कोल्हापूर : मनभावन श्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. पुढे गणेशउत्सव, नवरात्र , दिवाळी, मार्गशीष महिना अशी सणांची रेलचेल सुरु राहते. सण म्हटले कि ओघानेच फुले येतात. पूजा- सजावट अशा विविध कारणांनी फुलांचा गंध दरवळत राहतो. फुल शेती हि तर नानाविध रंगाची, सुगंधांची. फुलांचा दरवळ गंधित, मोहित करणारा. फुलांचे विविध रंग, सुगंध, उपयोग हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहेत. अशा सुंदर, रंगीबेरंगी फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे. तथापि एकच एक फुल आणि जोडीला आणखी एखादे फुल यांची शेती करणारा वर्ग संख्येने कमी आहे. या मांदियाळीत दरवळणारे एक नाव म्हणजे सफाळे कुटुंबीय. कोल्हापूर लगतच्या वाशी गावातील सचिन चपाले हे चुलते कृष्णात चपाले यांच्या मदतीने गेली चार दशकावून अधिक काळ फुल शेती करत आहेत. त्याचा परिमळ देणारी हि कृषक गाथा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 सध्या दसरा -दिवाळी सणाचा हंगाम आहे. या सणांवेळी झेंडू फुल हमखास घरोघरी लागते. झेंडू हे भारतातील एक महत्त्वाचे फूल आहे. ते धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कमी गुंतवणुकीत कमी कालावधीचे पीक असल्याने ते भारतातील लोकप्रिय पीक बनले आहे. याच झेंडूची फुल शेती चपाले कुटुंबीय वर्षभर करत असते. यातून त्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्नही मिळत असते. यातूनच कष्टाच्या शेतीला अर्थसाधनेचा गंध येतो. कोल्हापूर लगतच्या वाशी या गावात चपाले कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे ५० वर्षांपूर्वी पाच एकर शेती होती. कुटुंबात चौघे भाऊ. सचिननं याचे वडील दूध विक्रीचा ( गवळी ) व्यवसाय करीत. आई शेती सांभाळत असे. पुढे ९० च्या दशकात शेतीची वाटणी झाली. प्रत्येकाच्या वाट्याला आलेली जमीन सरासरी एक – सव्वा एकर इतकीच. जमीन बागायती जमीन तरी सीमांत क्षेत्र असल्याने शेती उत्पादने घेणे तसे कष्टदायक आणि आव्हानास्पद. त्या काळामध्ये ऊस, भात, भुईमूग यासारखी पिके घेतली जात असत. सचिन यांचे मामा अमोल माळी हे कागल येथील. ते तेव्हा चांगल्या प्रकारे फुल शेती करीत असत. त्यांच्या फुलशेतीला आलेले यश पाहून मग चपालेकुटुंबांनी फुलशेती हेच शेतीचे उद्दिष्ट मानून काम सुरू केले.

 सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी छोट्या प्रमाणामध्ये गलाटी, झेंडू असे फुले पिकवायला सुरुवात केली. तेव्हा फुल शेती ही आता इतकी विकसित, प्रगत झालेली नव्हती. कोणीतरी एखादा झेंडूचे पीक घ्यायचा. अगदी क्वचित गुलाब शेती केली जायची. गलाटा या फुलांचेच हार बहुतांशी दिसत असत. आता चित्र बदलले आहे. वेगवेगळ्या पद्धतीची सुवासिक सुंदर फुले घेतली जातात. सुमारे दोन दशके हीच शेती चपाले कुटुंबीय करीत राहिले. पुढे सचिन चपाले (वय ३९ ) यांचे दहावी शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांनी चुलते कृष्णात मारुती चपाले यांच्या बरोबरीने फुल शेतीमध्ये लक्ष घालायचे ठरवले.

  हे दोघे मिळून सध्या दोन वेळोवेळी ठिकाणी फुल शेती करत आहेत. स्वतःची दीड एकर जागा. आणखी एका ठिकाणी वीस गुंठ्यामध्ये फुल शेती केली जाते.  संपूर्ण वर्षभर झेंडूचे फुल पीक घेण्याकडे त्यांचा कल आहे. शिवाय जोडीला शेवंतीचे पीक ते घेतात. संपूर्ण वर्षभर पीक घेत घेतात.  बाजारात फुलांची मागणी कधी वाढते याचे नियोजन करून ते फुले पिकवत असतात. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेंडूसाठी सुपीक, पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते.  जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे, त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगले येते. झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते. परंतु फुले येत नाहीत.

सचिन यांच्या दहा गुंठ्यांच्या प्लॉट मध्ये एका बाजूला झेंडू असतो. दुसऱ्या बाजूला शेवंती घेतली जाते.  साधारणतः श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी, भाद्रपद, लग्नसराई हा फुल विक्रीचा तेजीचा हंगाम. या काळातच फुले बाजारात विक्रीला कशी आणता येईल याचे त्यांनी वर्षभराचे पक्के नियोजन केलेले असते. झेंडू व शेवंती हे पीक कालावधी सुमारे १३० – १५० दिवस असतो. लागवडीनंतर ६० दिवसांपासून ३ दिवसांतून एकदा काढणीची   फुले घेतली जातात. पीक चांगल्या पद्धतीने घेण्याकडे लक्ष द्यावे लागते. झेंडूच्या फुलांची काळजी लक्ष देऊन करावी लागते. नियमित पाणी पाणी द्यावे लागते. खताची फारशी गरज नसली तरी सेंद्रिय खतांचा वापर गरजेचा असतो. झेंडूचे झाड वेळोवेळी कापून स्वच्छ ठेवावे लागते. झेंडू पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नाग अळी, अळी, कटवर्म या किडींचा व करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी टिकतानाशक / बुरशीनाशक फवारणी करावी लागते.  झेंडू फुलांच्या पाकळ्या मऊ, मखमली असतात, त्यांच्यावर सूक्ष्म केस असतात. ज्यामुळे एक विशिष्ट चमक येते. झेंडूचे झाड लहान ते मध्यम आकाराचे असते. त्याच्या पानांना विशिष्ट सुगंध असतो. झेंडूच्या फुलांच्या मध्यभागी बीया असतात. बियांचा वापर झेंडूची नवीन रोपे वाढवण्यासाठी केला जातो.

भारत हा झेंडू फुलातील मोठा उत्पादक देश आहे. यामुळे या फुलांना मागणीही सर्वत्र असते. चपाले यांनी उत्पादित केलेली झेंडूची फुले गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सागरी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला जात असतात.अर्थात फुलांचे बाजारपेठेतील दर कधीच भरवशाचे नसतात. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली की फुलांचे दर घसरतात. आवक कमी असली की दर वधारतात. बाजारातील चढ-उतार गृहीत धरून त्यानुसार फुल विक्रीचे नियोजन करावे लागते. अर्थात फुल विक्री करणे हे मोठ्या कौशल्याचे काम असते. फुलांच्या पॅकिंगसाठी बांबूची टोपली किंवा बारीक पिशव्याचा वापर केला जातो. पावसाळ्यात ताज्या फुलांचे सरासरी उत्पादन सुमारे ८०-९० क्विंटल/एकर मिळते. तर हिवाळ्यात ते ६०-७० क्विंटल/एकर उत्पादन मिळते.यासाठी चपाले पती-पत्नी, चुलते, काही कामगार हे पहाटे साडेसहा वाजल्यापासून फुल तोडणी सुरू करतात. दोन – अडीच तासात तोडणी झाली की सकाळी ११ वाजता कोल्हापुरातील शिंगोशी फुल बाजारामध्ये विक्री स्वतः करतात. दिवसभराची कामे आवरल्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या कामाची आखणी केली जाते.

अत्यंत कष्टाचे आणि तितकेच जागरूक राहून फुल शेती करावी लागत असल्याचे सचिन चपाले हे इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर सांगतात.गेल्या वर्षी फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. दर घसरलेले होते. यावर्षी तुलनेन फुलांची लागवड कमी झाली आहे. बाजारपेठ अशी सतत वर खाली होणारी असते. त्याच्यामध्ये तेजी-मंदीचा मोठा झोला होत असतो. अशा आव्हानास्पद परिस्थितीत नियोजन करून मार्ग काढावा लागतो. झेंडू फुलांना सणाच्या काळामध्ये मागणी वाढलेली असते. दसरा -दीपावलीमध्ये झेंडूंचा वापर रांगोळी, सजावट ,पूजा साहित्य यासाठी केला जातो. गणेश चतुर्थी उत्सवात झेंडू फुले गणपती मूर्तीच्या सजावटीसाठी वापरली जातात. विवाह सोहळ्यामध्ये झेंडू फुले सजावटीसाठी वापरली जातात. भारतीय संस्कृतीत झेंडूच्या फुलांना सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय झेंडूचे फुल हे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. झेंडू अर्क, पेस्ट, तेल यासाठी  वापरले जाते. झेंडूच्या फुलापासून नैसर्गिक रंग बनवला जातो. केशरी आणि पिवळा रंग करण्यासाठी या फुलांना मागणी असते. शिवाय झेंडूचे फुल हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरले जाते.

झेंडूची फुले विविध रंगात आढळतात. सचिन हे केशरी, लाल – पिवळा, नारंगी रंगाची फुले घेतात.बाजारपेठेत सतत फुलांचा पुरवठा होण्यासाठी महिना – डिड महिन्याच्या अंतराने एक प्लॉट सोडून दुसऱ्या प्लॉट मध्ये लागवड केली जाते. तेजी – मंदी , चढ – उत्तर असे हेलकावे असले तरी चपाले कुटुंबियांसाठी फुल शेती जीवनात सुगंध घेऊन आली आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokshivar floriculture crop marigold flower farming amy