बियाणे खरेदीपासून ते पिकाच्या संगोपनापर्यंत सारे काही शेतकऱ्याने करायचे.. पीक हाती आल्यानंतर बाजारात मात्र भाव दलाल ठरवणार.. कमी पिकले तरी फायदा व्यापाऱ्यांचा.. जास्त झाले तर हेच भाव पाडणार..हा तिढा सुटायचा कधी?  हिवरखेडच्या देवेंद्र गोरडेंना पडलेला हा प्रश्न. मध्यस्थांची फळी वगळून शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीची व्यवस्था उभारल्याने प्रश्न सुटू शकतील, या आशेने गेल्या वर्षी त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी संत्र्यांची विक्री थेट पुण्यातील रस्त्यांवर केली. पण, शेतकरी विक्रीच्या कामात गुंतला, तर त्याने शेती करावी कधी?.. एक मार्ग सापडला तर दुसरे प्रश्न सुरू..गेल्या वर्षी पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी अमरावतीत तांदूळ महोत्सवात धान्य विकले. चांगला दर मिळाला. या वर्षी धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळाले. पण, अशा महोत्सवांमधून किती धान्याची विक्री होणार? शेतकऱ्यांना परंपरागत बाजार व्यवस्थेवर विसंबून राहण्याखेरीज पर्याय नाही, अशा चर्चा झडत असतानाच काही तज्ज्ञ शेतकरी वेगळी वाट जोखण्याच्या प्रयत्नात आहेत. देवेंद्र गोरडे हे त्यापैकी एक.

हिवरखेड येथे त्यांची संत्र्याची बाग आहे. डिसेंबरमध्ये संत्र्याची विक्री एजंटामार्फत दिल्ली, चेन्नईच्या व्यापाऱ्यांना करायची आणि पुन्हा शेतीच्या कामाला लागायचं, ही परंपरागत व्यवस्था. गेल्या वर्षी संत्र्याचे भाव कोसळले. काही संत्री उत्पादक शेतकरी स्वत: पुणे, हैदराबाद, सूरत अशा शहरांमध्ये संत्री घेऊन गेले. त्यांनी तेथे थेट विक्री केली. पण, संत्र्याच्या वाहतुकीपासून ते साठवणुकीपर्यंत अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करावी लागली. आता तेच दर शेतातच व्यापऱ्यांकडून मिळत असतील, तर सातशे किलोमीटर जाण्यात काय हशील, हा देवेंद्र गोरडे यांचा सवाल आहे. त्यांनी यावर आता उत्तर शोधलं आहे. देवेंद्र गोरडे सांगतात, ‘भाजीपाला, धान्य हे थेट ग्राहकांपर्यंत नेणे आणि विकणे हे सहज शक्य आहे. संत्र्याचे तसे नाही. हे फळ लवकरच खराब होणारे. जास्त उत्पादन झाले की व्यापारी भाव पाडणारच. पण, त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित व्हावे लागेल. बाजारातील परिस्थिती ओळखून अभ्यास करून व्यापाऱ्यांशी वाटाघाटी कराव्या लागतील. दोन्ही लोकांना परवडू शकतील, असे दर ठरवून विक्रीची व्यवस्था करावी लागेल. आम्ही आता सेव्हन ग्रीनहिल्स अ‍ॅग्रो कंपनी स्थापन केली आहे. शेतकरी आता कंपनीमार्फत व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करतात. यात अधिक लाभ मिळण्याची शक्यता असते.’

धान्य महोत्सवात सहभागी झालेले शेतकरी गोपाल मालठाणे सांगतात, ‘‘धान्य महोत्सवाची एक चांगली संकल्पना आहे. दलाल, व्यापाऱ्यांच्या साखळीशिवाय थेट ग्राहकांना शेतमाल विकल्याने चांगले दर मिळाले. मी स्वत: माझ्या शेतातील ओवा आणि जवसाची विक्री केली. शेतकऱ्यांनीही आता परंपरागत शेतीऐवजी बाजारपेठेचे अंदाज घेऊन उत्पादन करणे शिकले पाहिजे. धान्य महोत्सवात सर्वच शेतकऱ्यांना सहभागी होता येत नाही. पण, त्याचा विस्तार झाल्यास, सरकारने शेतकऱ्यांसाठी व्यवस्था निर्माण करून दिल्यास शेतकरी पुढाकार घेतील. तुरीचे काय झाले, हे सर्वाना माहीत आहे. सरकारने हमीभाव जाहीर केला, पण व्यापाऱ्यांनी तो दिला नाही. आज कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्यस्थाचेच काम करतात, पण शेतकऱ्यांना कोणतीही हमी देत नाहीत. या बाजार समित्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वत: मालाची खरेदी केल्यास बरेच प्रश्न सुटू शकतील. अनेक ठिकाणी आता दोन्ही पातळ्यांवर काम सुरू झाले आहे. सरकारी अधिकारीदेखील मदतीला धावून येत आहेत. शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे वरिष्ठ अधिकारी रवींद्र ठाकरे, धान्य महोत्सवाच्या आयोजनात पुढाकार घेणारे रवी पाटील यांच्यासारख्या अनेकांचा हातभार ‘शेतकरी ते ग्राहक’ या उपक्रमाला लागला आहे. त्याचा विस्तार व्हावा, अशी इच्छा अनेक जण बाळगून आहेत.’’

सेवानिवृत्त अधिकारी आणि शेतीतज्ज्ञ धनंजय धवड सांगतात, धान्य महोत्सवातून शेतकऱ्यांना अधिकचा लाभ मिळू शकतो, पण याला मर्यादा आहेत. आजच्या बाजार व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले पाहिजेत. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावेत, ही अपेक्षा वर्षांनुवष्रे व्यक्त केली जात आहे. पण, अजूनही सर्वसमावेशक तोडगा निघू शकलेला नाही. नियमनमुक्तीतून शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील, असे वाटत होते. पण अस्तित्वातील व्यवस्था मोडीत निघणे तूर्तास तरी शक्य दिसत नाही. शेतकऱ्यांनी बाजारात शेतमाल नेण्यावाचून पर्याय नाही. आजची बाजार व्यवस्था ही स्पर्धात्मक आहे. जर शेतकऱ्यांना चांगले दर मिळावेत, अशी अपेक्षा असेल तर समांतर बाजारपेठ तयार का करू नये? त्यासाठी काही लोक पुढाकार घेत आहेत, पण हे सर्व प्राथमिक स्तरावरच आहे.

शेती अभ्यासक रवी पाटील यांच्या मते, ‘धान्य बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश होताच, पण ग्राहकांना चांगले, विनाभेसळ धान्य मिळावे, ही तळमळ होती. दोन्ही बाजारांना शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असे महोत्सव सातत्याने विविध शहरांमध्ये व्हायला हवेत.’

धान्य बाजार, समूह शेती, कृषी उत्पादक कंपनी या संकल्पना रुजवण्याचे प्रयत्न एकीकडे सुरू असताना अजूनही सशक्त पर्याय शेतकऱ्यांना दिसलेला नाही. बाजारातून शेतकऱ्यांना घामाला हक्काचे दाम मिळायला हवेत, ही अपेक्षा करणे चुकीचेही नाही.

Story img Loader