मोदींनी संघाच्या अजेंडय़ातून बाहेर पडून काश्मीर प्रश्नाकडे बघावे – सोझ
काश्मीर समस्येसंदर्भात तेथील काँग्रेसचे बुजुर्ग नेते सैफुद्दीन सोझ यांची ‘लोकसत्ता’चे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर यांनी आपल्या काश्मीर दौऱ्यात भेट घेतली. या वेळी सोझ यांनी विविध मुद्दे मांडताना चर्चेची सुरुवात ‘हुरियत’पासून करा, असे आग्रहपूर्वक सांगितले.
- काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?
सैफुद्दीन सोझ – काश्मीर प्रश्न हा जटिल प्रश्न नव्हे, तो सहजपणे सोडवता येऊ शकतो. काश्मिरी लोक भारतावर संतापलेले असून त्यांचे ‘हुरियत’ प्रतिनिधित्व करते. त्यामुळे केंद्र सरकारने ‘हुरियत’च्या नेतृत्वाशी चर्चा करावी. काश्मीरमधील मुख्य धारेतील राजकीय पक्षांनी विश्वासार्हता गमावलेली असल्यामुळे या पक्षांशी चर्चा करून काहीच फायदा होणार नाही. काश्मीरमध्ये बोलणी करण्यासाठी राजकीय व्यक्तीचीच नियुक्ती केली पाहिजे.
- ‘हुरियत’शी चर्चा करणे आवश्यक आहे, असे का वाटते ?
लष्कराचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काश्मीर प्रश्न सोडवता येणार नाही. कधी तरी केंद्र सरकारला काश्मिरी लोकांशी बोलणी करावी लागतील. काश्मीर राजकीयदृष्टय़ा नेतृत्वहीन झालेले नाही. ‘हुरियत’मधील मीरवाइज उमर फारुख, यासिन मलिक आणि सईद अली शाह गिलानी या तिघांचे नेतृत्व उपलब्ध आहे. त्यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केली पाहिजे. काश्मीरमध्ये ‘हुरियत’कडून बंद पुकारला जातो तेव्हा लोक प्रतिसाद देतात. याचा अर्थ लोकांचा अजूनही ‘हुरियत’वर विश्वास आहे. ‘हुरियत’चे म्हणणे लोक ऐकत असतील तर, ‘हुरियत’शी बोलणे भारताच्या फायद्याचेच ठरेल!
- मुख्य धारेतील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीसारख्या राजकीय पक्षांबाबत आपले मत काय?
मुख्य धारेतील पक्षांना लोकांनी कधीच बाजूला केलेले आहे. त्यांचे कोणीही ऐकत नाही. असे असेल तर काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेची सुरुवात मुख्य धारेतील पक्षांपासून करता येणार नाही. ‘हुरियत’शी बोलणी केल्यानंतरच मुख्य धारेतील पक्षांशी चर्चा करता येऊ शकेल.
- पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काय वाटते?
पंतप्रधान मोदी यांना काश्मीर प्रश्न सोडवता येऊ शकतो. मात्र मोदींनी संघाच्या अजेंडय़ातून बाहेर पडून काश्मीर प्रश्नाकडे बघितले पाहिजे. मोदी संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. संवाद सुरू करून काश्मीर प्रश्न निकाली काढता येईल. जगभरात प्रत्येक संघर्ष चर्चा करून सोडवण्यात आला आहे. चर्चा सुरू होते तेव्हा वेगवेगळे पक्ष टोकाची भूमिका घेतात, पण अखेर मध्यममार्गी भूमिका घेतली जाते आणि सर्व घटकांना स्वीकारार्ह उपाय शोधला जातो. स्वायत्ततेवर देखील चर्चा होऊ शकते.
- पाकिस्तानात आता नवी राजवट आली आहे. आता भारताने पाकशी चर्चा पुन्हा सुरू करावी का?
‘घटनेच्या चौकटीत हा प्रश्न सोडवायला व्यक्तिश: माझा विरोध नाही, पण टोकाची भूमिका घेऊ नका. मग ‘हुरियत’ही टोकाची भूमिका घेणार नाही असे मला वाटते. तसे झाले तर काश्मिरी तरुण मारले जाणार नाहीत. पॅलेट गनचाही वापर थांबेल. भारत जसा काश्मीर प्रश्नाचा भाग आहे, तसाच पाकिस्तानही आहे. पण संयुक्त राष्ट्राच्या चौकटीतच हा प्रश्न पाकिस्तानला सोडवायचा आहे. त्यामुळे पाकिस्तानशी सावध पवित्रा घेऊनच चर्चा करावी लागेल.
सोझ यांचे ‘काश्मीर : ग्लिमसेस ऑफ हिस्टरी अॅण्ड स्टोरी ऑफ स्ट्रगल’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यात सोझ यांनी काश्मीरला स्वायत्तता देण्याचा विचार मांडला आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा संदर्भ पुस्तकात देण्यात आला आहे. काश्मिरी लोकांना निवडीची संधी दिली तर ते स्वतंत्र राहणे पसंत करतील, पण ते पाकिस्तानात येणार नाहीत, असे मुशर्रफ यांनी म्हटले होते. स्वातंत्र्य देणे शक्य नसल्यामुळे काश्मिरी लोकांसाठी स्वायत्तता हा पर्याय असू शकतो, असे सोझ यांनी पुस्तकात सुचवले आहे. या मांडणीमुळे हे पुस्तक वादग्रस्त झाले असून काँग्रेसने अधिकृतपणे सोझ यांचे विचार वैयक्तिक असल्याचे स्पष्ट करत स्वत:ला वादापासून वेगळे केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेवर सोझ यांनी टिप्पणी केली नाही, मात्र काँग्रेसच्या विरोधात आपण कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे सोझ यांनी सांगितले.