रेश्मा भुजबळ
कौटुंबिक संघर्षांतून सुरू झालेला रुबिना यांचा संघर्ष व्यक्तिगत न राहता समाजातील स्त्रियांना सबळ करण्यापर्यंत विस्तारत गेला आहे. अत्यंत प्रतिकूल अवस्थेत शिक्षण पूर्ण करणाऱ्या रुबिना यांनी शिक्षणाची दारे अनेक स्त्रियांसाठी उघडी करून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलंच, शिवाय आपल्यावरील अत्याचाराविरुद्ध लढण्याचं मनोबलही मिळवून दिलं. स्त्री स्वावलंबनासाठी ‘रुबी सोशल वेल्फेअर सोसायटी’, ‘मुस्लीम महिला मंच’, ‘रुबी ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट’, ‘शेल्टर होम’ आदी संस्था उभ्या करणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत – रुबिना पटेल.
स्वत:च्या कौटुंबिक संघर्षांतून समाजातल्या अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी लढण्याची प्रेरणा रुबिना पटेल यांना मिळाली. अत्याचारावर मात तर करायची, पण त्यातून बाहेर पडून स्वावलंबी व्हायला हवं तरच या समाजात निभाव लागणं शक्य आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी स्त्रियांसाठी ‘रुबी सोशल वेल्फेअर सोसायटी’, ‘मुस्लीम महिला मंच’, ‘रुबी ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट’ आणि इतर अनेक प्रकल्प सुरू केले आणि त्यातून बालविवाह, महिला शिक्षण, सक्षमीकरण, त्यांना कायदेविषयक सल्ला, समुपदेशन, कायदेविषयक मदत आणि एक उत्तम नागरिक बनवण्याची धडपड सुरू झाली. रुबिना हनिफ पटेल यांचे सामाजिक कार्य आता नागपूर आणि परिसरात चांगलेच विस्तारले असून हजारो स्त्रिया स्वत:वरील शारीरिक, मानसिक अत्याचारांच्या विरोधात लढू लागल्या आहेत, नव्हे त्याविरुद्ध न्याय मिळवू लागल्या आहेत. आत्मसन्मानाचं जगणं जगू लागल्या आहेत. रुबिना यांनी मुलींना त्यांच्या कौशल्याच्या आणि गुणांच्या आधारे लग्नाव्यतिरिक्त नवीन स्वप्न बाळगण्याची प्रेरणा दिली आहे.
रुबिना यांचा विवाह त्या बारावीत असतानाच झाला. तो विवाह ना त्या रोखू शकल्या ना त्यांची आई किंवा भाऊ. शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या आणि हुशार असणाऱ्या रुबिना यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या शिक्षक असलेल्या पतीला खूप विनवण्या कराव्या लागल्या. लग्नानंतरही शिक्षणाची ओढ मात्र काही केल्या गप्प बसू देईना. पती पुरुषी अहंकार बाळगणारा, संशयी, तापट होता. त्यातूनच मग सुरू झाला शिक्षणासाठीचा संघर्ष. शिक्षणासाठी शारीरिक, मानसिक छळ स्वीकारून त्यांनी आपले बी.ए.पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. तोपर्यंत पदरात दोन मुले होती. पुढे त्यांना एम.ए. एमएसडब्ल्यू करायचे होते. मात्र त्यांचे शिकणे पसंत नसलेल्या पतीने त्यांचा अनन्वित छळ करून अखेर त्यांना तलाक दिला.
सरकारी नोकरीत असतानाही पतीने कोणतीही कायदेशीर बाब पूर्ण न करता मुफ्तींकडून एकतर्फी तलाकचा फतवा बनवून दुसरे लग्नही केले. शिवाय जबरदस्तीने मुलाला आपल्या ताब्यात ठेवले. मग रुबिना यांनी मुलासाठी आणि पोटगीसाठी (मेहेर) कायदेशीर लढा सुरू केला. मुलाला भेटण्यासाठीही त्यांना अनेकदा मारहाण, अपमान सहन करावा लागला. एवढे करून त्यांच्या पतीनेच त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न, बळजबरीने घरात घुसणे यांसारखे अनेक खटले दाखल केले. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने आपली कायदेशीर लढाई कोणत्याही वकिलाचा आधार न घेता त्या स्वत: लढल्या. या वेळी न्यायालयात चकरा मारताना त्यांना त्यांच्यासारख्या अनेक ‘रुबिना’ भेटल्या. त्यातूनच २००५ मध्ये त्यांनी ‘रुबी सोशल वेल्फेअर सोसायटी’ची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी बहुपत्नीत्व, जबरदस्तीने आणि लहान वयात होणारे विवाह, तलाक आणि पोटगी तसेच मुलांचा ताबा या आणि इतर समस्येने पीडित स्त्रियांना समुपदेशन, मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. कित्येक स्त्रियांना त्यांच्या पतीकडून, नातेवाईकांकडून घराबाहेर काढले जायचे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न असायचा. तात्पुरता का होईना त्यांना, त्यांच्या मुलांना निवारा देण्यासाठी त्यांनी ‘शेल्टर होम’ सुरू केले. तिथे कित्येक जणींनी निवारा घेतला आहे आणि घेत आहेत. आपद्ग्रस्त स्थितीमध्ये ‘शेल्टर होम’मध्ये येणाऱ्या स्त्रियांसाठी कायदेशीर मार्गदर्शन, त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, व्होकेशनल ट्रेनिंग देऊन नोकरी मिळवून देणे आदी कामेही त्या संस्थेमार्फत करतात.
२००९ मध्ये त्यांनी ‘मुस्लीम महिला मंच’ची स्थापना केली. त्याद्वारे तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व, मेहेर, बालविवाह रोखणे, मुस्लीम वैयक्तिक कायदा, पुरुषसत्ताक पद्धत, जेंडर सेन्सटायजेशन आदी विषयांवर चर्चासत्र, परिषदा घेऊन स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्या करतात. तलाकपीडित स्त्रियांसाठीही अनेक उपक्रम त्या राबवतात.
मुस्लीम असो की इतर, मुलींचे शिक्षणगळतीचे प्रमाण अधिक असल्याचे रुबिना यांच्या लक्षात आले. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी २० ते २५ मुलींना शिष्यवृत्ती, शैक्षणिक मार्गदर्शन करून दहावीचे शिक्षण पूर्ण केले जाते. शिवाय २०१२ मध्ये सुरू केलेल्या रुबी ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये त्यांनी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले, जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम होता येईल. यामध्ये ब्युटिशियन, शिवणकला, शिवाय इलेक्ट्रॉनिक्स रिपेअिरग अॅण्ड मेंटेनन्ससारखे आधुनिक अभ्यासक्रमही आहेत.
संगणकाच्या ज्ञानाची गरज लक्षात घेऊन त्यांनी स्त्रिया आणि मुलींसाठी सुसज्ज अशी संगणक लॅब आणि अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. मुलींसाठी खेळायला मैदान तर त्यांनी तयार केलेच, शिवाय खेळाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन त्या करतात. ‘वाचाल तर वाचाल’ हे लक्षात घेऊन वाचनालयही सुरू केले आहे.
स्त्रियांना मानसिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी स्त्री-पुरुष समानतेवर काम करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यासाठी त्या गेल्या ३ वर्षांपासून नागपूरमधील वेगवेगळ्या महाविद्यालयांत ‘जेंडर मेला’, किशोरी संमेलन आयोजित करतात. आज त्यांच्या संस्थेचा कारभार कुही उमरेड, नागपूर आणि भंडारा येथे चांगलाच विस्तारला आहे. आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्येही काही मुस्लीम स्त्रियांच्या केसेस आल्या तर पोलीसही ‘भरोसा सेल’मार्फत रुबिना यांच्याकडे पाठवतात.
रुबिना यांची कौटुंबिक संघर्षांतून सुरू झालेली लढाई आता केवळ त्यांची राहिलेली नाही. त्यांनी आजपर्यंत हजारो स्त्रियांना अनेक प्रकारे मदत केली आहे, त्या सर्वाची ही लढाई आहे. शिवाय ज्या मुलासाठी त्यांना न्यायालयाचा फेरा घडला तो मुलगाही त्यांच्याकडे स्वत:हूनच परतला आहे. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षण घेत असून त्यांच्या नावापुढे रुबिना यांचेच नाव लावतात. त्यांनी केलेल्या संघर्षांचं हे सार्थ फलित आहे.
रुबी सोशल वेल्फेअर सोसायटी
पिली स्कूल, दर्गाह रोड,
बडा ताजबाग, उमरेड रोड,
नागपूर-४४० ०२४.
मोबाइल- ९९२३१६२३३७.
rubinaptl@gmail.com