‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याचे यंदा सातवे वर्ष आहे. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२४’च्या परीक्षक समितीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, राज्याच्या उद्याोग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ आमटे यांचा समावेश होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याबाहेरूनही या पुरस्कारासाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज केले होते.
चौफेर कलात्मक वाटचाल
‘तारे जमीन पर’ या २००७ साली प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या चित्रपटात एका लाघवी चेहऱ्याच्या मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अत्यंत सहज अभिनय, चेहऱ्यावरचा कमालीचा गोडवा आणि एकंदर व्यक्तिमत्त्वातच असलेली सकारात्मक ऊर्जा या तिच्या गुणांचा प्रभाव तिच्या भूमिकांमधून प्रेक्षकांवर न पडता तर नवल! त्यानंतर ओळीने ‘मानिनी’, ‘हुप्पा हुय्या’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ अशा मराठी चित्रपटांमधून अभिनेत्री गिरिजा ओक हे नाव घराघरात परिचयाचे झाले. अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळाल्यानंतर हमखास यश मिळवून देणाऱ्याच चित्रपटांची रुळलेली वाट धरायचा मोह कलाकारांना होतो. गिरिजाने मात्र यशाच्या शिखरावर असतानाही केवळ चित्रपट न करत बसता, जाहिराती, रंगभूमी, हिंदी मालिका अशा प्रत्येक माध्यमांतून स्वत:तील कलाकाराला अजमावून पाहिले.
मोठमोठया नामांकित ब्रॅण्डसच्या ऐंशीहून अधिक जाहिरातीतून सातत्याने दिसणाऱ्या गिरिजाने त्याचवेळी रंगभूमीवर ‘दोन स्पेशल’सारखे भिन्न विषय, प्रकृती असलेल्या नाटकात काम केलं. हिंदीत तिने ‘लेडीज स्पेशल’सारखी मालिका केली. भाषा आणि माध्यमांच्या कुठल्याही चौकटी न मानता सातत्याने चोखंदळ आणि कलात्मक वाटचाल करण्याची तिची भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच गेली काही वर्षे भिन्न भाषिक, भिन्न शैलीतील विविध नाटकांतून ती काम करत आहे. ओटीटी माध्यमांबरोबरच इतरही सगळ्या माध्यमांमध्ये नवे काही धुंडाळत तिची चौफेर कलात्मक वाटचाल अशीच सुरू राहणार असल्याचेही तिने सांगितले.
टेबल टेनिसमध्ये ‘सुवर्ण’यश
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत जन्मलेल्या दिया चितळेने टेबल टेनिसमध्ये आपली कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच तिने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. खार जिमखान्यापासून सुरू झालेला दियाचा प्रवास तिला भारतीय संघापर्यंत घेऊन गेला. भारतीय महिला टेबल टेनिसच्या आघाडीच्या खेळाडूंमध्ये दियाचा समावेश होतो. जपान, चीन, कोरिया आणि काही युरोपीय देशांची मक्तेदारी असलेल्या या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करताना दियाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘आयटीटीएफ’ जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या महिला संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते. त्या संघात दियाचा समावेश होता. वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दियाने महिला सांघिक गटात सुवर्ण कामगिरी केली. २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या भारताच्या महिला टेबल टेनिस संघातही दियाचा समावेश होता. यामध्ये महिला दुहेरी व सांघिक विभागात भारताने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती. २०२२-२३च्या हंगामात दिया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या टेबल टेनिस संघाचा भाग होती. जागतिक टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळलेल्या भारतीय संघातही तिचा समावेश होता. ‘डब्ल्यूटीटी’ स्पर्धेत तिने पहिल्यांदा सुवर्ण कामगिरी केली. यासह ‘डब्लूटीटी’ युवा कन्टेन्डर स्पर्धेत (मे, २०२२) तिने १९ वर्षांखालील विभागात सुवर्णयश मिळवले होते. अगदी लहान वयात टेबल टेनिससारख्या खेळात दिया चितळेने मिळवलेले यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
जन्मभूमीच कर्मभूमी
आपल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. अमरावतीच्या अमित आरोकरने तेच केले. अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर २०१०मध्ये अमितने छोट्या खोलीत एलईडी दिवे आणि उपकरणांची निर्मिती करत इन्व्हर्टर सेवेचा व्यवसाय केला. सातत्यानं प्रयत्न केल्यावर अमितला स्वत:चा खरा उद्याोग सापडला आणि ‘ईसीई (इंडिया) एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा श्रीगणेशा झाला. अमित आरोकर हा या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. विदर्भातील पहिला सौर ऊर्जा उपकरणे तयार करण्याचा कारखाना त्याने उभारला. ही कंपनी विविध सौर उत्पादने, एलईडी डिस्प्ले पटल, ट्रॅफिक सिग्नलिंग सेवा पुरवते. शिवाय ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड सौर पटल उभारून देण्याचे कामही करते. रोजगारासाठी इतर कुठेही न जाता अमरावती येथेच हा उद्याोग उभारण्याचे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. अमितने अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर सिपना कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुणे आणि बंगळूरु येथे मोठ्या पगाराच्या संधी खुणावत असताना जन्मभूमीतच राहून उद्याोग स्थापन करण्याचे स्वप्न अमितने पाहिले आणि ते पूर्ण केले. स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे ध्येय त्याने पाहिले आणि गेल्या सहा वर्षांत अमितने ७०० जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला आहे. १०६ उद्याोजकांना मदतीचा हात दिला आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांनी त्याने आपले ध्येय साध्य केले आहे.
तालवाद्याची प्रयोगशील परंपरा
तबला हे एक अभिजात हिन्दुस्थानी संगीतात वापरले जाणारे तालवाद्या. उस्ताद अल्लारखाँ, पंडित सामताप्रसाद, उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी तबला हे वाद्या जागतिक स्तरावर नेले. आता तबलावादनाची समृद्ध परंपरा पुढे नेत आहे ओजस अधिया. ओजसची तबलावादनाची आवड त्याचे वडील डॉ. योगेश यांनी हेरली. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षीच ओजस विख्यात तबलावादक मृदंगराज यांचा गंडाबंद शिष्य झाला. त्यानंतर तबलावादनाचे शास्त्रीय धडे गिरवत त्याचा प्रवास सुरू झाला आणि आज नव्या पिढीतील महत्त्वाचा तबलावादक म्हणून ओजसने ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे मंत्रमुग्ध वादन ओजसच्या सातत्याने कानी पडले आणि त्याला या दिग्गजांबरोबर तबलावादनाची संधी मिळाली. बेगम परवीन सुलताना, पं. विक्कू विनायकराम, उस्ताद राशीद खान, उस्ताद शुजात खान, कौशिकी चक्रवर्ती अशा अनेक मान्यवरांना ओजसने तबलासाथ केलीय. ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या ‘लिटल वंडर्स’ या कार्यक्रमासाठी जगभर फिरण्याची संधी ओजसला मिळाली. विविध देशांत ५०० हून अधिक कार्यक्रमांत ओजसने सादरीकरण केले. यापैकी काही कार्यक्रमांची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे. ओजसचा संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. प्रयोगशील पद्धतीने तबलावादनाची परंपरा पुढे नेणारा ओजस आढिया या तालवाद्याद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध करतो.
गडचिरोलीच्या विकासास हातभार
उत्तम समाजनिर्मितीसाठी कायदा आणि सुव्यवस्था महत्त्वाची… नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या गडचिरोलीसारख्या भागात कायदा- सुव्यवस्था राखण्यासह समाजाचे सक्षमीकरण करणे महत्त्वाचे असून पोलीस अधीक्षक नीलोत्पल हे कार्य उत्तमरित्या करत आहे. नीलोत्पलच्या प्रभावी नियोजनामुळे या भागांत दोन वर्षांत २७० किलोमीटरचे रस्ते, ३७ पुलांचे काम पूर्ण होऊन ७५ वर्षांत पहिल्यांदाच बससेवा सुरू झाली. ३८२ मोबाइल मनोरे उभारणीमुळे सुसंवाद शक्य झाला, त्याशिवाय सहा नवीन पोलीस ठाणी, मदत केंद्रांमुळे दुर्गम भागात कायदा-सुव्यवस्था प्रभावी झाली. परिणामी, उत्तर गडचिरोली नक्षलवादीमुक्त झाला, तर दक्षिण गडचिरोलीमध्ये नक्षलवाद शेवटच्या टप्प्यात आहे. डाव्या कडव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे दुर्गम भागात रस्ते, पूल, मोबाइल मनोरे या दळणवळण आणि संपर्क सुविधांचे जाळे निर्माण होण्यास अडथळे आले. आरोग्य सुविधा व रोजगार निर्मिती होऊ शकली नव्हती. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर दोन हजार चौरस किलोमीटर जंगल परिसरात पोलीस विभागाचे मदत केंद्र अस्तित्वात नव्हते. या सर्व आव्हानांना पेलत गडचिरोली पोलीस प्रशासनाने निलोत्पलच्या प्रभावी नियोजनातून मागील दोन वर्षांत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर अबुझमाड आणि नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारावर एकूण सहा नवी पोलीस ठाणी, मदत केंद्रे उभारली. येथील पोलीस प्रशासनाचा सहभाग वाढवला. त्यानंतर या भागांना जोडणारे रस्ते पोलीस संरक्षणात बांधण्यात आले. या भागांत ७५ वर्षांत प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये कृषी समृद्धी योजनेंतर्गत एकूण १६ कृषी सहलींचे आयोजन केले. आज गडचिरोली मागास म्हणून नव्हे, तर विकसित जिल्हा म्हणून मार्गक्रमण करत असून याचे श्रेय निलोत्पलला जाते.
दृष्टिहीनांना नवी दृष्टि
दृष्टिहीन व्यक्तींना ‘नवी दृष्टी’ देण्याचे महत्त्वाचे कार्य करतोय मुंबईचा डॉ. सुमित पाटील. सुमितने त्याच्या ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून दृष्टिहीनांना रंगाची ओळख करून देण्यासाठी रंगगंध, रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी चमकणाऱ्या पांढऱ्या काठीची निर्मिती, ब्रेल टंकाची निर्मिती, औषधांच्या पाकिटावर ब्रेलचा समावेश असे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वीरीत्या केले. दृष्टिहीनांना सुलभता आणि सुगम्यता मिळवून देण्याचे त्याचे ध्येय असून त्यासाठी तो प्रयत्नशील आहे. दृष्टिबाधित, दृष्टिहीन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी चित्रकला आणि हस्तकलेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याच्या त्याच्या उपक्रमात ३५०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला आहे. ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेतर्फे दृष्टिबाधित मुलांना विविध सुगंधांचा समावेश असलेले विशिष्ट किट दिले जाते. हे किट मिळाल्यावर या सुगंधांचा वापर कलात्मक प्रकल्प, संवेदनांचा शोध आणि स्वत:चे सुंगध तयार करण्यासाठी केला जातो. अपंगांच्या प्रश्नांवर सुमित लघुपट, माहितीपट, सांस्कृतिक कार्यक्रमही करतो. रंगगंध या संकल्पनेवरचा ‘तरंग’ हा लघुपट अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. राष्ट्रीय स्तरावरील ११२ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५७ पुरस्कार या लघुपटाला मिळाले आहेत. सुमित महाराष्ट्रासह देशभरातील शाळांमध्ये दृष्टिहीनांसाठी कार्यशाळा घेतो, उपक्रम करतो. आपल्याच समाजाचा एक अविभाज्य भाग असलेल्या दृष्टिबाधित, दृष्टिहीनांच्या प्रगतीसाठी डॉ. सुमित पाटील डोळस प्रयत्न करत आहे.
सुशासनासाठी तत्पर…
प्रशासनात बदल घडविण्यासाठी अधिकाऱ्याकडे इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी असलेला आयुष प्रसाद योग्य नियोजन करून प्रशासनात बदल घडवू पाहत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा २०१४-१५ उत्तीर्ण झाल्यावर आयुषची पहिली नेमणूक धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर येथे झाली. त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर काम करताना बांधकाम कामगारांचा स्वतंत्र गट स्थापन करून कामगारांना वैयक्तिक शौचालयांची कामे मिळवून दिली. पुणे जिल्ह्यातील खेड येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना अनेक वर्षांपासून प्रलंबित ३२ भूसंपादन प्रकरणांचा निपटारा केला. शिवाय आळंदी, भीमाशंकर तीर्थस्थळांचा विकास आराखडा तयार करण्यातही त्याने मोलाची भूमिका निभावली. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांसह सुसज्ज आश्रमशाळा, तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प, पुणे जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून प्रशासकीय सुधारणांवर भर, शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया, पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळा, शाळांची गुणवत्तावाढ, कुपोषणमुक्तीसाठी काम दखल घेण्याजोगे ठरले. जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर सातपुडा पर्वतरांगांमधील अतिदुर्गम अशा यावल तालुक्यातील आंबापाणी गावापर्यंत २० किलोमीटर पायपीट त्याने केली. तेथील आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा जाणून घेण्यासाठी नागरिकांशी संवाद साधला. जळगाव जिल्हा प्रशासनाने प्रसाद याच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संवाद सेवा सुरू केली.
मतदारांच्या कलकौलाचा अचूक होरा
जगभरातील निवडणुकांमध्ये सेफॉलॉजी अर्थात सांख्यिकी, विदा, तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. याच क्षेत्रात पुण्यातील सुशीलकुमार शिंदे त्याच्या ‘द स्ट्रेलेमा’ या कंपनीच्या माध्यमातून कार्यरत आहे. शास्त्रीय पद्धतीने सांख्यिकीचे व्यावसायिक प्रारूप विकसित करून व्यापक स्तरावर काम करणारी ‘द स्ट्रेलेमा’ ही राज्यातील एकमेव कंपनी ठरली आहे. निवडणूक निकालाचा कौल, जनमत चाचण्या, मतदार व राजकीय पक्षांच्या वर्तनाचा अभ्यास, धोरणे आणि त्यांचे परिणाम यांचा अभ्यास, या सर्वांसाठी लागणारे सर्वेक्षण करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे याने ‘द स्ट्रेलेमा’ची स्थापना २०२०मध्ये केली. कंपनीने चालू आर्थिक वर्षात १८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. मतदारांचे मानस व वर्तन, त्यांचा कल, कौल सेफॉलॉजीच्या शास्त्रीय पद्धतीने व संशोधनाद्वारे समजून घेणारी आणि या साऱ्याचे व्यावसायिक प्रारूप उभे करणारी ही कंपनी आहे. अचूकता आणि विश्वासार्हतेमुळे पाच वर्षांच्या काळात कामाचा ठसा कंपनीने उमटवला आहे. ‘द स्ट्रेलेमा’चा संस्थापक म्हणून सुशीलकुमारने सेफॉलॉजीचे प्रत्यक्ष उपयोजन करताना निरनिराळे प्रयोग केले. सेफॉलॉजीचे शास्त्र, तंत्र आणि त्यासाठीची कला यांच्या मिलाफातून त्याने या शास्त्राचे उपयोजनाचे स्वतंत्र सर्वंकष असे प्रारूप विकसित केले. शास्त्रीयरीत्या विदा संकलन आणि त्यासाठी अद्यायावत तंत्राचा वापर यावर तो भर देतो. गेल्या काही वर्षांत कंपनीने महाराष्ट्रासह गोवा, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांत आणि ५०० हून अधिक मतदारसंघांत सर्वेक्षणाचे काम केले आहे. संस्थेचे प्रारूप अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झाले आहे.
पुस्तक विक्री ते पुस्तक प्रकाशन
कौटुंबिक पार्श्वभूमी प्रतिकूल असताना निर्धाराने एक मुलगा उभा राहिला. दहावी नापास झाल्यावर घरोघरी वृत्तपत्र टाकताना त्याला वाचनाची गोडी लागली आणि त्याचे आयुष्य बदलू लागले. उदरनिर्वाहासाठी वेगवेगळी कामे करत तो पुस्तक विक्रीकडे वळला. विदर्भात पुस्तक प्रदर्शन भरवत त्याने पुस्तकांची दोन दुकानेही सुरू केली. इतरांची पुस्तके विकताना आपणच
पुस्तके प्रकाशित करावी असे त्याला वाटले आणि जन्म झाला ‘मधुश्री प्रकाशन’चा… युवा प्रकाशक शरद अष्टेकरचा प्रवास सध्याच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. उद्याोग साहित्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शरद अष्टेकर याची ‘मधुश्री प्रकाशन’ ही संस्था मराठी पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील ठळक नाव आहे. २०१७ मध्ये पहिले पुस्तक प्रकाशित केल्यानंतर शरदने मागे वळून पाहिले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखकांसह नव्या दमाच्या मराठी लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. या प्रकाशन संस्थेद्वारे केवळ आठ वर्षांत ३००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नव्या पिढीच्या लेखकांची पुस्तके आवर्जून प्रकाशित करतानाच शरदने युवाल नोआ हरारी यांच्यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तकेही मराठीत आणली आहेत. पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनवे मार्ग शोधत शरद अष्टेकरने कोट्यवधींची उलाढाल साध्य केली आहे. जगभरातील उत्तम साहित्य मराठीमध्ये आणतानाच मराठीत लिहिणाऱ्या तरुण लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या पिढीचा व्यावसायिक, उद्याोजक, प्रकाशक असलेल्या शरद अष्टेकरचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
कलाक्षेत्रातील लढवय्या
माहितीपट, लघुपट, चित्रपट आणि डिजिटल युगातील पॉडकास्टसारख्या माध्यमातून भवतालातील सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय मुद्यांवर लढत राहणारा कलाक्षेत्रातील लढवय्या म्हणजे वरुण सुखराज. चित्रपट निर्माता, लेखक, स्तंभलेखक अशी बहुपेडी ओळख असलेल्या वरुणने दीर्घकाळ जाहिरात क्षेत्रात काम केले. त्यानंतर मात्र एका टप्प्यावर त्याच्या आयुष्याने पूर्णत: वळण घेतले आणि त्याच्या कलात्मक प्रवासाला नवी दिशा मिळाली. भवतालातील सामाजिक- राजकीय उलथापालथींकडे लक्ष केंद्रित केलेल्या वरुणने आपल्या कथाकथनातून महत्त्वाचे विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा जणू विडा उचलला. सुरुवातीला त्याने महाराष्ट्र पिंजून काढला. शेतकरी आत्महत्यांनी उभा महाराष्ट्र पिळवटून निघाला होता. या आत्महत्यांमागची शेतकऱ्यांची हतबलता समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या पाठी त्यांच्या विधवांना खरोखरच आर्थिक मदत मिळते का? हे पाहण्यासाठी वरुण महाराष्ट्रभर फिरला. त्यावर त्याने केलेल्या १२ भागांच्या माहितीपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ दिल्लीत वर्षभर चाललेले शेतकरी आंदोलनही तो टिपत राहिला आणि त्या नोंदी ‘टु मच डेमोक्रेसी’ या त्याच्या चित्रपटातून जागतिक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. या चित्रपटाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या तो आर्थिक समस्या आणि बँकिंग क्षेत्रातील आव्हाने या विषयाबरोबरच पर्यावरणीय बदलाच्या अनुषंगाने दोन माहितीपटांवर काम करत आहे. हे माहितीपट येत्या वर्षभरात प्रदर्शित होतील. याशिवाय, गेल्या दहा वर्षांत त्याने पर्यावरणीय विषयांवर प्रकाश टाकणारा ‘कार्बनिक’ हा लाईव्ह शो आणि ‘अरे ला कारे’सारखे नाटक विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे.