सुलभा आरोसकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅराप्लेजिक फाऊंडेशन, कर्णबधिरांसाठी शाळा, डेफ युथ फाऊंडेशन, बाहेरील रुग्णांसाठी अतिथिगृह, बालविकास क्लिनिक, निवारा केंद्र, श्रमसाफल्य असे प्रकल्प सुरू करून कमरेपासून लुळ्या असणाऱ्या पॅराप्लेजिक रुग्णांचं आणि अपंग मुलांचं जीवन फुलवणाऱ्या सुलभाताई, वयाच्या ८५ वर्षीही ‘व्हील होम’ उभारण्याचं स्वप्न बघत आहेत. गेल्या ५० वर्षांत २५०० पेक्षा जास्त गरीब पॅराप्लेजिक रुग्णांना स्वावलंबी करून त्यांच्यात आत्मसन्मान जागवणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, सुलभा वर्दे.

सायनचं ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’ (१९६८) आणि ऐरोली येथील ‘संजीवन दीप’ (१९९६) ही मतिमंद आणि मूकबधिर मुलांची शाळा स्थापन करणाऱ्या सुलभाताई वर्दे. वय वर्ष ८५. आजही आजी-माजी पॅराप्लेजिकांसाठी आणि शाळेतील मुलांसाठी सतत कार्यरत आहेत. गेली ५० वर्ष कमरेपासून लुळ्या असलेल्या अनेकांच्या वेदनेवर त्यांनी फुंकर घातली आहे, नव्हे त्यांचं आयुष्य फुलवलं आहे. त्यांना स्वावलंबी आयुष्य देऊन आत्मसन्मान जागवला आहे.

महाविद्यालयीन काळापासूनच सुलभाताईंना वाटे की, ‘माणूस हा प्रथम माणूस आहे. त्याला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहेच. मग तो कसाही असो.’ याच प्रेरणेने आणि ध्यासाने त्यांनी ‘सोशल वर्कर’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ‘मेडिकल सोशल वर्कर’ म्हणून सायन रुग्णालयात १९६२ मध्ये त्या रुजू झाल्या आणि सुरू झाला एक प्रवास दु:खितांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा! १९९० पर्यंत सायन रुग्णालय ही त्यांची कर्मभूमी झाली. या काळात अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी पॅराप्लेजिक फाऊंडेशन, कर्णबधिरांसाठी शाळा, डेफ युथ फाऊंडेशन, बाहेरील रुग्णांसाठी अतिथिगृह, बालविकास क्लिनिक, असे प्रकल्प सुरू केले. मात्र त्याचं सर्वात मोठं काम म्हणजे पॅराप्लेजिक रुग्णांचं पुनर्वसन!

पॅराप्लेजिक म्हणजे मणक्याला जबरदस्त मार बसल्याने संवेदना वाहून नेणारे मज्जारज्जू तुटतात आणि त्याखालील शरीराचा भाग लुळा पडतो. हालचाल बंद होते, संवेदना शून्य होते, लघवी-संडासला झालेलं कळतही नाहीत. काही चावलं, भाजलं, समजत नाही, त्यामुळे जखमा होतात, संसर्ग होतो. आणि एक न संपणारं परावलंबी जीवन सुरू होतं. व्हीलचेअर नशिबी येते. अशा परिस्थितीत सर्वात जास्त हाल होतात ते गरिबांचे. घरे लहान, रस्ते खराब, व्हीलचेअर वापरणार तरी कशी? आणि कोठे. आणि ती आणण्यासाठी पैसे कुठून आणणार? अशा वेळी त्यांची अवस्था फारच हालाची होत असे. सुलभाताई हे पाहून अस्वस्थ होत. त्यांनी ठरवलं, यांच्यासाठी ‘निवारा केंद्र’ उभारायचं. त्यांच्यात जगण्याची उमेद, जिद्द, आत्मविश्वास निर्माण करायचा. आणि त्यातूनच १९६८ मध्ये म्हणजेच ५० वर्षांपूर्वी साकारलं ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’. के.ई.एम., नायर रुग्णालयाच्या,

ओ टी/ पी टी/ नर्सेस, डॉक्टर्स यांना त्यांनी फाऊंडेशनचे सदस्य करून घेतलं आणि रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात या कामाची सुरुवात केली. १९९१ मध्ये डॉ. एस. व्ही. नाडकर्णीनी या कामासाठी पूर्ण बराक दिल्याने त्यांचा उत्साह आणि कामाची गती वाढली. मात्र जागा हातात येऊन उपयोग नव्हता. गरीब रुग्णांसाठी तेही पूर्णत: अपंग असणाऱ्या रुग्णांसाठी सोयी करणं गरजेचं होतं. त्यासाठी पैसा आवश्यक होता. देणगीरूपाने त्यांनी दोन महिन्यांत १४ लाख रुपये जमवले आणि बराक सुसज्ज केली.

बराकीच्या अर्ध्या भागात ‘स्वीकार’ प्रकल्प, पुरुष-महिला विभाग, ऑफिस उभे राहिले आणि उर्वरित भागात ‘श्रमसाफल्य’ हा अपंगांना स्वावलंबी करणारा प्रकल्प सुरू केला. व्हीलचेअरवर बसून हे अपंग अनेक शोभेच्या वस्तूंबरोबर सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे डायपर्स तयार करतात. या सर्वाना त्यांनी जवळच घरं मिळवून दिली. त्यांच्या बायकांना संस्थेत काम दिलं. ३५-३६ जणांना महापालिकांच्या रुग्णालयामधून स्टॉल्स दिले. तसेच त्यांच्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम, सहली, त्यांनी बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शने, स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रम सुरू करून त्यांच्या आयुष्यात आनंद भरण्याचं कामही सुलभाताई मोठय़ा सजगतेने करत आहेत. त्यांच्या या कामात त्यांच्या सहकाऱ्यांची मिळणारी मदत ही त्यांच्यासाठी मोलाची ठरते आहे. सुलभाताईंच्या मते ‘‘या सगळ्यांची कामगिरी, सकारात्मक वृत्ती, स्वत:तील त्रुटींना भिडण्याची ताकद त्यांना नेहमीच अचंबित करते.’’ गेल्या ५० वर्षांत २५०० पेक्षा जास्त गरीब पॅराप्लेजिक रुग्णांचं जीवन त्यांनी फुलवलंय. काहींची लग्नं लावून संसार थाटून दिलाय. त्यांना मूल होण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक अडचणीत त्या ठामपणे उभ्या असतात. त्यामुळेच ते सर्व जण त्यांना आईच म्हणतात.

‘पॅराप्लेजिक’ संस्था स्थिरावल्यावर त्यांनी अपंग मुलांसाठी कार्य करायचं ठरवलं. इच्छा तेथे मार्ग असतोच. १९९० मध्ये ऐरोली- नवी मुंबई येथे सिडकोने एक एकर जागा त्यांना त्यासाठी दिली. अथक प्रयत्नांनी आणि अनेकांच्या मदतीने १९९६ च्या दसऱ्याला त्यांनी तेथे ‘संजीवन दीप’ शाळा सुरू केली. तेथे आज, मूकबधिर, अपंग, मतिमंद, ऑटिस्टिक अशी ९७ मुलं शिकताहेत. त्यांचा आग्रह जीवन शिक्षणावर आहे. दहावीचा निकाल १०० टक्के लागतो. त्यांना व्यावसायिक शिक्षणही तिथं मिळतं. शाळा बहरतेय, पण सुलभाताईं इथंच थांबणाऱ्या नाहीत. त्यांना तेथे ‘व्हील होम’ सुरू करायचंय. थकलेल्या, वयोवृद्ध पॅराप्लेजिकांना सन्मानाने जगता यावं म्हणून जागा बांधून तयार आहे. फक्त आर्थिक चणचण दूर व्हायला हवी, ज्यामुळे त्यांच्यासाठी योग्य त्या सोयी करणं शक्य होईल. या कामाबरोबरच ‘सोशल वर्कर’च्या कामांची व्याप्ती सांगणारं ‘लोकमान्य सेवाव्रती’ आणि ‘ध्यास-प्रवास’ अशी त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

सुलभाताईंच्या ५५ वर्षांच्या या वाटचालीत सासर-माहेर, पती मधुकर वर्दे यांची मोलाची साथ मिळाली. १९६५ मध्ये त्यांना सीआयएफतर्फे अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली तेव्हा पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले होते. २००५ मध्ये पतीनिधनानंतर मुलगी जयाली आणि जावई केतन वैद्यांची मदत आहेच. त्यामुळेच प्रवासातली अनेक वादळं त्यांनी संतवृत्तीने पेलली, त्या म्हणतात, ‘‘माझा श्वास असलेल्या गरीब पण कणखर जिवांना परमानंद देणारे अनेक भोई मिळोत, हीच माझी ईश्वराला आर्त विनवणी.’ त्यांची ही इच्छा पूर्ण होवो, ही सदिच्छा!

पॅराप्लेजिक फाऊंडेशन

टी १ ओल्ड बॅरॅक ऑफ

सायन हॉस्पिटल, सायन,

मुंबई- ४०००२२.

संपर्क- ९८२०२५५४००, ९८३३१९०५२४.

paraplegicfoundation@yahoo.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta durga 2018 sulabha varde paraplegic foundation