‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी आयोजित केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र‘ या उपक्रमाचे पाचवे पर्व १५ व १६ सप्टेंबर रोजी पुण्यात पार पडले. विषय होता : ‘सामाजिक चळवळींचा बदलता चेहरा’. राज्याच्या समाजजीवनातील मातब्बर अभ्यासक, कार्यकर्ते यांनी या परिषदेत धर्म, श्रद्धा, जात, सुधारणेच्या चळवळी आणि आजचे सामाजिक वास्तव अशा विविध मुद्दय़ांचा वेध घेतला, विचारमंथन केले. हे प्रश्न तसे वादाचे; पण त्या वादांमधून तत्त्वबोधच व्हावा याच भावनेने ही वादसभा पार पडली. अनेक व्यासंगी, ज्येष्ठ आणि तरुण मंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ठोस आणि विधायक चर्चेचा हा सारांश..
धर्मसुधारणा आणि आजची आव्हाने
सर्वच धर्मामधील सुधारणावाद्यांनी एकत्र येणे गरजेचे
बहुतेक धर्माची निर्मिती आणि त्यांची तत्त्वे, नियम, आचारविचार तयार होऊन शेकडो वर्षे उलटली आहेत.
गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणामुळे निर्माण झालेला साम्राज्यवाद आणि धर्माध हिंसक शक्ती ही आणखी दोन महत्त्वाची आव्हाने या धर्मसुधारणेच्या कार्यापुढे उभी ठाकली आहेत. मुस्लीम जगात तर ही गोष्ट खूप प्रामुख्याने दिसत आहे. अमेरिकेने सौदी अरेबियासारख्या देशांना हाताशी धरून सुन्नी मुसलमानांचे अतिरेक्यांमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे आज अनेक मुस्लीम देशांत शिया-सुन्नी दंगे सुरू झाले आहेत. यामागे वरकरणी धार्मिकतेचा रंग दिसत असला तरी त्यामागे खरे तर आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत. हे असे अराजक निर्माण करायचे आणि त्यातून साम्राज्यवाद पोसायचा हेच अमेरिकेचे अनेक ठिकाणी धोरण आहे. हिंदू धर्म हा सहिष्णुतावादी, सर्वसमावेशक, अहिंसक म्हणून आजवर ओळखला जात होता; पण गेल्या काही वर्षांमध्ये या धर्मातही उजव्या धर्माध शक्तीचा शिरकाव झाला आहे. या एकूणच बदललेल्या सामाजिक-आर्थिक स्थितीमध्ये धर्मसुधारणेची चळवळ पुढे चालू ठेवणे खूप अवघड झाले आहे.
कालपरत्वे प्रत्येक धर्मात बदल आवश्यक असतात. साचलेपणा, कालबाह्य़ गोष्टी दूर करणे आवश्यक असते. यालाच ‘धर्मसुधारणा’ असे आपण म्हणतो. या धर्मसुधारणा अनेक शतकांपासून सुरू आहेत. या सुधारणा करताना सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि मुख्य म्हणजे राजकीय स्थितीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या साऱ्यांचा अभ्यास करत आणि एकेका मुद्दय़ावर स्वतंत्र लढा देण्यापेक्षा एकत्र येत मार्ग शोधले पाहिजेत.
आपल्याकडील समाजकारण, अर्थकारण आणि मुख्य म्हणजे राजकारणाचा धर्म स्थायिभाव बनला आहे. यामुळे तो समाजातून दूर करणे शक्य नाही; पण परिवर्तन शक्य आहे. यासाठीच सर्व सुधारणावाद्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या वेळी धर्माच्या जमेच्या बाजू लक्षात घ्याव्यात, त्यातली सामाजिक ताकद लक्षात घ्यावी, मानवतावादी रूप ध्यानात घ्यावे आणि या साऱ्यांचा उपयोग करत सुधारणेचा मार्ग धरावा. असे केल्यास हाच धर्म समाजाला बांधून ठेवणारा- प्रगतीकडे घेऊन जाणारा घटक ठरेल.
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, ज्येष्ठ विचारवंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा