इंधन दरवाढीविरोधात ‘भारत बंद’चं आवाहन काँग्रेसने केल्यामुळं ‘आप’ या आंदोलनात सहभागी होईलच असं कोणाला वाटत नव्हतं. पण ‘आप’ने ऐन वेळी बंदला साथ दिली. त्यातून काहीच साध्य झालं नाही हा भाग वेगळा. ममतांनी योग्य माघार घेतली होती. आपलंच सरकार असताना आपलंच राज्य बंद पाडायचं हे ममतांना रुचलं नाही, शिवाय काँग्रेसच्या बंदमध्ये तृणमूल काँग्रेसने कशाला दुय्यम भूमिका घेऊन जायचं हाही विचार दीदींनी केला असावा. ‘आप’च्या केजरीवाल यांनी मात्र दोन्ही दगडांवर पाय ठेवले. बंदमध्ये आप सहभागी झाला खरा पण, तो अर्धामुर्धा. ‘आप’चे एक मंत्री काँग्रेसच्या विरोधी आघाडीबरोबर रामलीला मैदानावर दिसत होते. ‘आप’च्या नेत्या अतिशी ‘जंतरमंतर’वर माकपच्या सीताराम येचुरी यांच्याबरोबर निदर्शनांत सहभागी झाल्या होत्या. अतिशी याचं पूर्ण नाव अतिशी मर्लिना. आताशा त्या स्वत:ला फक्त अतिशी म्हणातात. दिल्लीतून त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. आपलं आडनाव आड येईल असं त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला वाटतंय. मर्लिना हे ख्रिश्चनधर्मीय आडनाव वाटत असल्यानं या आडनावाची भानगडच नको म्हणून शेवटच्या नावावर त्यांनी काट मारलेली आहे. असो. मुद्दा हा की, आपच्या नेत्या, आपच्या मंत्री आंदोलनात होते पण, दिल्लीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. निदान दिल्लीत तरी भारत बंद फसला. दिल्लीतील चित्र बघून असेल कदाचित बंदचा कार्यक्रम करून आलेले काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रांजळपणे कबुलीच दिली. काँग्रेसला बंद वगैरे

करायची सवयच नाही. आम्हाला ते

करताही येत नाही पण, मोदींच्या धोरणामुळं नाइलाजाने आम्हाला आंदोलन वगैरे करावं लागतंय.. भारत बंदमधून एकमात्र सिद्ध झालं, विरोधकांना एकत्र राहण्याशिवाय गत्यंतर नाही!

चलो देखते हैं..

गेल्या आठवडय़ात भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक झाली. शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आधारित ‘चलो जीते हैं’ ही यशोगाथा कथन करणारी चित्रफीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सक्तीने पाहावी लागली. ही चित्रफीत मोदींची अधिकृत डॉक्युमेंटरी नव्हे असं भाजपची मंडळी सांगतात. पण, तरीही ती वारंवार दाखवली जाते आणि लोकांना पाहावी लागते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही सभागृहात बसून ३२ मिनिटांची यशोगाथा बघण्याशिवाय पर्याय नव्हता. वास्तविक, या पदाधिकाऱ्यांनी ही चित्रफीत अनेकदा पाहिलेली आहे. त्यांच्या राज्यांत अनेक कार्यक्रमांत ती दाखवली गेली आहे. फेसबुकवरून या चित्रफितीचे आदानप्रदान सुरू आहे. त्यांना बैठकीकडून अपेक्षा होती ती लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराबाबत दिशा मिळण्याची. प्रचाराचं वातावरण तापत असताना त्यावर अधिकाधिक चर्चा कानावर पडावी अशी कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा होती. पण त्यांच्या कानात भिनला तो ‘चलो देखते हैं’चा नारा.. आता ही चित्रफीत देशातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दाखवली जाणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जसा ‘पक्षधर्म’ पाळला तसा विद्यार्थ्यांनाही त्यांचा ‘विद्यार्थीधर्म’ नाइलाजाने का होईना पाळावा लागेल.

आणि मंत्री रागावले!

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले गेले याची माहिती देण्यासाठी बऱ्याचदा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद शास्त्री भवनात येतात. कधी कधी त्यांच्याबरोबर पीयूष गोयल असतात. या आठवडय़ात रविशंकर नव्हते. गोयल यांच्याबरोबर धर्मेद्र प्रधान आणि राधामोहन सिंह होते. रेल्वे, इथेनॉल आणि शेती अशी तीन विषयांवर मोदींनी निर्णय घेतल्यामुळे त्या खात्याचे मंत्री आलेले होते. प्रधानांनी सांगितलं की, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवेल त्याला जास्त पैसे मिळणार.. पण सध्याच्या घडीला ही निव्वळ घोषणाच ठरणार आहे. आता तरी प्रत्येक साखर कारखाना उसाच्या रसापासून साखरच बनवतो आणि मळीपासून जमल्यास इथेनॉल. नेमका हाच कळीचा प्रश्न पत्रकाराने विचारला. मंत्रिमहोदयांना त्याने एक प्रकारे आव्हानच दिलं. त्याचं म्हणणं होतं की, जी व्यवस्थाच अस्तित्वात नाही त्याची घोषणा सरकार कशाला करतंय? पण, प्रचारकांची सवय असलेल्या मंत्रिमहोदयांना हा प्रश्न फार लागला. सयुक्तिक उत्तर राहिलं बाजूला प्रधान साहेब रागावले. ‘आम्ही निर्णय घेतला म्हणजे आम्ही काही ठरवलेलं असेल की नाही?’ मग, राग आवरत ते म्हणाले, ‘तुमच्या सूचनेचा आम्ही विचार करू. आम्ही नवी योजना घेऊन येऊ’.. ही योजना येईल तेव्हाच कळेल साखरेऐवजी इथेनॉल बनलंय की नाही! या पत्रकार परिषदेत राधामोहन यांनी शेतीच्या निर्णयाबद्दल बरंच काही तरी वाचून दाखवलं. त्यांचं विवेचन पूर्ण झाल्यावर पत्रकारांना कळेना की नेमका निर्णय काय झालाय. मग बरचसं स्पष्टीकरण गोयल यांनी देऊन टाकलं.

कव्वाली कायमची थांबली!

अनेक छोटय़ा छोटय़ा घटना घडत असतात की ज्याचं महत्त्व लगेच लक्षात येत नाही, पण याच घटना खोलवर परिणाम करून जात असतात. दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये अशीच एक घडना झाली. या भागात द्रोण मंदिर आहे. तिथे गेली ९५ वर्षे श्रीकृष्ण उत्सव साजरा होत आला आहे. या महोत्सवात दर वर्षी कव्वालीची मैफल रंगते. हिंदू मंदिरात सूफी कव्वाली गायली जाते. गेली ७० र्वष लोक ही कव्वाली ऐकत आले आहेत. पण या वर्षी मात्र श्रीकृष्ण उत्सवाचा विचका झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी घनिष्ठ संबंध सांगणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या प्रांगणात कव्वाली अभद्र मानली. त्यांनी पुरता राडा केला. मुस्लीम परंपरेचे हिंदूंच्या उत्सवात काय काम?.. कव्वालीच्या तालावर अश्लील नृत्य केलं जातं असा या कार्यकर्त्यांचा ‘भन्नाट’ युक्तिवाद होता. कधी, केव्हा आणि कुठल्या कव्वालीवर अश्लील नृत्य केलं गेलंय? कव्वालीसारख्या अत्यंत लोकप्रिय संगीत प्रकाराला निव्वळ मुस्लीम परंपरेचा भाग बनवून ती नाकारण्याचा पायंडा पाडण्याकडे या संघटना निघाल्या असाव्यात. डोक्याला झाला तेवढा ताप पुरे असं म्हणत स्थानिक प्रशासनानं आणि पोलिसांनीही कव्वालीच रद्द करून टाकली. कव्वाली नाही तर उत्सवात रंग भरणार कसा? कव्वाली नको तर महोत्सवही नको असं म्हणत आयोजकांनी सगळ्यावर पडदा पाडला. धर्माधता वाढत जाते ती अशी..

– दिल्लीवाला

Story img Loader