|| डॉ. अभय खानदेशे

केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे ‘भारतरत्न’. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा अपवाद वगळता एकाही अभियंत्याला ‘भारतरत्न’ मिळालेले नाही. त्यामुळे विश्वेश्वरय्या सर्वच अभियंत्यांसाठी मानिबदू. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे स्मरण..

Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins in dharashiv
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना, तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ
Disagreements in sports over government authority Controversy over highest sports award again
सरकारच्या अधिकारावरून क्रीडाक्षेत्रात मतभिन्नता; सर्वोच्च क्रीडा पुरस्कार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

आज अत्यंत लहान सरकारी पुरस्कारासाठी मोठय़ा व्यक्तींची नेत्यांच्या समोर लाचारी बघताना विश्वेश्वरय्याचा भारतरत्नचा किस्सा दीपस्तंभ ठरावा. जेव्हा त्यांना भारतरत्न स्वीकारणार का याबाबत केंद्र सरकारकडून चौकशी झाली तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र टाकून विचारणा केली, ‘हा सन्मान स्वीकारल्यानंतर मला सरकारच्या धोरणावर टीका करण्यास बंधने येणार असतील, तर मला हा सन्मान नको.’ उलट टपाली पंडितजींनी कळविलं, ‘‘भारतरत्न  हा आपल्या देशाचा किताब आहे. माझ्या सरकारचा नव्हे. सन्मान स्वीकारल्याने तुम्ही सरकारचे िमधे होण्याचं काहीही कारण नाही.’’

विश्वेश्वरय्या शिक्षणाने सिव्हिल इंजिनीअर. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे. महाराष्ट्राचा त्यातही खासकरून पुण्याचा आणि त्यांचा संबंध कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावरही राहिला. पाटबंधारे खात्यात कार्यकारी अभियंता असताना त्यांनी खडकवासला प्रकल्पावर काम केलेलं आहे. संशोधन आणि पेटंट यांचा शास्त्रज्ञांशी संबंध येतो असं आपला सर्वसाधारण समज. या महान सिव्हिल इंजिनीअरने १९०३ साली धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचं पेटंट मिळवलं. धरणात एका विशिष्ट पातळीच्यावर पाण्याचा साठा गेल्यावर, दरवाजे आपोआप उघडले जातात आणि पाणी कमी झाल्यावर मानवी हस्तक्षेपाशिवाय बंद होतात.  किरकोळ तांत्रिक बदल सोडले तर आपण आजही त्याच डिझाइनची गेट्स बनवितो.

आजकाल करिअरच्या मध्यात नोकरी सोडून किंवा रजा घेऊन, नवीन काही शिकण्याची टूम आली आहे. प्रख्यात व्यवस्थापन महाविद्यालयेही त्याला प्रोत्साहन देतात. याची सुरुवातही विश्वेश्वरय्या यांच्या नावावर. १९०८ साली, वयाच्या ४७व्या वर्षी सरकारी वरिष्ठ पदाच्या (अधीक्षक अभियंता) नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. कामातून नाही. उलट नंतर त्यांची कारकीर्द जास्त बहरली. एक वर्ष परदेशात राहून त्यांनी अभियांत्रिकीचं नवीन ज्ञान आत्मसात केलं. हा नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याचा त्यांचा उत्साह नंतरही कायम राहिला. आवडीचा विषय होता कारखाने, स्टीलपासून मोटारगाडय़ांपर्यंत आणि रेशीमपासून साबणापर्यंत. देश होते खासकरून अमेरिका, युरोप आणि जपान. हे उच्चशिक्षण संपवून आल्यावरची त्यांची पहिली कामगिरी होती हैदराबादची पूर समस्या.

आज केरळच्या महाभयंकर पुराच्या पाश्र्वभूमीवर आठवतोय. २८ सप्टेंबर १९०८ मध्ये, बरोबर ११० वर्षांपूर्वी  हैदराबाद शहरात, मुसी नदीला असाच भयानक पूर आला होता. जवळपास ५० हजार नागरिक मृत्युमुखी पडले तर लाखो बेघर झाले होते. निम्म्याहून अधिक शहर नष्ट झालं. मुसीला येणारा पूर आणि त्यामुळे होणारं नुकसान, हैदराबादला नवीन नव्हतं. पण हे संकट न भूतो न भविष्यती असं होतं. पूर निवारण झाल्यावर, सहावा निजाम मेहबूब अली खान याने ब्रिटिश रेसिडेंटचा, इंग्रज इंजिनीअर सल्लागार म्हणून नेमण्याचा आग्रह डावलून विश्वेश्वरय्या यांना पाचारण केलं. या पूर समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी.

तत्कालीन मुंबई आणि मद्रास प्रांताच्या मागील कित्येक वर्षांच्या पावसाच्या सरासरीचा त्यांनी अभ्यास केला.  हैदराबाद प्रांताच्या नद्या, ओढे आणि नाले यांची पाहणी केली. आणि मगच मूळ प्रश्नाला हात घातला. त्यांनी संरचना आणि नियोजन करून दिलेल्या उस्मानसागर आणि हिमायतसागर या धरणसदृश जलाशयांमुळे आजतागायत  हैदराबादला परत तसा पूर आलेला नाही. पुन्हा असा कधी पूर आला तर सुरक्षित जागी जाता यावं म्हणून, हैदराबादजवळ नवीन शहर नियोजन करून वसवण्यात आलं. आज आपण त्याला सिकंदराबाद म्हणून ओळखतो.

म्हैसूर स्टेटसाठी १९१२ ते १९१८ पर्यंत त्यांनी दिवाण म्हणून अत्यंत महत्त्वाचे काम केले. दिवाण म्हणून त्यांनी पाश्चात्त्य देशातील वेबेरीअन नोकरशाही पद्धत अमलात आणली जी म्हैसूरच्या तत्कालीन संस्कृतीपेक्षा बरीच वेगळी होती. ती अर्थातच खाबूगिरीच्या पूर्ण विरोधात होती.

कृष्णराज सागर धरणाचा फायदा, पिण्याच्या पाण्यापासून कारखान्यापर्यंत सर्वानाच मिळाला. शेती तर खऱ्या अर्थाने बहरली. खासकरून उसाची. त्यांनी मलबेरीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले (या झाडाच्या पानावर रेशमाच्या किडय़ांची पदास केली जाते.). आणि मग पुरेसे रेशीम उपलब्ध होईल अशी खात्री झाल्यावर रेशीम तंत्रज्ञान शिकण्यासाठी जपानला इंजिनीअर पाठवले. त्यानंतर रेशमाचे कारखाने काढले. दिवाळीला हमखास आठवण येते त्या म्हैसूर सँडल सोपचा कारखाना त्यांनी सुरू केला. हे सर्व आजही चालू आहेत. इतकंच काय कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्सची सुरुवात त्यांनी केली. सामाजिक भान असलेल्या या अभियंत्याने पुण्यातला गाजलेला डेक्कन क्लब आणि बंगरुळूचा सेंच्युरी क्लब यांची स्थापना केली.

विश्वेश्वरय्या यांनी जी काही पुस्तके लिहिली त्यातील १९३५च्या सुमारास प्रकाशित झालेले ‘प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया’ हे जास्त गाजलेलं पुस्तक. तोपर्यंत महालनोबीस सारखे संख्याशास्त्रज्ञ सोडले तर कोणीही संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा इतका सखोल विचार मांडला नव्हता. सकल राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी या विषयाचा त्यांनी केलेला ऊहापोह मुळातून वाचण्याजोगा.

शेतीच्या विकासातील महत्त्वाचे अडथळे त्यांनी विषद केले आहेत.

  • एकत्र कुटुंबात वाटण्या झाल्यामुळे कमी कमी होणारे प्रति माणसी शेतीचे क्षेत्र
  • शेती करण्याच्या पारंपरिक व जुनाट अशास्त्रीय पद्धती
  • शेणाचा चुकीचा वापर (उदाहरणार्थ खत करून उपयुक्तता वाढविण्याऐवजी, गवऱ्या करून जाळण्यासाठी)
  • स्त्री शक्तीचा तथाकथित सामाजिक बंधनामुळे अपुरा वापर.
  • ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा. अगदी आजही शेतीसंबंधात वरील प्रश्न बहुतांशी कायम आहेत. इतकंच काय अजून जटिल झालेले आहेत. त्यामुळे औद्योगिक अर्थव्यवस्था सुधारली की शेतीवरील अनाठायी अवलंबित्व आपोआप कमी होईल हा सिद्धांत आज ८३ वर्षांनीदेखील तंतोतंत लागू आहे. सरकारच्या निव्वळ उत्पन्नातला शेतीचा वाटा कमीत कमी व कारखानदारीचा वाटा जास्तीत जास्त असावा हा त्यांचा कायमचा आग्रह असे.

अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या अर्थविषयक योगदानाबद्दल संदेह व्यक्त केले असले तरी, १९३६च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी मांडलेल्या अनेक शिफारशींचा ठसा, स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाच्या आर्थिक धोरणात जाणवतो.

कामानेच काय, पण अति कामानेदेखील कोणी मरत नाही असा गाढ विश्वास असणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना प्रचंड काम करण्यासाठी पुरेपूर १०१ वर्षांचे निरोगी आयुष्य लाभले. या माणसाने कधीच आपल्या संस्कृतीचे गोडवे गायले नाहीत. उलट शक्य त्या व्यासपीठावरून संस्कृतीच्या अवास्तव स्तोमामुळे, आपण अंधश्रद्धाळू आणि परंपरावादी बनलो त्यामुळे  आर्थिकदृष्टय़ा आपण कसे मागासलेले राहिलो, हे समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ इंजिनीअर नाही तर सर्वसामान्यांनाही प्रेरणा मिळेल असे अफाट कार्य विश्वेश्वरय्या यांनी करून ठेवले आहे.

Story img Loader