सिनेमाच्या जगात कलेशी प्रामाणिक बांधिलकी मानण्याचा काळ होता. तेव्हाचे एक नाव मन्ना डे. गेले काही दिवस कोलकत्ता येथे म्हणजे आपल्या मूळ शहरात ते आजाराशी झुंज देत होते, अखेर आज शास्त्रीय संगीताच्या बैठकीवर विविध प्रकारची चित्रपट गीते गाणाऱ्या पाश्र्वगायकाचा ‘पहाडी आवाज’ काळाच्या पडद्याआड गेला.
मोहम्मद रफी, तलत मेहमूद, मुकेश व किशोरकुमार यांच्या समकालीन पाश्र्वगायनाचा हा ‘शेवटचा हीरा’ आज निखळला. या प्रत्येकाची शैली वेगळी पण गायनाच्या भावार्थाशी एकरूपता अथवा तल्लीनता मात्र सारखी. म्हणूनच तर हा प्रत्येक पाश्र्वगायक आपले ‘वेगळे स्थान, वेगळे अस्तित्व’ निर्माण करू शकला. मन्ना डे यांच्या जाण्याने ‘हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळा’तील एक गुणी व अष्टपैलू पाश्र्वगायक काळाच्या पडद्याआड गेला.
कोलकत्ता येथे लहानाचे मोठे झाल्यावर मन्ना डे यांना त्यांच्य काकानी १९४२ साली मुंबईत आणले व ‘तमन्ना’ चित्रपटासाठी पाश्र्वगायनाची पहिली संधी दिली, तेव्हापासूनचा त्यांनी नाना पाटेकर दिग्दर्शित १९९१ च्या ‘प्रहार’पर्यंत बरीच विविधरंगी-विविध स्पर्शी गाणी गायली. ‘हमारी मुठ्ठी में आकाश सारा’ हे त्यांनी पाश्र्वगायन केलेले शेवटचे गाणे, पण त्यानंतर ते पाश्र्वगायनापासून दूर राहिले तरी त्यांची जुनी गाणी रसिक श्रोत्यांच्या नवीन पिढीलाही आपलीशी वाटत राहिली हे विशेष.
दिलीपकुमार व ऋषि कपूर वगळता आपल्या काळात जवळपास सर्व नायकांना त्यांनी ‘आवाज’ दिलाच, पण चरीत्रनायक व विनोदी कलाकार यांच्यासाठीही त्यांनी पाश्र्वगायन केले. त्यांच्या पाश्र्वगायकीला ‘सीमा’ नव्हती, असे म्हणायला हवे.
राज कपूर म्हटलं की मुकेश हे समीकरण एकरूप झाले होते, पण ‘चोरी चोरी’च आजा सनम मधुर चांदनीमे हम’ व यह रात भीगी भीगी, ‘मेरा नाम जोकर’मध्ये ‘ये भाय जरा देख के चलो’, श्री ४२० मध्ये ‘यह रात भीगी भीगी’ मन्नाडे गायले. राजकुमारशी मोहम्मद रफीचा आवाज जुळला होता, पण ‘मेरे हुजूर’साठी मन्ना डे ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया’ तर ‘हिन्दुस्थान की कसम’साठी हर तरफ अब यही अफसाने है गायले. बलराज साहनी यांनी मन्ना डे यांनी गायलेल्या ‘तू प्यार का सागर है’ (सीमा) व ‘ऐ मेरे प्यारे वतन’ (काबुलीवाला) या गाण्यांवर अभिनय साकारताना बलराज साहनी यांनी ती अधिकच उंचीवर नेली. ‘आनंद’साठी राजेश खन्नाला त्यांनी ‘जिंदगी कैसी है पहेली’साठी आवाज दिला. ‘मेहबूबा’त याच राजेश खन्नाने ‘गोरी तेरी पैजनीयाँ’ या मन्ना डे यांच्या शास्त्रीय संगीतावरील गाण्याला योग्य न्याय दिला. गाण्याचा भावार्थ गायकीतून साकारतानाच आपला आवाज त्या कलाकाराला व त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेला योग्य ठरेल याचे भान त्या काळात पाश्र्वगायक ठेवत व या कसरतीला अथवा कसोटीला हे कलाकार गायक उतरत, म्हणूनच तर त्यांची गाणी कायमस्वरूपी अथवा सर्वकालीन श्रवणीय ठरली. हेच मन्ना डे प्राणसाठीही आपले (कसमे वादे प्यार वफा सब-उपकार, यारी है इमान मेरा- जंजीर) व आदी मेहमूदलाही त्यांनी आवाज दिला. आओ ट्विस्ट करे- (भूत बंगला), जोडी हमारी-औलाद. कव्वालीपासून (यह इश्क इश्क है- बरसात की एक रात), मस्ती-मस्करीवाल्या गाण्यापर्यंत (एक चतुर नार- पडोसन) शास्त्रीय संगीताच्या बैठकीपासून (कौन आया मेरे मन के द्वारे- देख कबिरा रोया) मैत्रीच्या गाण्यापर्यंत (यह दोस्ती हम नही तोडेगे- शोले) असा मन्ना डे यांचा खूप मोठा प्रवास आहे. कधी प्रणयगीत, तर कधी दोन-तीन पाश्र्वगायकांत एक.. पण मन्ना डे यांच्या आवाजाची ओळख व जातकुळी वेगळी व स्वतंत्र! त्यांच्या पाश्र्वगायनाची वाटचाल ‘एक फुल जो माली, नील कमल, हिन्दुस्थान की कसम, बम्बई का बाबू, कर्ज, क्रांती, आविष्कार, अनुरोध, अब्दुल्ला, उजाला, तिसरी कसम, सफर’ अशी फुलली. हिंदी-मराठी, बंगाली, गुजराती, असामी, कन्नड, मल्याळम इतक्या भाषांत ते गायले. मन्ना डे यांनी आपल्या आत्मचरित्रात आपला संगीत जीवन प्रवास उलगडला आहे. मूळ बंगाली भाषेतील हे आत्मचरित्र मराठीत भाषांतरीत झाले आहे..
मन्ना डे यांच्या ‘पाश्र्वगायकीचा काळ’ स्वत: कामाचा ‘आनंद’ घेऊन इतरांनाही कलेचा आस्वाद देण्याचा होता, म्हणूनच तर तेव्हाचे चित्रपट, त्याचे विषय, त्यातील अभिनय व गीत-संगीत हे रसिकांच्या एका पिढीतून पुढच्या पिढीत पोहचले. हिंदी चित्रपटाची एकूणच, संस्कृतीच्या अनेक वैशिटय़ातील हे वैशिष्टय़ जगावेगळे आहे. मन्ना डे यांच्या पाश्र्वगायनातील विविधता-विशालता व अष्टपैलूत्व पाहता त्यांना ‘तू प्यार का सागर है’ असेच म्हणायला हवे. त्यांना ही श्रद्धांजली. मन्ना डे यांच्या ‘सूर ना सजे’ (वसंत बहार) यासारख्या कित्येक गाण्यांचा विसर पडणे शक्यच नाही.
तू प्यार का सागर है..
सिनेमाच्या जगात कलेशी प्रामाणिक बांधिलकी मानण्याचा काळ होता. तेव्हाचे एक नाव मन्ना डे. गेले काही दिवस कोलकत्ता येथे म्हणजे आपल्या मूळ शहरात ते आजाराशी झुंज देत होते,
First published on: 25-10-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manna dey the golden voice of indian cinema