भक्ती बिसुरे bhakti.bisure@indianexpress.com
जन्मजात व्यंग असलेल्या शिशूंना योग्य आणि तत्काळ शस्त्रक्रियेची गरज असते. पुण्यातील ससून रुग्णालतील बालशल्यविशारद डॉ. मीनाक्षी यांनी साडेतीन हजार बालरुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून अनेक मुलांना जीवदान दिले आहे. याशिवाय गेल्या आठ वर्षांपासून लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना शारीरिक आणि मानसिक वेदनेतून बाहेर काढण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. लैंगिक अत्याचाराविरुद्ध मोहीम उघडणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, बालशल्यविशारद डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले.
नवजात बाळाचा जन्म ही संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारी घटना असते. पण त्या बाळामध्ये एखादं लहानसं जरी व्यंग आढळलं तरी ते कुटुंब हवालदिल होतं. अशावेळी त्या बाळाला शस्त्रक्रियेद्वारे नवजीवन देण्याची किमया करतात बालशल्यविशारद डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले. हे त्यांचं काम महत्त्वाचं आहेच, पण त्याही पेक्षा त्यांचं मोलाचं काम आहे ते लैंगिक अत्याचारग्रस्त मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या शारीरिक वेदनांचा अंत करणं. गेल्या आठ वर्षांत त्यांनी अशा
५० लैंगिक अत्याचारग्रस्त मुलांवर शस्त्रक्रिया केल्या असून दीड वर्षांची मुलगी ही त्यांची सर्वाधिक लहान रुग्ण ठरली आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या माध्यमांतून लैंगिक अत्याचारांविरुद्ध लढा उभारणं हे त्यांनी त्यांच्या जीवनाचं ध्येय ठरवलं आहे.
मूळच्या लातूरच्या असलेल्या डॉ. मीनाक्षी विद्यार्थिदशेपासूनच कुशाग्र आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्या संपूर्ण राज्यात पहिल्या आल्या होत्या. सध्या त्या पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात बालशल्यविशारद आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात. ससून रुग्णालयातल्या तेरा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जन्मजात व्यंग असलेल्या एक दिवसाच्या बाळापासून पंधरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांवर साडेतीन हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. मीनाक्षी या शस्त्रक्रियांमध्ये कुशल शल्यविशारद म्हणून ओळखल्या जात असून अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया करून त्यांनी नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी योगदान दिले आहे. मात्र अधिक आव्हानात्मक ठरतात त्या लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांवरच्या शस्त्रक्रिया. जननेंद्रियांवरील जखमा या मुलांच्या शरीरावरील वेदनांचा उच्चाक असतो. एकच उदाहरण द्यायचं तर त्यांच्याकडे आलेल्या चार वर्षांच्या मुलीचे देता येईल. जेव्हा तिला रुग्णालयात आणले तेव्हा तिचे जननेंद्रिय पूर्ण फाटलेले होते शिवाय पोटातही रक्तस्राव झाला होता. त्यामुळे जननेंद्रियाला टाके घालून शिवण्याबरोबरच रक्तस्राव थांबवण्यासाठी पोटावर वेगळी शस्त्रक्रिया करावी लागली होती. मुळातच ही मुले अकस्मात झालेल्या या आघाताने मानसिकदृष्टय़ा कोसळलेली असतात. त्यात त्यांच्यावर असे शारीरिक आघात म्हणजे त्या मुलांची कसोटीच असते. त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा शांत करणं डॉक्टर म्हणून डॉ. मीनाक्षी कुशलतेने करतात. शिवाय या अत्याचारग्रस्त मुलांना घेऊन आलेले त्यांचे पालक मुळात हादरून गेलेले असतात. आपल्या मुलांच्या बाबतीत असं काही घडलंय हे पचवणं त्यांच्यासाठी कठीण असतं त्यामुळे त्यांना शांत करणं खूप गरजेचं असतं. डॉ. मीनाक्षी यांच्या मते, घटना घडल्यानंतर पालकांना शांतवणे हे खूप नंतर येतं, पण मुळात या पालकांना लैंगिक अत्याचाराविषयी सजग करणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त आमच्या ससून रुग्णालयात दर महिन्याला लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या किमान १० ते १५ केसेस येतात. पालकांनी, शिक्षकांनी, आजूबाजूच्या लोकांनी थोडी जरी सजगता दाखवली असती तर त्यातली ८० ते ९० टक्के प्रकरणे टाळता येऊ शकली असती. शिवाय अशी घटना घडली तर २४ ते ४८ तासांच्या आत त्यांना रुग्णालयात दाखल केले तर त्यांच्यावरील जखमा लवकरात लवकर भरून येण्यास मदत होते. शिवाय केस न्यायालयात दाखल झाली तर योग्य पुरावे हाती लागतात. ज्यांचा उपयोग त्या मुलांना न्याय मिळण्यासाठी होऊ शकतो. म्हणूनच डॉ. मीनाक्षी बाललैंगिक अत्याचार विषयावर ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत पालक शिक्षकांसाठी व्याख्याने घेतात. लैंगिक शिक्षण असावं की नसावं, असेल तर ते कसं, कुणासाठी, कुठल्या स्वरूपात असावं याबाबतही डॉ. मीनाक्षी मार्गदर्शन करतात.
लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांच्या उपचारांसाठी तज्ज्ञ भारतीय डॉक्टरांच्या पथकामध्ये त्यांची झालेली निवड त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची पोचपावतीच आहे. लैंगिक अत्याचार रोखायचे कसे हा स्वाभाविक प्रश्न डॉ. मीनाक्षी यांच्याशी बोलताना आपल्याला पडतो. प्रत्येकाने प्रत्येक लहान मुलाचं पालकत्व घ्यावं, हा त्यावर त्यांनी सुचवलेला उपाय.. ते मूल आपलं स्वतचं मूल असलंच पाहिजे, असा अट्टहास का, आजकाल मुलीच नाही तर मुलगेही अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडतात. म्हणूनच याबाबत तळमळ वाटणं महत्त्वाचं आहे. त्या तळमळीतून आलेली सजगता आणि जागरूकता अत्याचारांना थांबवण्यासाठी पुरेशी ठरते, असं त्या सांगतात. आपण स्वीकारलेल्या अशा पालकत्वामुळे एक लहान मूल जरी अत्याचारापासून वाचलं तरी त्यातून मिळणारं समाधान लाखमोलाचं असतं, हे त्या आवर्जून नोंदवतात. लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर काम करताना, उपचार करताना बालरोगतज्ज्ञ, स्त्री-रोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक या सगळ्यांचं एकत्र काम करणं उपयुक्त ठरतं, त्यामुळे माझं काम माझं एकटीचं नाही, महत्त्व आहे ते टीम वर्कचं हे नमूद करायलाही त्या विसरत नाहीत.
डॉ. मीनाक्षी यांच्या कामाचा आवाका पाहिला की साहजिकच प्रश्न पडतो, अनेक आर्थिक लाभ खासगी वैद्यकीय सेवेत गेल्यास मिळण्याची खात्री असून देखील शासकीय रुग्णालयात सेवा का? त्या सांगतात, ‘‘व्यक्ती म्हणून आपल्या जडणघडणीत संपूर्ण समाजाचाच वाटा मोठा असतो. आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग तळागाळातल्या लोकांपर्यंत व्हावा असं वाटत असेल तर शासकीय रुग्णालय हा उत्तम पर्याय आहे असं वाटल्यामुळे इथेच कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला.’’ डॉ. मीनाक्षी यांचं योगदान हे केवळ कार्यरत राहण्यापुरतं मर्यादित नाही. ससून रुग्णालयात बालरुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, त्यासाठी अति दक्षता विभाग असावा, लहान मुलांना शल्यपूर्व आणि शल्यपश्चात उत्तम उपचार मिळावेत यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
लहान मुलांचं जग आनंद, चैतन्य आणि उत्साहाचं असावं असं सगळ्यांनाच वाटतं.. मात्र या लहान मुलांच्या जगात बरीच असुरक्षितताही पावलोपावली आढळते. तिचा बीमोड करण्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकानंच डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले या आधुनिक दुर्गेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायची अत्यंत गरज आहे.
minakshi_dr@rediffmail.com
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स
पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि.,
राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक,
इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)
टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा