देदेवेंद्र फडणवीस हे अतिशय धडाडीचे व कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांचा सर्वाधिक वेळ पक्ष वाढविण्याबरोबर निवडणुकांची तयारी करून त्याजिंकणे आणि शिवसेनेचे खच्चीकरण करणे, यावरच खर्च होत असल्याने त्यांना जनतेची कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे भाजपने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची गेल्या तीन वर्षांत पूर्तता केलेली नाही. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत असल्याचे किंवा दुटप्पीपणा करीत असल्याचे मत मुख्यमंत्र्यांकडून व अन्य भाजप नेत्यांकडून व्यक्त केले जाते. पण शिवसेना विरोधी पक्षात असली किंवा सत्तेत असली तरी कायम जनतेबरोबर राहिलेली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, हे शिवसेनेने आक्रमकपणे मांडले. त्यात चुकीचे काय केले? त्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाला. त्याचे श्रेय भाजपचे नेते आज घेत असले तरी अजून कर्जमाफी लालफितीत अडकली असून शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोचलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी पक्ष वाढविणे गैर नाही. पण पोलीस, आर्थिक यंत्रणा व शासकीय यंत्रणेचा गैरवापर करायचा आणि शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात वेळ घालवायचा, हे योग्य नाही. त्यामुळे भाजपला काही ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा मिळाल्याही असतील, पण शिवसेनेचे फारसे नुकसान झाले नाही. आगामी निवडणुकीत भाजप युती करण्यासाठी तयार आहे, पण शिवसेनेने विरोधकाची भूमिका सोडली पाहिजे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. मात्र शिवसेना कायमच जनतेबरोबर राहणार आहे. भाजपचे काही फुटकळ नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर बेताल आरोप करणार असतील, तर ते शिवसेना सहन करणार नाही. युती भाजपने तोडली आहे. ज्या वेळी भाजप राजकारणात अस्पृश्य होता, त्या वेळी शिवसेनेने रालोआत त्यांची सोबत केली. त्यामुळे युतीधर्म भाजपकडून शिकण्याची आम्हाला गरज नाही.

संजय राऊत (शिवसेना खासदार)

Story img Loader