‘आज सर्वत्र निराशादायक वातावरण असताना शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणारे कुणी तरी हवे आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी ही संकटे दूर होऊ शकतील, पण त्यांना मानसिकदृष्टय़ा सावरण्यासाठी लोकांचे पाठबळ हवे. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेत जाण्यापासून रोखले आहे’, ही एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे.

गेल्या दहा वर्षांपासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात श्री शिवाजी शिक्षण संस्था, शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान आणि महाराष्ट्र बँकेच्या संयुक्त सहकार्याने विदर्भ शेतकरी जागृती अभियान राबवले जात आहे. अभियानात सहभागी झालेल्या या शेतकऱ्याने आपल्या भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारणांविषयी माहिती दिलीच, पण त्यांना या अभियानात सामील होण्याची गळही घातली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ही शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी संस्था. पण संस्थेच्या सामाजिक बांधिलकीतून २००७ मध्ये एक यज्ञ सुरू झाला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या पुढाकारातून शेतकरी जागृती अभियान सुरू करण्यात आले. दर शनिवारी कुण्या एका गावातील ५०-६० शेतकऱ्यांना संस्थेच्या वाहनातून मंडळाच्या सभागृहात आणले जाते. संस्थेतच त्यांच्या भोजनाची, निवासाची नि:शुल्क सोय केली जाते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करतात.

या अभियानाचे एक संयोजक प्रा. रवींद्र खांडेकर सांगतात, ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने शेतकरी जागृती अभियान सुरू केले तेव्हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. केंद्र सरकारने पॅकेजही जाहीर केले होते. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हे सरकारचे काम, पण एका सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीत संस्थेचाही हातभार लागावा, या हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले. दहा वष्रे उलटली, पण हे अभियान सुरूच आहे. विशेष म्हणजे, जे शेतकरी या अभियानात सहभागी झाले, त्यापैकी कुणीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नाही.’

प्रा. खांडेकर आपला अनुभव सांगतात, ‘शेतकऱ्यांना या ठिकाणी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळतेच, पण त्यांच्या मनातील निराशेचे मळभ दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. एकदा अनेक शेतकरी साशंकतेने या ठिकाणी आले, पण दोन दिवसांच्या कार्यक्रमानंतर परत जाताना त्यांच्यातील आत्मविश्वास पाहताना या अभियानाचे फलित लक्षात येते. या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर केवळ भाषणे दिली जात नाहीत. त्यांना आम्ही सांगतो, तुमच्या घराला आग लागली, तर आम्ही विझवण्यासाठी येथून येऊ शकणार नाही. सुरुवातीला प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील. तुमच्यातील शक्ती ओळखा, स्वत: लढा देण्यास शिका, कधीही निराश होऊ नका.’

‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पण या ठिकाणी सामाजिक प्रश्नही हाताळले जातात. अनेक शेतकरी बियाण्यांच्या खरेदीविषयक समस्या घेऊन येतात. कुणी त्यांची फसवणूक केलेली असते. आम्ही त्यांना लढा देण्यासाठी सज्ज करतो. वेळप्रसंगी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घडवून आणतो. प्रश्नांची सोडवणूक स्वत: करण्यास शिकणे, हा मूलमंत्र या ठिकाणी देण्यात येतो’, असे प्रा. रवींद्र खांडेकर सांगतात.

या अभियानात मोलाचे सहकार्य करणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नंदकिशोर चिखले माहिती देतात, ‘हे अभियान सुरू झाले, तेव्हा त्याचे स्वरूप छोटे होते. पण दहा वर्षांमध्ये या अभियानाने मोठा पल्ला गाठला आहे. आतापर्यंत १ लाख १० हजार शेतकऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांना दोन दिवसांमध्ये प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाते. कृषीविषयक प्रशिक्षण, आधुनिक शेती व्यवहार याविषयी माहिती दिली जाते. शेतकरी येथून गेल्यानंतर आपल्या गावातील शेतकऱ्यांनाही त्याची माहिती देतात. ही साखळी प्रक्रिया आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी या अभियानाचा लागलेला हातभार, हेच या अभियानाचे फलित आहे.’  शेतकऱ्यांची गावातील चावडी आता संपल्यागत असताना, एका ठिकाणी प्रेरणा देणारे चार शब्द कानी पडतात. निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. आपण एकटे नाही, कुणी तरी पाठीशी आहे, हे उमजते. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. पण त्यांचे आरोग्याचे प्रश्न, इतर समस्या सोडवण्यासाठीही या मोहिमेत सामील झालेले तज्ज्ञ धावून येतात, हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत असते.

अभियानाचे फलित

आतापर्यंत १ लाख १० हजार शेतकऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांना दोन दिवसांमध्ये प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाते. कृषीविषयक प्रशिक्षण, आधुनिक शेती व्यवहार याविषयी माहिती दिली जाते. शेतकरी येथून गेल्यानंतर आपल्या गावातील शेतकऱ्यांनाही त्याची माहिती देतात. ही साखळी प्रक्रिया आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी या अभियानाचा लागलेला हातभार, हेच या अभियानाचे फलित आहे.

 

Story img Loader