अलीकडे जुन्या गाण्यांना नवा साज चढविण्याचा ‘रीमिक्स’चा जमाना तेजीत आहे. आपल्या गाण्यांबाबत असे झाले, तर?.. मन्ना डे यांना ही कल्पनाच असह्य़ होती. असे झाले, तर ‘मैं हजार बार मर जाऊंगा,’ असे ते म्हणत.. या शब्दांतच त्यांच्या सुरांच्या अजरामरत्वाचा आत्मविश्वासही दडला होता.
एखाद्या सुट्टीच्या दिवशी, खूप दिवसांनंतर मित्रांचे टोळके एकत्र यावे, रात्री खूप गप्पा माराव्यात, दंगामस्तीला आणि जुन्या, कॉलेजच्या दिवसांच्या आठवणींना बहर यावा, काही हळव्या आठवणींनी मनाचे कोपरे ओले व्हावेत आणि त्या आठवणींच्या लगडी पुन्हा उलगडत असतानाच, मनात उमटलेली ती सुरांची सुगंधी लकेर गळ्यातून बाहेर पडावी.. असं झालं, की गप्पांचा सारा नूरच बदलून जातो आणि शब्दांना सुरांचीच सोबत सुरू होते.. एखादा हळवा क्षण त्या सुरांना कवेत घेऊन डोलू लागतो, आणि सारेजण त्या सुरांमध्ये सामील होऊन जातात..
असा अनुभव कधी घेतला नाही, अशी पिढी शोधूनही सापडणार नाही.
मित्रांचं असं एखादं टोळकं, मायदेशापासून, घरापासून दूर कुठे तरी, सातासमुद्रापार असेल, तर अशा गप्पांमध्ये उमटणारा तो सूर आणखीनच हळवाहळवा होऊन जातो आणि गप्पांना एकाकीपणाची खंत चिकटून जाते. तरी ती भावना नकोशी, जीवघेणी मात्र नसते. उलट, त्या भावनेत रुतून जावं, असं, हवंहवंसं आसुसलेपण साऱ्या मनामनांवर दाटून जातं..
अशा हळव्या क्षणाचा पुरता अंमल चढला, की कुणीतरी भावुक, गिटार काढतो आणि त्यातून उमटणाऱ्या स्वरांच्या साथीने सारेजण सूर लावतात.. एकामागून एक, ‘आठवणीतली गाणी’, मफल व्यापू लागतात आणि एका गीताचे शब्द सुरू होताच, सारी मने, कुठल्या तरी अनामिक ओढीनं मायभूमीवर पाऊल टाकतात..
सलील चौधरींचं अफाट संगीत, प्रेमधवन यांचे लोभसवाणे शब्द आणि ‘मन्ना डे’ नावाच्या एका ै‘जादूई’ सुरांचा साज.. शब्दांना भावनांची सहज किनार लाभते आणि एक अनामिक हुरहुर त्या मफिलीत दाटू लागते..
‘ऐ मेरे प्यारे वतन’.. एक दर्दभरा आवाज घुमू लागतो.. आपल्या देशात असताना, घरामध्ये आपल्या खोलीत, एखाद्या निवांत क्षणी हजारो वेळा ऐकलेले ते सूर परदेशात असलेल्या या तरुणाईच्या मनाचा असा काही कब्जा घेऊन जातात, की या सुरांच्या विळख्यात असंच अनंतकाळ जखडूनच राहावं, असं वाटत राहतं.  त्या शब्दांची ही जादू असतेच, पण त्याहूनही अधिक, त्या सुरांची मोहिनी त्या शब्दांनाही पडलेली असते.. मन्ना डे यांचा अप्रतिम आवाज हा त्या मोहिनीचा ‘किमयागार’ असतो. त्या आवाजातला दर्द हृदया-हृदयातून भळभळत जातो आणि शब्दशब्द मनाला थेट भिडत राहतो..  
परदेशातील, लठ्ठ कमाईच्या सुखात लोळत असतानाही मनाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवलेल्या आणि कधी तरी एकांतक्षणी आपल्याच मनाला न जुमानता उसळी घेऊन बाहेर येणाऱ्या, व्याकूळ भावनांना पुन्हा वाट फुटते..
‘ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछडे चमन.. तुझ पे दिल कुर्बान..
तू है मेरी आरजू, तू ही मेरी आबरू.. तू ही मेरी जान’..
.. एक ‘दर्द’ भावनेचा सडा िशपत सभोवार पाझरणाऱ्या त्या व्याकूळ सुरांवर स्वार होत मनाच्या कप्प्यातली ती बंद एकाकीपणाची भावना पुन्हा उसळून डोळ्यावाटे पाझरू लागते..
.. हा अनुभव परदेशातच नव्हे, तर कधीकधी, आपल्या देशात, आपल्या घरात, मित्रांच्या टोळक्यासोबत जागविलेल्या मफिलीतदेखील जिवंत होतो..
 ..ही ‘मन्ना डे’ नावाच्या गोड गळ्यातून उमटलेल्या त्या सुरांची किमया असते!
ते शब्द सुरांमधून पुढे पाझरू लागतात..
‘तेरे दामन से जो आएं, उन हवाओं को सलाम.. चूम लू मं उस जुबां को जिसपे आए, तेरे नाम..
सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगी तेरी शाम.. तुझ पे दिल कुर्बान’..
देशाविषयीच्या भावना इतक्या जिवंतपणानं मांडणारे ते शब्द व्यक्त होण्यासाठी मन्ना डे यांच्या सुरांचा आश्रय घेतात, म्हणून ते शब्द धन्य!.. त्या शब्दांचं ‘व्यक्तपण’  ‘वजनदार’ ठरतं..
या शब्दांना देशप्रेमाची किनार आहेच, पण त्याच वेळी, याच शब्दांतून आईच्या प्रेमाची पाखरही आठवते, आणि व्याकूळतेला अक्षरश: कंठ फुटतो..
‘मां का दिल बनके कभी सीने से लग जाता है तू..
जितना याद आता है मुझको, उतना तडपाता है तू.. तुझपे दिल कुर्बान’..
व्याकूळ असह्य़पणाचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे सूर कानात साठवत राहावेत.. राष्ट्रभक्तीच्या, देशप्रेमाच्या भावनांनी ओथंबलेली शेकडो बौद्धिकं ऐकूनही होणार नाही, एवढी मनाची मशागत करण्याचं सामथ्र्य या शब्दांमध्ये आणि ते कानात ओतणाऱ्या मन्ना डे यांच्या सुरांमध्ये आहे, याची साक्ष पटते.. आणि आठवणी जिवंत होऊन जातात! मन्नादांच्या गळ्यातून निघणाऱ्या सुरेल सुरांना ‘ऐ मेरे प्यारे वतन’सारख्या शब्दांचा देशभक्तीचा साज असो किंवा ‘ये रात भीगी भीगी’सारख्या प्रणयरम्य शब्दांचे सूर असोत, ‘लागा चुनरी में दाग’सारखे व्याकूळ शब्द असोत किंवा ‘एक चतुर नार’सारखे खटय़ाळ शब्द असोत.. साऱ्या शब्दांच्या स्वभावाला आपल्या सुरांनी पुरेपूर न्याय देणारा मन्ना डे हा गायक संगीताच्या अर्धशतकाचा ‘किमयागार’ ठरला.. त्या आवाजाला असंख्य ‘मिती’ आहेत, हे सिद्ध करण्यासाठी वेगळ्या समीक्षणाची गरजच नव्हती. राज कपूरच्या ‘श्री ४२०’मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’पासून राजेश खन्नांच्या ‘आनंद’मधील ‘जिंदगी, कैसी है पहेली’ पर्यंतच्या साऱ्या गाण्यांतूनच मन्ना डे यांच्या आवाजाचे ‘बहुमितित्व’ सिद्ध झाले होते. ‘उपकार’मधील ‘कस्मे वादे प्यार वफा’, ‘वक्त’मधील ‘ऐ मेरी झोहरा जबीं’, अशा गाण्यांचे सूर आजही आणि भविष्यातही अजरामर राहतील, अशी किमया मन्ना डे यांच्या आवाजाने संगीताच्या दुनियेत करून ठेवली. ‘शोले’मधील ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ या गीताचे शब्द आजही सच्चा मत्रीचा पुरावा देण्यासाठी पुढे केले जातात.. मन्ना डे यांनी हे शब्द अजरामर करून ठेवले आहेत, हेच याचं निर्वविाद कारण!   आजच्या जमान्यातील एखादी टुकार जाहिरातदेखील अनेकदा त्यासाठी वापरलेल्या सुरामुळे मनात रुतून राहते. तसे नसते, तर रस्त्यावर शिस्तीने चाला असा संदेश देणारी ‘ए भाय जरा देखके चलो’, ही जाहिरात केव्हाच विस्मरणात गेली असती.. म्हणून, अशा शब्दांना मनामनावर कोरण्याचे सारे श्रेय मन्ना डे यांच्या किमयागार सुरांना द्यावेच लागते..
मन्ना डे यांच्या आवाजाला ‘पठडीबाजपणा’ नव्हता. त्या सुरांच्या लगडींना वेगवेगळे, मोहक रंग आहेत. म्हणूनच, ते अमुक एका पठडीचे गायक राहिले नाहीत, ही त्यांच्या आवाजाने संगीताच्या दुनियेला दिलेली एक अजरामर देणगी आहे. गझल असो, कव्वाली असो, मिश्र संगीत असो, शास्त्रीय संगीत असो किंवा भक्तिगीत असो.. मन्ना डे यांचे सूर त्या त्या संगीताला समर्थपणे पुरेपूर न्याय देणारे ठरले. म्हणूनच, देशात असो वा विदेशात, भारतीय संगीताची जाण असलेल्या प्रत्येकाच्या आठवणी जिवंत करण्याचं सामथ्र्य यापुढेही त्या सुरांमध्ये निर्वविादपणे राहणार आहे. महंमद रफी, मुकेश, किशोरकुमार, हेमंतकुमार यांच्या आवाजाची मोहिनी असलेल्या काळात मन्ना डे यांच्या आवाजाने आपल्या विविधांगी सुरांच्या जादूचा वेगळा अमिट असा ठसा उमटविला..
अलीकडे जुन्या गाण्यांना नवा साज चढविण्याचा ‘रीमिक्स’चा जमाना तेजीत आहे. आपल्या गाण्यांबाबत असे झाले, तर?.. मन्ना डे यांना ही कल्पनाच असह्य़ होती. असे झाले, तर ‘मैं हजार बार मर जाऊंगा,’ असे ते म्हणत.. या शब्दांतच त्यांच्या सुरांच्या अजरामरत्वाचा आत्मविश्वासही दडला होता. मन्ना डे यांचे सूर रीमिक्समध्ये जाऊच शकत नाहीत, तिथे ते बसविण्याचा प्रयत्न झाला, तर ‘सूर ना सजे’ असाच अनुभव येईल. कारण सुरांच्या या किमयागारालाच ते मान्य नाही, हे संगीताच्या नवदुनियेलाही मान्य करावेच लागेल..

Story img Loader