वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर ‘नीट’ ही परीक्षा सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर घेण्याच्या निर्णयास महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विरोध केला असून या निर्णयामुळे ग्रामीण विद्यार्थी व मुलींवर अन्याय होत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. यावर सर्वोच्च न्यासालयात उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. या पाश्र्वभूमीवर ही प्रवेश-प्रक्रिया व त्यामागचे सामाजिक व तात्त्विक मुद्दय़ांचे विश्लेषण करणारा लेख..
पुन्हा एकदा आपल्या बारावीच्या मुलांवर अनिश्चितता व संभ्रमाचे सावट पडले आहे. याचे कारण आहे २८ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या स्वत:च्या २०१३च्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा घेतलेला निर्णय! मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)ला ‘नीट’, म्हणजे नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, ही वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी द्यावी लागणारी प्रवेश परीक्षा घेण्याचा अधिकार होता. तो अधिकार २०१३च्या निर्णयानुसार रद्द करण्यात आला होता. २०१६च्या निर्णयामुळे पुन्हा ‘जैसे थे’ आणि ‘नीट’ची टांगती तलवार! कुतूहलाची गोष्ट ही की २०१६चा निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे अध्यक्ष आहेत न्या. अनिल दवे. २०१३चा निर्णय ज्या पीठाने दिला त्याचे न्या. दवे हे सदस्य होते व त्यांनी निर्णयाच्या विरुद्ध मत दिले होते. या वर्षी ‘नीट’ ही सीबीएसई या केंद्र शासनाच्या बोर्डाच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील क्रमवारीला (मेरिट लिस्ट) अनुसरून भारतातल्या सर्व वैद्यकीय संस्थांनी प्रवेश द्यावयाचा आहे.
प्रथम, ‘नीट’ घेण्याचा महत्त्वपूर्ण अधिकार केंद्र शासनाला आला घटनेच्या समवर्ती सूची (कॉन्करंट लिस्ट)मधील कलम २५च्या अंतर्गत. जरी शिक्षण हे क्षेत्र घटनेप्रमाणे राज्य शासनाच्या अखत्यारीत असले तरी तंत्र व वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सांभाळणे व राज्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. एमसीआयला परीक्षा घेण्याचा अधिकार किंवा सीबीएसई व नॅक या संस्थांची कार्यकक्षा, तसेच भारतातल्या वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ‘नीट’ची परीक्षा देणे बंधनकारक असणे हे या अधिकारातून येते. अपेक्षित असे आहे की ‘नीट’/ सीबीएसई विद्यार्थ्यांची योग्यता ठरवण्यासाठी एक गुणांक ठरवील. विद्यार्थ्यांला ‘नीट’मध्ये या गुणांकाच्या वर गुण मिळाले तर तो/ती वैद्यकीय संस्थांमधे प्रवेश घेण्याच्या योग्य आहे असे आपण समजावे. पण खरी परिस्थिती वेगळी आहे. ‘नीट’ ही संस्था भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांची त्यांना या परीक्षेमध्ये पडलेल्या एकूण गुणांच्या आधारे देशपातळीवर एक क्रमवारी प्रसिद्ध करणार आहे. देशातील सर्व शिक्षण संस्थांना या क्रमवारीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागेल. तसेच, प्रत्येक राज्याची जी काही सामाजिक उद्दिष्टे व आरक्षणे असतील त्याची अंमलबजावणीसुद्धा या क्रमाने करणे अपेक्षित आहे. प्रश्न असा पडतो की सहा तासांच्या एका परीक्षेमध्ये योग्यता ठरवणे जरी शक्य असले तरी या गुणांच्या आधारावर सर्व मुलांची क्रमवारी करणे हे संख्याशास्त्राच्या दृष्टीतून कितपत शास्त्रशुद्ध व योग्य आहे? तसेच, कलम २५च्या अंतर्गत केंद्राला विद्यार्थ्यांची योग्यता ठरवण्याचा जो अधिकार आहे त्यातून त्यांची अशी क्रमवारी लावण्याचा अधिकार प्राप्त होतो का? दर्जा सांभाळताना देशातील सर्व विद्यार्थ्यांना एकाच क्रमवारीच्या साच्यात बसवणे कितपत योग्य किंवा गरजेचे आहे? विद्यार्थ्यांची योग्यता ही स्वतंत्रपणे ठरवता येते, त्यात दोन विद्यार्थ्यांची तुलना करण्याची आवश्यकता नाही. बुलढाणा जिल्ह्य़ातील मुलगी आणि पुण्याचा शहरी मुलगा यांची तुलना करून क्रमवारी लावणे कठीण आहे आणि ते करताना केवळ गुण नव्हे तर इतर अनेक निकष लक्षात घ्यावे लागतील. जसे की ग्रामीण भागासाठी डॉक्टर हवे असतील तर नक्कीच बुलढाण्याच्या मुलीचा क्रम वर लागेल.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ‘नीट’चा अभ्यासक्रम, जो आहे सीबीएसईचा. सीबीएसई या बोर्डाचे विद्यार्थी हे सामान्यत: शहरी व मध्यमवर्गीय असावेत. सीबीएसईने त्यांच्या अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमाची व प्रयोगांची रचना या विद्यार्थिवर्गाच्या महत्त्वाकांक्षेला अनुसरून केली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, भौतिकशास्त्राच्या विषयांच्या मांडणीमध्ये विज्ञानाचा एक वैश्विक दृष्टिकोन अभिप्रेत आहे. विद्युत व चुंबकशास्त्र, अणू विज्ञान असे विषय त्यात सामावलेले आहेत. मात्र सामान्य नाग्रिकांच्या गरजांशी संबंधित आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या पाणी, शेती, चूल या विषयांचे विज्ञान त्यांत नाही. याउलट तत्त्वत: तरी प्रत्येक राज्य सरकार त्याच्या सामान्य नागरिकाच्या विकासाला योग्य असा अभ्यासक्रम तयार करण्यास स्वायत्त आहे. आपल्यासाठी तो सामान्य नागरिक आहे, ग्रामीण किंवा छोटय़ा शहरात राहणारा, आíथक व सामाजिकदृष्टय़ा अल्प परिस्थितीतील.
ही सगळी कोर्ट-कचेरी होत असताना प्रत्येक राज्याने त्यांना योग्य वाटेल अशी प्रवेश पद्धत अवलंबिली आहे. महाराष्ट्रामध्ये २०१६ साठी एमएचटी-सीईटीची योजना आहे. तामिळनाडूमध्ये बारावी बोर्डाचे गुण ग्राह्य़ धरून महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. हा खरोखरच फार अभिनव व सामाजिकदृष्टय़ा पुरोगामी निर्णय आहे व याचे पर्यवसान काय होते याचा अभ्यास महाराष्ट्राने करायला हवा. तामिळनाडूची आíथक व सामाजिक विकासाची घोडदौड अव्याहत चालू आहे .
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा