मुंबईत आजपासून महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३५ वे अधिवेशन सुरू होत असून प्रा. डॉ. ज. रा. दाभोळे  हे या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग..

जागतिकीकरण व तंत्रज्ञानाचा सुसाट वेग या दोन घटनांमुळे आजच्या जगासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे आज उत्पादनासाठी मानवी श्रमाची गरज अतिशय कमी झाली आहे. भविष्यात येऊ  घातलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’सारख्या शोधांनी ही गरज आणखी कमी होईल. कामगारच नव्हे तर पांढरपेशे व्यावसायिकदेखील ‘अतिरिक्त’ ठरतील. त्यामुळे बेरोजगारीची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. मूठभर अतिविशेष तज्ज्ञ व वित्त व्यावसायिक गडगंज पैसा कमावतील आणि बाकीच्या व्यक्तींचा जीवनस्तर मात्र घसरत जाईल. यातून आर्थिक विषमता वाढेल. आज दक्षिण आफ्रिकेत पिण्याच्या पाण्यापेक्षा मोबाइल फोन अधिक सहजतेने उपलब्ध आहेत. समाजमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यामुळे आता हे वास्तव सर्वासमोर येत राहील. बेरोजगारी टाळण्यासाठी खेडय़ातून शहरांकडे, त्यातून महानगरांकडे आणि अखेरीस परदेशात स्थलांतर होणे अटळ आहे. त्यातून गावांचे भकासपण, शहरांची बकाली आणि सांस्कृतिक अस्मितांची टक्कर होणेही अपरिहार्य आहे.

आजच्या जगासमोरील महत्त्वाचे आव्हान पर्यावरणाचा ऱ्हास हे आहे. मानवाच्या आत्यंतिक हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यातून तापमान बदल, नापिकी, समुद्राच्या पाण्याचे आम्लीकरण होऊन त्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होणे, लोकसंख्येचा विस्फोट, अनेक प्रजाती अस्तंगत होणे, आम्लवर्षां अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विज्ञानामुळे आपण आज या समस्यांचा वेध घेऊ  शकतो आणि त्यावर उपायही शोधू शकतो; पण ट्रम्पसारखे राजकारणी जेव्हा क्षुद्र स्वार्थाच्या रक्षणासाठी तापमानवाढीचे वैज्ञानिक निष्कर्षच केराच्या टोपलीत टाकतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध नि:संदिग्ध भूमिका घेण्यास वैज्ञानिक कचरत नाहीत. दिवंगत स्टीफन हॉकिंग यांनी ट्रम्पविरोधात भूमिका घेतली होती. अनेक देशांतील राजकारणी ट्रम्पविरोधात भूमिका घेण्यास कचरतात, हे वास्तव आहे. पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतल्यास तापमानवाढीचे संकट अधिकच गडद होईल. आपल्याला त्यामुळे परतीची वाट सापडणार नाही. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर पृथ्वी हा शुक्रासारखा उष्ण ग्रह होऊन येथील तापमान २५० अंशावर जाईल. सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडेल आणि येथील जीवसृष्टी कायमची नष्ट होईल, असा इशारा स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे.

आपण मानवी इतिहासाच्या सर्वात धोकादायक टप्प्यावर आपण उभे आहोत. हा ग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान आपल्याजवळ आहे; पण तो धोका टाळण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे नाही अथवा हा ग्रह सोडून सर्वाना दुसऱ्या एका ग्रहावर नेऊन वसविण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याकडे नाही. याचा अर्थ असा की, माणसाला राहण्यास योग्य असा एकमेव छोटासा ग्रह आपल्याजवळ आहे आणि तो म्हणजे पृथ्वी हा होय. म्हणून पृथ्वी हा ग्रह वाचविणे हा एकच उपाय आपल्याजवळ आहे. त्यासाठी ‘आपण सर्वानी मिळून’ या संकटावर मात करणे जरुरीचे आहे. आपल्याला बंधुभावाने एकत्र यावे लागेल. बेरोजगारी आणि गरिबीच्या झळा सोसणाऱ्या सर्वाना मदत करावी लागेल. निसर्गाचे संतुलन टिकवावे लागेल. वैज्ञानिकांच्या सल्ल्याची दखल घ्यावी लागेल. सर्वसामान्य माणसांना वैज्ञानिकांचे म्हणणे लगेच पटू शकेल. प्रश्न निर्माण होईल तो राजकारण्यांचा. राजकारण्यांना पटवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

आज जगभरात ‘विकास’ हा परवलीचा शब्द बनला आहे. आफ्रिकेतील जंगलापासून कायमच्या दुष्काळगस्त मराठवाडय़ापर्यंत सर्वाना विकास हवा आहे. तेथील विकासाची कल्पना असते तरी कशी? विकास म्हणजे चकचकीत गाडय़ा, आठपदरी रस्ते आणि ओसंडून वाहणारे सुपरमॉल. असा विकास सर्वाना उपलब्ध होऊ  शकेल का? त्याची पर्यावरणीय किंमत काय असेल? तिचा भार पृथ्वीला पेलणार आहे का? यांसारखे प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. मात्र ती दिल्यानंतरही एखादा असाही प्रश्न विचारेल की, हे असले प्रश्न आम्हालाच का विचारले जात आहेत? अमेरिकेतील लोकांना का विचारले जात नाहीत? विचार करण्याची गरज गरिबांनाच आहे का? श्रीमंतांनी विचार केला नाही तरी ते चालते काय? विकासाची फळे आधी आम्हाला चाखू द्या, पर्यावरणाचा विचार करण्याची श्रीमंती गरीब देशांना परवडणारी नाही. जरा चीनकडे बघा, असे म्हटले जाते. पर्यावरण हा प्रश्न खरोखर गंभीर आहे का? मुळात पर्यावरणशास्त्र हे विज्ञान आहे की मूठभर कार्यकर्त्यांनी उभे केलेले खूळ आहे? हे आणि यांसारखे प्रश्न विचारले जातील, याबद्दल खात्री बाळगावी. तथापि कितीही प्रश्न विचारले, कोणी कितीही संशय व्यक्त केला तरी वास्तवात जे आहे ते बदलणार नाही आणि वास्तव हे आहे की, जर आम्ही गांभीर्याने काही पावले तातडीने उचलली नाहीत, तर सर्वनाश अटळ आहे.

ही पृथ्वी नष्ट करू शकतील इतकी भयानक अण्वस्त्रे आज काही देशांकडे आहेत. एक छुपी अण्वस्त्र स्पर्धा गेली काही दशके सुरू असल्याचे आपण पाहतो आहोत. अंतिमत: आपण सर्वच सर्वनाशाकडे वाटचाल करीत आहेत. दु:खाची गोष्ट ही आहे की, येऊ  घातलेला हा सर्वनाश थोपविणारे तंत्रज्ञान मात्र माणसाजवळ आज उपलब्ध नाही. जे तंत्रज्ञान आहे ते सर्वनाशाकडे नेणारे आहे. म्हणून सर्वप्रथम सर्वच माणसांनी, विशेषत: विचारी माणसांनी जे तंत्रज्ञान माणसाला बेरोजगार करणारे आहे त्यास सरळ नकार द्यायला शिकले पाहिजे. मानवी कल्याणास उपयोगी पडेल तेवढेच तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. हे काम एकटय़ादुकटय़ाने होणारे नाही. त्यासाठी माणसांनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. संघटित होऊन अशा मानवी हितविरोधी तंत्रज्ञानास विरोध करावा लागेल. अर्थात, यात राजकारणी, आम्ही माणसांनी आपापसातील सर्व भेदाभेद दूर ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. धर्मभेद, पंथभेद आदी अमंगळ गोष्टींना थारा असता कामा नये. हे सारे भेदाभेद नष्ट होण्यासाठी आपल्याला बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनीच चालणे आवश्यक आहे. संपूर्ण मानवजात एक होऊन आपले उद्दिष्ट साध्य होण्यासाठी सर्वाची मिळून एकच एक भूमिका तयार करावी लागेल. ‘सेव्ह अर्थ, सेव्ह ह्य़ुमॅनिटी’ ही आम्हा सर्वाची भूमिका असली पाहिजे. या मार्गानेच आपण सर्वनाश थोपवू शकू, अन्यथा तो अटळ आहे.