मुबलक पाण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ७० हजार एकर जमीन क्षारपड झाली आहे. यातील केवळ कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात ४० हजार एकर जमीन क्षारपड आहे. ही जमीन पुन्हा पिकाखाली यावी यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. यापैकी शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्यांने राबवलेला उपक्रमास यश मिळू लागले आहे. याविषयी…
पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्न ऊस पट्ट्यात खत, पाणी वापर अतिमुबलक झाला नि कृष्णाकाठची काळीशार सुपीक जमीन क्षारपड झाली. उजाड शेतीकडे फिरकण्याचेही कष्ट कोणी घेईनासे झाले. शिरोळच नव्हे तर राज्याच्या अनेक भागांमध्ये क्षारपड जमीन ही समस्या बनली आहे. भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झाल्याने जमिनीत क्षार साचू लागतात. अशा जमिनी पाणथळ होऊन क्षार व चोपनयुक्त बनल्या आहे. पश्चिम महाराष्ट्रातच सुमारे ७० हजार एकर तर कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात ४० हजार एकर जमीन क्षारपड झाली आहे. ही जमीन पुन्हा पिकाखाली यावी यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. यापैकी शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने राबवलेला उपक्रम उल्लेखनीय ठरत आहे.
सच्छिद्र जल प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारण्याच्या मोहिमेतून गेल्या ७- ८ वर्षात कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यात सुमारे ८ हजार एकर शेतीमध्ये पुन्हा हिरवे सोने उगवू लागले आहे. संपन्नतेची पहाट पुन्हा इथल्या क्षितिजावर उगवली आहे. अशा या प्रगोगाला देशात मान्यता तर मिळालीच आहे. आता तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. दत्त कारखान्याने सादर केलेला ‘सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम’ हा शोधप्रबंध गेल्या आठवड्यात आय. ए. पी. एस. आय. टी., क्यू न्होन, रिन्ह दिन्ह, व्हिएतनाम येथे आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन २०२४ परिषदेत सादर करण्यात आला. साखरउद्याोगातील मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कृष्णाकाठच्या दत्त कारखान्याची क्षारपड जमिनीची यशकथा आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचली आहे.
हेही वाचा : लोकशिवार: भाजीपाल्यातून समृद्धी !
क्षारपड जमिनीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. कृषी उत्पादनाचा अति हव्यास आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने ही दुर्दशा उद्भवली आहे. मीठ फुटलेल्या जमिनीची समस्या भीषण रूपात पुढे येत आहे. अति तेथे माती असे म्हटले जाते. पण मातीतच अति झाले तर करायचे काय? हा चिंतेचा विषय. केवळ चिंता करून हा प्रश्न सुटणारा नव्हता. तसे पाहू गेल्यास क्षारपड मुक्तीचे बरेच प्रयोग झाले. पण त्याला पुरेशा प्रमाणात यश आले नव्हते. पाण्याचा निचरा हा त्यातील कळीचा मुद्दा. ही बाब हेरून उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी शास्त्रीय पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे ठरवले. अर्थात, निर्धार आणि अपेक्षित यश यात महद अंतर असते. ते किती असते हे गणपतराव पाटील आणि दत्त कारखान्यातील सहकाऱ्यांना हळूहळू उमगत गेले.
एक तर आधीच्या अपयशी – अपुऱ्या प्रयोगामुळे उजाड रानात पुन्हा काही पिकेल ही आशाच शेतकऱ्यांनी सोडून दिली होती. खेरीज, काही करायचे तर पैसे आणायचे कोठून हा सर्वात मोठा प्रश्न. त्याची जबाबदारी गणपतराव पाटील यांनी स्वत:च्या जबाबदारीवर अतिशय धाडसाने उचलली. धाडस केल्याशिवाय नौका पैलतीर जाणार नाही याचाही अदमास त्यांना आलेला होताच. स्व. सा. रे. पाटील उदगाव सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रती एकरी एक लाख रुपये अल्प व्याजाने ७ वर्षाच्या मुदतीसाठी १३ कोटी ४२ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातून गणेशवाडी, आलास, शेडबाळ येथील सुमारे १ हजार शेतकरी १५०० एकर जमीन सुधारणेच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले. याकरिता बँकेने १२ कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज दिले. उदगाव बँक व गणपतराव पाटील करीत असलेले हे वित्तीय धाडस अभ्यासकांच्या लेखी पूर्णत: गैर होते.
यातून ही मोहीम सन २०१६-१७ साली सुरू झाली. क्षारपडमुक्ती संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका घेणे, जनजागृती करणे, त्यांना एकत्रित करून संस्था स्थापन करणे, तसेच बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे, यासाठी स्वत: पुढाकार घेऊन काम करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील सात गावे, उत्तर कर्नाटकातील मंगावती, कागवाड यांसारख्या काही गावांमध्ये हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्यात आला. आतापर्यंत तब्बल ८ हजार एकर जमिनीत हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला असून आता तेथे ऊस, कडधान्य, गहू, भाजीपाला आदी विविध प्रकारची पिके घेतली जात आहेत. राजू जाधव (घालवाड) हे मिळेल तेथे शेतमजुरी करायचे. क्षारपड जमीन सुधारणा उपक्रम फलदायी ठरल्याने स्वत:च्या शेतीत त्यांनी उभ्या हयातीत प्रथमच एकरी ४३ टन उसाचे उत्पादन घेतल्याचे पाहिले. काशीम मुल्लाणी (कवठेसार) यांनी सर्वाधिक ४८ टन तर महादेव मगदूम (शेडशाळ) यांनी दोन एकरात ९३ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्याकडे लक्ष्मीची पावले दरवर्षी चालून येत आहेत.
ज्या जमिनीत कुसळही उगवणार नाही अशी ठाम धारणा झालेल्या हजारो शेतकऱ्यांची शेती आता बारमाही शेतपिकाने डवरलेली असून कृषी क्षेत्रातील अनोखा प्रयोग फलदायी ठरला आहे. कार्यक्षेत्रातील २३ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वनिधीतून प्रक्षेत्र विकास, बांध बंधिस्ती, पाण्याचा पाट, जमिनीस आकार देणे, भूसुधारक, हिरवळीची खते, उसाचे बेणे, खते व औषधे आदींचा खर्च करायचा आहे. तर सच्छिद्र निचरा प्रणालीसाठी प्रति हेक्टरी ६० हजार रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळत आहे. या प्रकल्पाअंतर्गत २५० कि.मी. मुख्य बंदिस्त पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. ८ हजार एकर जमिनीमध्ये कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणालीचे काम पूर्णत्वास जाऊन या जमिनी पिकावू झाल्या आहेत. शेतकरी वेगवेगळी पिके घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करत आहेत. त्यामुळे हा क्षारमुक्त जमीन प्रकल्प देशभरात पथदर्शक व ‘दत्त पॅटर्न’ म्हणून नावारूपास आला आहे.
हेही वाचा : Silk Worm Farming : आदिवासी शेतकऱ्यांचा रेशीम शेतीचा प्रयोग
ही प्रणाली कारखाना कार्यक्षेत्राबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागांसह सांगली जिल्ह्यातीलही दोन गावांत राबवली जात आहे. मुख्य बंदिस्त पाइपलाइन व सच्छिद्र निचरा प्रणालीस केंद्रीय क्षार जमिनी संशोधन केंद्र कर्नाल, हरियाणा या संस्थेने मान्यता दिली आहे. प्रारंभी कविकल्पना वाटणारा प्रकल्प सत्यात उतरला आहे. आणि आता तर तो आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत गौरवला गेला आहे. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, माती परीक्षण विभाग प्रमुख ए. एस. पाटील, प्रकल्प अभियंता कीर्तिवर्धन मिरजे यांनी सादरीकरणात भाग घेतला.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना
मागील पिढीकडून शेतकऱ्यांना क्षारपड जमिनीचा वारसा मिळाला. ही जमीन सुपीक करणे हे बिकट आव्हान असताना शेतकरी आणि साखर कारखाना या दोहोंच्या कष्टप्रद प्रयत्नातून यश आले आहे. क्षारपड जमीन सुधारणेचा हा अनोखा प्रयोग संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर देशासाठीही पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. शिवाय, या प्रयोगास व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत मान्यवरांनी गौरवले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. या भागातील इंच नि इंच जमीन क्षारपड करून दाखवू याची खात्री वाटू लागली आहे. याहीपेक्षा नाउमेद झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आशाआकांक्षा पेरण्याचे काम केल्याचे समाधान अधिक आहे. दहा हजारावर कुटुंबात पुन्हा एकदा पिकलेल्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न येऊ लागले आहे. हे कार्य खरेच मैलाचा दगड ठरणारे आहे. शिवाय, जिद्दी शेतकऱ्यांनी मनापासून साथ देत कर्जफेड प्रामाणिकपणे करून मोठ्या वाटचालीसाठी मनापासून केलेली मदत कौतुकास्पद आहे. – गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने केलेल्या या प्रयोगाला केंद्र शासनाने ११.५० कोटी रुपये अनुदान मंजूर करून आर्थिक पाठबळ दिल्याने कृषी क्षेत्रातील प्रयोगात एका रानवट यशोगाथेची नोंद झाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन पाणथळ सुधारणा योजनेसाठी केंद्र शासन ६० व राज्य शासन ४० टक्के अनुदान देते. तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर या अंतर्गत दत्त कारखान्याने राबवलेल्या पहिल्या टप्प्यातील ३५०० शेतकऱ्यांना ११ कोटी ४६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा होत असल्याचे कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी सांगितले. या प्रयोगाचे अनुकरण करण्यासाठी पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचे संचालक तसेच शेतकऱ्यांचे समूह दत्त कारखान्याला भेट देऊन अनुकरण करू लागले आहेत. – एम. व्ही. पाटील, कार्यकारी संचालक
dayanandlipare@gmail. com