सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीचे नाव घेतल्यावर भल्याभल्या राजकारण्यांच्या काळजात धस्स होते. चौकशीसाठी आता याला पाचारण करणार, त्याच्यावर बालंट कोसळणार, असे भाजपचे काही उत्साही नेते जाहीर करतात आणि बहुतेक वेळा तसे होतेही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ईडीच्या नव्या धमकीमुळे सारेच अचंबित झाले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होऊ लागली आहे. निवडणूक म्हटले की मतदारांना आकर्षित करण्याचे ‘नामी प्रयोग’ केले जातात. त्यात ‘ लक्ष्मीदर्शन ’ हा प्रामुख्याने नजरेत भरणारा प्रकार. या निवडणुकीत डिजिटल पेमेंट द्वारा ‘ लक्ष्मीदर्शन ’ होईल असे भाजपला वाटत आहे. त्यातूनच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ पैसे कोणी वाटले, त्याने ते कुठून आणले याची तर चौकशी होईलच, पण पैसे घेणाऱ्या मतदारांचीही ईडीकडून चौकशी होईल; तेव्हा सावध राहा, असा सावधानतेचा इशारा जाहीरपणे दिला आहे. थोडक्यात काय भाजपच्या मनासारखा निकाल लागला नाही तर निवडणुकीनंतर सक्तवसुली संचालनालयाला सामान्य नागरिकांचीही चौकशी करणार तर. चंद्रकांतदादांच्या या धमकीचा मतदारांवर उलट परिणाम तर होणार नाही ना, ही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटणारी भीतीही रास्तच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा