|| मिमि आणि नुसरत
काश्मीरचा विषय आला, की ३७० कलम, ३५-ए, फाळणी, पं. नेहरू, सरदार पटेल, पाकिस्तान, मुस्लीम, दहशतवाद असे शब्द क्रमाक्रमाने येतातच. वातावरण एकदम संवेदनशील बनून जातं. भाजपच्या नेत्यांसाठी काश्मीर म्हणजे दुखरी नस. त्यांच्यासाठी ती सारखी ठसठसत राहते. नस कापता येत नाही, मग दुखणं सहन करावं लागतं. जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट पुढच्या सहा महिन्यांसाठी कायम राहावी म्हणून लोकसभेत प्रस्ताव आणला गेला. नेहमीप्रमाणं विरोधक आणि सत्ताधारी शिरा ताणून बोलत होते. काश्मीर प्रश्न सोडवायचा कसा यावर चर्चा होत नाही; तर तो निर्माण कोणी केला, यावर खडाजंगी होते. क्रमांक दोनचे मंत्री अमित शहा काँग्रेसच्या खासदारांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्ही इतिहासात गेलात, आता मलाही जायला हवं..!’ मग त्यांनी नेहरू, सरदार वगैरे सगळा- संघाने ७० र्वष सांगितलेला- इतिहास पुन्हा ऐकवला. हे सांगता सांगता शहांचा आवाज इतका टिपेला गेला, की विरोधी बाकांवरून कोणी तरी म्हणालं, ‘असे चिडता कशाला?’ शहांच्या एकदम लक्षात आलं, की आपण लोकसभेत बोलतोय. स्वत:ला सावरत शहा म्हणाले, ‘मी चिडलो नाही. फक्त वरच्या पट्टीत बोललो इतकंच. कधी कधी वरच्या पट्टीत बोलावं लागतं. मी बोललेलं सगळ्यांना ऐकू जावं आणि कळावं म्हणून बोललो..’ दोन दिवस आधीच मोदी म्हणाले होते, ‘काही जण अजूनही निवडणूक प्रचाराच्या मूडमध्ये आहेत!’ मोदींना कुठं ठाऊक होतं, आपले क्रमांक दोनचे मंत्रीही त्याच मूडमध्ये आहेत. प्रस्तावावर शहा यांनी पाऊण तास भाषण केलं. मंत्री म्हणून उत्तर देण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. राजनाथ सिंह त्यांना अधूनमधून मदत करत होते.. हा मुद्दा बोला, तो मुद्दा बोला, वगैरे. राजनाथ यांना गृहखात्याचा पाच वर्षांचा अनुभव असल्यानं त्यांनी वडीलकीच्या नात्यानं शहांना मार्गदर्शन केलं. शहांनीदेखील राजनाथ आणि मोदींच्या काश्मीर धोरणाचं खूप कौतुक केलं. ओवेसींनी धडाधड चार-पाच प्रश्न शहांना विचारले. शहांनी ओवेसींचं नाव घेऊन मुद्दा मांडायला सुरुवात केली, पण ओवेसी सभागृहातच नव्हते. ओवेसी परत आले आणि गेले. शहांनी पुन्हा ओवेसींचं नाव घेतलं. शेवटी शहा म्हणाले, ‘आताही नाहीत का ओवेसी? जाऊ दे चला!’ आणि ओवेसींना उत्तर देणं बारगळलं.
तृणमूल काँग्रेसकडं दोन ‘सेलिब्रिटी’ खासदार आहेत. नुसरत जहाँ आणि मिमि चक्रवर्ती. नुसरत मुस्लीम, पण तिनं हिंदू व्यक्तीशी लग्न केलं. हिंदू रिवाजाप्रमाणं भांगात सिंदूर भरला. ‘वंदे मातरम्’ म्हटलं. जबरदस्त कौतुक होतंय खासदार नुसरतचं. मिमिनंही ‘वंदे मातरम्’ म्हटलं, पण ती हिंदू; त्यामुळं त्याचं काही विशेष नाही. आपल्यामुळं नाहक वाद नको, असं बहुधा दोघींनी ठरवलं असावं. त्यांच्या पाश्चिमात्य पेहरावावरून वाद सुरू होता. या आठवडय़ात त्या भारतीय पोशाखात आलेल्या दिसल्या. दोन-तीन दिवस संसदेत होत्या. लोकसभेत मोदींचं भाषण सुरू होतं, ते या दोन्ही खासदारांनी दोन-चार मिनिटं ऐकलं. कदाचित त्यांना कंटाळा आला असावा. सभागृहातून त्या बाहेर पडल्या, तर संसदेच्या आवारात न्यूज चॅनलवाल्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. ‘थोडं मागं व्हा’ म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. पत्रकारांचा आक्रमकपणा पाहून मिमि भेदरली. नुसरत तुलनेत धाडसी असावी. तिनं मिमिला हातांची साखळी करून संरक्षण दिलं. कशीबशी सुटका करून घेऊन त्यांनी काढता पाय घेतला. त्यावरूनही वाद सुरू झालाय. कोणाला तरी वाटलं, की नुसरत आणि मिमिनं गराडा घालणाऱ्या पत्रकारांबद्दल लोकसभेच्या अध्यक्षांकडं तक्रार केली. मग त्यांना स्पष्ट करावं लागलं, की कोणतीही तक्रार केलेली नाही, पत्रकारांचा आम्ही मान राखतो, वगैरे.
हे प्रकरण संपतं ना संपतं, तोच कोणी तरी- ‘मिमि चक्रवर्ती हिनं खासदार असून भारतीय सभ्यता कशी गुंडाळून ठेवली आहे, ती तोकडय़ा कपडय़ांत कशी नाचत होती, मतदारसंघात ती अजूनही गेलेली नाही’ वगैरे चर्चा सुरू केली आहे. लोकप्रतिनिधी होण्यापेक्षा लोकांचं मनोरंजन करणं अधिक सोपं, असं म्हणण्याची वेळ या दोघींवर फारच लवकर आलेली दिसते! बाकी ‘ढाई किलो का हात’ अधूनमधून पाहायला मिळतो. भोजपुरी नट रवी किशनची उपस्थिती मात्र वाखाणण्याजोगी आहे.
लक्ष वेधलं महुआनंच!
लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेली महिला खासदार भाजप सदस्यांची भाषणं शांतपणे ऐकत होती. पण कोणीही कल्पना केली नव्हती, की ही खासदार इतकी ‘फायरब्रँड’ असेल. लोकसभा अध्यक्षांनी तिचं नाव उच्चारलं व तिनं सत्ताधाऱ्यांवर थेट शाब्दिक प्रहार केला. तृणमूल काँग्रेसच्या पहिल्यांदाच खासदार झालेल्या महुआ मोईत्रानं केलेल्या जबरदस्त आक्रमक भाषणामुळं सत्ताधारीही अवाक् झालेले दिसले. तिच्या भाषणाच्या वेळी सत्ताधारी बाकांवर आणि पत्रकारांच्या गॅलरीतही तुलनेत कमी उपस्थिती होती. पण तिच्या भाषणानं नंतर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तृणमूलचे खासदार नेहमीच आक्रमक असतात; पण महुआच्या बोलण्यात कोणताही आक्रस्ताळेपणा नव्हता. देशात फॅसिझमचा धोका का निर्माण झाला आहे, या मुद्दय़ावर अत्यंत मुद्देसूद मांडणी महुआनं केलेली पाहिली. सत्ताधाऱ्यांविरोधात केलं गेलेलं नव्या लोकसभेतील हे पहिलं खणखणीत भाषण. काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन बंगालीच, पण महुआच्या धारदार शब्दांपुढं त्यांचं भाषण बोथट झालं. खरं तर लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून महुआ मोईत्राचीच निवड करायला हवी! तिच्या पक्षाचं संख्याबळ पाहता ते शक्य नाही. तिचं भाषण सुरू असताना भाजपमधील ‘शाऊटिंग ब्रिगेड’ गप्प बसलेली दिसली. अधूनमधून सत्ताधारी डाव उलटवण्याचा प्रयत्न करत होते; पण त्यामुळं महुआ ना विचलित झाली, ना तिनं भाषण थांबवलं. उलट- ‘हा गोंधळ थांबवा’ असं महुआनं लोकसभा अध्यक्षांना सांगितलं. नवखी असल्याचं दडपण नाही. बोलण्यातही नवखेपणा नाही. पुढील पाच र्वष भाजपला वारंवार महुआचे खडेबोल ऐकावे लागणार असं दिसतंय. महुआच्या बोलण्यात जितकं गांभीर्य होतं, त्याउलट तिचे राज्यसभेतील सहकारी डेरेक ओब्रायन यांच्या भाषणात मात्र नाटय़ अधिक होतं. त्यांनी भाषण इंग्रजीत सुरू केलं. पण पश्चिम बंगालच्या अस्मितेचा मुद्दा आला, तेव्हा ते बंगाली भाषेकडं वळाले. त्यांची बंगालीतली पाच मिनिटं म्हणजे नटाची ‘सोलोलॉकी’च म्हणायची! या ‘रोबिंद्रोनाथां’च्या आवाजातील चढ-उतार, हावभाव पाहून अस्सल नटही अचंबित होईल!
मोदी का बरं संतापले?
राज्यसभेत थोडी गडबडच झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यायचं होतं. त्याच रात्री मोदींना जपानला जायचं होतं. तिथं ‘जी-२०’ देशांची बैठक होती. त्यामुळं त्यांना संसदेतलं काम पूर्ण करावं लागणार होतं. राज्यसभेत उत्तर दिल्याशिवाय परदेशी जाणार कसं? अन्यथा प्रस्तावाची संमती प्रलंबित राहिली असती. राज्यसभेत चर्चेसाठी दीड दिवस होता, पण भाजपचे विद्यमान खासदार मदनलाल सैनी यांचं निधन झाल्यानं सभागृह तहकूब केलं गेलं. परंपरेप्रमाणं सभागृह दिवसभरासाठी तहकूब झालं असतं; पण पंतप्रधानांना देशाबाहेर जायचं होतं. वेळ कमी पडत होता. सदस्यांना तर प्रस्तावावर बोलायचं होतं. मग तीन तासांची तहकुबी करून वरिष्ठ सभागृह सुरू झालं. संध्याकाळी उशिरापर्यंत सदस्य मतप्रदर्शन करत राहिले. दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरू होती. काँग्रेसचे आनंद शर्मा बोलायला उभे राहिले. ते बोलत गेले. त्यांची वेळ संपली तरी थांबेनात. आनंद शर्मा हे ज्येष्ठ, अनुभवी संसदपटू. उपसभापतींना त्यांना खाली बसवता येईना. दोन-तीनदा वॉर्निग बेल वाजवून पाहिली. आनंद शर्मावर काही परिणाम झाला नाही. शर्मा म्हणाले, ‘मला बोलायचं आहे.’ उपसभापती म्हणाले, ‘शर्मा, तुमच्यानंतर आणखी चार वक्ते बोलणार आहेत. वेळ कमी आहे.’ सदस्यांचं बोलणं झालं, की दुपारी लगेचच पंतप्रधान उत्तराचं भाषण करणार होते. पंतप्रधानांकडं फार वेळ नव्हता. अखेर शर्मा खाली बसले. जेवणाची सुट्टी झाली. तासाभरात मोदींचं भाषण सुरू झालं. केंद्र सरकारला राज्यसभा कशी वेठीला धरते, या मुद्दय़ावर मोदी आले. ‘मला परदेशात जायचं आहे. मला बोलण्यासाठी राज्यसभेची वेळ मागून घ्यावी लागली..’- मोदींच्या या वक्तव्यात शर्माचं नाव नव्हतं, पण रोख त्यांच्याकडंच होता. शर्मानी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांची अडवणूकच केली होती. त्याचा मोदींना राग आला असावा. राज्यसभेत विधेयकं अडवली जातात, ही मोदींच्या मनातील खरी खदखद आहे. पण ती- ‘भाषणाची वेळ मागून घ्यावी लागते’ या वाक्यातून बाहेर पडली. त्यानंतर मोदींनी राज्यसभेचं दायित्व, वरिष्ठ सभागृहातील सदस्यांचा कारभार वगैरेवर भाष्य केलं.