अविनाश पाटील
शेती परवडत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत असतात. वाढता खर्च, गुंतवणूक, श्रम आणि पुन्हा अस्मानी संकटांनी शेती करणे जिकिरीचे झाले आहे. अशा वेळी शेवग्याची शेती हा एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे, शेवग्याच्या शेंगा, फुले, पाने सर्वच कामाला येतात. कमी पाण्यातील, कमी खर्चाची शेवगा शेती अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
दिवसेंदिवस कमी होणारे पाण्याचे प्रमाण, खते, बी-बियाणे, औषधांच्या वाढणाऱ्या किमती, यामुळे शेती परवडत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत असतात. त्यातच अवकाळी, गारपीट यांसारखे अस्मानी संकट कोसळल्यावर शेतकरी पुरता कोलमडतो. अशा वेळी शेती करावी तरी कोणती, असा प्रश्न पडतो. अशा शेतकऱ्यांना शेवगा शेती हा चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे, शेवग्याच्या शेंगा, फुले, पाने सर्वच कामाला येतात. कमी पाण्यातील, कमी खर्चाची शेवगा शेती अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम, भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली, तरी चालते. क्षारयुक्त, खोलगट आणि भातखाचराच्या, जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीत शेवगा लागवड करू नये. शेवग्याची लागवड मार्च, एप्रिल, मेवगळता कोणत्याही महिन्यात केली तरी चालू शकते. कोकण भागात पावसाळय़ात पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे महिनेवगळता इतरत्र लागवड करावी.
शेवगा लागवडीसाठी काळय़ा भारी जमिनीत दोन ओळींमधील अंतर १२ फूट आणि दोन झाडांमधील अंतर सहा फूट ठेवावे. या प्रमाणात लागवड केल्यास एकरी ६०० झाडे बसतात. दोन ओळींमधील अंतर १३ फूट आणि दोन झाडांमधील अंतर सात फूट ठेवल्यास एकरी ५०० झाडे बसतात. जमीन मध्यम असल्यास दोन ओळींमधील अंतर १० फूट आणि दोन झाडांमधील अंतर सहा फूट ठेवावे. याप्रमाणे एकरी ७०० झाडे बसतात. जमीन हलकी आणि मुरमाड असल्यास दोन ओळींमधील अंतर १० फूट आणि दोन झाडांमधील अंतर पाच फूट ठेवल्यास एकरी ८७० झाडे बसतात.
हेही वाचा >>>सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग!
लागवडीची खड्डा पद्धत
शेवगा लागवड करताना जमीन जर मुरमाड, खडकाळ असेल, तर दीड फूट आकाराचे आणि खोल खड्डे खोदावेत. खड्डय़ात जमिनीच्या वरच्या थरातील चांगली माती भरावी. ही माती भरताना त्यात दोन किलो शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फास्फेट, २०० ग्रॅम निंबोळी पावडर आणि पाच ग्रॅम थायमेट यांचे मिश्रण करून खड्डा भरावा. त्यास आळे करावे.
जमीन जर मध्यम, काळी किंवा चांगल्या पोताची असेल, तर अशा जमिनीत शेवगा लागवड करताना अधिक खोल खड्डे खोदण्याची गरज नसते. जमीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल नांगरून सपाट करावी. आपल्या जमिनीनुसार हव्या त्या अंतराप्रमाणे आखणी करून घ्यावी. अशा ठिकाणी फावडय़ाच्या साहाय्याने उकरून एक फूट आकाराचा आणि खोली असलेला खड्डा करावा. त्यात दोन ते पाच किलो शेणखत, १०० ग्रॅम दाणेदार सुपर फॉस्फेट, १०० ग्रॅम निंबोळी पावडर आणि पाच ग्रॅम थायमेट यांचे मिश्रण मातीत टाकून खड्डा भरावा. आळे तयार करून त्यात ४० ते ४५ दिवसांच्या रोपांची लागवड करावी. शेवग्याचे झाड तीन ते चार फूट वाढल्यानंतर झाडांना मातीचा भर द्यावा. आवश्यकतेनुसार तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी दोन झाडांतील एक झाड काढून टाकावे.
शेवगा लागवडीचे अर्थशास्त्र
शेवगा लागवडीसाठी एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. एक एकर लागवडीसाठी दोन ओळींमधील अंतर १० फूट आणि दोन झाडांमधील अंतर सहा फूट गृहीत धरल्यास ७०० झाडे बसतात. पहिल्या सहा महिन्यांत प्रतिझाड कमीत कमी १० किलो उत्पन्न मिळते. ७०० झाडांपासून सात टन उत्पन्न मिळते. शेवगा शेंगांना वर्षभर कमीत कमी २० रुपये आणि अधिकाधिक ८० रुपये किलोपर्यंत भाव मिळतो. वर्षांचा सरासरी भाव ३० रुपये किलो मिळतो. बाजारभावात चढ-उतार झाले, तरी लागवडीचा सुरुवातीचा खर्च वजा जाता पहिल्या सहा महिन्यांत एकरी एक लाख ते दीड लाख रुपये निव्वळ नफा होतो. दुसऱ्या वर्षी प्रतिझाड १५ किलो, तिसऱ्या वर्षी प्रतिझाड २० किलोपर्यंत उत्पन्न मिळते. याप्रमाणे दर वर्षी उत्पादनात वाढ होत जाते. तिसऱ्या वर्षांपासून पुढे एकरी २.५० लाख ते ३.५० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न बागायत क्षेत्रातून मिळते. जेथे फेब्रुवारीपर्यंतच पाणी असते, अशा ठिकाणी एकरी ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळते. अवेळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलामुळे उत्पादनात थोडाफार फरक पडू शकतो. शेवगा झाडाला मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाणी मिळाले नाही, तरी झाडे जगतात. फक्त त्या कालावधीत त्यापासून उत्पन्न मिळत नाही.
’ पी.के.एम-१
शेवग्याचे हे वाण लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न देण्यास सुरुवात करते. या वाणाचा वर्षांतून एकच बहर येतो. तीन ते चार वर्षांपर्यंत उत्पन्न घेता येते. प्रतिझाड २०० ते २५० शेंगा येतात.
’ पी.के.एम.-२
शेवग्याच्या या वाणापासून लागवडीनंतर सहा महिन्यांत उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. वर्षांतून दोन बहर घेता येतात. शेंगा तीन ते साडेतीन फुटापर्यंत लांब असतात. चार ते पाच वर्षांपर्यंत उत्पन्न घेता येते.
’ ओडिशी
या वाणाची लागवड केल्यानंतर सात ते आठ महिन्यांत उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. वर्षांतून एकच बहर येतो. प्रतिझाड १५० ते २०० शेंगा असतात. तीन ते चार वर्ष उत्पन्न मिळते. या वाणात भेसळयुक्त झाडांचे प्रमाण अधिक असते. काही झाडांना लाल रंगाच्या शेंगा येतात.
’ के.एम.-१
हा वाण गावठी वाणासारखाच. शेंगा एक फूट लांब असतात. रंग गर्द हिरवा, चव उत्तम. तीन वर्षांनंतर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. आठ ते १० वर्ष उत्पन्न मिळते. प्रतिझाड ३०० ते ४०० शेंगा येतात.
’ रोहित-१
महाराष्ट्र शासनाचा २०२० या वर्षांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारप्राप्त नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा येथील बाळासाहेब मराळे यांनी २००५ मध्ये निवड पद्धतीद्वारे रोहित-१ हा वाण विकसित केला. लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न येण्यास सुरुवात होते. वर्षांतून दोन बहर घेता येतात. शेंगांचा रंग गर्द हिरवा, लांबी ४५ ते ६० सेंमी, प्रतिझाड ४०० ते ६०० शेंगा, १० ते १२ वर्षांपर्यंत उत्पन्न घेता येते.
Avinash.patil@expressindia.com