‘काय झाडी.. काय डोंगार.काय हाटिल.समदं ओक्के’ या संवादामुळे सार्वत्रिक प्रसिद्धीचे वलय लाभलेले सांगोल्याचे आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील चर्चेत आले आणि त्यांना राज्यभरातून भाषणासाठी मागणी वाढू लागली.  मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी सर्वच ठिकाणी त्यांच्या सभांना गर्दी होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांना आपल्या पक्षाच्या उपनेतेपदी बढती दिली आहे. एवढे सारे वलय लाभले असताना अ‍ॅड. शहाजीबापूंनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आपणांस विधान परिषदेवर पाठवा आणि आपल्या सांगोला मतदारसंघातून साखर सम्राट अभिजित पाटील यांना विधानसभेवर पाठविण्याची अजब मागणी केली आहे. त्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. वाळू तस्करीप्रकणी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात तडीपार झालेले अभिजित पाटील हे आता अल्पावधीतच सहा साखर कारखान्यांचे मालक झाले आहेत. त्यांच्या साखर कारखान्यांसह कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने अलीकडेच धाडी घातल्या होत्या. तेव्हा त्यांच्या मदतीला लगोलग भाजपचे नेते प्रवीण दरेकर पंढरपुरात धावून आले होते. पाटील हे भाजपमध्ये येतील, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकी शाबूत राखण्याची खात्री देता येत नाही. तेव्हा काहीही होवो माझी आमदारकी कायम ठेवा, असाच शहाजीबापूंचा प्रयत्न.

इजा. बिजा.. तिजा?

एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवस खरोखरीच फिरले. सरकार गेले. मुंबई महानगरपालिकेवरील नियंत्रण गेले. पक्षाचे नाव आणि चिन्हही गेले. अजून कोण सोडून जाणार याबाबत संभ्रम. सारेच अस्वस्थ करणारे. दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होऊ नये म्हणून शिंदे गटाने सत्तेचा पुरेपूर वापर केले. परंतु न्यायालय उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या मदतीला धावून आले. दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात लीलया पार पडला. अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार ऋजुता लटके यांचा मुंबई महानगरपालिकेतील राजीनामा रोखून धरण्यात आला. प्रकरण न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने पुन्हा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिलासा दिला. कारण लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शिंदे गटाची बंडखोरी, त्यातून आमदारांची अपात्रता हे सारे विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. दसरा मेळावा आणि अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने न्यायालयाचे निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागले. सर्वोच्च न्यायालयाचा निकालही शिवसेनेच्या बाजूने लागेल व इजा, बिजा आणि तिजा शिवसेनेचा विजय होईल, असा आशावाद शिवसेनेच्या एका नेत्याने व्यक्त केला. तसे झालेच तर शिंदे यांच्या अडचणीत वाढ होईल.

बाहेर गोंधळ, आत सारे आलबेल !

आरोग्य मंत्री तानाजी सावंत जेथे जातात तेथे त्यांच्याबरोबर वाद- तंटा असतोच. ते उस्मानाबादचे पालकमंत्री. ते आले की अनेकांना जोर वाढतो. आता सत्ताधारी गटाचा जोर तो. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुके यांना जर सरकारी बैठकीत बसण्याची परवानगी दिली तर आमच्या गटाच्याही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या जिल्हाप्रमुखांना बैठकीत घ्या, अशी मागणी झाली. मग त्यावरून घोषणाबाजी झाली. अगदी ‘हम- री – तूम- री’वर बाब गेली. मग दोन्ही जिल्हाप्रमुखांशिवाय बैठक घेण्याचा निर्णय झाला. बाहेर गोंधळ सुरू होता, पण मग आतमध्ये खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. अगदी ‘एमएससीबी’ मधील निविदांच्या  कुरघोडीचा विषयही चर्चेत आला. तेव्हाही सारे आलबेल होते.

खासदारांची तिरकी चाल कशासाठी

सांगलीतील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयानजीक असलेल्या चौकाचे सुशोभीकरण करून माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी पार पडला. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवतण दिले. या वक्तव्याने व्यासपीठावरील मंडळी आवाक झाली. खासदारांना काँग्रेसपेक्षा अधिक ममत्व राष्ट्रवादीबद्दल आहे हे जिल्हा जाणतो.

तासगाव कारखान्याच्या लिलावावेळी सोनहिरा कारखाना स्पर्धक होता, हेही सर्वाना ज्ञात आहे. मात्र, आता काँग्रेसबाबत ममत्व दाखविण्यामागे कडेपूरच्या देशमुख गढीला चेकमेट करण्याचा डाव असावा, असेही चाणाक्ष मंडळी सांगत आहेत. खासदार पदासाठी पर्याय देण्याची वेळ भाजपवर आलीच तर  देशमुखांच्या गढीचा विचार केला जाणार असल्यानेच ही तिरकी चाल खासदारांनी केल्याचे मानले जाते.

(सहभाग : दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर, सुहास सरदेशमुख)

Story img Loader