२२ सप्टेंबर २०१३ ला प्रश्नचिन्ह शाळेचं उद्घाटन झालं. शाळा सुरू झाली, पण अनेक प्रश्न अनुत्तरितच होते, म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवलं. कधीकाळी जी मुलं भीक मागायची, चोऱ्या करायची, कचरा गोळा करायची, आज ती सर्व शाळेत शिकताहेत. सकाळी प्रार्थनेनं शाळा सुरू होते. संध्याकाळी मुलं शाळेच्या आवारातच खेळतात. अत्यंत अपुऱ्या मानधनावर तेथील शिक्षक शिकवताहेत. मुलं-मुली शाळेतच झोपतात, तिथंच जेवतात. पहिली ते दहावीपर्यंतच्या या शाळेत ४४७ मुलं शिकताहेत..
भटक्या-विमुक्त जातीतील फासेपारधी समाज कायमच भटके जीवन जगणारा. पाली व बेडय़ांवर वास्तव्य करणारा हा समाज. जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासेपारधी समाजाकडे बघितलं जातं. उकिरडय़ावरचं जगणं नशिबी आलेल्या समाजाला त्यांच्यातीलच मतीन भोसले या तरुणानं अंधकाराच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा परिषदेतल्या शाळेतील नोकरीवर लाथ मारून त्यानं भीषण आर्थिक दैनावस्था, गरिबी, गुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेल्या कुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही निवासी शाळा सुरू केली. त्याच्या शाळेचं नाव प्रश्नचिन्ह असलं, तरी त्यानं आजच्या काळातील दांभिक वृत्तीला सडेतोड उत्तर दिलं आहे.
मतीन भोसलेचा जन्म फासेपारधी समाजातला. अमरावती जिल्ह्यातल्या मंगरूळ चव्हाळा या गावचा. वडील शिकार करायचे आणि आई लोकांच्या घरी भांडी घासायला जायची. उदरनिर्वाहाचं साधन अत्यंत अपुरं. गावातील लोकांच्या शिळ्या अन्नावर मतीनसह तीन भाऊ, एक बहीण आणि आईवडिलांची गुजराण व्हायची. खायला पुरेसं अन्न नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, अभ्यासाला पुस्तकं नाहीत, अशा अनेक अडचणींना तोंड देत मतीन शिकला. मतीननं वयाच्या सोळाव्या वर्षीच शिंगणापूर फाटय़ावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केलं. पारधी समाजाला जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यानं केलेल्या या आंदोलनाला यशही मिळालं. सहा-आठ महिन्यांनी सुमारे तीन हजार फासेपारध्यांना जातीचे दाखले मिळू शकले.
अत्यंत विपरीत परिस्थितीत मतीननं डी.एड. पूर्ण केलं, त्याला २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळाली, पण नोकरीत असतानाही त्याच्यातील कार्यकर्ता त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ‘आदिवासी फासेपारधी सुधार समिती’ स्थापन केली. समितीच्या माध्यमातून रोजगार, रेशनकार्ड आणि इतर अनेक मागण्यांसाठी त्यानं लढा दिला. दरम्यान, मतीनचं लग्न झालं. पत्नी सीमा ही दुसऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जात होती. त्याचा वैयक्तिक संसार सुरळीत चालला होता, पण त्याला समाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी होती.
दोन घटनांनी मतीनला अंतर्मुख केलं. २०१० मध्ये वडाळा येथे खेकडे पकडण्यासाठी नाल्याकाठी गेलेली दोन फासेपारधी समाजाची मुलं पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यांचे मृतदेह झुडपांमध्ये अडकलेले होते. लहान मुलांना जगण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो, हे पाहून त्याचं मन विचलित झालं. २०११ मध्ये दादर रेल्वे स्थानकावर त्याच्या समाजातील दोन चिमुकली भावंडं भीक मागताना रेल्वेतून खाली पडून मृत्युमुखी पडली. त्यांचे मृतदेह परत गावी आणण्यासाठीदेखील त्याला संघर्ष करावा लागला. शिक्षणाचा अभाव आणि दारिद्रय़ यासाठी कारणीभूत असल्याचं समजून मतीननं फासेपारधी समाजातील भीक मागणाऱ्या, चोरी करणाऱ्या लहान मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी निवासी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा दिला. येथून त्याच्या संघर्षांला नव्याने सुरुवात होणार होती. लहान मुलांना शोधून निवासी शाळेत आणणं सोपं काम नव्हतं. एकीकडे नोकरी नसल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्याच्या पत्नीला सुरुवातीला त्याचा हा निर्णय पसंत पडला नव्हता, पण त्यानं कुटुंबातील सदस्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचवून त्यांचं मन वळवलं. मतीन समाजाच्या भल्यासाठी हे सारं करतोय, याची जाणीव झाल्यावर पत्नी सीमानं घराची जबाबदारी स्वीकारली आणि मतीन शाळेच्या कामासाठी बाहेर पडला. कार्यकर्त्यांसमवेत त्यानं मुंबई, नागपूर, चेन्नई, हैदराबाद अशा महानगरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलं. अनेक मुलांचे पालक तुरुंगात होते. काहींचे पालक त्यांचं पालनपोषण करू शकत नव्हते. मुलांना शाळा प्रवेशासाठी घेऊन जाण्याआधी या मुलांच्या पालकांचा विश्वास त्याला संपादन करावा लागला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या १८८ मुलांना त्यानं मंगरूळ चव्हाळा या ठिकाणी आणलं खरं, पण व्यवस्था अपुरी होती. हितचिंतकांच्या सहकार्यानं साडेतीनशे चौरस फुटाचं एक गोदाम उपलब्ध झालं होतं. तट्टे उभारून तयार केलेली बाथरूम आणि नैसर्गिक विधीसाठी मोकळे रान, असा त्याचा नवा संसार सुरू झाला.
या १८८ मुलांना शिकवण्यासाठी त्यानं ‘भीक मांगो’ आंदोलन सुरू केलं. पदोपदी अपमान सहन करावा लागला. सरकारी अधिकाऱ्यांनी झिडकारलं, राजकीय पुढाऱ्यांनी अव्हेरलं, पण मतीनची धडपड सुरूच होती. नागरिकांकडून मात्र दान मिळू लागलेलं होतं. कुणी जुने कपडे दिले, अन्नधान्य दिलं आणि ही आश्रमशाळा सुरू झाली. संघर्ष सुरूच होता. आंदोलन सुरूच होतं. २०१३ मध्ये ‘भीक मांगो’ आंदोलनादरम्यान मतीनला अत्यंत विदारक अनुभव आला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे ते मदत मागण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना हाकलून लावण्यात आलं. भीक मागणं गुन्हा आहे आणि हे व्यवस्थेच्या विरोधातील आंदोलन आहे, असे म्हणत जिल्हा प्रशासनाने मतीनसह आंदोलकांना १४ ऑगस्टला अटक केली. त्यांना तुरुंगात हलवण्यात आलं, पण मतीन तिथंही स्वस्थ बसला नाही. त्यानं तिथंही शाळा भरवली. ही बातमी त्याच्या घरी पोहोचली, तेव्हा सीमानं व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं. गावात आंदोलन होईल, म्हणून पोलिसांनी गावाची पोलीस छावणी केली होती. पोलिसांना गुंगारा देऊन सीमानं ७०-८० महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. या ठिकाणी आंदोलन करताना महिलांना अटक करण्यात आली. ती तारीख होती १५ ऑगस्ट. या सर्व आंदोलकांना नागपूर येथील तुरुंगात हलवण्यात आलं. तेव्हा सीमा सात महिन्यांची गरोदर होती. इकडे अमरावतीच्या कारागृहात मतीननं बेमुदत उपोषण सुरू केलं. त्याला कुख्यात गुन्हेगारांना ठेवतात, त्या अंडा बॅरेकमध्ये डांबण्यात आलं होतं. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली, तेव्हा त्यांनी हस्तक्षेप केला आणि मतीनच्या सुटकेचं फर्मान सुटलं. ७२ तास त्याचं उपोषण चाललं. ‘भीक मांगो’ आंदोलनातून ६० हजार रुपये जमले होते. त्यातून त्यानं टिनपत्र्याची शाळा सुरू केली. २२ सप्टेंबर २०१३ ला या शाळेचं एका वृद्धाच्या हस्ते उद्घाटन झालं. पारधी बोलीभाषेतून शिकवणारे तीन शिक्षक शाळेत रुजू झाले. शाळा सुरू झाली, पण अनेक प्रश्न अनुत्तरितच होते, म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवलं. जालना येथील ‘मैत्र मांदियाळी’च्या मदतीतून आता एक इमारत उभी झाली आहे, पण जागा अपुरीच पडते. कधीकाळी जी मुलं भीक मागायची, चोऱ्या करायची, कचरा गोळा करायची, आज ती सर्व शाळेत शिकताहेत. सकाळी प्रार्थनेनं शाळा सुरू होते. संध्याकाळी मुलं शाळेच्या आवारातच खेळतात. अत्यंत अपुऱ्या मानधनावर तेथील शिक्षक शिकवताहेत. मुलं-मुली शाळेतच झोपतात, तिथंच जेवतात. पहिली ते दहावीपर्यंतच्या या शाळेत ४४७ मुलं शिकताहेत. त्यांना आता आपल्या गावाकडची आठवण येत नाही. मतीन आणि सीमा त्यांचे मायबाप बनले आहेत. या मुलांना माणुसकीची शिकवण देत आहेत. शाळेला कोणतंही सरकारी अनुदान मिळत नाही. मान्यता मिळवण्यासाठी त्याचा पाठपुरावा सुरूच आहे. मुलांना दोन वेळच्या जेवणासाठी आठवडय़ाला दोन क्विंटल धान्य लागतं. ‘मैत्र मांदियाळी’ या संस्थेतर्फे दर महिन्याला किराणा मिळतो. कधी कधी तोही अपुरा पडतो. अनेक संस्था, दानशूर व्यक्ती या शाळेच्या मदतीसाठी पुढं येत आहेत, पण या शाळेचा आवाका मोठा आहे. या सर्व मुलांना शिकवून स्वत:च्या पायावर उभं करण्याचं व्रत मतीन भोसले, त्याची पत्नी सीमा, मुख्याध्यापक ओंकार पवार, समितीचे उपाध्यक्ष आलेंद्र पवार, नामसिंग पवार, नूरदास भोसले, प्रकाश पवार, सचिन भोसले, आधीन भोसले, मनीष भोसले, रणजीत पवार आदी सहकाऱ्यांनी हाती घेतलं आहे.
दांभिकपणाला ‘प्रश्नचिन्ह’चे सडेतोड उत्तर!
- मंगरूळ चव्हाळामधील या निवासी शाळेतल्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना शिकूनसवरून समाजात ताठ मानेने जगता यावे, त्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी शाळेला मदतीची गरज आहे, ती मदतीच्या हातांची.
- हेच मदतीचे हात मुलांचे जीवन घडवणार आहेत. संस्थेला या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना राबवायच्या आहेत.
शिकून मोठं व्हायचंय
धुळे जिल्ह्यातल्या एनकरवाडीचा शिवा पवार आश्रमशाळेत नववीत शिकतो. त्याचे वडील तुरुंगात आहेत. शिवाला इंजिनीअर व्हायचं आहे. यशोदा भोसले ही लहानशी मुलगी नागपूर येथे भीक मागायची. तिला शिकून समाजासाठी योगदान देण्याची इच्छा आहे. पिंकी राठोड ही तेलंगणातील आदिलाबादची. तिला भरपूर शिकायचं आहे. त्या घाणेरडय़ा विश्वातील आठवणीही तिला नकोशा होतात.
प्रश्नचिन्ह आश्रमशाळा अमरावती
प्रश्नचिन्ह या आश्रमशाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ३५ विद्यार्थ्यांची एक पिढी बाहेर पडली आहे. निकाल ८६ टक्के लागला. यातील अनेक मुलांना लष्करात जाऊन देशसेवा, तर काही मुलींना परिचारिका बनून रुग्णसेवा करायची आहे. काहींना पोलीस सेवेत जायचे आहे. अजून खूप काम बाकी आहे..
संस्थेपर्यंत कसे जाल?
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नागपूर ते औरंगाबाद महामार्गावरील शिंगणापूर चौफुलीपासून चार किमीवर मंगरूळ चव्हाळा गाव आहे. गावाजवळील फासेपारधी वस्तीपासून उजवीकडे ‘प्रश्नचिन्ह’ ही आश्रमशाळा आहे.
धनादेश या नावाने पाठवा.. आदिवासी फासेपारधी सुधार समिती
(Adivasi Fasepardhi Sudhar Samiti)
(संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांना कलम ८०जी (५) नुसार करसवलत प्रतीक्षेत आहे.)
धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०५३६
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ – २७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
नगर कार्यालय
संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००