नांदेड, लातूर आणि धाराशिव मतदारसंघांत ‘फुटणार हो काँग्रेस फुटणार’ अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांनी अशोकराव चव्हाण कधीही भाजपमध्ये येतील, असे विधान माध्यमांपर्यंत पोहोचविले. मात्र साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत चव्हाण यांनी या चर्चेचे खंडन केले. आता लातूरमध्येही ही चर्चा सुरू आहे. नांदेड आणि लातूर मराठवाडय़ातील काँग्रेसचे मजबूत गड. पण हे गड आता भाजपकडे झुकले असल्याची चर्चा सुरू आहे. धाराशिवमधील लिंगायत मतदारांच्या पट्टयात प्रभाव असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचीही चर्चा सुरू झाली आहे. तारीख वारासह छातीठोकपणे बघा हो, निवडणुकीपूर्वी काँग्रेस फुटणार या चर्चेला पेव फुटले आहे.
पवारांची ‘ती’ परंपरा कायम?
राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील अशा विविध नेत्यांमध्ये शीतयुद्ध असायचे. अजितदादा स्वपक्षीय नेत्याबद्दल कधी काय बोलतील याचा नेम नसायचा. पक्षात फूट पडली. पक्षाची दोन शकले झाली. शरद पवार गटात रोहित पवार यांचे प्रस्थ वाढले. नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी युवा संघर्ष यात्रा काढून आपले नेतृत्व अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. पक्षातील ‘छोटय़ा पवारां’चे वाढते प्रस्थ पक्षातील नेत्यांना खुपू लागले होतेच. गेल्या आठवडय़ात शरद पवारांच्या उपस्थितीत शिर्डीत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनाला पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे रोहित पवार उपस्थित नव्हते. पण प्रभू रामावरून जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी ‘एक्स’ वरून (ट्वीट) नापसंती व्यक्त केली. त्यावर रोहित पवार अजून लहान आहेत. मी त्यांना फार महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर आव्हाडांनी दिले. अजित पवार असो वा रोहित पवार, स्वपक्षीयांचा पाणउतारा करण्याची नेतृत्वाच्या जवळच्यांची सवय काही गेलेली नाही, हेच या वादातून अधोरेखित झाले.
कुऱ्हाडीचा दांडा..
सांगली जिल्ह्यातील भाजपच्या एका मातब्बर नेत्याची गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सावली बनून राहिलेल्या साहाय्यकाने सोमवारी आपले स्वतंत्र कार्यालय मिरजेत सुरू केले. आजपर्यंत नेत्याने राजकीय डावपेच कसे रचले, विधानसभेसाठी सलग तीन वेळा विजय कसा संपादन केला याची आखणी कशी केली याची माहिती या मदतनीसाच्या संग्रही आहे. या कर्तबगारीमुळे भाजपनेही पक्षात मानाचे स्थान देत, एका मतदारसंघाचे प्रमुखपदही बहाल केले. यामुळे नवीन कार्यालय म्हणजे येणाऱ्या काळात नेत्याला ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ न ठरले’ तर आश्चर्य वाटायला नको.
समन्वयाचे आव्हान
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांचा एकत्रित मेळावा १४ जानेवारीला राज्यभर आयोजित करण्याचा घाट घातला जात आहे. महायुतीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात समन्वयासाठी भाजपकडून खासदार डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजितदादा गट) आमदार संग्राम जगताप यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतील शिंदे गटाकडून अद्याप समन्वयकाची नियुक्ती झालेली नाही. समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यापूर्वीच खासदार विखे व आमदार जगताप यांच्यामधील ‘समन्वया’ची जिल्ह्यात चर्चा होत आहे. त्यांच्या या एकत्रित कार्यक्रमांनी मात्र भाजपमधील निष्ठावंतांचा गट अस्वस्थ आहे. भाजपमधील निष्ठावान आणि आमदार जगताप एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. आता पक्षाने समन्वयकांची जबाबदारी खासदार विखे व आमदार जगताप यांच्याकडेच सोपवल्याने निष्ठावंतांची अधिक कोंडी झाली आहे.
गेले केळकर कुणीकडे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. या मतदारसंघाचे खासदार राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांसारख्या खासदारांनी भूषविलेला हा मतदारसंघ पुढे शिवसेनेच्या ताब्यात गेला याची सल भाजप नेत्यांच्या मनात अजूनही कायम आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या ताब्यात घेण्याची हीच उत्तम संधी असल्याचे भाजप नेत्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे ठाण्याच्या खासदारांकडून तुमच्या अपेक्षा काय, असा प्रश्न पुढे करत भाजपने थेट लोकांच्या मनातील जाहीरनामा तयार करण्यास घेतला आहे. ही संकल्पना मांडण्यासाठी डॉ. विनय सहस्रबुद्धे, संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, संदीप लेले, माजी आमदार नरेंद्र मेहता हे नेते गेल्या आठवडय़ात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. ही सगळी धामधूम सुरू असताना भाजपचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर मात्र कुठेही उपस्थित नव्हते.
(संकलन : सुहास सरदेशमुख, संतोष प्रधान, दिगंबर शिंदे, जयेश सामंत, मोहनीराज लहाडे)