यंदाचा पावसाळा चांगला झाला, असे सर्वसाधारण मत ऑक्टोबरच्या सुरुवातीस- म्हणजे पावसाचा ‘मोसम’ उरला नसताना व्यक्त होते आहे. परंतु पावसाच्या चार महिन्यांमध्ये इतके चढ-उतार पाहायला मिळाले की, या वर्षीचा पाऊस नेमका कसा आहे, हे अद्याप सांगता येऊ नये.
या लहरी हवामानासंदर्भात घेतलेला गेल्या चार महिन्यांचा आढावा..
‘कोणत्याही दोन वर्षांचा मान्सून एकसारखा नसतो, प्रत्येक वर्षी त्याचे वेगळे रूप पाहायला व अनुभवायला मिळते!’.. मान्सून अर्थात मोसमी पावसाचा विषय निघाला की, हवामानशास्त्रज्ञांकडून त्याच्याबाबत ही गोष्ट आवर्जून ऐकायला मिळते. मान्सूनच्या आगमनाचा काळ, त्याच्या परतीचा प्रवास, पाऊसकाळ, उघडिपीचा काळ, त्याच्यापासून मिळणारा एकूण पाऊस, मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात होणारी पावसाची विभागणी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रदेशांनुसार होणारी विभागणी.. अशा अनेक घटकांचा विचार करता खरोखरच पावसाची कोणतीही दोन वर्षे एकसारखी नसतात.
या वैशिष्टय़ाप्रमाणेच मान्सूनची आणखी एक अनोखी बाब म्हणजे, प्रत्येक वर्षीचा मान्सून काही ना काही शिकवतो. या वर्षीसुद्धा त्याने एक धडा दिला. स्वत:च्या वर्तनातील एक बाब ठळकपणे मांडली. ती म्हणजे पाऊस चांगला आहे की वाईट याबाबत पावसाळा पूर्ण होईपर्यंत ठामपणे काही टिप्पणी करू नये! कारण तशी टिप्पणी बरोबर आली तरी त्यात आपल्या कौशल्यापेक्षा योगायोगाचाच भाग अधिक असतो. या वर्षी मुख्यत: महाराष्ट्रात नेमके हेच घडले. पावसाच्या चार महिन्यांमध्ये इतके चढ-उतार पाहायला मिळाले की, या वर्षीचा पाऊस नेमका कसा आहे हे तो संपेपर्यंत समजलेच नाही.
वेळेआधीच्या आगमनाचा विक्रम
मान्सूनचे या वर्षीचे आगमन विक्रमी ठरले. तो केरळात पोहोचला म्हणता म्हणता त्याने देशसुद्धा व्यापला. त्याचे केरळातील आगमन १ जून रोजी म्हणजे अगदी त्याच्या वेळापत्रकानुसार झाले. त्यानंतर मोजून पंधरा दिवसांत त्याने शेवटचा मुक्काम असलेले राजस्थानचे वाळवंट गाठले. मान्सूनच्या ज्ञात इतिहासात त्याने १६ जून रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घटना अपवादात्मक! मान्सूनने संपूर्ण देश व्यापण्यासाठी वेळापत्रकानुसार १५ जुलै ही तारीख उजाडते. त्याचा प्रवास दर वर्षी पुढे-मागे होतो, पण त्यात इतका मोठा फरक पडल्याचे यापूर्वी अगदी क्वचित पाहायला मिळाले आहे. या वर्षी १६ जून रोजी मान्सूनने देश व्यापला.
‘देश व्यापला’ याचा अर्थ दर वेळेस पाऊस चांगलाच पडतो असे नाही. पण या वर्षी दिलाशाची बाब अशी की, पावसाची सुरुवातही दमदार झाली. विशेषत: महाराष्ट्रात त्याने जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात तर बहुतांश भागांत पाऊस थांबलाच नाही. याबाबत पुण्याची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. पुण्यात जुलै महिन्यात पावसाचे सरासरी १३ दिवस असतात, पण या वेळी तब्बल २८ दिवस पाऊस पडला. जूनमध्येही इनमीन ७-८ दिवसांच्या सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात २० दिवस पावसाचे होते. राज्याचा पर्जन्यछायेचा प्रदेश वगळता इतर सर्व भागांत पावसाची अशीच स्थिती होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या अपुऱ्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर हा मोठा दिलासा होता. महाराष्ट्रात हवामानाच्या दृष्टीने चार उपविभाग आहेत. त्यापैकी विदर्भात जून-जुलैमधील सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला होता, तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या इतर तीन उपविभागांमध्ये तो सरासरीच्या तब्बल दीडपट कोसळला होता. देशभरातसुद्धा तोपर्यंत सरासरीच्या १७ ते १८ टक्के जास्त पाऊस पडला होता. पुढे ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज होता. त्यामुळे भारतासाठी आताचे वर्ष अतिवृष्टीचे (सरासरीच्या ११० टक्के किंवा जास्त पावसाचे) ठरण्याची शक्यता अधिक होती. गेली सलग वीस वर्षे असे घडलेले नाही, त्यामुळे अशा वर्षांची प्रतीक्षा होती. त्या वेळी अनेक अभ्यासकांनी ही शक्यता बोलूनही दाखवली होती. महाराष्ट्रात तर ओला दुष्काळ पडणार की काय, असे चित्र जुलै महिन्याच्या अखेरीस होते.
खेळ चढ-उताराचा..
धो-धो पावसाच्या या वातावरणात या वर्षीच्या पावसाळ्याबाबत खूपच चांगले चित्र रंगवले गेले. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने अशी हुलकावणी दिली की सर्वाच्याच पोटात गोळा आला. महाराष्ट्रात ऑगस्ट महिना जवळजवळ कोरडाच गेला. आधीच्या पावसात बहुतांश धरणे भरून घेतली होती म्हणून बरे, नाही तर अस्वस्थता आणखी वाढली असती. जून-जुलैच्या ‘चढा’नंतर पाऊस उतरणीला लागला. त्याचा विशेषत: पर्जन्यछायेच्या प्रदेशावर (मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि मराठवाडय़ाचा बराचसा भाग) विपरीत परिणाम झाला. या भागात आधीची सलग दोन-तीन वर्षे अतिशय अपुऱ्या पावसाची गेली होती. त्यामुळे जनावरांच्या चारा छावण्या, पाण्याचे टँकर, दुष्काळी कामे, गावांचे स्थलांतर अशी परिस्थिती होती. मान्सूनपूर्व उन्हाळी पावसाने हजेरी न लावल्याने आधीच स्थिती बिकट होती. त्यामुळे हे वर्षसुद्धा दुष्काळाचेच का? असे निराशेचे वातावरण होते. येऊ घातलेल्या दुष्काळाची बरीच चर्चा झाली. परिस्थिती पाहून जनावरांच्या छावण्या पुढेही कायम ठेवण्याचा विचार राज्याच्या पातळीवर झाला. आधीचे दोन महिने सुकाळ आणि त्यानंतरच्या महिन्यात दुष्काळ अशा प्रकारे वातावरण पालटले होते. त्याला विदर्भाचा अपवाद होता. कारण तिथे सुरुवातीपासून ते अखेपर्यंत पाऊस कोसळत होता.
अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईचे राज्यावर सावट असताना पावसाच्या अखेरच्या सप्टेंबर महिन्यात पुन्हा चित्र पालटले. गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री पावसाला सुरुवात झाली आणि संपूर्ण गणपतीच्या दिवसांत त्याने जोरदार हजेरी लावली. विशेषत: पर्जन्यछायेच्या पट्टय़ात इतका पाऊस कोसळला की, त्या भागावरचे दुष्काळाचे सावट कुठच्या कुठे पळाले. तळी-तलाव भरले. गेली दोन वर्षे पूर्ण कोरडे असलेले ओढे व माणगंगेसारख्या नद्यासुद्धा वाहू लागल्या.. सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनचा काळ संपला, तेव्हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागांवर पाण्याच्या दृष्टीने समाधानकारक चित्र आहे. निदान या वर्षी तरी पाणीटंचाईची झळ बसायला नको, असे आज तरी वातावरण आहे.
पावसात चढ-उतार हे असतातच. या वर्षी ते इतके ठळक होते की पावसाळा संपेपर्यंत पावसाचा नेमका अंदाज आलाच नाही. पावसाबद्दल मध्येच ठाम मत करून घ्यायचे नाही आणि मतप्रदर्शन तर अजिबातच करायचे नाही, असा धडाच जणू या वेळच्या मान्सूनने दिला. विशेष म्हणजे जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा अधिकृत काळ. तो संपला असला तरी मान्सून अद्याप भारतातून परतलेला नाही. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच, गुजरात व राजस्थानच्या काही भागांतून तो बाहेर पडला आहे. पण देशाचे इतर सर्व भाग अजूनही त्याच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात पाऊस काही रंग दाखवणार का, याचीदेखील उत्सुकता आहेच.
मुक्काम वाढतो आहे, पण..
देशात मान्सूनचा परतीचा प्रवासही उशिराने सुरू झाला. वेळापत्रकानुसार तो १ सप्टेंबरला सुरू होतो. मात्र, यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास ९ सप्टेंबर रोजी सुरू झाला. त्यानंतरही तो झटपट बाहेर पडला नाही, तर बराच काळ रेंगाळलेलाच आहे. एव्हाना त्याने महाराष्ट्रातून बाहेर पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्याला अजून बराच काळ जावा लागेल, अशी स्थिती आहे.
इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हवामानबदल विषयावरील पाचवा स्थितिदर्शक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात मान्सूनचा देशातील मुक्काम वाढणार असल्याचे म्हटले आहे. त्याचाच प्रत्यय या वर्षीच्या मान्सूनने दिला.
अंदाजाची ऐशीतैशी
या वर्षी मान्सून काळातील पावसाबाबत हवामान विभागातर्फे देण्यात आलेले अंदाज वस्तुस्थितीपासून दूरचेच ठरले. जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण देशात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज दिला होता. त्यात ४ टक्क्यांची तफावत अंतर्भूत होती. त्यामुळे ९४ ते १०२ टक्के इतका पाऊस पडला असता तर अंदाज खरा ठरला असता. प्रत्यक्षात देशात सरासरीच्या १०६ टक्केपाऊस पडला. हे अंदाज देणे किचकट असल्याने त्यात ८ टक्क्यांची त्रुटी अंतर्भूत आहे. प्रत्यक्षात मात्र अंदाज आणि पाऊस यांच्यात खूपच मोठी तफावत आहे.
प्रदेश जाहीर अंदाज प्रत्यक्ष पाऊस
वायव्य भारत ९४ टक्के १०९.२ टक्के
मध्य भारत ९८ टक्के १२२.७ टक्के
ईशान्य भारत ९८ टक्के ७१.२ टक्के
दक्षिण भारत १०३ टक्के ११५.४ टक्के