दिगंबर शिंदे
शेतीमध्ये वाढीव उत्पादनासाठी रासायनिक खते, औषधे यांचा अतोनात वापर सर्रास केला जात आहे. हा वापर शेतीचा उत्पादन खर्च तर वाढवतोच; पण पर्यावरण आणि आरोग्यासाठीदेखील घातक आहे. यातूनच यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीची कल्पना पुढे आली आहे. या पीक पद्धतीत उत्पादन कमी मिळत असले तरी त्यास मागणी आणि दर अधिक मिळत असल्याने शेतकरी आकृष्ट होऊ लागले आहेत. यातील एक यशस्वी प्रयोग सांगली जिल्ह्यातील डिग्रज येथील शेतकरी डॉ. दादासाहेब पाटील यांनी राबवला आहे.
शेती उत्पादन वाढीसाठी महागडी रासायनिक खते, औषधे यांचा अतोनात वापर होतो. मानवी आरोग्यासाठी हे हानिकारक तर आहेच, पण सातत्याने रासायनिक खते, औषधे यांचा वापर केल्याने काळय़ा आईचे आरोग्यही धोक्यात येऊन नैसर्गिक समतोल ढासळतो. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीची कल्पना पुढे आली आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत उत्पादित होत असलेल्या पिकापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थानाही मागणी वाढत असून नियमित उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी डिग्रज येथील शेतकरी दादासाहेब पाटील यांनी साधली आहे.
मौजे डिग्रज (जि. सांगली) येथील डॉ. दादासाहेब पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी जमिनीच्या आरोग्याची गरज लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला. दावणीला लहान मोठय़ा खिलार आणि सहिवाल जातीच्या अशा नऊ गाई. गोमूत्र, शेणखत, हिरवळीची खते याचा वापर करत सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. त्यात सातत्याने अपयश पदरी आले. पण न खचता २४ वर्षांपासून जमिनीचे आरोग्य टिकवून सेंद्रिय शेती करत गूळ, काकवी, गुळाची पावडर, मूग आणि उडदाची विक्री करताहेत.
कृष्णा नदी काठी वसलेलं मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज. सन २०१९ आणि सन २०२१ ला संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीला महापूर आला आणि पूर्ण गावाला पुराचा वेढा पडला. अशा परिस्थितीतही इथला शेतकरी खचला नाही. या गावात हळद, ऊस आणि भाजीपाला पिके घेतली जातात. याच गावातील डॉ. दादासाहेब आकाराम पाटील. तसे यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील सावळज. त्यांचे वडील त्यांच्या मामांच्या गावी म्हणजे मौजे डिग्रज येथे वास्तव्यास आले. दीड एकर शेती आणि आजोबांच्या काळापासून देशी गाई सांभाळण्याचा वारसा एवढेच काय त्यांच्या हाती होते. प्रतिकूल परिस्थितीत शेती पिकवली जायची. पाटील यांचे वडील आकाराम आणि आजोबा दरगोंडा यांनी खूप कष्ट उपसले. त्यांच्यातून कष्ट करण्याचे अंगवळी पडले. गावात दळवळणाची सुविधाही नव्हती. अशा परिस्थितीत दादासाहेब यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. सन १९७५ मध्ये सातारा येथे पाटील यांनी बी. ए. एम. एस.चे शिक्षण घेतले.
हेही वाचा >>>किफायतशीर शेवगा!
दादासाहेबांनी गावातच प्रॅक्टिस सुरू केली. नाममात्र शुल्क घ्यायचे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने अति रासायनिक खतांचा वापर होत असल्याने आजार होतो हे लक्षात आले. त्यामुळे आपणच सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला. १९९९ साली त्यांच्या या सेंद्रिय शेतीचा प्रारंभ काळ होता. घरची सुरुवातीची आणि नंतर नव्याने वाढवलेली अशी १९ एकर शेतीत त्यांनी हा प्रयोग सुरू केला. आजोबांच्या काळापासून दावणीला देशी गाई असल्याने या गाईंचे महत्त्व जाणले होते. ही शेती सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला, पण त्याची काहीच माहिती नव्हती. सेंद्रिय शेती करणारे कोणी नव्हते. आपणच प्रयोग केले तरच, त्याचा अभ्यास होईल, या हेतूने अडीच एकरावर प्रयोग सुरू केला. मुळात सेंद्रिय शेती करायचे म्हटले तर, पहिल्यांदा जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यादृष्टीने काम सुरू केले. देशी गाईचे शेणखत, गोमूत्र वापरून शेती करण्यास सुरुवात केली. स्लरी कशी तयार करायची, त्याचा वापर कसा करायचा हे काहीच माहिती नव्हते. त्यामुळे तोटाही झाल्याने सातत्याने अपयशच पदरी पडले. पण ते खचले नाहीत. जिद्द आणि सचोटी यातून सेंद्रिय शेती करून मातीची सुपीकता वाढवण्यास यश आले. पुढच्या पिढीलाही सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटल्याने मुलेही सेंद्रिय शेतीकडे वळू लागली आहेत.
अभ्यास महत्त्वाचा
सेंद्रिय शेती म्हणजे केवळ रासायनिक खताचा वापर टाळणे नव्हे. पहिल्यांदा रासायनिक खताचा वापर बंद केला. जमिनीला काय हवे, याची माहिती असणेही आवश्यक असल्याने अभ्यास महत्त्वाचाच असतो. त्यानंतर मनोहर परचुरे, सुभाष पाळेकर यांच्या संपर्कात आलो. त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीची संकल्पना समजून घेतली. त्यांच्या अभ्यासानुसार शेती करू लागलो. पण त्यांच्याकडील पुरेशे ज्ञान मिळाले नसल्याने अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे पुन्हा नव्या जोमाने अभ्यास सुरू केला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
मिळेल तेथून घेतले ज्ञान
पाटील सांगत होते की, जन्माला आल्यापासूनच आपण विद्यार्थी असतो. त्यामुळे ज्ञान घेण्यात कसलाही संकोच मी केला नाही. ज्या ठिकाणाहून सेंद्रिय शेतीचे ज्ञान मिळते त्या ठिकाणाहून ज्ञान आत्मसात केले. २०१७ ला गुजरातचे गोपालभाई सुतारिया यांचा सेंद्रिय शेतीबाबत लेख वाचला. तो मनाला भावला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. ५५ प्रकारापेक्षा जास्त जीवाणू असलेले विरझण आणले. त्यापासून जीवांमृत करून शेतीला वापरत आहे.
अमृत सेंद्रिय उद्योगाची सुरुवात
सेंद्रिय शेतीत खर्च कमी आणि अपेक्षित उत्पन्न मिळते. पण याला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर नक्कीच फायदा होईल, असे त्यांच्या अभ्यासातून उमगले. पाटील यांनी २००० पासून गूळ, काकवी, गुळपावडर तयार करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी स्वत: गुऱ्हाळ घर उभारले आहे. जवळच्या भागात आणि मागणीनुसार त्याची विक्री करतात. तसेच सेंद्रिय पध्दतीने गूळ निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना ते स्वत: गूळ तयार करून देतात. एका काईलसाठी ३५०० रुपये मजुरी घेतात. त्यामुळे त्यातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन तयार केले आहे.
पट्टापद्धतीचा वापर
आठ फूट पट्टापद्धतीचा वापर करून जोड ओळी चार फूट सरीवर उसाची लागण आणि खोडवा ही दोनच पिके घेतली जातात. मूग, हळद, उडीद, भुईमूग ही आंतरपिके घेतात. हिरवळीच्या खतांचा वापर करण्याबरोबरच पालापाचोळा, उसाचे पाचट आणि आंतरपिकाचे अवशेष रानातच ठेवून रोटरद्वारे मातीआड केला जातो.
काकवीपासून जाम
सातत्याने नवीन प्रयोग आणि नवी उत्पादने करण्याची धडपड पाटील यांच्यात दिसते. त्यामुळे यंदा काकवीपासून जाम तयार केला आहे. यामध्ये विविध औषधी वनस्पती, ड्रायफ्रूटचा वापर केला आहे. परिसरातील लोकांना, मित्र मंडळींना हा जाम चवीसाठी दिला आहे. त्यांच्याकडून जामबद्दल प्रतिक्रिया घेऊन त्यामध्ये बदल केला जाणार आहे. लवकरच मार्केटमध्ये विक्रीसाठी जाम उपलब्ध करणार आहेत. सेंद्रिय शेतीतील उसापासून तयार केलेली काकवी, गूळ, गूळ पावडर आणि मूग, उडीद यांची विक्री करून बाजारापेक्षा अधिक दराने जागेवरच विक्री केली जाते.
मानवी आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच जमिनीच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे ओळखून विषमुक्त जीवनाची सुरुवात स्वत:पासून केली. यातूनच सेंद्रिय उत्पादनेही सुरू केलीत. आज जिकडून मिळेत तिकडून सेंद्रिय शेतीतील आणि प्रक्रियेचे ज्ञान घेऊन शेती करत आहे. – डॉ. दादासाहेब पाटील
Digambar.shinde@expressindia. Com