राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर गुरुवारी पंतप्रधानांनी दिलेलं प्रदीर्घ उत्तर म्हणजे निवडणूक प्रचाराची सुरुवात होती. पण, त्याआधी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा बोलले. ते ऐकायला मोदी लोकसभेत नव्हते. देवेगौडा यांनी तब्बल १४ वर्षांनी लोकसभेत भाषण केलं. ते भावनिक झाले होते. माजी पंतप्रधान म्हणून त्यांना मानसन्मान सत्ताधारी भाजपने द्यायला हवा होता, तो दिला गेला नाही याची खंत त्यांच्या मनात असावी. सत्ताधारी बाकांकडे बघत ते म्हणाले की, इतक्या वर्षांत मी कधी बोललो नाही. माझे सभागृहातील हे कदाचित शेवटचं भाषण असेल.. तुम्हाला माझं नावही घ्यावं असं वाटत नाही.. मोदी सातत्याने बहुमतातील सरकारचा उल्लेख करतात. देशाला भक्कम सरकारच हवं. महाआघाडीचं दुर्बळ सरकार विकास करू शकत नाही असा प्रचार भाजपचे नेते करताना दिसतात. आघाडीच्या सरकारमध्ये विकासाची कामं होतच नाहीत असं कुणी सांगितलं?.. देवेगौडांच्या बोलण्यात नाराजी होती. सर्वाधिक लांबीच्या बोगीबीळ पुलाचं भूमिपूजन देवेगौडांच्या काळात झालं. पण उद्घाटनाचं श्रेय मोदींनी घेतलं. दिल्ली मेट्रोला देवेगौडा सरकारनं गती दिली. उत्पन्न स्वयंघोषित करण्याची योजना त्यांच्यात काळात आणली गेली. देवेगौडांनी या सगळ्या योजनांचा भाषणात उल्लेख केला. मी दहा महिने पंतप्रधान होतो, पण काश्मीरमध्ये पाच वेळा जाऊन आलो.. नागा नेत्यांना भेटलो. हे सगळं काम आमचं आघाडी सरकार सत्तेवर असतानाच झालं आहे. देवेगौडा सभागृहाला सांगत होते. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे फक्त तीन खासदार आहेत. त्यामुळं देवेगौडांना बोलण्यासाठी कमी वेळ उपलब्ध होता. देवेगौडा म्हणाले की, पूर्वी पक्षसंख्या कमी असली तरी महत्त्वाच्या प्रश्नावर सदस्यांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दिला जात असे.. देवेगौडांची निर्धारित वेळ संपली होती, पण विरोधी सदस्यांनी त्यांना बोलण्याचा आग्रह केला. सत्ताधाऱ्यांनीही आक्षेप घेतला नाही. लोकसभा अध्यक्षांनीही देवेगौडांचा मान राखत भाषण पूर्ण करू दिलं. देवेगौडांचं लोकसभेतलं हे अखेरचं भाषण असेल असं नाही. त्यांना सत्ताधारी बाकावरून बोलण्याची संधी मिळणारच नाही असंही आत्ता कोणी सांगू शकत नाही.
दिल्लीवाला
पूर्वाश्रमीचे राजे-महाराजे स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते लोकप्रतिनिधी बनले. पण, काही राजांची गोष्टच वेगळी असते. त्यांच्यावर ‘साहेबां’ची कृपा असते. त्यांनी काहीही केलं तरी लोक त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांना निवडणुकीचं तिकीटही मिळतं आणि ते लोकप्रतिनिधी या नात्यानं संसदेतही येतात. गेल्या आठवडय़ात हे राजे आलिशान गाडीतून उतरले. दिवस होता अर्थसंकल्पाचा. राजांसाठी सकाळी अकराची वेळ थोडी लवकरचीच. राजांची पावलं अडखळत होती आणि पायरी चुकत होती. सुरक्षारक्षक पाहातच होते. राजांना अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला उपस्थित राहायचं होतं. ते पुढं निघाले तर सुरक्षारक्षकांनी अटकाव केला. राजांनी रक्षकांकडं दुर्लक्ष केलं आणि ते तडक आत गेले. राजांचं उग्र रूप पाहून रक्षक थोडे घाबरले. त्यांनी आतमध्ये असलेल्या सुरक्षारक्षकांना निरोप दिला. राजे आत पोहोचेपर्यंत निरोप वाऱ्याच्या वेगाने पोहोचला होता. तिथं मात्र राजांचं काही चाललं नाही. सभ्य भाषेत सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. मग, राजांनाही परतण्याशिवाय दुसरा माग उरला नाही.. आणखी एका राजांना सुरक्षारक्षकांनी अडवलं होतं. हे राजे अत्यंत मवाळ. त्या दिवशी राजे नेहमीच्या राजेशाही वेशात नव्हते. त्यांनी जीनची पँट घातलेली होती. त्यामुळं सुरक्षारक्षकांनी त्यांना ओळखलं नाही. राजांकडे सुरक्षारक्षकांनी ओळखपत्र मागितलं. त्यांनीही नम्रतेनं ते दाखवलं आणि राजे सभागृहात गेले. दोन दिवसांच्या अंतराने घडलेली ही दोन राजांची गोष्ट!
आक्रमक तृणमूल
पश्चिम बंगालमध्ये सीबीआय नाटय़ाचा रंगतदार प्रयोग झाल्यापासून तृणमूल काँग्रेसचे खासदार मोदी सरकारवर भडकलेले आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. लोकसभेत कल्याण बॅनर्जी, इद्रीस अली हे तृणमूलचे अधिक ‘बोलके’ खासदार आहेत. घोषणाबाजीत कल्याण बॅनर्जीचा हात कोणी धरू शकत नाही. कधी कधी इद्रीस अली स्वत:ची जागा सोडून मागच्या बाकांवर जाऊन बसतात. मग, त्यांच्या अंगात उत्साह संचारतो. भाजपप्रणीत ‘एनडीए’च्या सदस्यांनी गेली पाच वर्ष लोकसभेचं सभागृह व्यापून टाकलेलं होतं. त्यामुळं विरोधकांचा आवाज कमकुवत झालेला होता. काँग्रेसमध्येही कोणी आक्रमक झालंय असं फारच कमी वेळ पाहायला मिळालं. गुरुवारी पंतप्रधानांच्या भाषणावेळी सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेस मुख्यालयात महासचिवांची बैठक सुरू होती. त्यामुळं राहुल, ज्योतिरादित्य नव्हते. काँग्रेस आणि भाजपने खासदारांसाठी व्हिप काढलेला होता तरीही दोन्हीकडील सदस्य गैरहजर होते. पंतप्रधानांनी लोकसभेत प्रवेश करताक्षणी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मोदींविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. चौकीदार चोर है.. मोदींचं भाषण सुरू असतानाही अधूनमधून तृणमूलचे सदस्य घोषणा देत होते. भाषण देता देता मोदी थांबले. तृणमूलच्या खासदारांकडं बघत म्हणाले, झाल्या घोषणा देऊन.. काँग्रेसची घोषणा तुम्ही आयात केलेली दिसते. घोषणाबाजी करण्याचं काम काँग्रेसनं तुमच्यावर सोपवलेलं दिसतंय.. सीबीआय नाटय़ात काँग्रेसनं तृणमूलला पाठिंबा दिला आहे. त्याची परतफेड तुम्हाला करावी लागतेय.. मोदींच्या या वक्तव्यानंतर मात्र तृणमूलचे सदस्य काही काळ शांत बसले. मोदी तब्बल एक तास चाळीस मिनिटं बोलले. मध्ये मध्ये ते पाण्याचे घोट घेत होते. तृणमूलचा एक सदस्य त्यांना म्हणाला, पानी पिलो.. पंतप्रधानांना असं म्हणणं हे त्या पदाचा अवमान करणं होतं. हे जाणून कल्याण बॅनर्जीनी त्या सदस्याला थांबवलं. मग, मोदींनीही दुर्लक्ष करत भाषण चालू ठेवलं.
राहुल यांचा कारभार
गेल्या आठवडय़ात काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर ते मोजक्या पत्रकारांशी गप्पा मारत होते. बोलता बोलता विषय राहुल गांधींच्या काम करण्याच्या पद्धतीवर आला. त्या दिवशी हे माजी मंत्री सकाळीच काँग्रेस मुख्यालयावर होते. राहुल यांची भेट होईपर्यंत काही काळ त्यांना वाट पाहावी लागली होती. राहुल यांनी नऊ जणांना वेळ दिलेली होती. माजी मंत्री दुसरे वा तिसरे असावेत. वेळ टळून गेल्यावर लगेचच राहुल यांच्याकडून त्यांना निरोप गेला आणि सांगितलं गेलं की आणखी १५ मिनिटं लागतील. माजी मंत्री सांगत होते, खरं तर राहुल यांना निरोप पाठवण्याची गरज नव्हती. मी वाट पाहिलीच असती. माजी मंत्र्यांना राहुल यांच्या वागण्यातील नम्रता भावली. त्यांच्यानंतर छत्तीसगढमधील एक महिला कार्यकर्ती राहुल यांना भेटली. तिला विधानसभेचं तिकीट मिळणार होतं. पण, शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला गेला. राहुल यांनी त्या कार्यकर्तीला निरोप पाठवून सबुरी दाखवायला सांगितली होती. प्रदेश काँग्रेसकडून तिचं राजकीय पुनर्वसन झालं नाही. तिनं थेट राहुल यांनाच एसएमएस केला. राहुल यांनी लगेचच दिल्लीत बोलावून घेतलं. राहुल यांनी तिला दोनच मिनिटं वेळ दिला. पण लगेचच संघटना महासचिव के. वेणुगोपाळ यांना बोलावून त्यांच्याकडे कागद दिला. तातडीने कार्यवाही करा, अशी सूचना त्यावर लिहिलेली होती. माजी मंत्री सांगत होते, वेणुगोपाळ छत्तीसगढमधील कार्यकर्तीला शोधत होते.. माजी मंत्र्यांनी सोनियांचा कारभारही पाहिलेला आहे. सोनियांना एखादा मुद्दा महत्त्वाचा वाटला तर त्या पेन्सिलने कागदावर टिपून घेत आणि तो नंतर त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडं दिला जाई. राहुल यांचा कारभार अधिक खुला आहे. ते कार्यकर्त्यांशी थेट बोलतात. त्यांच्या संदेशाला प्रतिसाद देतात. राहुल हळूहळू काँग्रेसवर स्वत:ची पकड मिळवत असल्याचं माजी मंत्र्यांच्या बोलण्यातून जाणवलं.