केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची गेल्या आठवडय़ात सांगलीमध्ये गाडगीळ सराफी पेढीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेला किस्सा अनेकांच्या डोळय़ांत अंजन घालणारा ठरला. मंत्री झाल्यानंतर अनेक जण ओळख काढीत जवळ येतात, कामासाठी आले तर त्यात वावगे वाटायचे काहीच कारण नाही. मात्र, मंत्र्याला अडचणीत आणणारे तिघे जण असतात हे त्यांनी आवर्जून सांगितले. यामध्ये पहिला क्रमांक अर्धागिनीचा म्हणजेच बायकोचा, दुसरा बायकोचा भाऊ म्हणजेच मेव्हणा आणि तिसरा क्रमांक पीए म्हणजेच स्वीय साहाय्यकाचा. या तिघांमुळे मंत्री अडचणीत येतात. हा किस्सा सांगलीत चांगलाच लागू पडत असल्याने उपस्थित नेतेमंडळींच्या भुवया उंचावल्या. एका ज्येष्ठ नेत्याच्या मेव्हण्याला पहिल्यांदा जिल्हा नियोजन मंडळावर संधी मिळाली. कार्यकर्त्यांनी समजून घेतले. जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक निवडीची वेळ आली तेव्हा पुन्हा मेव्हण्याची वर्णी लागली. तर एका नेत्याच्या स्वीय सहायकांचे निवासस्थान म्हणजे कोटय़वधीचा आलिशान राजवाडाच आहे. त्यांचे उत्पन्न किती, कोटय़वधी खर्चाचा आलिशान बंगला कसा उभारला, असे प्रश्न भाबडय़ा मनाला पडायलाच नकोत. सत्तेच्या पंगतीला पहिला मान पाव्हण्या-मेव्हण्यांचाच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा