गुलजार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीतकार म्हणून माझ्या प्रवेशाचा ‘व्हिसा’ होत्या त्या! मी सचिनदांकडे निव्वळ  मदतनीस म्हणून काम करत होतो. लता मंगेशकर काही कारणांमुळे सचिनदांवर नाराज होत्या. ती नाराजी संपल्यावर त्या सचिनदांकडे परत गायला आल्या तेव्हा माझं पहिलंच गाणं होतं, ‘मोरा गोरा अंग लै ले..’ तेव्हा माझी त्यांची पहिल्यांदा भेट झाली . त्यामुळे मला लता मंगेशकर आठवतात त्या तिथपासून.  तेव्हाही त्या आकाशात डोक्यावर तळपणाऱ्या सूर्यासारख्या होत्या. त्या तेव्हा त्यांच्या कारकीर्दीच्या शिखरावर होत्या. त्यांना कायम तसंच बघितलं आहे.  पण सगळय़ात सुंदर गोष्ट ही की अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही तो सूर्य जमिनीवर उतरून भेटत होता. त्यांनी आम्हाला कधीच आम्ही ज्युनियर होतो हे जाणवून दिलं नाही. त्या आम्हाला बोलावून  ‘बसा’ म्हणत, बोलत.  ‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है.. गर याद रहें’ हे गाणं ‘किनारा’साठी लिहिलं, ते स्वत:च्या आवाजाबद्दल असल्याचं लताजींनाही जाणवलं, त्यांनी कौतुक केलं तेव्हा मी गमतीनं म्हणालो होतो : आता लोक तुमची स्वाक्षरी मागतील तेव्हा तुम्ही या गाण्याचीच आठवण द्या!

 मी इतकी माणसं बघितली आहेत, पण त्या आणि आशाजी दोघीजणी अशा होत्या की गाण्यांच्या तालमींनाही त्या यायच्या. सचिनदांच्या गाण्यांचं रेकॉर्डिग असो, मदनजींच्या गाण्यांचं रेकॉर्डिग असो या दोघी बहिणी रेकॉर्डिगला यायच्या. म्हणजे आम्ही आकाशात जो सूर्य बघत होतो, त्याचे पाय जमिनीवर होते. त्यांचे पाय जमिनीवरून कधीही हलले नाहीत. आजही अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही लता मंगेशकर माहीत असतात. त्याने त्यांची गाणी ऐकलेली असतात. आजही ऐकत आहेत. माझ्या इथे काम करणारी माणसंदेखील ‘लताजी’ नाही, तर लता मंगेशकर गेल्या, असं मला सांगत होती. सामान्य माणसाशी त्यांचं असं नातं आहे. मी अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहे. सकाळी उठून रेडिओ लावला की पहिला सूर लता मंगेशकरांचाच कानावर पडायचा. दुपारी, संध्याकाळी, रात्री रेडिओ लावला की त्यांचं गाणं ऐकायला मिळतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत त्यांची वेगवेगळी गाणी कानांवर पडतात. त्याशिवाय होळी आली लता मंगेशकरांचं गाणं.. रक्षाबंधन आलं त्यांचं गाणं.. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये त्यांचं गाणं.. बैसाखी आली तर त्यांचं गाणं, त्यांनी प्रत्येक भाषेत गाणं गायलं आहे. दिवाळी असो, ईद असो, कोणताही सण असो.. एवढंच कशाला लग्न असलं तरी त्यांचंच गाणं..

माझं असं म्हणणं आहे की शी वॉज कल्चर ऑफ एव्हरीथिंग. लता मंगेशकर म्हणजे भारताची दैनंदिन संस्कृती. त्या म्हणजे सगळय़ा जाती, धर्माच्या पलीकडे जाणारी भारताची संस्कृती. त्या म्हणजे कला, त्या म्हणजे संगीत. एवढंच कशाला, ‘लोकसत्ता’च्या संपादकांनी ज्याची आठवण दिली ते ‘खामोशी’ चित्रपटातलं माझं गाणं, ‘हमने देखी है इन आँखो की महकती खुशबू..’ आधी नायकासाठी लिहिलं होतं.  संगीतकार होते हेमंत कुमार, त्यांनी ते लताजींना देण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी हे गाणं नायिकेसाठी कसं नाही, ते स्त्रीचं गाणं म्हणून मी पाहात नाही, असं सांगितलं. पण हेमंत कुमारांचा निर्णय : एवढी अनवट चाल लताजीच गातील. हवं तर सिच्युएशन बदला. आता कळतंय.. लताजींच्या गाण्यानं जाती, धर्म वा भाषांमधलाच भेद नाही तर लिंगभेदही मिटवला. त्या आपल्यामध्ये होत्या पण आता त्या सूर्याच्या तेजामध्ये विलीन झाल्या आहेत. आताही त्यांच्या स्वरांचं चांदणं आपल्यावर तसंच बरसणार आहे. सूर्याचं तेज कधीच कमी होणार नाही, तसंच लता मंगेशकरांच्या बाबतीतही आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lyricist gulzar emotionally remembers lata mangeshkar zws
Show comments