दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाचा अंदाज करणे कठीण आहे. पाऊस अनाकलनीय बनला आहे. अशा प्रकारची शेरेबाजी पावसाच्या बदललेल्या स्थितीवरून हल्ली वारंवार केली जात असल्याचे कानावर पडते. परिणामी पाऊस कधीचा पडतो याकडे डोळे लागतात. अनेकदा तो वेळेवर , पुरेसा पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो. तसे होतेही. पण ते त्याच्या मनानुसार , पावसाच्या.

त्याचे आगमन वेळेवर होते. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर सुगी दिसू लागते. मध्येच तो इतका लांबतो की शेतकरी घायकुतीला येतो. शेत शिवाराने मान टाकल्याने पुन्हा दुबार पेरणीचे संकट येणार की काय अशी भीती वाटायला लागते. या भीतीने मनामध्ये घर केलेलं असते. शेतातील हिरवाई हिरमुसली होऊ लागलेली असते. सारे काही गमावले असे समजून गावोगावची मंडळी त्रस्त्र झालेली दिसतात. आणि अशाच एका वंचित वेळी बेसावध गाठून पाऊस झोडपायला सुरुवात करतो. पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतो. तो इतका की संततदार पावसामुळे अवघा परिसर जलमय होतो. त्याची मिठी इतकी विक्राळ कि उगवलेले सारे मातीमोल होण्याची भीती दाटते. यंदाही पावसाने अशीच अवस्था केली आहे. त्याची हि दुखरी वेदना आणि त्यावरची उपाययोजना.

यंदा पाऊस वेळेवर पडणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पुरेशी तजवीज केली होती. वायदा केल्याप्रमाणे तो अगदी वेळेवर आला. थोड्याच दिवसात तो कामचुकार बनला. तो पुन्हा इतका लांबला की शेतकऱ्यांची घालमेल सुरू झाली. इकडे शेतकरी गणित घालीत मनाचे मांडे खाऊ लागला. तरणा काही मदतीला आला नाही. म्हाताऱ्याने मुळीच निराश केले नाही. त्याने अशी काठी उगारली ढग बदाबदा गळू लागले. त्याला थोपवणे अशक्यमात्र बनले.  त्याने अशी काही खेळी केली की मुसळधार पावसाने निम्म्या महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत झाले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ येथे पुराची धास्ती निर्माण झाली. नदी, धरणे, नाले , ओढे पात्राबाहेर सरकले. हळूहळू त्यांनी आसपासची शेती काबीज केली. नागरी वस्तीत घुसखोरी केली. गावेच्या गावे त्यामध्ये वेढली गेली. अशा या अनाकलनीय, बेभरवशाच्या पावसाचे करायचे काय असा प्रश्न पडला. त्याहून अधिक चिंता निर्माण झाली ती पुरात बुडालेल्या पिकांची. ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, फळे अशी पिके पुराच्या पाण्याखाली बुडाली.

पूर्वीचे लोक सांगायचे महापुर आला कि आठवडाभरानंतर नदी पूर्वीसारखी दिसायची, वाहायची. आजकाल पर्जन्य गती बदलली आहे. आता महापूर येतो तोच जणू मुक्कामाला आल्यासारखा. आठवडा, दोन आठवडे, तीन आठवडे …किती दिवस कोण जाणे. पुराचे तसेच तसे साचून राहते. आताही पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतली त्याला आठ – दहा  दिवस  उलटले. लख्ख ऊनही पडू लागले आहे. पण पुराचे पाणी काही गतीने ओसरताना दिसत नाही. त्याची कारणे अनेक. त्याची मीमांसा येथे अपेक्षित नाही तर पिकपाण्यावर झालेल्या परिणामाची.

नुकतेच कोठे काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे. बुडालेली पिके नजरेला येऊ लागली आहेत. त्यावरून पुरात काय गमावले आहे, किती नुकसान झाले आहे याचा अदमास घेणे शक्य झाले आहे. सोमवारपासून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या कृषी विभागाची पथके उसाच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बाहेर पडली आहेत. शेत -शिवारात जाऊन बुडालेल्या उसाचे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेतला जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संवाद साधला जात आहे. २००५, २००६, २०१९, २०२१ सालच्या महापुरात अपरिमित हानी झाली होती. यंदा तितकेसे नाही; पण जे नुकसान झाले आहे तेही काही कमी नाही, अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत. त्यामुळे आता या पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचे अर्थकारण हे साखर उद्योगाशी निगडित आहे. गावोगावी उसाचे मळे फुलले आहेत. असे मळेच्या ऊस मळे पाण्यात दीर्घ काळ राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनने २०१९ सालच्या पुरात बुडालेल्या ऊस पिकांची पाहणी केली होती. अनेक कृषी शास्त्रज्ञ त्यामध्ये सहभागी झाले होते. पूरग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस शेतीचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर काही निरीक्षणे नोंदवली. शेतकऱ्यांनी मे, जूनच्या अखेरीस लागणी सुरू केल्या. त्या जुलै उजाडला तरीही सुरूच राहिल्या होत्या. हाच उगवणीचा  काळ.  याच काळात धुवाधार पाऊस झाला. सऱ्या पाण्याने भरल्या. पुराचे पाणी शेतात शिरले. शेती पाण्यात डुंबून राहिली.  परिणामी लागण केलेल्या उसाची उगवण झाली नाही. उगवलेले कोंब भरून गेले. सुरळीमध्ये पाणी गेल्याने पिके वाढण्याची अवस्था थंडावली. अनेक ठिकाणी पिके कुजून गेली. काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये लागण केली होती. तो ऊस १५ ते १९ कांड्यावर होता. काही शेतकऱ्यांनी जुलै – ऑगस्टमध्ये लावलेला आडसाली ऊस २० -२२  कांड्यावर होता. खोडव्याचे पीक तेरा ते पंधरा कांड्यावर होते.

बहुतांशी क्षेत्रात पीक दहा-बारा दिवस अधिक काळ पाण्यात राहिले होते. नुकसानीचे प्रमाण नदीकिनाऱ्यापासून अंतराप्रमाणे व्यस्त आढळून आले होते. खालच्या कांड्यांवर मुळ्या उठल्या होत्या. नदीपात्रातून थोड्या उंचीवरील क्षेत्रातील पीक तीन ते सात दिवस पाण्यात होते.

यावर्षी त्याहून वेगळी परिस्थिती नाही. काही ठिकाणी पुराचे पाणी आले नाही. पण अति पावसाने सऱ्या भरल्या आहेत. सततच्या पावसामुळे पाणी शेताबाहेर काढणे अशक्य बनले होते. बुडालेल्या पिकावर चिखल माती साठली आहे. गाळ सुरळीत जाऊन शेंडामर होऊन खालचे डोळे फुटले आहेत. त्यामुळे उसाची वाढ होत नाहीत. याचे शेती – शेतजमिनीवर प्रतिकूल परिणाम होतात.

शेतातील पिकासाठी आवश्यक जिवाणू मरून जातात. जैविक घटक नष्ट पावतात. जमीन मृतवत झाल्यासारखी होते. परिणामी उस पिकाची वाढ खुंटते. त्यावर अनेक परिणाम दिसू लागतात. उसाची वाढ अत्यंत मंद गतीने होते. पानांची लांबी , रुंदी, आकार कमी होतो. ती पिवळी पडतात.  पानावर गाळ साचतो. रोग व किडींना पिके बळी पडतात. मुळे मृतवत होतात. त्यांची जमिनीवरचे पकड कमी होते. परिणामी अनेक ठिकाणी पिके लोळत असल्याचे विदारक दृश्य दृष्टीस पडते.

अशा उसाचे करायचे काय असा दुसरा गंभीर प्रश्न निर्माण होतो. काहीजण यापासून गुळ तयार करायचा प्रयत्न करतात. पण चवहीन गुळात गुणवत्ता येणार कुठून. याचे खोडवे ही चांगले नसते. असे अनेक परिणाम दिसून येतात. हि पिके टिकवायची तर युरिया ,सुपर फॉस्फेट ,जिवाणू खत पसरावे लागते. रोटावेअरने उसाचे अवशेष व खते जमिनीत काढून टाकावी लागतात.  ते शेतात कुजून त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर होते. शेतात साचलेले पाणी निचरा करून काढून टाकावे. वापसा येताच अंतर मशागत करून जमीन भुसभुशीत करावी. ऊस लोळत असेल तर बांधून उभा करावा.  त्यामुळे जमिनीशी कांड्यांचा जमिनीशी संपर्क येणार नाही. मुळ्या व पांगश्या डोळे फुटण्याचे प्रमाण कमी राहील. ऊस वाढीनुसार वेगवेगळ्या पद्धतीच्या फवारण्या केल्या जातात. त्याबाबत तज्ञांनी वेगवेगळ्या रचना केल्या असून त्याचा अवलंब करता येईल. त्यांच्या सल्ल्याने अशी फवारणी करणे फायदेशीर ठरते. अशा काळात गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तेव्हा २५ टक्के मेटलडिहाइडचा वापर करावा. मुळाची वाढ होण्यासाठी चुन्याच्या निवळीची (चुन्याची नव्हे ) आळवणी अथवा फवारणी जमेल तेव्हा केली पाहिजे. अशा काही उपाययोजना करून उसात गोडवा आणता येणे शक्य आहे.  dayanandlipare@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok shivar challenges of heavy rain for farmers excessive impact rain on crops zws