हिंदी चित्रपटसृष्टीच्या गळेकापू स्पध्रेत कोणतीही तडजोड न करता, कोणालाही न दुखावता ज्यांनी आपली कारकीर्द घडवली, अखेपर्यंत सौजन्य व चांगुलपणा राखला, अशा मोजक्या कलाकारांमध्ये मन्ना डे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
मन्ना डे यांचा आवाज खूपच कोरडा आहे, मोहम्मद रफी असताना पाश्र्वगायनासाठी मन्नादांच्या नावाचा विचार का करायचा, असा रोखठोक प्रश्न ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांनी एकदा उपस्थित केला होता. (कालांतराने नौशाद यांचंच संगीत कोरडं व साचेबद्ध झालं, हा भाग वेगळा..) या विधानात तथ्य असलं तरी ते फारच टोकाचं होतं. मन्नादांसारख्या गायकाला असं झटकून टाकणं नौशाद यांना शक्य असेल, मात्र मन्नादांच्या गाण्यांवर ओझरती नजर टाकली तरी या या ‘कोरडय़ा’ विधानातील फोलपणा लक्षात येईल. एक कमालीचा आश्वासक, मनाला धीर देणारा स्वर अशीच त्यांच्या गायकीची नोंद होईल, यात शंका नाही. पुरावा म्हणून त्यांची अशी अनेक गाणी सांगता येतील.
रफी यांच्या दोन वष्रे अगोदर म्हणजे १९४२ मध्ये मन्नादा मुंबईत आले. ‘रामराज्य’सारख्या चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाल्याने पौराणिक चित्रपटांतील गाणी गाणारा गायक, असा शिक्का त्यांच्यावर बसला त्यावेळी ते केवळ २४-२५ वर्षांचे होते. रोमँटिक गाणी गाण्याची खुमखुमी वयपरत्वे त्यांच्यात होती. मात्र ती आघाडी रफी सांभाळत असल्याने मन्नादा हतबल होते. मला कोणी रफी, दुराणी किंवा खान मस्तानाप्रमाणे रोमँटिक गाणी का देत नाही, असा उद्विग्न प्रश्न त्यांना पडत असे. शंकर-जयकिशन यांचा अपवाद वगळता त्यांना आवर्जून पाचारण करणारा एकही संगीतकार नव्हता. ‘एस-जें’नी त्यांना सुरुवातीला बोलावलं ते ‘आवारा’मधील ‘घर आया मेरा परदेसी’ या गाण्यासाठी. या गाण्यात आपल्याला सुरुवातीच्या दोन ओळींखेरीज काहीच नाही, हे लक्षात आल्यानंतर ते कमालीचे निराश व नाराज झाले. मात्र शंकर यांनी त्यांना समजावलं, दोन ओळी का होईना, मात्र तुम्ही त्या राज कपूरसाठी गात आहात, हे लक्षात घ्या, भविष्यात याचा निश्चितच लाभ होईल.. मन्नादा तयार झाले, त्यानंतर ‘आरके’ ची निर्मिती असलेल्या ‘बूूट पॅलिश’ या चित्रपटातील गाण्यांसाठी ‘एस-जें’नी पुन्हा एकदा मन्नादांना पाचारण केलं, मात्र मन्नादा पुन्हा निराश झाले, कारण ती गाणी चरित्र अभिनेता डेव्हिड यांच्यावर चित्रीत होणार होती. आपल्याला रफीप्रमाणे नायकांची गाणी मिळत नाहीत, या भावनेने त्यांना घेरलं. अर्थात ‘बूट पॉलिश’मधील त्यांची गाणी गाजली. यापकी ‘लपक छपक तू आ रे बदरवा’ हे विनोदी गाणं आणि ‘रात गयी जब दिन आता है’ या गाण्यांचं खुद्द राज कपूरने कौतुक केलं.
ही गाणी आपल्या कारकीर्दीत टìनग पॉइंट ठरली, असं ते सांगत असत. तरीही राज कपूरचा काही प्रमाणात अपवाद वगळता कोणत्याही नायकाचा आवाज होणं त्यांच्या नशीबात नव्हतं. त्यामुळेच नौशाद यांच्या मुद्द्याचा सर्व बाजूंनी विचार करावा लागेल. दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीने साधारणपणे १९५० ते १९७० या दोन दशकांत रुपेरी पडदा व्यापून टाकला होता. या तिघांचे संगीतकार व गायक ठरलेले होते. दिलीपकुमारसाठी नौशाद व मोहम्मद रफी, देव आनंदसाठी सचिनदेव बर्मन व किशोरकुमार (काला पानी, काला बाजार, तेरे घरके सामने असे काही चित्रपट सचिनदांनी पूर्णपणे रफींना बहाल केले ही गोष्ट वेगळी) आणि राज कपूरसाठी शंकर-जयकिशन व मुकेश असं समीकरण झालं होतं. मात्र मुकेशसाठी कठीण ठरतील अशी गाणी (प्यार हुआ इकरार हुआ है, दिलका हाल सून दिलवाला, आजा सनम, ये रात भिगी भिगी, ए भाय जरा देखके चलो..) गाण्यासाठी वेळोवेळी मन्नादांनाच बोलावलं गेलं. रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिल ही तो है’या चित्रपटातील गाणी राज कपूरमुळे मुकेशला मिळाली, मात्र ‘लागा चुनरी में दाग’ ही पुढे लोकप्रिय झालेली भरवी गाण्यासाठी मन्नादांना पर्याय नव्हता. कोणत्याही नायकाचं पाठबळ नसताना मन्नादांना बाकी गायकांच्या ट्रॅफिकमधून आपली गाडी पुढे न्यायची होती. ‘आराधना’नंतर तर मन्नादांना रफी व किशोरकुमार असं दुहेरी स्पध्रेला तोंड द्यावं लागलं. कोणत्याही नायकाचा आवाज होण्याची संधी न मिळणं, हे त्यांच्या झगडण्याचं प्रमुख कारण ठरलं.
रागदारीवर आधारित गाणी गाणं हा त्यांचा हातखंडा होताच, मात्र विनोदी ढंगाची (लपक छपक तू आ रे बदरवा, म तेरे प्यारमें क्या क्या न बना दिलबर, मेरे भसको डंडा क्यू मारा, फूल गेंदवा न मारों, ओ मेरी मना) गाणी तसंच थीम साँग्ज (तू प्यारका सागर है, कस्मे वादे प्यार वफा सब, नदियाँ चले चले रे धारा, दर्पण झूठ न बोले, तुम बेसहारा हो तो, ) गाण्यासाठीही त्यांना प्राधान्य देण्यात आलं. यामुळेच रफी आणि किशोरकुमारच्या स्पध्रेत त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
मन्नादांचं मन एवढं मोठं की किशोर आणि रफीची स्तुती करण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. रफीकडून मी खूप काही शिकलो तसंच किशोरसारखा अष्टपलू व गुणी कलाकार पुन्हा होणार नाही, असं ते वेळोवेळी कबूल करत असत. ‘दो बिघा जमीन’मधील त्यांनी गायलेलं ‘धरती कहें पुकारके’ हे गाणं जणू त्यांच्या जीवनाचं सार होतं.
अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस ओर तू फिर आए ना आए, मौसम बीता जाए या ओळी ते खऱ्या अर्थाने जगले!

Story img Loader