हिंगोली येथील या शिक्षिका, स्वत: दोन्ही पायांनी अधू, मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मागे त्या खणखणीतपणे उभ्या राहिल्या आहेत.सुरुवातीला आत्महत्येविरोधात प्रचार सुरू केला, पण नंतर मात्र पगारातले पैसे आणि शेती उत्पन्नाच्या आधारे त्यांनी या मुलांना सर्वार्थाने मायेचे छत्र द्यायचे ठरवले. ‘सेवासदन’ वसतिगृह स्थापन करून आज त्या या मुलांच्या मीराई झाल्या आहेत. अनाथांच्या नाथ झालेल्या मीरा कदम आहेत यंदाच्या दुर्गा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या व्यवसायाने शिक्षिका. पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी, चालताना कायमच कशाना कशाचा आधार घ्यावा लागतोच, पण वृत्ती मात्र आधार देण्याची. त्याच देण्यातून मीरा कदम यांनी हिंगोली येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे ‘सेवासदन’ वसतिगृह स्थापन केले आहे. या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये आणि त्यांनी शिकून आपल्या पायावर उभे राहावे यासाठी त्यांनी अंबामातेचे वर्णन असलेलं ‘अनाथांची नाथ’ होण्याचे व्रत हाती घेतले आहे.

एखाद्या मुलाच्या शिक्षणाचे शुल्क भरायचे असो, की एखाद्याला उच्च शिक्षणातील पुस्तके घ्यायची असतील, मीरा कदम पुढाकार घेतात. त्या हे सारे कधी स्वत:च्या पगारातील पैसे देऊन तर कधी शेतीच्या उत्पन्नातून सारा खर्च करतात. 

हिंगोली शहरातील ‘आदर्श महाविद्यालया’जवळ असणाऱ्या ‘सेवासदन’मधून आता काही मुले ‘नीट’ परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. काही अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. काही स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलेली आहेत. या मुलांच्या वडिलांनी शेतीतल्या समस्येतून आत्महत्या केली तर कोणी आजारपणाला कंटाळून आयुष्याचा शेवट केला. अशा सगळया मुलांच्या शिक्षणातल्या अडचणी मीरा सोडवतात. पूरक गोष्ट म्हणजे त्यांचे पती धनराज हेही त्यांना तेवढीच मोलाची मदत करतात. पण या सर्वांची सुरूवात झाली १९ वर्षांपूर्वी. 

हेही वाचा >>> शिक्षणात पुढे जाताना…

२००५ च्या सुमारास मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढू लागली होती. याच काळात मीरा कदम यांचे वडीलही वारले. वडील गेल्याने निर्माण होणारी पोकळी त्यांना जाणवत होती. पती, मुले असताना वडिलांची एवढी पोकळी आपल्याला जाणवते तर आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील लहान मुलांना किती त्रास होत असेल याचा त्या विचार करू लागल्या. या प्रश्नावर काही तरी काम करायला हवे असे आतून जाणवायला लागले. मग शेती प्रश्न आणि आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांनी ते दु:ख स्वत: अनुभवले. शिक्षिका असल्याने बोलण्याची सवय होतीच. समजून सांगण्याची हातोटी होती. त्यामुळे आत्महत्या करू नका, असा संदेश देण्याचे मीरा यांनी ठरवले. गावोगावी जाऊन मंदिरातील ध्वनिवर्धकावरून त्या आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील इतरांची कशी परवड होते, तेव्हा आत्महत्या करू नका, हे सांगू लागल्या. तेव्हा गावात जमणारे लोक म्हणायचे, ‘थोडं आधी आला असता तर आत्महत्या रोखली गेली असती.’ अनेक वर्ष अशा पद्धतीने लोकजागृती करूनही त्याचा पुरेसा उपयोग होत नाही हे मीरा यांच्या लक्षात आले. शेवटी पती आणि आपल्या मुलांना त्यांनी विश्वासात घेतले. काही सहकाऱ्यांना सांगितले आणि ठरवले की, सुरुवातीला २५ गरजू विद्यार्थ्यांची मदत करायची. त्यावेळी कोणाला शैक्षिणक साहित्य दिले. कोणाला शुल्क भरायला मदत केली. एव्हाना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या मीरा यांच्याकडे गावागावांतील लोक समस्याग्रस्त मुले व त्यांच्या अडचणी घेऊन येऊ लागले. त्यांनी त्या अडचणी सोडवणे सुरू केले. पण तरीही या मुलांना पुरेसा आधार मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आले. आणि अखेर २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये या मुलांसाठी निवासी व्यवस्था करावी लागेल याबाबत विचारविनिमय सुरू झाला. त्या विचाराला मूर्त रूप आले आणि त्यांनी  २०१९ मध्ये िहगोली येथे शहरातील १४ खोल्यांचे एक घर दर महिना २५ हजार रुपये भाडयाने घेतले. आता त्याचे भाडे २७ हजार रुपये आहे. तेथे आता ७० मुले राहातात.

मीरा कदम मूळ लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील रहिवासी. सासर- माहेर एकाच गावातील. येथे त्यांची साडेतीन एकर बागायती शेती आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न, तसेच शिक्षिका म्हणून मिळणारा पगार असे सारे काही त्या ‘सेवासदन’च्या कामात लावतात, आता त्यांच्या कामाची गरज समाजानेही ओळखली आहे. दानशूरांच्या देणग्या काही प्रमाणात मिळू लागल्या आहेत. मीरा गावोगावी जाऊन व्याख्यानेही देतात. त्यातून मिळणारे मानधनही याच कामात त्या खर्ची घालतात. अन्नधान्याची मदत समाजातील विविध घटकांतून होत असल्याने मुलांची वेळ भागते, असे त्या सांगतात.

करोनाच्या काळात मात्र कसोटीचे प्रसंग आले. बाहेरची व्याख्याने बंद झाली. त्यातून मिळणारे मानधनही थांबले. तेव्हा वसतिगृहात ५० मुले होती. जवळचे नातेवाईक कोणालाही घरात घ्यायला तयार नव्हते या मुलांना कसे सांभाळायचे असा प्रश्न आला. मग मीरा कदम यांनी सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याचे हप्ते त्या अजूनही फेडताहेत. पण असे कसोटीचे प्रसंग महाविद्यालयाच्या प्रवेश कालावधीमध्ये अधिक असतात. काही मुलांचे प्रवेश शुल्क न भरल्याने रखडतात. काही वेळा संस्था- चालकांशी संवाद साधून शुल्क माफ होते किंवा कमी होते. पण तोपर्यंत शुल्क भरण्यासाठी अनेकांना विनंती करावी लागते. दरवेळी वेळेवर मदत मिळतेच असे नाही. तेव्हा हिरमोड होतो. पण एखादी संस्था, एखादी व्यक्ती मदतीसाठी हात पुढे करते आणि वेळ निभावून नेली जाते. एके वर्षी जळगावमध्ये एक निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किरणला प्रवेश मिळाला मात्र शुल्क ११ लाख रुपयांहून अधिक होते. पहिल्या वर्षी ही रक्कम जमवण्यासाठी अनेकांना विनंती केली. अखेर संस्थाचालकांना  मुलाची पार्श्वभूमी कळली आणि संस्थेने शुल्क माफ केले. अशी मदत नेहमीच उपकारक ठरते.

 या मुलांना आत्ताच आधार दिला नाही तर ते फक्त अंगमेहनतीचे हमाली काम करत राहतील किंवा कोणाच्या शेतात मजूर म्हणून राबवतील. पुढची पिढी वाचविण्यासाठी आपल्याला शक्य आहे तेवढे काम करायचे, असे मीरा यांनी ठरवले आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे अनेक मुलांना आयुष्य घडवता येणे शक्य होऊ लागले आहे. ज्यांच्या घरातील घरकर्ता जातो त्या घरातून आता एक तरी मुलगा शिकून पुढे जावा, या इच्छेसाठी मीरा कदम मनापासून आणि जिद्दीने काम करीत आहे.

खरे तर पोलिओमुळे आधार घ्यावा असे अधूपण आलेले असतानाही त्यावर मात करत दुसऱ्यांना संवेदनशील मनाने आधार देणाऱ्या मीरा कदम खऱ्या अर्थाने दुर्गाच. सहअनुभूतीच्या आधारे सकारात्मक कृती करणाऱ्यांमध्ये करुणा ही भावना निर्माण होते. त्याचा विस्तार हेच ध्येय असणारी मंडळी अवतीभोवती आहेत म्हणूनच वसतिगृहातील मुले मीरा यांना मीराई म्हणतात. ‘अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी’ अशी देवीच्या आरतीतील ओळ सार्थ करणाऱ्या मीरा कदम यांना ‘लोकसत्ता’चा सलाम! 

suhas.sardeshmukh@expressindia.com

संस्थेचे नाव – साथ फाउंडेशन तांदुळजा द्वारा संचालित सेवासदन मुलांचे वसतिगृह

 पत्ता –  आदर्श कॉलेजच्या पाठीमागे, जिजामाता नगर िहगोली

 संपर्क क्रमांक — ७०३८००२४५८, ७७७४८२०६६४

  ईमेल :     meerakadam16@gmail.com