हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात खासदार सभागृहात कमी आणि संसदेच्या लॉबीमध्ये जास्त दिसत होते. दोन्ही सभागृहं तहकूब होत असल्यानं काही खासदार नेहमीप्रमाणं सेंट्रल हॉलचा रस्ता पकडत होते. काही खासदार सेल्फी काढण्यात मग्न होते. गुरुवारी दोन्ही सभागृहं दिवसभरात पहिल्यांदा तहकूब झाली. तेवढय़ात सोनिया गांधी एकटय़ाच लगबगीनं चालत आल्या. त्यांचं आसपास असलेल्या माणसांकडं लक्ष नव्हतं. त्या तशाच पुढं निघून गेल्या आणि अचानक थांबल्या. त्या परत आल्या आणि काँग्रेसच्या खासदाराला त्यांनी नमस्कार केला. ‘तुम्हाला मी बघितलंच नाही. माफ करा.’ असं सोनिया म्हणाल्या. त्यांची विनम्रता पाहून कोणीतरी म्हणालं, याला म्हणतात काँग्रेस.. त्यावर ते खासदार म्हणाले, याला काँग्रेस नव्हे, गांधी कुटुंब म्हणतात.. काँग्रेस सदस्यच नव्हे तर समोरून आलेल्या कोणाही व्यक्तीला सोनिया इतक्याच विनम्रतेनं नमस्कार करतात. त्यांच्यातील मार्दव अगदी भाजप विचारांच्याही अनेकांना भावतं! भाजपमध्ये राजनाथ सिंहसारखे काही नेते अजूनही वाजपेयींची परंपरा चालवताना दिसतात. संसदेतील ग्रंथालयाच्या इमारतीसमोर राजनाथ यांचा ताफा थांबलेला होता. अडवाणी येत असल्याचं पाहून राजनाथ यांनी लगेच ताफ्यातील गाडय़ा पुढे घ्यायला सांगितलं. अडवाणींना आपुलकीनं आतमध्ये नेलं. दुसऱ्या दिवशी संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली गेली. तिथं अडवाणी उभे होते. त्यांची दखलही न घेता एक वरिष्ठ नेता पुढं आला आणि निघून गेला. राजनाथ यांच्या आणि या नेत्याच्या ‘विनम्रते’बद्दल संसदेतील नोकरशाहांमध्ये वेगवेगळे सूर उमटलेले दिसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा