आगामी लोकसभा निवडणुकीत बहुतेक सर्वच राज्यांमध्ये राजकीय नेत्यांनी आपली मुले वा नातेवाइकांना उमेदवारी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी निम्म्या म्हणजेच २४ मतदारसंघांमध्ये घराणेशाहीची पाश्र्वभूमी असलेले उमेदवार िरगणात आहेत. त्याचा हा आढावा..
कोणत्याही निवडणुकीत घराणेशाही हा मुद्दा प्रकर्षांने चर्चेला येतो. आपली मुले, पत्नी, जवळचे नातेवाईक यांना उमेदवारी किंवा महत्त्वाची पदे मिळाली पाहिजेत, असा बहुतांशी राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. घराणेशाही ही फक्त आपल्याच देशात आहे, असे नाही. अमेरिकेत जॉर्ज बुश (वरिष्ठ) आणि त्यांचे पुत्र त्यांचेही नाव जॉर्ज बुश यांनी राष्ट्राध्यक्षपद भूषविले. वडील आणि मुलगा राष्ट्राध्यक्ष, तर भाऊ फ्लोरिडा प्रांताचा गव्हर्नर, अशी पदे एकाच घरात बघायला मिळाली. फक्त हुकूमशाही किंवा राजघराणे असलेल्या देशांमध्ये नव्हे, तर लोकशाही प्रक्रिया असलेल्या राष्ट्रांमध्ये घराणेशाही रुजू लागली. नेहरू-गांधी घराण्यातील राहुल गांधी हे चौथ्या पिढीचे प्रतिनिधी राजकारणात सक्रिय आहेत. शेजारील पाकिस्तानमध्ये भुत्तो घराण्यातील तिसरी पिढी पुढे आली आहे. बांगलादेशातही शेख हसिना आणि खलिदा झिया या दोन्ही महिला नेत्यांचे नेतृत्व घराणेशाहीतूनच पुढे आले. आपल्या देशाचा विचार केल्यास भाजप, बसपा, कम्युनिस्ट अशा काही पक्षांचा अपवाद करता काँग्रेससह बहुतांशी पक्षांमध्ये घराणेशाही आहे. मुलायमसिंग यादव, फारुख अब्दुल्ला, करुणानिधी, प्रकाशसिंग बादल यांनी आपल्या राजकीय वारसांकडे सूत्रे जातील अशी व्यवस्था केली. शिवसेनेतही तिसरी पिढी पुढे आली. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित आणि कन्या सुप्रिया सुळे राजकारणात स्थिरस्थावर झाले. पदावर स्थिरस्थावर होणारा नेता आपल्या घरातील एखादा राजकारणात पुढे येईल याची खबरदारी घेत असतो.
सहा मुख्यमंत्र्यांची पाश्र्वभूमी घराणेशाहीची
देशातील २६ पैकी (दिल्ली आणि आंध्र प्रदेशात राष्ट्रपती राजवट) सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना घराणेशीहीची पाश्र्वभूमी आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होतो. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आणि आई या दोघांनीही केंद्र आणि राज्यात महत्त्वाची पदे भूषविली. राज्यात मुख्यमंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही घराणेशाहीची किनार आहे. जम्मू आणि काश्मीरचे ओमर अब्दुल्ला, झारखंडचे हेमंत सोरेन, ओदिशाचे नवीन पटनायक, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव आणि राजस्थानच्या वसुंधराराजे या मुख्यमंत्र्यांच्या घरातच महत्त्वाची पदे भूषविली गेली. पृथ्वीराज चव्हाण आणि वसुंधराराजेवगळता चौघांच्या वडिलांनी त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.
तीन मतदारसंघांमध्ये घराणेशाहीतच लढत
राज्यातील ४८ पैकी निम्म्या म्हणजेच २४ मतदारसंघांमध्ये घराणेशाहीची पाश्र्वभूमी असलेले उमेदवार आहेत. लोकसभा अथवा विधानसभेत आपल्याच घरात उमेदवारी मिळाली पाहिजे, असा नेतेमंडळींचा प्रयत्न असतो. घराणेशाहीत कोणत्याही राजकीय पक्षाला अपवाद करता येणार नाही.  केवळ राजकीय हिशेब चुकते करण्याकरिता मंत्रिपदावर पाणी सोडून डॉ. विजयकुमार गावित यांनी मुलीला भाजपच्या वतीने उभे केले. विधान परिषदेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठीच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा जाहीर झालेला उमेदवार बदलून सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. धनशक्तीमुळे गाजलेल्या त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांनी तेव्हा खडसे यांच्या मुलाचा पराभव केला होता. काँग्रेसला मतदारसंघ सुटत नाही हे लक्षात येताच अपक्ष म्हणून निवडून येऊनही पाच वर्षे काँग्रेसला साथ दिलेल्या सदाशिव मंडलिक यांनी मुलाला शिवसेनेकडून उभे केले. दिंडोरी मतदारसंघातून माजी मंत्री ए. टी. पवार यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने मांडला होता. पण त्यांनी सुनेला उमेदवारी देण्यास भाग पाडले. ज्येष्ठता लक्षात घेता विजयसिंह मोहिते-पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर घराणेशाहीचा शिक्का मारता येणार नाही. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणूनच प्रकाश यांना जास्त महत्त्व आहे. हातकणंगलेमधील काँग्रेसचे उमेदवार कलाप्पाण्णा आवाडे हे स्वत: माजी मंत्री, मुलगा प्रकाश माजी मंत्री, सून माजी नगराध्यक्षा तर नातूही सक्रिय.  छगन भुजबळ आणि गणेश नाईक या दोन्ही मंत्र्यांनी खासदारकी, आमदारकी वा महापौरदपद आपल्याच घरात राहील, अशी खबरदारी घेतली.
पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत कल्याण, उत्तर मध्य मुंबई आणि रावेर या तीन मतदारसंघांत तर घराणेशाहीची पाश्र्वभूमी असलेल्यांमध्येच लढत होणार आहे. घराणेशाहीतून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांकडून निवडणुकीत हात अधिकच ‘सैल’ सोडला जात असल्याचे बघायला मिळते. मग संजीव नाईक, डॉ. श्रीकांत शिंदे, राजू पाटील, विश्वजित कदम, हिना गावित, मनीष जैन त्याला अपवाद नाहीत. कारण मुलाला किंवा नातेवाइकाला काहीही करून निवडून आणतो हा शब्द नेत्याने त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे टाकलेला असतो. अशा वेळी सारी प्रतिष्ठा पणाला लावून घरातील व्यक्तीला निवडून आणण्याचे उद्दिष्ट राजकीय नेत्यांचे असते व त्यासाठी कितीही ताणण्याची त्यांची तयारी असते. घराणेशाहीवरून टीका केली जात असली तरी नेतेमंडळींच्या मुलांचे म्हणणे वेगळे असते. पहिल्या वेळी नेत्याचा मुलगा किंवा मुलगी म्हणून मतदार निवडून देतात, पण निवडून आल्यावर आपले कौशल्य सिद्ध करावे लागते; तरच मतदार पुन्हापुन्हा निवडून देतात. घराणेशाहीवर टीका केली जाते, पण नेत्यांच्या मुलांना किंवा नातेवाइकांनाच मतदार निवडून देतात.
सर्वपक्षीय घराणेशाहीची ही उदाहरणे..
*दक्षिण मुंबई – मिलिंद देवरा (काँग्रेस) – वडील मुरली देवरा माजी केंद्रीय मंत्री तथा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष.
*दक्षिण मध्य मुंबई –  आदित्य शिरोडकर (मनसे) – वडील राजन शिरोडकर हे भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष
*उत्तर मध्य मुंबई – प्रिया दत्त (काँग्रेस) – चित्रपट अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांची कन्या. पूनम महाजन (भाजप) – माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची कन्या. फरहान आझमी (समाजवादी पार्टी) –  राज्यातील सपाचे प्रमुख व आमदार अबू आसिम आझमी यांचे पुत्र.
*ईशान्य मुंबई – संजय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – कामगार नेते आणि माजी आमदार दिना बामा पाटील यांचे पुत्र.
*ठाणे –  संजीव नाईक (राष्ट्रवादी) – जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे पुत्र.
*कल्याण – आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेस) – माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र.       डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) – सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचे पुत्र. राजू पाटील (मनसे) – कल्याण ग्रामीणचे आमदार रमेश पाटील यांचे बंधू.
*दिंडोरी –  डॉ. भारती पवार (राष्ट्रवादी) – माजी मंत्री व आमदार ए. टी. पवार यांची सून.
*रावेर – मनीष जैन (राष्ट्रवादी) – खासदार ईश्वर जैन यांचे पुत्र. रक्षा खडसे (भाजप) – विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची सून.
*नंदुरबार – हिना गावित (भाजप) – राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या.
*मावळ – राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) – माजी मंत्री तथा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई.
*पुणे – विश्वजित कदम (काँग्रेस) – वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र.
*बारामती –  सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) – केंद्रीय मंत्री शरद पवार यांची कन्या
*नगर – राजीव राजाळे (राष्ट्रवादी) – वडील माजी आमदार तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मामा.
*सांगली – प्रतीक पाटील (काँग्रेस) – माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू तर माजी खासदार प्रकाश पाटील यांचे पुत्र.
*कोल्हापूर –  मुन्ना महाडिक (राष्ट्रवादी) – काँग्रेस आमदार महादेव महाडिक यांचे पुतणे. संजय मंडलिक (शिवसेना) – अपक्ष खासदार सदाशिव मंडलिक यांचे पुत्र.
*रत्नागिरी-सिंधुदुर्ग –  नीलेश राणे (काँग्रेस) – उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र.
*जालना – विजय औताडे (काँग्रेस) – माजी आमदार आणि औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे यांचे पुत्र.
*हिंगोली – राजीव सातव (काँग्रेस) – माजी राज्यमंत्री रजनीताई सातव यांचे पुत्र.
*नांदेड – अशोक चव्हाण (काँग्रेस) – माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र.
*वर्धा – सागर मेघे (काँग्रेस) – विद्यमान खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र तसेच राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे मेव्हणे.  
*रामटेक – मुकुल वासनीक (काँग्रेस) – माजी खासदार बाळकृष्ण वासनीक यांचे पुत्र.
*यवतमाळ-वाशिम- भावना गवळी (शिवसेना) – वडील पुंडलिक गवळी माजी खासदार.
*अमरावती – नवतीन कौर राणा (राष्ट्रवादी) – अपक्ष आमदार रवी राणा यांची पत्नी. डॉ. राजेंद्र गवई (रिपब्लिकन) – रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सू. गवई यांचे पुत्र.
*औरंगाबाद – नितीन पाटील (काँग्रेस) – वडील सुरेश पाटील जिल्हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी.

devendra fadnavis interview in loksatta Varshvedh event
महाराष्ट्रात युतीचे राजकारण आणखी काही काळ चालेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Story img Loader