दिल्लीतील शेतकरी मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची मनं जिंकून घेतली. शरद पवारांनी भाषण केलं आणि ते काही वेळ थांबून निघाले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास राहुल गांधी आले. तोपर्यंत सीताराम येचुरी, फारुख अब्दुल्ला यांची भाषणं झालेली होती. राहुल येताच सभेचा उत्साह वाढला. राहुल हेच आकर्षणाचं केंद्र बनून गेलं. व्यासपीठासमोर बसलेल्या काही शेतकऱ्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते पण, सुरक्षारक्षकांनी त्यांना आणि पत्रकारांना बाजूला केलं. राहुल हे सीताराम येचुरींच्या शेजारी बसलेले होते. तेवढय़ात डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार येचुरींकडे आला आणि राहुल, येचुरी आणि कन्हैया यांच्या हास्यविनोद सुरू झाले. कन्हैया जायला निघाला तर राहुलने कन्हैयाच्या खांद्याला हात लावून परत बोलवलं. त्या दोघांत काय बोलणं झालं माहिती नाही पण, त्यांच्यात सुसंवाद झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. दलित नेता जिग्नेश मेवाणीही होता. पण, त्याने फक्त नेत्यांची भाषणे ऐकली. ना तो कोणा नेत्याला आपणहून भेटला ना त्याने बोलणं केलं. राहुलनी सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आदर राखत भाषण केलं. भाषण संपल्यानंतर व्यासपीठावर सगळेच राहुलभोवती जमा झाले होते. त्यामुळं अध्र्या तासात छायाचित्रकारांना भरपूर ‘कँडिड मोमेंट्स’ मिळाले! राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष या नात्याने राहुल यांचं भाषण सभेतलं अखेरचं ठरायला हवं होतं पण, अरविंद केजरीवाल सर्वात शेवटी आल्याने त्यांच्या भाषणाने मेळाव्याची सांगता झाली. त्यामुळं राहुलना केजरीवालांचं भाषण ऐकावं लागलं. शेतकऱ्यांच्या निमित्ताने का होईना दोन्ही विरोधक एका व्यासपीठावर आले हे महत्त्वाचं.

अशीही सक्ती

तीस हजारहून अधिक शेतकरी ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’च्या छत्राखाली एकत्र आलेले होते. या समितीचे समन्वयक आहेत व्ही. एम. सिंग. ताडमाड उंच. अत्यंत आकर्षक पंजाबी व्यक्तिमत्त्व. त्यांचं बोलणंही लोकांना त्यांच्याकडं खेचून घेतं. राजकीय नेत्यांची भाषणं होण्याआधी व्ही. एम. शेतकऱ्यांना उद्देशून बोलत होते. वेगवेगळे झेंडे आणि विचारांचे नेते आलेले आहेत असं ते सांगत होते. अखिल भारतीय किसान सभेचे लाल झेंडे उठून दिसत होते. त्याचा संदर्भ घेत व्ही. एम. गमतीनं सीताराम येचुरींना म्हणाले, ‘सगळीकडे लाल-लाल झेंडे दिसताहेत. आमचे झेंडे दिसतच नाहीत’. त्यांची ही ‘तक्रार’ ऐकून सीताराम हसायला लागले.. व्ही. एम. यांनी उपस्थित राजकीय नेत्यांकडं एकच आग्रह धरला होता. लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कर्जमुक्ती आणि दीडपट भावाचा समावेश हवा. संसदेत मांडलेल्या शेतकऱ्यांच्या खासगी विधेयकावर तर तुम्ही सगळ्यांनी स्वाक्षरी केलेलीच आहे पण, जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख करणार की नाही हे सांगा, असं व्ही. एम. सगळ्या नेत्यांना विचारत होते. समाजवादी पक्षाकडून खासदार धर्मेद्र यादव यांनी शेतकऱ्यांना समर्थन देणारं भाषण केलं आणि ते जागेवर जाऊन बसले. व्ही. एम.नी त्यांना परत बोलावलं. धर्मेद्रजी तुम्ही खासगी विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी सही केलीत हे मान्य पण, तुम्ही पक्षाच्या जाहीरनाम्याचा उल्लेखच केला नाहीत. सपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची मागणी मान्य करू असं लिहिणार का?.. व्ही. एम. सिंग यांनी धर्मेद्र यादवांना विचारलं. अखेर खासदार पुन्हा माइकजवळ आले आणि त्यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या दोन्ही मुद्दय़ांचा समावेश असेल असं आश्वासन दिलं. यादव यांच्यानंतर बोलणाऱ्या प्रत्येक नेत्यानं जाहीरनाम्याचा आणि शेतकरी मुद्दय़ांचा उल्लेख केला.

देवाची जात

छत्तीसगढ, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्या. उरला आहे तो राजस्थान. हे राज्य भाजप गमावण्याची शक्यता मानली जात असल्यानं सत्ता राखण्यासाठी भाजप कसोशीनं प्रयत्न करत आहे. त्यामुळं सगळ्या देव-देवतांना नमन केलं जातंय. ब्रह्मा-विष्णू-महेश हे तर आद्य देव. राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार. रामाचं मंदिर उभं करायचं आहे पण, त्या आधी रामाची मूर्ती बनवण्याचं काम सुरू झालंय. राजस्थानच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचार करत असल्यानं रामाचा उल्लेख असतोच. राम आणि योगी हे समीकरणच बनून गेलंय. पण, आता योगींनी कुठले देव कुठल्या जातीचे हेही सांगायला सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वी योगींची अलवर भागात सभा झाली. तिथं त्यांनी जात आणि धर्म देवांनाही लागू केला. या सभेत उल्लेख रामाचा नव्हता. रामभक्त हनुमानाचा होता. योगीचं वाक्य होतं, ‘बजरंगबली हे असे लोकदेवता आहेत जे स्वत आदिवासी आहेत, दलित आहेत, वंचित आहेत’.. अलवर भागात प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात हनुमानाचं नाव घेतलेलं होतं. अलवरवासी हनुमानाचे पूजक आहेत. या शहरांत हनुमानाची अनेक मंदिरं आहेत. मोदींनी संदर्भ घेतला होता तो पांडूपोल हनुमानाशी. पांडूपोलमध्ये हनुमानानं पांडवांना दर्शन दिल्याचं मानलं जातं. अलवरचा ग्रामीण मतदार संघात दलित-आदिवासीबहुल आहे.

गेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा २७ हजार मतांनी पराभव झाला होता. भाजपला अलवर ग्रामीण आपलंसं करायचं असेल तर हनुमान आणि दलित हे समीकरण मांडण्याशिवाय पर्याय उरला नसावा. त्यामुळं सध्याच्या रामभक्त योगींनी खऱ्या रामभक्ताला साद घातली आणि देवांनाही जाती-पातीत विभागून टाकलं.

भांडवलवादी की कम्युनिस्ट?

चिनी ई-कॉमर्स कंपनी ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा यांच्याबद्दल काय वाटतं असं मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरींना विचारलं गेलं. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी जॅक मा यांची नवी ओळख निर्माण झालेली आहे. मा यांना चीनमधील सर्वात मोठे भांडवलदार मानलं जातं. पण, ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. मग, मा हे भांडवलवादी की कम्युनिस्ट?.. मा कोण वाटतात हे येचुरींकडून जाणून घ्यायचं होतं. त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा येचुरीचं म्हणणं होतं की, मा कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत की नाही हे माहीत नाही.. पण, मा भांडलवादी असणं अधिक महत्त्वाचं आहे की, कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असणं? यावर येचुरी म्हणाले की, मा हे यशस्वी आंत्रप्रनूर बनले आहेत. त्यातून भांडवलवादावर समाजवादाचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. समाजावादाच्या भल्यासाठी भांडवलवादाचा कसा योग्य उपयोग करून घेता येईल हेच मा यांच्या उदाहरणातून दिसतं.. गुगली टाकलेल्या प्रश्नावर येचुरींनी मा, समाजवाद आणि भांडवलवाद अशा सगळ्यालाच ‘न्याय’ देऊन टाकला.

– दिल्लीवाला

Story img Loader