या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्याला चीन माहीत असतो तो त्याच्यासोबत सतत सुरू असलेल्या कुरबुरींमुळे. आपली बाजारपेठ व्यापून टाकणाऱ्या चिनी वस्तूंमुळे. प्रचंड लोकसंख्येमुळे. पण त्यापलीकडेही चीन हाडामांसाच्या माणसांचा देश आहे. तिथे राहून तो अनुभवल्यावर तिथल्या माणसांचं, त्यांच्या जगण्याचं विस्मयजनक दर्शन होतं.

िभतीपलीकडचा हा देशच निराळा आहे. इथे हेकेखोर स्वभावाची माणसं आहेत, प्रत्येकाने स्वत:भोवती घालून घेतलेली एक अभेद्य अशी िभत आहे. मुक्त संवादाला कचरणारी विसंवादी पात्रं आहेत. कुणाच्या तरी धाकातून निर्माण झालेली एक भयाण शिस्त आहे. ललनांचा चिवचिवाट आहे, तरुणांची जिद्द आहे. दुसऱ्याप्रति असणारा आदर आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचं कुतूहल आहे. स्वत:च्या संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान आहे. खटकणारा स्पष्टवक्तेपणा आहे, भावणारं आदरातिथ्य आहे. सौंदर्यप्रसाधनांचं वेड आहे, तंत्रज्ञानाचं व्यसन आहे. अन्नग्रहणाची भन्नाट पद्धत आहे, स्वयंपाकाची अचाट प्रथा आहे. कुणीतरी आपल्यावर चाल करेल ही असुरक्षितता आहे, महासत्ता बनण्याची ईर्षां आहे. हे सगळं पोटात सामावून एका अदृश्य मार्गावरून ड्रॅगनची वाटचाल सुरू आहे. ती डोळे दिपवून टाकणारी आहे, तशीच डोळे उघडायला लावणारी देखील आहे.

या देशाचा भौगोलिक विस्तार जितका मोठा आहे त्याच्या कित्येक पटींनी अधिक या देशाच्या संस्कृतीचा पसारा आहे. हा पसारा जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी मोठी तपश्चर्या करावी लागेल. काही महिन्यांच्या वास्तव्यात चीन हा देश उमजेल अशी आशा बाळगणं बाळबोध ठरेल. पण तरीही पाच महिन्यांच्या वास्तव्यात विद्यापीठ कॅम्पस, मेट्रो, हायस्पीड ट्रेन्स, रस्ते, मॉल्स, पर्यटनाची स्थळं आदी ठिकाणी ड्रॅगन स्वत:ची झलक दाखवत होता. अगदी विमानतळावर उतरल्यापासूनच चीनने स्वत:चं वेगळेपण सिद्ध करायला सुरुवात केली होती. त्याची पहिली पायरी म्हणजे पुढले काही महिने इंग्रजी बासनात गुंडाळून ठेवायची. विमानतळावरल्या अधिकाऱ्यालाही इंग्रजीची अ‍ॅलर्जी होती. त्यामुळे मोडक्यातोडक्या चिनी भाषेमध्ये आणि उर्वरित भावना हाता-चेहऱ्याच्या हालचालींवरून व्यक्त कराव्या लागत होत्या. पण भाषेची अडचण फक्त विमानतळावरच नव्हती. केमिस्टपासून ते अगदी मोबाइल स्टोअपर्यंत सगळीकडेच इंग्रजीला मज्जाव होता.

मोबाइल स्टोअरमध्ये नवीन सिमकार्ड विकत घेताना खरी कसरत झाली होती. आगामी संकटाची तशी पूर्वकल्पना होतीच. त्यामुळे सिने-टीव्ही कलाकार जसे डायलॉग पाठ करून मग कॅमेऱ्याला सामोरे जातात तशीच तयारी इथेही करावी लागली. हवा असलेला प्लान, किती रुपये, कधी अ‍ॅक्टिव्हेट होणार, इंटरनेट डेटा, पासपोर्ट वगरे शब्दांचे चिनी समानार्थी शब्द आधीच लिहून घेतले होते. पण लिखित शब्द आणि समोरून उच्चारले जाणारे शब्द यामधे गणिताच्या पुस्तकात सोडवलेलं गणित आणि आपण उत्तरपत्रिकेत लिहिलेलं गणित इतका फरक होता. त्यामुळे समोरच्या काऊंटरपलीकडच्या माणसाचे उद्गार ऐकून चेहरा भावशून्य झाला होता. शेवटी मोडकंतोडकं इंग्रजी येणाऱ्या एका कॉलेज तरुणीने शंकानिरसन केलं आणि सिमकार्ड खरेदी पार पडली. त्या तरुणीचे तातडीने आभार मानण्यात आले. भविष्यात अशा अडचणीसाठी मदत म्हणून आणि चिनी भाषा सुधारण्याच्या उद्देशाने त्या तरुणीशी मत्री केली.

इथे (इथे म्हणजे चीनमध्ये) मत्रीची सुरुवात ही वीचॅट आयडी शेअर करून होते. वीचॅट हे व्हॉट्सअ‍ॅपसारखं किंबहुना त्यापेक्षाही सरस असं मेसेजिंग अ‍ॅप आहे. चिनी कंपनीनेच ते तयार केलेलं आहे. मोबाइल नंबरवर आधारित व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा केवळ युजर आयडीवर आधारित वीचॅट हे बरंचसं सुरक्षित आणि सोयीस्कर आहे. त्याशिवाय वीचॅट वॉलेटच्या माध्यमातून अथपासून इतिपर्यंत सारं काही विकत घेता येतं हा भाग निराळा.

बाकी चीनमध्ये एक बरं आहे. तुम्ही सज्जन आणि सभ्य दिसत असाल तर अनोळखी मुली वीचॅट आयडी शेअर करायला फारशा घाबरत नाहीत. त्यामुळे त्या कॉलेज तरुणीशी मत्री केली. खरी गंमत वीचॅट आयडीमध्ये आहे. इथे जवळपास प्रत्येकाचं (म्हणजे ज्यांना ज्यांना इच्छा आहे किंवा गरज आहे ते) इंग्रजी नाव असतं. तेही आपल्याला आवडेल ते नाव आपण स्वत:ला द्यायचं. या तरुणीचं चिनी नाव हे वँग होतं, तर इंग्रजी नाव जेन. त्यामुळे वीचॅट आयडीवर ही दोन्ही नावं होती. परदेशी नागरिकांना आपली नावं उच्चारताना त्रास होऊ नये यासाठी ज्याने त्याने केलेली ही खास सोय. पण अनेकदा लिपस्टीक, सनशाइन अशी नावंही मुली घेतात. इंक (म्हणजे शाई) असं नाव असणारी एक मुलगीही चीनमधल्या डेटिंग अ‍ॅपवर वावरते.

चीनमधल्या या नामकरणावर खरंतर ग्रंथसंपदाच तयार करता येईल. व्याकरणाच्या नाम या प्रकारात मोडणाऱ्या साऱ्यांची चिनी नावं तयार होतात. म्हणजे व्यक्तीपासून ते वस्तूपर्यंत आणि शहरापासून ते दुकानापर्यंत एकूण एक नाम हे चिनी भाषेत वेगळं असतं. त्यामुळेच मुंबईचं नाव मंगमाय होतं, भारताचं नाव इंदू होतं, अमेरिका मकुओ होते आणि इंग्रजीचं ियगवन असं नामकरण होतं. अगदी ब्रॅण्डलासुद्धा ही मंडळी खास चिनी नाव देतात. उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड्स ही जगप्रसिद्ध फूडचेन. मात्र ड्रॅगनने तिला मायदलंग असं नाव दिलंय. सामान्य माणसं याच नावांचा वापर करतात. मातृभाषा समृद्ध करत ती जोपासायची कशी हे चीनकडून शिकता येईल. जगातल्या देशांची, शहरांची, महनीय व्यक्तींची, घटनांची नावंही चिनी भाषेत तयार केली जातात. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक चिनी नाव दिलं जातं. मूळ नावाच्या उच्चाराच्या जवळ जाणारं असं हे नाव असतं.

चीनमध्ये रस्ते, विमानतळं, विद्यापीठं, पूल, स्टेशन्स, बस आगार, शाळा, कॉलेजेस अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणांना कुठल्याही महापुरुषांची, नेत्यांची नावं नाहीत. भौगोलिक स्थानानुसारच नावं देण्याची इथे प्रथा आहे. उदाहरणच द्यायचं तर बीजिंगचा खरा उच्चार पेईचिंग असा आहे. पेई म्हणजे उत्तर दिशा आणि चिंग म्हणजे राजधानी. उत्तरेकडची राजधानी म्हणजे बीजिंग. शांघायचंसुद्धा तसंच आहे. समुद्रकिनारी वसलेलं शहर म्हणजे शांघाय. रस्त्यांच्या बाबतीतही हेच धोरण. स्थानिक जागेचं नाव आणि त्याला लागून उत्तरेकडचा रस्ता, पूर्वेकडची गल्ली, पश्चिमेकडची लेन अशीच साधारण रस्त्यांची नावं असतात. शाळा-विद्यापीठांसाठीही हेच तंत्र वापरलं जातं. बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सटिी, थिआनचिन म्युन्सिपल स्कूल नंबर तीन अशा प्रकारे संस्थांचं नामकरण होत असतं. नेतेमंडळींच्या नावांनी संस्था वगरे सुरू करण्याचं खूळ अजून तरी त्या देशाला लागलेलं नाही. कॅम्पसमध्ये त्या संस्थेत शिक्षण घेतलेल्या मोठय़ा व्यक्तीचा पुतळा वगरे असतो. पण त्याच्याच नावाने संस्था सुरू करण्याचे प्रकार मात्र टाळले जातात. उदाहरणार्थ, नानखाय विद्यापीठ हे चीनमधलं पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांपकी एक. चीनचे पहिले राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय हे याच विद्यापीठाचे विद्यार्थी होते. पण म्हणून त्यांच्या नावाने विद्यापीठात कुठल्याही प्रकारचं स्वाध्याय केंद्र किंवा संशोधन केंद्र वगरे सुरू करण्यात आलेलं नाही. विद्यापीठाच्या आवारात त्यांचा एक पुतळा उभारण्यात आला आहे, इतकंच.

बाकी इथल्या विद्यापीठांचे कॅम्पससुद्धा विस्तीर्ण. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक अशा सगळ्या सुविधा असतात. अगदी हॉस्पिटलसुद्धा २४ तास सुरू असतं. बाहेरच्या दुकानांपेक्षा कॅम्पसमध्ये असणाऱ्या दुकान-कम-सुपरमार्केटमध्ये वस्तू तुलनेने स्वस्त असतात. एकेका कॅम्पसमध्ये तीन-चार कॅण्टीन्स. आणि कॅण्टीन म्हणजे मोठी मेसच. एका कॅण्टीनची इमारत दोन-तीन मजली. प्रत्येक मजल्यावर प्रशस्त असा डायिनग हॉल, ज्याला चायनीजमध्ये शठांग म्हणतात. एका वेळी १५० पानं सहज उठू शकतील इतका मोठा असा हॉल असतो. तिथे फक्त आणि फक्त चायनीजच मिळतं. पिझ्झा, बर्गर वगरे फास्ट फूड प्रकारातले पदार्थ कॅण्टीनमध्ये मिळत नाहीत. खाण्याच्या किमतीही आटोक्यात असतात. म्हणजे अगदी सात युआनपासून ते २५ युआनपर्यंत (२५ रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत) किमतीचे पदार्थ इथे उपलब्ध असतात. याशिवाय कॅण्टीनमध्ये अगदी स्वस्तात म्हणजे २० रुपयाला बीअरचा कॅन उपलब्ध असतो.

खाण्यापिण्याचे पसे देण्याची पद्धतही इथे जरा निराळी आहे. विद्यार्थ्यांचे कॉलेज आयडीकार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे कॅम्पसमधल्या बहुतांश दुकानांमध्ये नुसतं आयडीकार्ड मशीनला लावून पसे भरता येतात. हेच आयडीकार्ड वापरून संपूर्ण विद्यापीठात उपलब्ध असलेलं वायफायदेखील वापरता येतं. फक्त कॉलेज कॅम्पसच नाही तर बसमध्येही या आयकार्डच्या माध्यमातून पसे भरता येतात. सामान्य लोकांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे. फक्त कॉलेज आयकार्डच्या जागी त्यांचं तिथलं ओळखपत्र असतं. आपल्याकडे जसं आधार कार्ड आहे (अजून त्याबद्दल संदिग्धता आहे हा भाग निराळा) तसंच हे कार्ड असतं. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी या कार्डाचा वापर ओळखपत्र म्हणून तर होतोच पण त्याशिवाय दैनंदिन आíथक व्यवहारासाठीही केला जातो.

चीनमध्ये सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आर्थिक व्यवहाराची व्याख्या गेल्या काही वर्षांमध्ये बदलली आहे. मोबाइलमुळे संवाद क्षेत्रात बदल झाले. आधी फोन, एसएमएस असं करत करत मेसेजिंग अ‍ॅपपर्यंत तंत्रज्ञानाची मजल पोहोचली. पण चीनने या मेसेजिंग अ‍ॅपलाच मोबाइल वॉलेट बनवून टाकलं. वीचॅट हे तिथलं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे त्यांच्यासाठी पाकीटच आहे. त्यामुळे  इथले लोक खिशात पाकीटच ठेवत नाहीत. खिशातला मोबाइल हेच त्यांचं पाकीट. वीचॅट आणि अलिपे ही दोन अ‍ॅप्स ही चिनी लोकांसाठी मूलभूत गरजच बनली आहे. वीचॅटमध्ये वॉलेट नावाचा पर्याय असतो. वीचॅट वॉलेट हे थेट बँक खात्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे बँकेतून आधी वीचॅटच्या वॉलेटमध्ये पसे टाकावे लागतात आणि त्यानंतर आíथक व्यवहार केले जातात. वाण्याकडच्या सामानापासून ते विमानाच्या तिकिटापर्यंत कुठेही या वीचॅट वॉलेटचा वापर केला जातो. याशिवाय आप्तेष्टांनाही थेट पसे पाठवण्याची सोय असते. अलिपे किंवा अ‍ॅलिपे हे आपल्याकडच्या भीम या अ‍ॅपसारखं आहे. अ‍ॅलिपेचा वापर हा प्रामुख्याने ऑनलाइन खरेदीसाठी केला जातो. लहान झेरॉक्सच्या दुकानापासून ते हायस्पीड रेल्वे तिकिटाच्या बुकिंगपर्यंत वीचॅट आणि अ‍ॅलिपे पेमेंटसाठीचे क्यूआर कोड लावलेले असतात. तो कोड स्कॅन करायचा आणि विशिष्ट रक्कम त्या अकाऊंटला पाठवायची की व्यवहार झाला. ३० सेकंदांच्या आत होणारा हा व्यवहार अत्यंत सोयीचा आहे.

ऑनलाइन खरेदीसाठीही अनेकदा वेबसाइटवर हे क्यूआर कोड लावलेले असतात. पण मुळातच चीनमध्ये ऑनलाइन खरेदीचं अक्षरश: जाळं पसरवलेलं आहे. अलिबाबा ग्रुपच्या जॅक मा याने सुरू केलेलं थाओपाव हे ऑनलाइन पोर्टल अ‍ॅमेझॉनलाही मागे टाकणारं आहे. जगात उपलब्ध असणारी कुठलीही वस्तू या ई-कॉमर्सच्या वेबसाइटवर किंवा अ‍ॅपवर मिळू शकते. अगदी गुलाबजाम, रसगुल्ल्यांपासून ते सिमेंट, विटांपर्यंत सारं काही इथे उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात इथे वस्तू मिळतात आणि डिलिव्हरीही त्वरित होत असते. त्यामुळे खरेदीची व्याख्याच या ई-कॉमर्सने बदलून टाकलीये. विद्यापीठांमध्ये दररोज १५-२० वेळा तरी या ई-कॉमर्सचे डिलिव्हरी बॉइज नजरेला पडतात. सामान्यत: विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या हॉस्टेलची सोय केलेली असते. तर चिनी विद्यार्थ्यांसाठी वेगळी. परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातल्या एका खोलीमध्ये दोनजण राहत असतात. तर चिनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात मुलांच्या एका खोलीत सहाजण तर मुलींच्या एका खोलीत चारजणी राहत असतात. या डिलिव्हरी बॉइजना परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये येण्यास परवानगी आहे पण चिनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिरण्यास परवानगी नाही. त्यामुळे मग या ई-कॉमर्सच्या लोकांनी शक्कल लढवली. कॅम्पसमध्येच एक कोपरा पकडून तिथेच या सगळ्या विद्यार्थ्यांचं सामान मांडून ठेवलेलं असतं. ज्याने त्याने यावं, स्वत:चा ऑर्डर नंबर त्या माणसाला सांगावा आणि वस्तू घेऊन जावी, असा सोपा प्रकार असतो. त्यामुळेच मग कॅम्पसमधल्या कोपऱ्यात विद्यार्थ्यांनी मागवलेल्या वस्तूंचे ढीग नजरेला पडतात.

पाश्चिमात्यांचं अनुकरण

गेल्या काही वर्षांमध्ये चीनमध्ये इंग्रजी शिकण्याचे वारे वाहू लागलेत. खरंतर इंग्रजी शिकण्याचं खूळच शिरलंय. उच्च मध्यमवर्ग आणि उच्चभ्रू वर्गामध्ये हे खूळ जरा जास्तच दिसतं. इंग्रजी शिकण्याला काहीच आक्षेप नाही. पण इथे ती शिकण्यामागचा उद्देश जरा वेगळाच आहे. म्हणजे आपल्या पाल्याला आंतरराष्ट्रीय भाषा येते, यामुळे इतरांपेक्षा आपण वरचढ आहोत हे दाखवण्याची इथे चढाओढ असते. त्यामुळेच अचूक इंग्रजी शिकण्यापेक्षा ती बोलण्याच्या शैलीवर अधिक भर आहे. व्याकरण आणि लिखाणापेक्षा पाश्चिमात्य बोलतात तशीच (अ‍ॅक्सेन्ट) आपणही फाडफाड इंग्रजी बोलावी असं इथल्या बहुतांश जनतेला वाटत असतं. बाकी, मागणी तसा पुरवठा हे व्यापारी सूत्र तर जगाच्या कानाकोपऱ्यात कोरलं गेलं आहे. त्या सूत्राचा अवलंब चीनमधल्या इंग्रजी शिकण्यातही झालेला आहे. पण इथलं चित्र मात्र बरंच वेगळं आहे.

इंग्रजी शिकवणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्था चीनमध्ये सुरू झाल्या आहेत. आणि त्या संस्थांमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना मोठी मागणी आहे. पण त्यासंदर्भात या संस्थांचं धोरण एकदम स्पष्ट आहे. गोरे किंवा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युके, दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड या देशांचे पासपोर्ट असणाऱ्यांसाठीच या जागा रिकाम्या असतात. इंग्रजी शिक्षकांसाठीच्या ज्या जाहिराती असतात त्यामध्ये देखील तसा स्पष्ट उल्लेख असतो. दुसरी गोष्ट म्हणजे या इंग्रजी शिकवणाऱ्यांना बक्कळ पगार दिला जातो. त्याशिवाय मिळणाऱ्या सोयी वेगळ्या. म्हणजे मासिक १७ ते २० हजार युआन (साधारण एक लाख ७० हजार ते दोन लाख रुपये) इतका पगार या शिक्षकांना असतो. त्याशिवाय राहण्यासाठी घरही उपलब्ध करून देण्यात येतं. मायदेशातून येण्याजाण्याच्या तिकिटाचा खर्च, व्हिसा, सुटय़ा आणि घरभाडं याचीही काळजी घेतली जाते. कुणालाही मोहात पाडणारी अशीच ही ऑफर असते. त्याशिवाय शिकायला येणारे अनेक युरोपियन, अमेरिकन विद्यार्थी फावल्या वेळात कुठेतरी इंग्रजी शिकवत असतात. एका तासाचे साधारण २००-३०० युआन (दोन ते तीन हजार रुपये) मिळतात. त्यामुळे अनेक जण तर सुरुवातीला स्टुडंट व्हिसावर येतात. मँडरिन शिकण्यासाठी एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेतात. सुरुवातीचे काही दिवस, आठवडे वर्गात बसतात. त्यानंतर मग एजंटला गाठून इंग्रजीच्या शिकवण्या सुरू करतात. एकदा त्यामध्ये जम बसला की मग वर्क व्हिसा मिळवून चीनमध्येच कामकाजाला लागतात. त्यानंतर मग कॉलेजला रामरामच ठोकतात. चिनी भाषा शिकणंही मागे पडतं.

हे शिकवणंसुद्धा मजेशीर असतं. म्हणजे विद्यार्थी शिकत असताना त्यांचे पालकही सोबत असतात. वर्गात एकावेळी साधारण तीन ते चार विद्यार्थी आणि त्यांचे पालक बसलेले असतात. शिकवताना विद्यार्थ्यांला कंटाळा आला तर त्याची करमणूक करायची जबाबदारीही शिक्षकावर असते. त्यामुळे शिकवण्याबरोबरच इंग्रजीतली बडबड गीतं, छोटय़ा मुलांच्या गोष्टीचे पाठ आधी शिक्षकांना गिरवायला लागतात. याशिवाय अनेकदा या शिकवण्या एखाद्या बागेत किंवा मॉलमध्ये होतात. पालकांचं असं म्हणणं असतं की मोकळ्या वातावरणात शिकवलं की मुलांच्या लक्षात राहतं. त्याचबरोबर फळं, फुलं, प्राणी, खेळणी यांची इंग्रजी नावं ही मुलं ती समोर असताना अधिक प्रभावीपणे शिकतात. पालक आणि या अशा संस्था चालवणाऱ्या उद्योजकांचं तर्कशास्त्र काहीही असो. पण शिक्षकांची मात्र अनेकदा दमछाक होते. आमचा एक स्कॉटलंडचा मित्र या अशा शिकवण्या घ्यायचा. एकदा मुलांच्या मागे धावताना पडला आणि गुडघा फोडून घेतला. त्यानंतर मात्र त्याने इंग्रजी शिकवण्यासाठी डोकं फोडून घेणं बंद केलं. अर्थात मोठय़ा मुलांना इंग्रजी शिकवणं सुरूच होतं. कारण इथे चीनमध्येही अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणाची इच्छा बाळगून असतात. त्यामुळे जीआरई, आयईएलटीएस, टॉफेलसारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी युरोपियन, अमेरिकन शिक्षकांची मदत घेतली जाते.

इंग्रजी शिकण्याबरोबरच आणखी एक फॅड प्रामुख्याने इथल्या तरुणींमध्ये दिसतं, ते प्लास्टिक सर्जरीचं. स्वत:च्या दिसण्यावर इथल्या मुली बराच भर देतात. अर्थात, सरसकट सगळ्याच मुलींचा असा विचार असतो असं नाही. पण बहुतांश तरुणी या सौंदर्यप्रसाधनांचं भांडारच स्वत:सोबत घेऊन िहडत असतात. वेळ मिळाला की कर मेकअप ही जणू काही प्रथाच. टिंडर हे एक डेटिंग अ‍ॅप  जगभरातल्या तरुण-तरुणींमध्ये खूपच लोकप्रिय आहे. चीनमध्ये मात्र टिंडर चालत नाही. त्याऐवजी तिथे त्यांची स्वत:ची अशी अनेक डेटिंग अ‍ॅप्स आहेत. त्यातलं ठानठान हे सर्वात लोकप्रिय असं अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर तरुणींचे जे फोटोज असतात ते बघितले की असं वाटतं चीन म्हणजे सौंदर्याची खाण आहे. पण हे फोटो म्हणजे एकतर भरभक्कम मेकअप करून काढलेले असतात किंवा मग फिल्टर्स तरी वापरलेले असतात. हे फिल्टर्स म्हणजे काढलेल्या फोटोचं सुशोभीकरण करणं. एकूणच इथल्या समाजमाध्यमांवर अशा सुशोभित फोटोंचं पीक आलेलं असतं. पण मुद्दा हा की आपण सुंदर दिसलं पाहिजे असा जणू या मुलींचा हट्टच असतो. ब्युटी स्लीप या भाबडय़ा संकल्पनेवर अनेकजणींचा ठाम विश्वास आहे. ब्युटी स्लीप म्हणजे रात्री दहाच्या आधी झोपायचं आणि सकाळी पाच-सहा वाजता उठायचं. झोपायच्या आधी आंघोळ करायची, चेहरा स्वच्छ धुवायचा, चेहऱ्याला कसला तरी लेप लावायचा. सुकला की पापुद्रा काढल्यासारखा तो लेप काढायचा. चेहरा पुन्हा धुवायचा. हे सोपस्कार झाले की झोपी जायचं. हे असं केल्याने म्हणे त्वचा कोमल आणि मुलायम राहते आणि सुरकुत्या पडत नाही. खरं-खोटं कन्फुशिअस जाणे.

पण हे असं सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने स्वत:चं रूप उजळवणं जितकं सर्रास दिसतं, तितकंच प्लास्टिक सर्जरी करून स्वत:चं रूपडं पालटवण्याचं प्रमाणही मोठं आहे. त्यामुळेच की काय मोठय़ा शहरांमध्ये अगदी छोटय़ा छोटय़ा रुग्णालयांमध्येही प्लास्टिक सर्जरीच्या शाखा असतात. ४० हजार रुपयांपासून ते अगदी पार १० लाखांपर्यंत रुपये (मुद्दाम युआनमधील किंमत लिहिली नाही) मोजून चेहरेपट्टी बदलली जाते. खरंतर अनेकदा हा फरक साध्या डोळ्यांना जाणवणारा नसला तरी या तरुणी मात्र स्वत:च्या नव्या रूपावर खूश असतात.

भारताविषयीचं कुतूहल

रूपाच्या बाबतीत मात्र इथल्या तरुणींना भारतीय मुलींबाबत खूपच आकर्षण आहे. तसं त्यांना पाश्चिमात्य मुलींचं रूपडंही भावतं. पण भारतीय मुलींचे डोळे, नाक आणि त्वचा इथल्या मुलींना खूप आवडते. त्यांच्या मते भारतीय मुली या खूप सुंदर असतात. त्यांचे कपडे आणि दागिने खूपच आकर्षक असतात. नसíगक सौंदर्याचं लेणं घेऊनच भारतीय मुली जन्मतात असा चिनी तरुणींचा समज आहे. आणि म्हणूनच की काय ऐश्वर्या रॉय आणि प्रियांका चोप्रा या इथे बऱ्याच लोकप्रिय आहेत. म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेला त्यांची नावं माहीत नसली तरी चिनी तरुणी मात्र या दोघींना फॉलो करतात. थिआनचिनमध्ये एक भारतीय स्पा आहे. तिथे खरंतर चिनी मसाजच दिला जातो. पण त्यांना भारतीय आयुर्वेदिक मसाज सुरू करायचा आहे. त्यामुळे त्यांनी त्या स्पा सेंटरला भारतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिथे देवनागरीमध्ये काही लिहिलेली संस्कृत वाक्यं दिसतात. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे ऐश्वर्या रॉयचा फोटो लावलेला आहे. देवदास सिनेमात हातात दिवा घेतलेली तिची ती पोझ इथल्या बॅनरवर झळकली आहे. सोबतीला िहदी सिनेमांची गाणीही हळू आवाजात लावलेली असतात. संपूर्ण माहोल भारतीय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चार चिनी मुलींनी केला आहे. त्यांना तिथे काही भारतीय पदार्थ ठेवायचे होते, पण ते कसे बनवायचे याची मात्र त्यांना काही कल्पना नव्हती. मग बटाटय़ाची भाजी, कांदा भजी, पुदिना चटणी असे सोपे पदार्थ त्यांना सांगण्यात आले. पण ते बनवण्याची पाककृती सांगताना मात्र चिनी भाषेविषयीच्या ज्ञानाच्या अक्षरश: चिंधडय़ा झाल्या होत्या. फोडणीला मँडरिन तर सोडाच, पण इंग्रजीतही उचित असा शब्द काही सापडत नव्हता. त्यात पुन्हा इथे यूटय़ूब, फेसबुक वगरेवर बंदी. त्यामुळे ती अ‍ॅप्स सुरू करण्यासाठी जे काही तांत्रिक सोपस्कार करावे लागतात ते सारे पार करून योग्य त्या पाककृती त्या चारचौघींपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

एकूणच इथल्या लोकांना भारताविषयी कमालीचं कुतूहल आहे. इंदू (भारताला चिनी भाषेत इंदू म्हणतात) या शेजारी देशाबद्दल लोकांच्यात संमिश्र भावना आहेत. भारतीय सिनेमे आणि सिनेमांमधलं संगीत इथल्या लोकांना खूपच आवडतं. पण त्याहीपेक्षा सिनेमांमधले नृत्यप्रकार हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारतीय सिनेमामध्ये असणारी नाचगाणी हा प्रकार चिनी लोकांना फारच भावतो. रस्त्यावर बेभान नाचणाऱ्या ‘नर्तकांचा’ या इथल्या लोकांना हेवा वाटतो. चीनमध्ये असं रस्त्यावर नाचण्याला वगरे परवानगी नाही. त्यामुळे हा प्रकार यांच्यासाठी नवाच. चीनमध्ये नाच म्हणजे ज्याला स्क्वेअर डािन्सग म्हटलं जातं तो. हाच एक प्रकार इथे सार्वजनिक ठिकाणी केला जातो. प्रामुख्याने व्यायामाचा एक भाग म्हणूनच हा नाच केला जातो आणि तोसुद्धा वयस्क मंडळी स्वत:ची प्रकृती जपण्यासाठी करतात. शालेय जीवनात आपल्याकडे ज्या प्रकारचे व्यायामप्रकार शिकवले जायचे त्याच प्रकारात मोडणारा असा हा नृत्याविष्कार असतो आणि हा नृत्याविष्कार संध्याकाळच्या वेळी बागेत, मदानात, मोकळ्या जागी चारपासून ते चाळीसपर्यंत इतक्या संख्येने उपस्थित वयोवृद्ध मंडळी करत असतात. शारीरिक हालचाली होणं हाच या नाचाचा मुख्य उद्देश.

नाच, गाणी आणि भारतीय सिनेमांबाबत बोलताना आमिर खानचा उल्लेख न करणं म्हणजे आमरसाची पाककृती सांगताना आंब्याचं नाव न घेण्यासारखं आहे. चीनमध्ये आमिर खानचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. थ्री इडियट्स या सिनेमापासून आमिरची लोकप्रियता इथे वाढायला लागली. आमिरचा सिनेमा येणार म्हटल्यानंतर इथल्या प्रेक्षकांमध्येही उत्साहाचं वातावरण असतं. इथल्या तरुणांसाठी आमिरचे सिनेमे संवेदनशील असतात. त्यांच्या मते आशयघन सिनेमे असल्यामुळेच ते इथल्या जनतेला भावतात. थ्री इडियट्समधून केलेलं शिक्षणावरचं भाष्य असो, पीकेमधून धर्माधतेवर केलेली टीका असो किंवा दंगल सिनेमातून दाखवलेला स्त्री-पुरुष समानतेचा विषय असो, चीनमध्ये आमिर खान म्हणजे थेट समस्यांना हात घालणारा आणि उत्तम आशय देणारा सिनेमा असं जणू समीकरणच बनलेलं आहे. म्हणूनच चीनमध्ये दंगल सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा तो पहायला लोकांनी गर्दी केली होती.  चीनमध्ये दंगलने बाराशे कोटी रुपयांची कमाई केली, यातच काय ते आलं.

सिनेमे, गाणी यांच्याबरोबरच योगाचं एक मोठं आकर्षण इथल्या जनतेला आहे. त्यातही मुलींमध्ये याचं प्रमाण मोठं आहे. भारतीय योगा म्हणजे आरोग्य आणि मन:शांतीसाठीचा अत्यंत सोपा उपाय अशी इथल्या जनतेची धारणा आहे. त्यामुळेच भारतीय योगा क्लासेसना इथे मोठी मागणी आहे. आपल्यासाठी अगदी साधे आणि सोपे सूर्यनमस्कारदेखील इथल्या लोकांसाठी अत्युच्च विद्यासाधना आहे. चीनमधल्या मोठय़ा शहरांमध्ये साधारण अडीच हजार योगाचे क्लासेस आहेत आणि हे बहुतांश भारतीयांचेच आहेत. आकडय़ांमध्ये बोलायचं झालं तर योगा शिकवणाऱ्या शिक्षकाची मानसिक कमाई ही अडीच ते तीन लाख रुपयांच्या घरात जाते. तुम्हाला मोडकी-तोडकी चिनी भाषा येत असेल आणि योगाचं ज्ञान असेल तर चीनमध्ये स्वत:चे योगा क्लासेस सुरू करणं अगदी सोपं आहे.

चीनमध्ये योगाचं जसं कुतूहल आहे तसंच आश्चर्य आहे ते हाताने जेवणाविषयी. चीनमध्ये आल्यानंतर चॉपस्टिकने जेवणाची सवय करावी लागते. दोन-तीन दिवसांच्या सरावानंतर ते जमूनही जातं. अगदी चिकन-मटणाचे तुकडेदेखील चॉपस्टिकने खाता येतात. पण कसं आहे आपल्यासारख्या लोकांना भातात हात घातल्याशिवाय किंवा कोंबडीवर आडवा हात मारल्याशिवाय चन पडत नाही. इनर मंगोलियाला आम्ही गेलो असता तिथे एका हॉटेलमध्ये जेवणाचा प्रसंग आला. हॉटपॉट हा चिनी भोजन समारंभामधला एक खास प्रकार. टेबलाच्या केंद्रस्थानी शेगडी आणि त्यावर भांडं असतं. त्यामध्ये तुम्हाला दिलेले कच्चे पदार्थ घालायचे असतात आणि ते शिजल्यानंतर खायचे असतात. सोबत काही इतरही पदार्थ दिलेले असतात. सगळा कारभार चॉपस्टिकनेच करायचा असतो. बराच वेळ चॉपस्टिकने मटणाचे तुकडे खाल्ल्यानंतर एक वेळ अशी आली की म्हटलं आता हाताचाच वापर केला पाहिजे. सोबतच्या खुर्चीवर पाकिस्तानी मुलगा होता. तोदेखील मग हातानेच खाऊ लागला. आम्ही हे असं जेवण सुरू केल्यानंतर शेजारच्या टेबलावरच्या चिनी कुटुंबाने माना वळवल्या आणि आधीच छोटे असणारे डोळे आणखी छोटे करून आमच्याकडे बघू लागले. आम्ही आपले मटण खाण्यात मग्न होतो. थोडय़ा वेळाने लक्षात आल्यावर जरा विचित्र वाटायला लागलं. त्यातल्या काही जणांनी कॅमेरावर आमचे फोटो, व्हिडीओ वगरे काढले. आमच्या टेबलावर असणाऱ्या चिनी मित्राने सांगितलं की तुम्ही हाताने जेवताय म्हणून त्यांना आश्चर्य वाटलंय. हा प्रकार आमचं जेवण संपेपर्यंत सुरू होता. जेवण संपल्यानंतर जवळजवळ सगळ्यांनीच माना आमच्याकडे वळवल्या. तेव्हा मात्र फारच संकोचल्यासारखं झालं. चिनी मित्र म्हणाला की तुम्ही आता या हाताचं काय करता हे त्यांना बघायचं आहे. मी आणि पाकिस्तानी मित्र आम्ही उठलो आणि सरळ बेसिनपाशी जाऊन हात धुवून रुमालाने पुसले. तेव्हा कुठे या समस्त चिनी मंडळींचे जीव भांडय़ात आणि समोर चॉपस्टिक्स ठेवलेल्या पानात पडले.

चिनी जनतेला भारतीयांविषयी आकर्षण असलं तरी भारत म्हणजे मुलींसाठी धोकादायक असलेला, चोऱ्यामाऱ्या, लुटालुटी, खून, बलात्कारांचा देश अशीही एक प्रतिमा इथल्या जनतेमध्ये आहे. मुळातच इथल्या माध्यमांमधून भारताविषयी फारसं आपुलकीने लिहिलं जात नाही. मुळात भारताबद्दल चांगलं लिहिणं म्हणजे लोकशाहीविषयी चांगलं लिहिण्यासारखं आहे. त्यामुळे लोकशाही बळावू द्यायची नाही म्हणून लोकशाही असणाऱ्या देशांमधल्या वाईट घटना अतिरंजित करून जनतेपुढे ठेवण्याचं काम इथली माध्यमं करत असतात. परिणामी इथल्या लोकांना भारताविषयी थोडीशी भीतीच असते. त्यामुळेच एकटय़ाने भारतात फिरायला येण्यासाठी इथले पर्यटक फारसे तयार नसतात. मोठय़ा ग्रुपमध्येच ते भारतभ्रमण करायला येतात.

चीनमधल्या तरुणांसाठी भारत हा पर्यटनासाठीचं खास आकर्षण आहे. इथल्या चालीरीती, परंपरा, सण याविषयीची माहिती इथे येऊन घेण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. एरवी मोबाइलमध्येच ही पिढी गढून गेलेली असते. चीनमधल्या मेट्रोमध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या माना या खालीच झुकलेल्या असतात. मोबाइलवरच सिनेमा, सीरिअल बघण्यापासून ते पुस्तक वाचण्यापर्यंत सारं काही केलं जातं. एखाद्या झॉम्बी किंवा गर्दुल्यासारखे हे लोक त्या छोटय़ा स्क्रीनच्या पलीकडल्या विश्वात रमून गेलेले असतात. मोबाइल हा शरीराचाच एक अविभाज्य भाग बनून गेलेला असतो. गेिमग हे इथलं आणखी एक खूळ. अक्षरश: रस्त्यातून चालताना, ट्रेनमध्ये चढताना लोक गेम खेळत असतात. आसपासच्या जगाचं अस्तित्व विसरून समोरच्या खेळात बुडून गेलेले असतात. हे सारं काही अनेकदा कुणीतरी मुद्दामहूनच केल्यासारखं वाटतं. लहान मुलांना जसं करमणुकीसाठी खेळणं देऊन त्यातच रममाण केलं जातं तसा हा प्रकार वाटतो. जनतेला अशा करमणुकीच्या विश्वात गुंतवून ठेवायचं, जेणेकरून या पिढीच्याही डोक्यात सरकार, यंत्रणा, पक्षाविरोधी काही विचार येणार नाहीत.

एरवीही तसं सरकारविषयी कुणीही काहीच बोलत नाही. थिआनआनमन नंतर सरकारविषयीची भीती आजही प्रत्येकाच्या मनात आहे. इथली तरुणाई जगात आपली छाप पाडण्याची मनीषा बाळगून आहे. पण त्यासाठी लागणारी मुक्त विचारसरणी आणि समोरच्याची बाजू ऐकून घेण्याचं सामथ्र्य इथल्या तरुणाईमध्ये क्वचितच दिसतं. प्रखर राष्ट्रवाद इथल्या प्रत्येकाच्याच मनात िबबवला गेला आहे. त्यामुळेच चीनच्या विरोधात काही बोललं तर त्यावर खुल्या मनाने कुणीच चर्चा करत नाही. इथल्या लष्कराच्या एकूणच कारभाराबद्दल, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल एका मुलीशी वाद सुरू होते. वाद विकोपाला गेले आणि त्या मुलीने संवादच तोडून टाकला. गंमत अशी की त्याच्या उलट अनुभवही आला. एका मित्राशी बोलत असताना त्याने सांगितलेली कथा खरंच दु:खद होती. नव्वदच्या दशकात प्रगतीचे वारे वाहत होते तेव्हा जनतेला काही कामं देण्यात आली. काही जणांना गावागावांत शिक्षक, बँक कर्मचारी, मजूर म्हणून पाठवण्यात आलं. अशा कुटुंबाच्या पाल्यांच्या संगोपनाची जबाबदारी मग त्यांच्या आजीआजोबांवर आली. परिणामी, या मुलांना आईवडिलांचं प्रेम फारसं मिळालंच नाही. या मित्राने सांगितलेलं वाक्य अंगावर काटा आणणारं होतं. तो म्हणाला, ‘‘आईवडील असून अनाथ असणं काय असतं हे इथल्या आमच्या वयाच्या पिढीने अनुभवलं आहे.’’

चीनने प्रगतीची शिखरं पादाक्रांत केली आहेत. इथली जनताही प्रेमळ स्वभावाची आहे. पण आपल्या देशाच्या जनतेला स्वातंत्र्य देऊन, बरोबर घेऊन प्रगती साधायची की त्यांना नियंत्रित करून यंत्रवत कारभार करायचा, हे मात्र चीनने ठरवणं फार गरजेचं आहे.
पुष्कर सामंत – response.lokprabha@expressindia.com / @pushkar_samant