अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सोनिया गांधी बराच वेळ संसदेत होत्या. राहुल गांधी काँग्रेसच्या बैठकांसाठी निघून गेले. दुपारी ते शरद पवार यांना भेटायला गेले. त्यामुळे ते लोकसभेत आले नाहीत. सत्ताधारी बाकांवरही उपस्थिती तुलनेत कमीच होती. सोनियांसाठी हा दिवस विशेषच म्हणावा लागेल. दोन ज्येष्ठ संसदपटूंनी त्यांना अचंबित केले. मुलायमसिंह यादव यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देऊन सभागृहात खळबळ उडवून दिली. मुलायमसिंह नेमके काय बोलताहेत? मोदींनी पंतप्रधान व्हावे असे त्यांना वाटतेय? हे ऐकून सोनियांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य, अचंबा आणि अस्वस्थता असे सगळेच भाव एकवटलेले होते. मुलायमसिंह विनोद करत असावेत असे वाटले होते, पण ते मनापासून मोदींना शुभेच्छा देत होते. मुलायम यांनी अनपेक्षितपणे विरोधकांची केलेली कोंडी बघून सत्ताधारी सदस्य मात्र कमालीचे सुखावले होते. मुलायमसिंह यांच्या आधी देवेगौडा बोलले. त्यांनी सोनियांचा उल्लेख केला. सोनिया पंतप्रधान बनता बनता राहिल्या. त्यांना पंतप्रधान होता आले नाही, असे देवेगौडा म्हणताच, त्यांच्या बाजूला बसलेल्या सोनिया दुसऱ्यांदा अचंबित झाल्या. त्या लगेच देवेगौडांना म्हणाल्या, पण मला व्हायचेच नव्हते!.. देवेगौडांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे बघत ते म्हणाले, तुम्हाला पंतप्रधान व्हायचे नव्हते असे नाही. त्यात अडचणी आल्या. देवेगौडांना म्हणायचे होते की, सोनियांना पंतप्रधान बनू दिले गेले नाही. नाही तर वाजपेयींनंतर सोनियाच पंतप्रधान झाल्या असत्या.. पण, देवेगौडांच्या वक्तव्यावर सोनियांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. नेहमीप्रमाणे त्या शांत राहिल्या. पंतप्रधानपदाबाबत सोनियांनी कधीही जाहीरपणे मतप्रदर्शन केलेले नाही. लोकसभेतही त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा