अटलजींची अंत्ययात्रा निघण्याच्या बेतात होती. पत्रकार रस्त्याच्या कडेला वाट पाहात उभे होते. विषय अर्थातच वाजपेयींचा होता.. त्यापैकी एका पत्रकाराने सांगितलेला हा किस्सा. कोणी तरी आव्हान दिलं पंतप्रधान वाजपेयींची मुलाखत घेऊन दाखव. या तरुण पत्रकाराचं रक्त सळसळलं. त्यानं थेट पंतप्रधान कार्यालयाला फोन लावला. वाजपेयींनी बोलवलंय तुम्हाला.. दोन दिवसांनी कार्यालयातून फोन आला. या पत्रकाराच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सकाळी आठची वेळ दिली होती. सात वाजताच त्याने वाजपेयींचं घर गाठलं. काही वेळाने वाजपेयी आले. त्यांनी या पत्रकाराची विचारपूस केली. पत्रकारानं विचारलं, मुलाखत सुरू करायची का?.. वाजपेयी हसायला लागले. मग म्हणाले, पंतप्रधानांची मुलाखत घेण्याचा एक शिष्टाचार असतो. अशी मुलाखत देता येत नाही. बस. माझी बैठक झाली की मी येतो.. बैठक झाल्यावर वाजपेयी पुन्हा त्याला भेटायला आले.. तू तरुण आहेस हे मी तेव्हाच ओळखलं होतं; पण तू फोन केलास म्हणून मी तुला भेटायला बोलावलं.. वाजपेयी कोणालाही भेटायला तयार असत. या पत्रकाराचा हा अनुभव आत्ताच्या राजकारणावर टिप्पणी करणारा आहे. त्या पत्रकाराला वाजपेयींनी मुलाखत दिली नाही, पण निव्वळ फोन केला म्हणून देशाचे पंतप्रधान त्याला भेटायला मात्र तयार झाले. कुठल्याही लोकप्रतिनिधीला कोणाशीही संवाद साधता आला पाहिजे. कोणालाही कधीही केव्हाही लोकप्रतिनिधीला भेटता आलं पाहिजे. लोकांना लोकप्रतिनिधी आपला वाटला पाहिजे.. हा पत्रकार म्हणाला, आता हा संवादच संपलेला आहे. आता लोकप्रतिनिधी वेळ घेऊनही भेटायचं टाळतात. या संवादविरहित राजकारणानं आताशा टोक गाठलेलं आहे..
गायब झालेलं ट्वीट
स्वातंत्र्यदिनी भाजपच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाचं दृश्य सरकारी वृत्तवाहिनीवर का दाखवलं गेलं?.. प्रश्न अनुत्तरितच आहे. असो. पण, आता मुद्दा गायब झालेल्या ट्वीटचा आहे. शहांचं ते ‘प्रसिद्ध’ ध्वजवंदन ‘डीडी न्यूज’वर दाखवलं गेलं होतं. राजकारणाच्या दोऱ्या हव्या तशा ओढणारे शहा इथं मात्र गडबडलेले साऱ्यांनी पाहिले. तिरंगा फडकवायचा होता, पण चुकून नको ती दोरी ओढली गेली.. तिरंगा खाली कोसळला. प्रसंगावधान बाळगून एक-दोन जणांनी हात दिला आणि तिरंगा पुन्हा वर गेला आणि फडकू लागला. हे सगळं दृश्य बघायला विचित्रच वाटत होतं, पण स्टुडिओत बसलेल्या पाहुण्याच्या प्रतिक्रियेनं बघणारे पार खजीलच होऊन गेले. पाहुणा तरी काय करणार? तो चुकचुकला आणि त्याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले.. डिझास्टर!.. अमित शहांसारख्या दिग्गजांवर नामुष्कीच ओढवली. या दृश्याची समाजमाध्यमांवरून भरपूर देवाणघेवाण झाली. त्यावरून विनोदही झाले. हे दृश्य ‘डीडी न्यूज’च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरही उपलब्ध होतं, पण नंतर ते गायब झालेलं आहे. ‘डीडी न्यूज’वर नियंत्रण असल्यानं मूळ स्रोत नष्ट करण्यात आला आहे, पण त्याला आधीच खूप फांद्या फुटलेल्या होत्या. या फांद्या कशा कापता येतील?
पाण्यासाठी दुवा
वाजपेयींचं अंत्यदर्शन होईल या आशेपोटी काही हजारांच्या समूहानं दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयासमोर गर्दी केली होती. खरं तर यातील कोणालाही वाजपेयींच्या पार्थिवावर फुलं वाहण्याची संधी मिळणार नव्हती; पण मुख्यालयाच्या दोन नंबर गेटवर एकच गलका सुरू होता. आत जाण्यासाठी चढाओढ लागली होती.. सध्या दिल्लीतलं हवामान वाईट आहे. दहा-पंधरा मिनिटं पाऊस येऊन जातो. मग उकाडा इतका वाढतो की, श्वास घ्यायलाही त्रास व्हावा.. हजारोंचा समूह घामानं निथळलेला होता. घशाला कोरड पडलेली होती. या गर्दीत एखाद-दोन चक्कर येऊनही पडले.. पाण्याची व्यवस्थाच नव्हती. मुख्यालयात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. आतमधील कोणाला तरी दया आली असावी. आतमधून पाण्याच्या बाटल्या बाहेर फेकल्या गेल्या.. एखाद्या पूरग्रस्त भागांत हेलिकॉप्टरनं अन्नधान्य पुरवलं जावं तसं काहीसं वाटत होतं.. संपूर्ण दीनदयाळ उपाध्याय मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. अखेर लोकांनी मोर्चा वळवला तो ‘आप’च्या कार्यालयात. याच मार्गावर केजरीवाल यांच्या पक्षाचं कार्यालय आहे. तिथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे. वाजपेयींसाठी आलेले चाहते दुवा मात्र केजरीवालांना देत होते.. तीन-चार तास उभं राहून थकलेले लोक परतीच्या प्रवासासाठी फर्लागभर अंतरावर असलेल्या मेट्रो स्टेशनमध्ये घुसले. हे लोक तिथल्या कॅफेमध्ये जात होते, पिण्याच्या पाण्यासाठी.. साठ रुपयांचं पाणी एका घोटात संपत होतं.. अनेकांनी तर मेट्रो स्टेशनमध्येच बसकण मारलेली होती.. मानवतेपोटी सुरक्षारक्षकांनीही त्यांना हटकलं नाही!
सल अजूनही जाईना!
राजकारणात आलेली संधी कधी कधी मुठीतून वाळू निसटावी तशी निसटून जाते. ते नेमकं कसं झालं हे कळतदेखील नाही.. सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय आणखी कोणाला हे अधिक समजणार?.. सुशीलकुमारांच्या मुठीतून मुख्यमंत्रिपद विलासरावांनी ज्या ‘नजाकती’नं काढून घेतलं त्याचा सुशीलकुमारांना पत्ताही लागला नाही! त्यानंतर सुशीलकुमारांची संधी गेली ती गेलीच. गेल्या आठवडय़ात सुशीलकुमार दिल्लीत आले होते. निमित्त होतं निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या पुस्तक प्रकाशनाचं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही येणार होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आले होते.. खोब्रागडेंच्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे म्हणाले, थोडा काळ मी मुख्यमंत्री होतो, मी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली; पण मला पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही. मी संघर्ष करायला हवा होता. मी संघर्षयात्री होऊ शकलो नाही. हायकमांडशी मी लढलो नाही.. काँग्रेस संस्कृतीवरच जणू सुशीलकुमारांनी भाष्य केलं. सुशीलकुमार राजकीय-सामाजिक जीवनात आता फारसे दिसत नाहीत. काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळातूनही त्यांना बाजूला केलं गेलंय. ‘टीम राहुल’मध्येही त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. आयुष्यभर मेहनतीनं राजकारणात यशस्वी झालेल्या या नेत्याच्या मनातून इतक्या वर्षांनंतरही मुख्यमंत्रिपद गमावल्याची सल गेलेली नाही.
– दिल्लीवाला