पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावात ३० जुलैला संपूर्ण गावच दरड कोसळण्याच्या घटनेने नकाशावरून पुसले गेले. तेथे जे काही थोडे लोक वाचले आहेत त्यांचे पुनर्वसन ग्रामसभेत चर्चा करून लोकशाही मार्गाने व्हायला हवे. उघडय़ावर आलेले संसार पुन्हा एकदा उभारावे लागतील, मोडून पडलेली मने पुन्हा एकदा जीवनाच्या आशेने भरून टाकावी लागतील. अशा प्रत्येक घटनेत शासन तर मदतीला असायला पाहिजेच, पण समाजाचीही जबाबदारी खूप मोठी असते तरच निसर्गाने विस्कटलेला डाव पुन्हा मांडता येतो. दुसऱ्या लेखात माळीण गावातील मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गावातील मुलांच्या वह्य़ा बघितल्यानंतर त्यांच्या पाठय़क्रमात असलेल्या एका कवितेतील वर्णन काळरात्र होऊन त्यांना सामोरे यावे हा योगायोग, पण तरीही या मुलांनी या प्रसंगाला मोठय़ा धीरोदात्तपणे सामोरे जाताना लहान वयातच मोठी समज आल्याचे दाखवून दिले. त्या मुलांची शाळा, तेथील पूर्वीची स्थिती व आताची स्थिती, कायमचे अंतरलेले मित्र, आईवडील, ज्याच्या सान्निध्यात ही वस्ती व त्यांची संस्कृती जोपासली गेली तोच निसर्ग शत्रू ठरला, हे सगळे वाचल्यानंतर डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा