हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातूनच सामाजिक-राजकीय क्षेत्रात आलेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ.. गेले चार-पाच महिने करोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी अव्याहतपणे ते कार्यरत आहेत. पुण्याचं वैशिष्टय़ असलेल्या गणेशोत्सवाविषयी, त्यांच्या घरातला उत्सव, गणेशोत्सवाच्या आठवणींना मुरलीधर मोहोळ यांनी दिलेला उजाळा..
गणेशोत्सवाचं आणि तुमचं नातं काय?
* लाडक्या गणरायाच्या आगमनामुळे घरोघरी आनंदाचं, उत्साहाचं, प्रेमाचं वातावरण असते. मी स्वत: गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून गेली सव्वीस वर्षांपेक्षा जास्त श्री साई मित्र गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो. उत्सव जसजसा जवळ येतो तसतसा, आम्हा कार्यकर्त्यांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सर्वजण एकत्र येतात, गाठीभेटी होतात, ऋणानुबंध निर्माण होतात. गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते.
करोना काळातल्या या गणेशोत्सवाविषयी काय वाटतं?
* यंदा करोनाच्या पाश्र्वभूमीवर जल्लोष, दिमाखदारपणा नसला तरी कार्यकर्ता म्हणून मनातला उत्साह आणि भाव तसूभरही कमी झालेला नाही. पुणे शहरातील गणेशोत्सव सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त वर्षे प्रबोधनाची आणि लोकहिताची परंपरा जपून आहे. पण, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जड अंत:करणाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या संवेदनशील आणि समाजाभिमुख निर्णयाचे शहरातील सर्व गणेश मंडळांनी स्वागत करीत पाठिंबा दर्शवला. त्याबद्दल पुण्याचा प्रथम नागरिक या नात्याने समस्त गणेश मंडळाचे मन:पूर्वक आभार मानतो.
गणेशोत्सवातील नियमावली नेमकी कशी आहे?
* गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षीप्रमाणे यंदा आगमनाच्या आणि निरोपाच्या मिरवणुका काढता येणार नाहीत. गणरायाची पूजा आणि आरतीसाठी जास्तीत जास्त पाच व्यक्तींना हजर राहता येईल. तसेच नागरिकांनी घरातील गणपतीचे, घरीच विसर्जन करावे, अशा प्रकारची नियमावली केली आहे. करोनाचा शहरातील वाढता प्रसार रोखण्यासाठी या नियमावलीचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी ही विनंती.
टाळेबंदीचे नैराश्य गणेशोत्सव दूर करेल का?
* करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून टाळेबंदी सगळ्यांनीच अनुभवली आहे. पुणे शहरात ९ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला. त्याच्या आधीपासून महापालिकेने तयारी सुरू केली होती. त्याचा फायदा नक्कीच झाला आहे. टाळेबंदीच्या काळात करोना विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत झालीच, पण हा काळ प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा नैराश्य आणि साचलेपण घेऊन आला. त्यावर मात करण्यासाठी गणेशोत्सवाचं हे पर्व निश्चितच मांगल्य घेऊन येईल.
तुमच्यातील कार्यकर्ता महत्त्वाचा की महापौर म्हणून घेतलेले निर्णय
* करोनाच्या संकटकाळात एवढय़ा मोठय़ा कालखंडाची परंपरा असलेला गणेशोत्सव साधेपणाने करावा लागणार याचा अंदाज मला सुरुवातीपासून आला होता. मात्र, यात गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आणि शहराचा प्रथम नागरिक अशी दोन टप्प्यात माझ्या मानसिकतेची विभागणी झाली होती. अर्थात ते स्वाभाविकही आहे, कारण माझ्यातला कार्यकर्ता हा गणेशोत्सवातच घडला गेला. पण, जबाबदारीचे भान लक्षात घेत माझ्यातला उत्साही कार्यकर्ता मागे ठेवावा लागला आणि शहराच्या व्यापक हिताचा विचार करत जड अंत:करणाने कठोर निर्णय घ्यावे लागले. यात सर्वच गणेशोत्सव मंडळाकडून मिळालेली सकारात्मक साथ अत्यंत महत्त्वाची आहे. जवळपास आठ शतकांची परंपरा असलेली आपली वारी समाजाच्या हिताचा विचार करत साधेपणाने होते, तर गणेशोत्सव का नाही? हाही विचार मनात होता.
पुण्याचा प्रथम नागरिक आणि गणेशोत्सव मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता या नात्याने सर्वाना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. हा गणेशोत्सव घरीच राहून साजरा करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.