काँग्रेसनं जाहीरनामा समिती तयार केली आहे तिचे प्रमुख आहेत पी. चिदम्बरम आणि समन्वयक आहेत राजीव गौडा. गेल्या आठवडय़ात काँग्रेसनं नवं संकेतस्थळ सुरू केलं. त्याची माहिती देण्यासाठी दोघांनी पत्रकार परिषद बोलावली होती. काँग्रेसचं स्वतचं धोरण आहे, पण लोक काय म्हणतात हे विचारात घेण्यासाठी हे संकेतस्थळ निर्माण केलं असल्याचं या द्वयीचं म्हणणं होतं. या संकेतस्थळावर कोणीही काँग्रेसला सूचना करू शकतं. काँग्रेस लोकांपर्यंत कसा पोहोचत आहे, उपसमित्या कशा केल्या आहेत आणि त्या काय काय काम करीत आहेत अशी सविस्तर माहिती या नेत्यांनी दिली. या संकेतस्थळावर कोणीही काहीही लिहू शकतं. चिदम्बरम यांना प्रश्न केला गेला की, समजा लोकांनी राम मंदिर बांधलं पाहिजे अशी सूचना केली तर काँग्रेस काय करेल?.. चिदम्बरम यांनी सांगितलं होतं की, लोकांच्या दृष्टीने जे विषय महत्त्वाचे वाटतात त्यांचा विचार केला जाईल आणि त्या आधारावर काँग्रेस जाहीरनामा बनवेल.  हिंदीतून विचारलेला प्रश्न चिदम्बरम यांना कळला नाही. इंग्रजीत विचारल्यावर चिदम्बरम यांची अडचण झाली. त्यावर, लोकांकडून सूचना तरी येऊ देत, एवढं बोलून त्यांनी विषय बदलला. पत्रकार परिषदेनंतर गप्पा मारताना गौडांनी, राम मंदिर विषय अर्थातच बाजूला ठेवला जाईल,  असं खरं खरं सांगून संकेतस्थळाच्या ‘उपयुक्त’तेवर अप्रत्यक्ष टिप्पणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिमटे आणि टोमणे

राजकीय नेते आणि पत्रकारांची जुगलबंदी होतच असते. अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की नेते दुर्लक्ष करतात. अनेकदा ते पत्रकार परिषद गुंडाळून निघून जातात. पत्रकारांसाठी ही नित्याचीच बाब असते. काही नेते मात्र पत्रकारांनाच बारीक चिमटे काढतात. हसत हसत टोमणे मारतात की पत्रकारांनाही काय बोलावं हे सुचत नाही. चार दिवसांपूर्वी वाहतुकीसंदर्भातील सर्वेक्षण   प्रकाशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांची मस्त फिरकी घेतली. मी राजकारणात आलो होतो तेव्हा रस्त्यावर कार अगदी कमी दिसायच्या. आमच्यापैकी एकाकडंच कार होती. त्याच्या गाडीतून फुकट फिरायला मिळावं म्हणून त्याला आम्ही अध्यक्ष केलं. आता जिकडं जाईल तिकडं कारच्या रांगा लागलेल्या असतात. पत्रकार समोर बसलेत. जुन्या पत्रकारांना विचारा, त्यांच्याकडं कार होती का? पूर्वी पत्रकार दुचाकी घेऊन फिरायचे. पायपीट करायचे. आताचे पत्रकार कार घेऊनच हिंडतात. काहींकडं गाडय़ाही किमती असतात. दोन-दोन कार आहेत त्यांच्याकडं. कुठं ठेवतात या कार? रस्त्यावर जागा तरी आहे का ठेवायला?.. गडकरी मिश्कीलपणे म्हणाले. राहुल गांधींनीही टीव्हीवाल्या पत्रकारांना टोमणा मारला होता. कधी कधी आमच्याही बातम्या दाखवाव्यात. तुमच्यावर खूप दडपण असतं याची मला कल्पना आहे. पण, घाबरून कसं चालेल?.. राहुल यांच्या वक्तव्यावर कोणी तरी म्हणालं, तुमच्याही बातम्या दाखवतो! त्यावर, राहुल काँग्रेस कार्यकर्त्यांकडं बघत म्हणाले, माझ्यामागे कॅमेरा लाव बघू, म्हणजे या पत्रकारांचं म्हणणंही रेकॉर्ड होईल.. तुम्ही पत्रकार माझ्या समोर सतत कॅमेरे लावता, आता तुमच्यासमोर कॅमेरे लावले पाहिजेत. मोदी आणि भाजपला वृत्तवाहिन्या प्राधान्य देतात असं राहुल यांना सुचवायचं होतं.

वातावरण दूषित

दिल्लीतील हवेत इतकं प्रदूषण आहे की, फर्लागभरावरचं देखील धूसर दिसतं. इंडिया गेटवर उभं राहिलं की राष्ट्रपती भवनाचा कळस आपल्याला एखाद्या पडद्याआडून पाहिल्यासारखा वाटतो. अशा प्रदूषणात धावणं आरोग्यासाठी योग्य नाही. पण दिल्लीकरांनी अशुद्ध हवेतदेखील ‘एकता दिवस’ मोठय़ा आनंदाने साजरा केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या  पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलं. त्यानिमित्त इंडिया गेटवर धावण्यासाठी प्रचंड गर्दी जमलेली होती. त्यात भाजपच्या नेत्यांनाही सहभागी व्हावंच लागलं. एकतेसाठी धावणाऱ्या अनेकांकडं मास्क नव्हते. धूलिकणांनी भरलेली हवा फुप्फुसात घेऊनच ही मंडळी धावली. रविवारनंतर दिल्लीच्या हवेत थोडी सुधारणा होईल. सध्या पंजाब, हरयाणातून दूषित हवा दिल्लीत येते, वारं फिरलं की प्रदूषणयुक्त हवा पाकिस्तानात जाईल, असं म्हणतात.. पटेलांच्या एकता पुतळ्यावरून झालेल्या टीकाटिप्पणीमुळंदेखील वातावरण दूषित झालेलं दिसतंय. पटेलांच्या पुतळ्याशेजारी उभे राहिलेल्या मोदींवर काँग्रेसच्या समाजमाध्यमाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी केलेली ‘बर्ड ड्रॉपिंग’ ही टिप्पणी पक्षाला खालच्या स्तरावर घेऊन जाणारी होती. मोदींना चोर म्हटल्याच्या ट्वीटनेही त्यांच्यावर टीका झालेली होती. आता याच स्पंदना यांनी एका महिला पत्रकाराने केलेल्या साध्या प्रश्नावर उद्धट प्रतिक्रिया देऊन अकारण वाद ओढवून घेतला आहे. त्या पत्रकाराच्या खासगी आयुष्याचा उल्लेख करून स्पंदना यांनी काँग्रेसच्या इतर अपरिपक्व नेत्यांमध्ये स्वतला सामील करून घेतलेलं आहे. स्वतच्या पायावर धोंडा मारून घेणाऱ्यांची काँग्रेसमध्ये वानवा नाही याचं आणखी एक उदाहरण!

स्टार बदलले!

नरेंद्र मोदी पंतप्रधान बनेपर्यंत भाजपमधील अनेक नेत्यांचे ‘गृह-तारे’ अनुकूल होते. २०१४ मध्ये मोदी दिल्लीत सत्तारूढ झाल्यानंतर एक-एक मोहरा मार्गदर्शक मंडळात स्थानापन्न होऊ लागला. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे त्यातील दोन प्रमुख नेते. आता त्यांना भाजपमध्ये सक्रिय करून घेतलं जात नाही. त्यामुळं निवडणुकीच्या प्रचारातदेखील त्यांना सहभागी करून घेतलं जाण्याची शक्यता कमीच दिसते. मध्य प्रदेशमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत अडवाणी, जोशी आणि शत्रुघ्न सिन्हा ‘स्टार प्रचारक’ होते. या वेळी मोदी हेच स्टार प्रचारक. दिवाळीनंतर त्यांच्या प्रचारसभांचा झंझावात सुरू होईल. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील मंत्र्यांना प्रचारासाठी बोलावलं जाणार आहे. हेमा मालिनी, मनोज तिवारी यांच्यासारख्या भाजप नेत्यांनाही मध्य प्रदेशमध्ये पाठवलं जाऊ शकतं. ‘अकबरकांड’ उघड होण्यापूर्वी एम. जे. अकबर यांच्यावरही प्रचाराची जबाबदारी देण्याचं भाजपनं ठरवलं होतं. पण आता अकबर यांची अवस्था ‘प्लुटो’सारखी झालेली आहे. पत्रकारितेतील तळपत्या ताऱ्याची आता ‘ग्रह’ म्हणूनदेखील मान्यता काढून घेतलेली आहे. भाजपने हा ‘अशुभ’ ग्रह कमळातून बाहेर फेकून दिलेला आहे.

– दिल्लीवाला

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chandni chowkatun