्या आधी जे स्वप्नदृश्य दिसतं, त्याचं चित्रण, त्या गीताचं लेखन आणि गायन अद्भुत आहे. आजवर त्याची बरोबरी झालेली नाही. चित्रपटाच्या नायकाचा मनस्वीपणा व्यक्त करताना ‘मुझ को चाहिए बहार’ या अंतऱ्यामध्ये मन्ना डे सलग सहा-सात ओळी एका दमात गातात. त्यात आवेश, त्वेष, तळमळ, निकड आणि एका तरुण मनाची धडपड, त्याच्या हृदयाची धडधड जाणवते.
टिपेला पोचूनही मन्ना डेंच्या आवाजाची सुरेल पातळी कायम राहते. मिठाचा एक जास्त कण सुग्रास अन्नाची चव बिघडवतो, तसा किंचितसा बेसूर वा कर्कशपणा अप्रतिम गाण्याची वाट लावतो. मन्ना डेंचा शुद्ध सूर, त्यांची भावदर्शनाची क्षमता यांनी ते गाणं ऐकणं हा एक जिवंत, अद्भुत अनुभव केला आहे. ‘तू छुपी है कहां’ या ‘नवरंग’मधल्या गाण्यात सी. रामचंद्रांनी मन्ना डेंच्या आवाजाची ‘रेंज’ कमालीच्या कल्पकतेनं वापरली आहे. ‘तू छुपी है कहां, मैं तडपता यहां’ या आक्रोशानं म्हणजे साहजिकच चढय़ा सुरात हे गाणं सुरू होतं. दोन कडव्यांनंतर त्याची लय बदलते. ते संथ होतं. नायिकेची चाहूल लागलेला नायक काहीसा शांत होतो आणि ‘ये कौन चांद चमका, ये कौन घुंगरू खनका’ म्हणून माग काढत जातो. तरीही ती सापडत नाही तेव्हा कळवळून त्याचा आवाज पुन्हा टिपेला चढतो. ‘जमुना, तू ही है तू ही मेरी मोहिनी’ म्हणताना त्याचं पिळवटून उठलेलं काळीज मन्ना डेंच्या कंठातून व्यक्त होतं. जलद-संथ-जलद हा स्वराचा ‘शटल’ प्रवास त्यांनी या तीन मिनिटांच्या गाण्यात लीलया केला आहे. ‘चुनरी संभाल गोरी’सारखी रांगडी गाणी ते तशाच ताकदीनं रंगवायचे.
अशी अस्सल गुणवत्ता होती म्हणूनच मन्ना डे अनाकलनीय प्रतिकूलतेला पुरून उरले. चांगले तीस-चाळीस र्वष गात राहिले. त्यांचं अस्तित्व कोणत्याही स्टारवर अथवा संगीतकारावर अवलंबून नव्हतं. ‘पंत गेले राव चढले’ या जातीचं यश त्यांना प्रतिस्पध्र्याच्या जाण्यानं मिळालं नाही ते बरंच झालं. त्यांनी जे यश मिळवलं ते स्वत:च्या गुणांचं आणि मेहनतीचं अन् म्हणूनच निर्भेळ होतं, हे आपोआप सिद्ध झालं. सचिनच्या झंझावातामध्ये व्ही.व्ही.एस. लक्ष्मणसारखे प्रतिभाशाली क्रिकेटपटू झाकोळून गेले, तीच स्थिती रफी-मुकेश-किशोर या समर्थ त्रिकुटाच्या जमान्यात मन्ना डेंची झाली, पण लक्ष्मणप्रमाणेच ते व्हेरी व्हेरी स्पेशल होते. सगळ्यांहून निराळे होते. म्हणूनच त्यांच्या गुणांना संगीतप्रेमींनी भरभरून दाद दिली. मन्ना डेंना ‘फिल्म फेअर’सारखे पुरस्कार मिळाले नाहीत. त्याची नामांकनं मात्र भरपूर मिळाली, पण ‘सूरसिंगार’सारख्या सांगीतिक संघटनांनी व संस्थांनी त्यांच्यावर पुरस्कार, सन्मान आणि सत्कार यांचा वर्षांव केला.
पद्मश्री व पद्मभूषण हे सरकारी सन्मान असूनही चक्क या गुणी माणसाच्या वाटय़ाला आले आणि तेही वेळेवर! कलाक्षेत्रातल्या या मानमरातबाबरोबरच मन्ना डेंना आर्थिक स्थैर्याचं ऐहिक सुख लाभलं. दोन्ही मुलींची लग्न झाल्यावर आणि पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले, पण असाहाय्य झाले नाहीत. पुण्याईच्या बळावर तेही परीक्षक म्हणून अनेक टीव्ही चॅनेल्सवरून दिसले असते, पण पैसा व प्रसिद्धीसाठी त्यांना अशा गोष्टींचा कधीच मोह झाला नाही. ‘आपण बरं, आपलं गाणं बरं’ या वृत्तीनं ते अलिप्तपणे पण शेवटपर्यंत आनंदानं व स्वाभिमानानं जगले. आजकाल खिरापतीसारखे वाटले जाणारे डझनावरी संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार त्यांच्याकडे चुकूनही फिरकले नाहीत. त्यांना जितकं मिळायला हवं होतं, तितकं मिळालं नाही, ही हळहळ त्यामुळे अधिक वाढते. यातच त्यांचा गौरव आहे. कारण ही कीव नाही. मस्ती न मिरवता मस्तीत राहणाऱ्या सत्प्रवृत्त माणसाला केलेला तो सलाम आहे.
गुणी गायक: उमदा माणूस
सप्तसुरांशी खेळणाऱ्या मन्ना डेंनी गायक बनण्याचं स्वप्न कधीच बाळगलं नव्हतं. त्यांना बॉक्सर बनायचं होतं! गुद्दय़ांवरून स्वारी वकिलीच्या रिंगणात उतरणार होती, पण चुलते व संगीतकार के. सी. डे यांनी मुंबईला चलण्याचा आग्रह केला आणि मुंबई बघण्यासाठी प्रबोध चंद्र तथा मन्ना डे यांनी मायभूमी कलकत्ता सोडली. काकांच्या आग्रहावरून, टाइमपास म्हणून ते त्यांना मदत करू लागले आणि मग संगीतातच रमले.
या क्षेत्रात त्यांच्या योग्यतेएवढं त्यांना मिळालं नाही म्हणून प्रत्यक्ष भेटीत त्यांच्यापाशी हळहळ व्यक्त केली, तेव्हा उमद्या मनाच्या, खिलाडूवृत्तीच्या मन्ना डेंनी दिलेलं उत्तर त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणारं होतं. ते म्हणाले, ‘‘मला जे मिळालं त्यात मी खूश आहे. माझी वाट कुणी अडवली नव्हती. ते (रफी, मुकेश) माझ्या आधी या क्षेत्रात आले होते. मीच नंतर आलो. ते दोघे व किशोरदा कमालीचे टॅलेन्टेड होते.
त्यांनीही संघर्ष केलाच, यश मिळवलं. असे प्रतिस्पर्धी होते म्हणून मेहनत करण्याची प्रेरणा कायम राहिली. कोणती गाणी गायची हे चित्रपट संगीतात तुमच्या हातात नसतं. ती चांगली गाणं एवढंच काय ते तुम्ही करू शकता. मला वाटतं, मी ते प्रामाणिकपणे केलं. माझ्या हातात जसे पत्ते आले, तसा डाव मी खेळत गेलो. मला कोणतीही खंत नाही, खेद नाही. मी तृप्त आहे.’’
सूर सापडला पण..
अस्सल गुणवत्ता होती म्हणूनच मन्ना डे अनाकलनीय प्रतिकूलतेला पुरून उरले. चांगले तीस-चाळीस वर्षे गात राहिले. त्यांचं अस्तित्व कोणत्याही
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-10-2013 at 02:51 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legendary singer manna deys final journey