एका ज्येष्ठ पत्रकाराच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. ल्युटन्स दिल्लीतील तमाम नामवंत- त्यातील बहुतांश मोदीविरोधक- समारंभाला उपस्थित होते. प्रकाशन झालं. परिसंवाद सुरू झाला. २०१९ मध्ये मोदी जिंकून येतील का?.. चर्चेत सहभागी झालेल्या एकालाही असं वाटत नव्हतं की, मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. त्यांचं म्हणणं होतं मोदींची ५६ इंच छाती काही इंचानं कमी होईल. असं म्हणण्यात मोदीविरोधक नव्हे तर भाजपच्या मित्रपक्षाचा सदस्यच आघाडीवर होता.. भाजपच्या दुसऱ्या मित्रपक्षाचा प्रतिनिधीही पहिल्या रांगेत बसला होता. हा वाघासारखा मित्र अलीकडं कमळाला फार टोचून टोचून बोलतोय; पण कमळाशी आमनेसामने लढाई करायला तयार नाही. मोदींच्या भीतीपोटी त्याची हिंमत होत नसावी बंडखोरी करायची.. अनेकांच्या मनात हा प्रश्न घर करून राहिलेला आहे. वाघ घाबरतो की काय मोदींना?.. हाच प्रश्न त्या ज्येष्ठ पत्रकाराने वाघनख असलेल्या संपादकाला अचानक विचारला. खरं सांगा, तुम्ही मोदींना घाबरता की नाही?.. इतका थेट प्रश्न तमाम लोकांच्या पुढय़ात कोणी विचारेल असं त्या संपादकाला वाटलंच नव्हतं. प्रश्न जणू अंगावर कोसळलाच! काय बोलावं हे महाशयांना समजेना. शेवटी त्यांना शब्द सापडले. क्षणभर चाचपडण्यात गेले, मग त्यांनी उसन्या बाणेदारपणे उत्तर दिलं, ‘कोण म्हणतो आम्ही मोदींना घाबरतो?’.. पण, म्हणतात ना; जो बूंद से गयी, वो हौद से नहीं आती..

प्रश्नमंजूषाकार डेरेक

पूर्वी ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये होत्या. त्यांच्याकडं एकच काम होतं, लोकसभेत मागच्या सीटवर बसून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर आरोप केला की, तितक्याच जोरदार आवाजात त्या सदस्यांविरोधात बोलायचं. सध्या भाजपसाठी हे काम दिल्लीचे खासदार रमेश बिढुरी करतात. हे बिढुरी लोकसभेत इतका ओरडाआरडा करतात की लोकसभा अध्यक्षांना त्यांना सतत शांत करावं लागतं.. बिढुरींसारखे अनेक आहेत. राज्यसभेत तर ममतांचे चेले बिढुरींचे सख्खे भाऊ शोभतात. क्विझमास्टर (प्रश्नमंजूषाकार) डेरेक. अर्थातच डेरेक ओ’ब्रायन.. तृणमूल काँग्रेसचा राज्यसभेतील बुलंद आवाज. डेरेक तृणमूलचे राष्ट्रीय प्रवक्तेआहेत, खासदार आहेत. आता ते पूर्णवेळ राजकारणी बनलेले आहेत. त्यांची पूर्वीची ‘क्विझमास्टर’ची भूमिका आता ते बजावत नाहीत. त्यामुळं त्यांना ‘क्विझमास्टर’ म्हटलेलं आवडत नाही; पण तरीही डेरेक अधूनमधून ‘क्विझमास्टर’ होण्याची संधी मात्र सोडत नाहीत. पहिल्यांदाच खासदार बनलेल्या संसद सदस्यांसाठी दोन दिवसांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला होता. विद्यार्थी वर्गात बसलेले होते. तेवढय़ात ‘क्विझमास्टर’ आले. त्यांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षाच घेतली.. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, संसदेत लोकांचे प्रश्न मांडणार आहात. बघू तुम्हाला संसदेच्या कामकाजाबद्दल काय माहिती आहे?.. क्विझमास्टरांनी एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. ज्याचं उत्तर बरोबर त्याला एक चॉकलेट.. काही हुशार विद्यार्थ्यांनी धडाधड उत्तरेही दिली. उत्तरं बरोबर दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला क्विझमास्टर डेरेक यांनी चॉकलेट दिलं आणि आपलं वचन पाळलं.

पंतप्रधान ते, पंतप्रधान हे..

विद्यमान पंतप्रधानांच्या राज्यसभेतल्या भाषणाला कात्री लावण्यात आली. पंतप्रधानांनी केलेलं भाषण सभागृहानंच कापून टाकावं हे बहुधा पहिल्यांदाच घडत असेल.. पण, या बोलक्या पंतप्रधानांमुळं त्या मौनी पंतप्रधानांची आठवण झाली. मनमोहन सिंग यांचं अस्तित्व आताशा फारसं जाणवतच नाही. राज्यसभेचे सदस्य असल्यानं ते नियमित सभागृहात उपस्थित असतात. शांतपणे बसलेले असतात. कुणी नमस्कार केला तरच ते हात जोडतात. ना ते कुणाकडं बघून स्मित करतात ना ओळख दाखवतात. आपली जागा आणि आपण एवढंच त्यांचं वर्तुळ.. राज्यसभेतले दुसरे दिग्गज शरद पवार..तेही फारसे बोलत नाहीत. पत्रकारांशी तर अजिबातच नाही.. मागच्या आठवडय़ात मात्र कमाल झाली.. त्या दिवशी मनमोहन सिंग स्वत:हून आपली जागा सोडून थेट पवारांकडं गेले. मनमोहन यांनी पवारांना काही तरी विचारलं. या दोन ज्येष्ठांमध्ये बराच वेळ गहन चर्चा सुरू होती. विचारांची नेमकी कोणती देवाणघेवाण झाली हे कळायला मार्ग नाही; पण कदाचित गंभीर काही तरी असावं.. चर्चेनंतर दोघेही गंभीर चेहऱ्यानंच आपापल्या जागेवर बसले.. विरोधकांच्या आघाडीचं कसं होणार, बहुधा असा प्रश्न दोघे एकमेकांना विचारत असतील.

वारीचा अनुभव पायी घ्यावा!

गेल्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी पंढरपूरच्या वारीचा उल्लेख केला होता. प्रत्येकाने एकदा तरी वारीत सहभागी व्हायलाच हवं.. पंतप्रधानांनी आकाशवाणीवर सांगून टाकलं. मोदीभक्तांनी पंतप्रधानांची ‘बात’ मनापासून ऐकली. अमराठी लोकांना प्रश्न पडला पंढरपूरला आहे काय? वारीला जायचं म्हणजे काय करायचं?.. खासदारांनी शोधून काढलं की पंढरपूर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतं. या मतदारसंघातले खासदार आहेत भाजपचे शरद बनसोडे. त्यांना अनेकांनी विचारणा केली, मेल पाठवले. पंतप्रधानांनी वारीबद्दलचं कुतूहल वाढवून ठेवल्यामुळं बनसोडेंची मागणी एकदम वाढली. बनसोडेंनी प्रत्येकाला वारीचं महत्त्व समजावून सांगितलं; पण त्यांच्यापुढं एक प्रश्न निर्माण झाला. लोकसभेत शून्य प्रहारात बनसोडेंनी त्याला वाट करून दिली. ते म्हणाले, इतक्या सगळ्यांना पंढरपूरला यायचंय; पण मला लाज वाटली.. पंढरपूरमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. तिथं यायलाही जेमतेम तीन रेल्वेगाडय़ा.. पंढरपूर म्हणजे काय हॉलिडे पॅकेज आहे का?.. अध्यक्षजी, वारी तुमच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. पंढरपुरात जायला आणखी रेल्वेगाडय़ा सोडायला हव्यात.. तुम्हीच सरकारला निर्देश द्या.. पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद देईल.. बनसोडेंचं हे संभाषण मराठमोळ्या भाषेत सुरू होतं. त्यांचं झाल्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनही मराठीत हसत हसत म्हणाल्या, वारी पायी पायी करण्यातच त्याचा खरा अनुभव असतो! यावर बनसोडे तरी काय बोलणार?.. लोकसभा अध्यक्षांचंही खरंच होतं.

– दिल्लीवाला

Story img Loader