निमित्त होतं काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांच्या पुस्तक प्रकाशनाचं. सिबल यांचे मित्र पी. चिदंबरम कार्यक्रमाला होतेच, शिवाय मनमोहन सिंग, शरद यादव, सीताराम येचुरी, चंदन मित्रा अशी अनेक राजकीय मंडळीही होती. चर्चा सुरू होती गेल्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीची. यात सिबल आणि चिदंबरम या दोघा काँग्रेसींनी हिरिरीने भाग घेतला. काँग्रेसने मार का खाल्ला यावर त्यांची कारणमीमांसा सुरू होती. तेवढय़ात शरद यादव म्हणाले, तुम्ही काँग्रेसवाले हरणारच होता. पण थेट धोबीपछाड?.. ही कमालच झाली!.. शरद यादव हे मोदींसारखे छाती ताणून बोलत नाहीत. संसदेतही शरद यादव यांची भाषणं खुसखुशीत असतात. बारीक बारीक विनोद करत ते भाषणात रंगत आणतात. या कार्यक्रमातही त्यांच्या मिस्किलपणाची अशी झलक पाहायला मिळाली. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी स्वत:च्याच पक्षावर केलेली टिप्पणी मात्र खूप काही सांगून गेली. भाजपला रामराम करून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले चंदन मित्रा यांचं म्हणणं होतं की, समजा विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक जिंकली तर प्रादेशिक पक्षातील नेत्याने पंतप्रधान व्हायला हवे. त्यावर येचुरी यांचं मित्रा यांना सांगणं होतं की, आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका! काँग्रेसच्या पाठिंब्यावर आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आली होती तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कडव्या काँग्रेसविरोधामुळे पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना देशाचा पंतप्रधान होण्याची संधी नाकारली गेली. ही कम्युनिस्टांची घोडचूकच होती. प्रकाश कारात यांचा कडवेपणा कायम असला तरी येचुरी मात्र समन्वयाची भूमिका घेत असतात. म्हणूनच येचुरींनी कम्युनिस्टांनी केलेल्या चुकीची कबुली दिली. याचा अर्थ आता विरोधी पक्ष आगामी लोकसभेत जिंकला तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा